परिचारिकेवर बलात्कार
मुख्य आरोपीसह डॉक्टरला सश्रम कारावास
वाशीम, ३ जुलै / वार्ताहर
मंगरुळपीर येथील खाजगी रुग्णालयातील परिचारिकेवर बलात्कार केल्याबद्दल हनिफ मोहनवाले याला ७ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि याप्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्या डॉ. राजेश चौधरीला ३ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन्ही आरोपींना ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त व सत्र न्यायाधीश एम.आर. मंथनवार यांनी सुनावली.
बलात्कारपीडित परिचारिका डॉ. राजेश चौधरीकडे काम करीत होती.
पालख्यांच्या मिरवणुकीने यवतमाळ भक्तिमय
यवतमाळ, ३ जुलै / वार्ताहर
डोक्यावर पागोटे, खांद्यावर भगव्या पताका, कपाळावर चंदन टिळा आणि बुक्का, कंठी तुळशी माळा, हातात टाळ आणि मृदंग असलेले असंख्य ‘विठ्ठल भक्त’ शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त दिंडय़ा आणि पालख्या घेऊन यवतमाळात रुक्मिणी पांडुरंग संस्थानात दाखल झाले. यवतमाळात ‘मिनी-पंढरी’ अवतरली असे वाटू लागले.
मोहा, मासळी, बोरगाव, माधनी, चमेडिया नगर, गजानन महाराज देवस्थान, सत्यसाई सेवा समिती इत्यादी ठिकाणच्या पालख्यांची मिरवणूक शहरात काढण्यात आली.
शेगावात अवतरली पंढरी
मुरलीधर काळे
शेगाव, ३ जुलै
विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारकऱ्यांनी प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या शेगावात आषाढी यात्रेचा अनुपम सोहोळा अनुभवला.गजानन महाराजांच्या पंढरीत आषाढी एकादशी यात्रा सोहोळा शुक्रवारी लाखोच्या वर भाविकांच्या उपस्थितीत झाला. गजानन महाराजांनी पंढपुरात भक्त बापूना काळे यांना पाटील यांच्या वाडय़ात (मठात) विठ्ठल रूपात दर्शन दिले.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी सभागृहाचे अतिक्रमण तोडणार
बुलढाणा, ३ जुलै / प्रतिनिधी
राष्ट्रपतींच्या आगमनानिमित्ताने त्यांचा प्रवास मार्ग प्रशस्त करण्यासाठी कारंजा चौकातील भव्यदिव्य प्रश्नसादिक वास्तू असलेल्या तिरुपती मंगल कार्यालयाचे अतिक्रमण तोडण्याच्या कारवाईला नगरपालिकेने प्रश्नधान्य दिले आहे. नगरपालिकेने तिरुपती मंगल कार्यालयाचे ६७४ चौरस फूट अतिक्रमण विहित मुदतीच्या आत काढून टाकावे अन्यथा ते पाडून टाकले जाईल, अशी नोटीस मंगल कार्यालयाच्या मालक संचालकांना दिली आहे. याला मुख्याधिकारी संजीव ओव्हळ यांनी दुजोरा दिला आहे.
मतदारसंघांच्या निवडीवरून सावळागोंधळ
परिसीमनानंतर मतदारसंघांमध्ये झालेल्या फेरबदलांमुळे अमरावती जिल्ह्य़ातील अनेक पुढाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच भाजप-शिवसेनेतही मतदारसंघांच्या निवडीवरून सावळा गोंधळ आहे. हक्काचे मतदारसंघ दोन आमदारांना सोडावे लागले. एका आमदाराला त्याच्या मतदारसंघात स्वारस्यच उरलेले नाही. जागा वाटपाच्यावेळी जी स्पर्धा चालेल तिचा अंदाज एव्हाना सर्वाना आला आहे. राष्ट्रपतीपुत्र रावसाहेब शेखावतांच्या अमरावती विधानसभा मतदार संघातील तयारीने पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्यासमोर चांगलेच आव्हान उभे केले आहे.
अदानीसंबंधीच्या बैठकीत गदारोळ
*शासनाच्या भूमिकेचा निषेध
* एका सदस्याचा राजीनामा
*दोन सदस्यांचा सभात्याग
चंद्रपूर, ३ जुलै/ प्रतिनिधी
राज्याच्या तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी फेटाळलेल्या अहवालावर पुन्हा शासनाच्याच व्यासपीठावर चर्चा कशी? असा प्रश्न उपस्थित करत अभ्यास गटातील वन्यजीव प्रेमींनी आक्षेप घेतल्याने अदानी उद्योग समूहाच्या प्रस्तावित कोळसा खाणीच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या अभ्यास गटाची पहिलीच बैठक अतिशय वादळी ठरली. शासनाच्या ‘अदानी बचाव’ भूमिकेचा निषेध करीत काही सदस्यांनी सभात्याग केला तर एका सदस्याने राजीनामा दिला.
पोलीस शिपायाच्या घरून सागवान जप्त
गोंदिया, ३ जुलै / वार्ताहर
घराचे फर्निचर बनविण्यासाठी पोलीस शिपायाने अवैधरीत्या आणलेले सागवान वन विभागाच्या पथकाने छापा टाकून नुकतेच जप्त केले. सागवानच्या ५१ पाटय़ा जप्त करण्यात आल्या असून सागवानची किंमत सुमारे १० हजार रुपये आखली आहे. पोलीस शिपाई संतोष पाठक यांच्या घराचे बांधकाम गणेशनगरात सुरू असून घराची दारे, खिडकी व फर्निचर बनविण्यासाठी त्यांनी सागवानाचे चिराण आणले होते. हे चिराण अवैधरीत्या आणण्यात आल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने पाठक यांच्या घरावर छापा घातला. या छाप्यात सागवानच्या सहा फूट लांबीच्या ५१ पाटय़ा जप्त करण्यात आल्या असून काही लाकूड घरात वापरण्यात आले आहे. सागवान कुठून आणले याबाबत पथकाने पाठक यांना विचारपूस केले असता त्यांनी सातलवाडा येथील शेतकऱ्यांचा सातबाराचा उतारा दाखवला.
मूर्तीजापूरजवळ अपघात; एक ठार, सहा जखमी
अकोला ३ जुलै/ प्रतिनिधी
मूर्तीजापूरजवळील आसरा फाटय़ावर शुक्रवारी दुपारी मिनीडोरने इंडिकाला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक मुलगा ठार झाला असून सहा जखमी झाले आहेत. अमरावतीहून अकेाल्याकडे येणाऱ्या इंडिकाला एका मिनीडोरने जोरदार धडक दिली. मूर्तीजापूरजवळील आसरा फाटा येथे झालेल्या अपघातात सात जखमी झाले. यातील सौरभ साऊतकर याचा अकोला येथे सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इंडिकामधील अन्य सहाजण जखमींवर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये प्रवीण तायडे, राजू काळे, सुनील वानखडे, राम काळे, सुनील सरदार आणि निरंजन यांचा समावेश आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मिनीडोरचालक अपघातस्थळाहून पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
शेतकऱ्यांच्या मनात रुखरुख
मूर्तीजापूर, ३ जुलै / वार्ताहर
तालुक्यात पावसाने शेतकरी सुखावला असला तरी मान्सूनच्या लहरीपणामुळे मात्र खरीप पेरण्यांबाबत त्याच्या मनात रुखरुख कायमच आहे. रोहिणी, मृग नक्षत्र पार कोरडे गेल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. दरम्यान, आद्र्रा नक्षत्राच्या २९ जून रोजी तालुक्यात झालेल्या पावसाने त्याला थोडे ‘हायसे’ वाटू लागल.े परंतु, केवळ ३६ मि.मी. पावसाच्या भरवशावर खरीप पेरणीला सुरुवात करावी कशी या संभ्रमात कास्तकार आहे. २९ जून नंतर मूर्तीजापूर तालुक्यात अद्यापही दुसऱ्या पावसाची हजेरी लागली नाही. १५ जुलैनंतर खरीप पेरणी करू नका हा कृषी तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेता केवळ ३६ मि.मी.च पडलेल्या पावसावर भिस्त ठेवून शेतकऱ्यांना पेरण्या करणे परवडणार नाही, असे जाणत्या कास्तकारांचे मत आहे. महागडे बी-बियाणे खते यांचा विचार करता कास्तकारही पेरणीसाठी सध्या तरी हिंमत बांधू शकत नाही. मात्र, तरीही काहींनी मान्सूनला आव्हान देत तालुक्यात पेरण्या सुरू केल्या .
भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा
भंडारा, ३ जुलै / वार्ताहर
विधानसभा निवडणुकीकरिता जिल्ह्य़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे स्पष्ट आवाहन राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे केले. जिल्हा काँग्रेस समितीच्या सभेत ते बोलत होते. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारींचे निराकरण केले जाईल, असेही आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले.या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर लिचडे होते. सभेला आमदार सेवक वाघाये, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नारायण तितिरमारे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रमिला कुटे उपस्थित होते. जिल्ह्य़ातील समस्यांबद्दल आशीष पात्रे, विठ्ठलराव कहालकर, रूपेश बांगळकर यांनी माहिती दिली. सभेचे संचालन प्रेमसागर गणवीर यांनी केले, तर आभार सुनील समरीत यांनी मानले.
कृषी दिन कार्यक्रमाकडे मंत्री, आमदारांची पाठ
भंडारा, ३ जुलै / वार्ताहर
भंडारा जिल्हा परिषदेच्यावतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषीदिन कार्यक्रमाला केंद्रीय, राज्यशासनातील मंत्र्यांसह तीन आमदारांनीही पाठ फिरवली. विधान परिषद सदस्यही आले नाहीत.
निमंत्रण पत्रिकेनुसार या कृषीदिन कार्यक्रमाचे उद्घाटक नागरी विमान उड्डयन राज्यमंत्री प्रफुल्ल पटेल होते. अध्यक्षस्थानी जलसंपदा लाभक्षेत्र व आदिवासी विकास वने व पर्यावरण राज्यमंत्री विजय वडेट्टीवार राहणार होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण, विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय कल्याण, खनिकर्म व रोहयो राज्यमंत्री नाना पंचबुद्धे राहणार होते. आमदार बंडूभाऊ सावरबांधे, आमदार सेवकभाऊ वाघाये, आमदार मधुकर कुकडे, विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन, केशवराव मानकर यांची नावे पत्रिकेत छापली होती.हे सारे मान्यवर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावरील कार्यक्रमाला येणे अपेक्षित होते. निश्चितच हे गैरहजर राहणे, शेतकऱ्यांचा तसेच जनमानसाचा अपमान करणारे ठरले आहे.
पदवीधर अंशकालीन संघटनेचे ७ जुलैला मुंबईत आंदोलन
गोंदिया, ३ जुलै / वार्ताहर
पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्यावतीने सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस मुंबई येथील मुख्य कार्यालयासमोर येत्या ७ जुलैला आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यात वर्ग-३ ची ४८ हजार पदे रिक्त आहेत, तर १७ हजार ५६४ पदवीधर अंशकालीन कर्मचारी असूनही त्यांना या रिक्त पदावर सामावण्यात आले नाही. सत्ताधारी पक्ष व सरकारच्या वतीने अनेकदा आश्वासन देऊनही अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीरतेने कुणीच घेत नसल्याने त्यांचे वय वाढत असून सत्ताधारी पक्ष टाळाटाळ करीत आहे. बेरोजगारांची दिशाभूल करणाऱ्या पक्षाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयासमोर ७ जुलैला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष रेखा अहिरराव, कार्याध्यक्ष मनोज गायकवाड व गोंदिया जिल्हाध्यक्ष तीर्थराज हरिणखेडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आज लाखांदूरला धरणे
साकोली, ३ जुलै / वार्ताहर
शिक्षण सेवक कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शाखेच्यावतीने ४ जुलैला लाखांदूर तहसील कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहे. शनिवारला दुपारी २ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्र सरकारने शिक्षण सेवक सारखी प्रतिगामी योजना अंमलात आणून शिक्षण क्षेत्राचा बट्टय़ाबोळ केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सर्व शिक्षण सेवक, शिक्षक व शिक्षिकांनी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे लाखांदूर तालुका कार्यवाह जयंत तुलसीदास झोडे, तालुका अध्यक्ष पी.जी. कापगते यांनी केले आहे.
मर्दानी महिला आस्था मंचचे सोमवारी धरणे
चंद्रपूर, ३ जुलै / प्रतिनिधी
‘समान संधी, समान सत्ता, अध्र्या महिला अर्धी सत्ता’ हा नारा देत महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी मर्दानी महिला आस्था मंचच्यावतीने सोमवार, ६ जुलैला येथील वसंत भवनासमोर महिला आरक्षण धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.लोकसंख्येच्या प्रमाणात महिला अध्र्या आहेत तर त्यांचा सत्तेत सहभाग २० टक्के करावा, अशी एक विचारधारा सुरू आहे. खरं तर अर्धा सहभाग महिलांना मिळायला हवा होता तो ३३ टक्केवर आणला. अनेक कसोटय़ा पार करत या निवडणुकीसाठी तरी हे आरक्षण लागू करावे, अशी सर्व महिलांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करून घेण्यासाठी सर्व पक्षाच्या महिलांनी एकत्रित येऊन ‘एक जोर का धक्का’ देण्याची गरज आहे. यासाठी मर्दानी महिला आस्था मंचच्यावतीने ६ जुलैला धरणे धरण्यात येणार आहे. या आंदोलनात बहुसंख्य महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार शोभा फडणवीस, डॉ. रजनी हजारे, शोभा पोटदुखे, डॉ. किरण अंदनकर, विमल गाडेकर, नंदा अल्लूरवार, प्रभा चिलके, अनिता कथडे, नीलिमा शिरे, अंजली घोटेकर, माधुरी येरणे, विद्या मसादे, शोभा महंतो, पद्मा पांडे यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पाऊस
गडचिरोली, ३ जुलै / वार्ताहर
गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासात एकूण २२१.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाची सरासरी १८.४ मि.मी. एवढी आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १२४४.१ मि.मी. पावसाची नोंद झालेली असून त्याची सरासरी १०३.६ आहे. मागील वर्षी ३०५५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. पावसाची सरासरी २५४.६ मि.मी. एवढी होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्म्याहून कमी पाऊस झालेला आहे. गडचिरोली-११४.४ मि.मी. (५.४ मि.मी.) धानोरा-१०१.६(४०.०), चामोर्शी-९४.०, मुलचेरा-१२८.६ (६.०), देसाईगंज-१२२.४ (३८.०), आरमोरी-२०२.६(८०.२), कुरखेडा-१२४.१ (४५.७), कोरची-२१.२ (१.२), अहेरी-९१.३, अशी पावसाची यंदा नोंद झाली आहे.
फळ विक्रेत्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची अखंड सेवा
पुलगाव, ३ जुलै / वार्ताहर
गांधीचौकात एका हातगाडीवर फळ विकणाऱ्या एका महिलेच्या दुकानाभोवती भली मोठी गर्दी पाहून जाणारा वाटसरू अवाक झाल्याशिवाय राहात नाही. पण, ही गर्दी फळ घेणाऱ्या ग्राहकांची नसते तर सत्यप्रती साक्षांकित करून घेणाऱ्या पालकांची व विद्यार्थ्यांची असते. गांधी चौकात फळाच्या हातगाडी वर शकुंतला गावंडे या विशेष कार्यकारी अधिकारी अडल्या नडल्यांच्या प्रती साक्षांकित करून देण्याचे काम अखंडपणे करीत असते. फळांचे दुकान व ग्राहक सांभाळून ही समाजसेवा त्या चोखपणे बजावत आहेत. त्यांच्या दुकानावर साक्षांकित प्रतीसाठी गर्दी असते.त्यांचा काटेकोरपणाही वाखाण्यासारखाच आहे. मूळ कागदपत्रे पाहूनच प्रती साक्षांकित करण्यात त्या अजिबात कुचराई करीत नाही. त्यामुळे अनेकांना मूळ कागदपत्रासाठी मात्र हेलपाटे मारावे लागते. राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला प्रतिनिधी आहेत.
जानकीबाई देशमुख शाळेचे यश
अचलपूर, ३ जुलै / वार्ताहर
इयत्ता १० वीच्या परीक्षेत येथील जानकीबाई देशमुख कन्या विद्यालयाने घवघवीत यश प्रश्नप्त करून आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेचा निकाल ८८.२ टक्के लागला असून १४२ विद्यार्थिनींनी दिलेल्या परीक्षेत १२५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. या शाळेतून मोनिका अशोक अंबाडकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला ९१.६९ टक्के गुण आहेत. द्वितीय वर्षा श्रीरामजी मुगल हीला ६५० पैकी ५८६ गुण म्हणजे ९०.१५ टक्के मार्क्स आहेत. तृतीय क्रमांक पूजा संजय जायले हिला ६५० पैकी ५६४ एवढे म्हणजे ८६.७६ टक्के गुण आहेत. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थाध्यक्ष माधुरी देशमुख, अॅड. दीपक देशमुख, गोविंद हरदास, माजी प्रश्नचार्य दादासाहेब बेंडे, प्रश्नचार्य ज्योती जोशी आदींनी स्वागत केले आहे.
मूर्तीजापूरच्या ठाणेदाराचा सत्कार
मूर्तीजापूर, ३ जुलै / वार्ताहर
पोलीस निरीक्षक ओमप्रकाश अंबाडकर यांचा भाजप कार्यकर्त्यांनी नुकताच सत्कार करून निरोप दिला तर नव्याने येथे रुजू झालेल्या ठाणेदार प्रल्हाद गिरी यांचे स्वागत केले. हरीश पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या समारंभात यवतमाळ जिल्ह्य़ात बदलून गेलेले ठाणेदार अंबाडकर यांना भाजप कार्यकर्त्यांनी भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या तर नव्याने मूर्तीजापुरात बदलून आलेले ठाणेदार प्रल्हाद गिरी यांचे कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी गिरीश गांधी, नीलेश हांडे, सचिन राऊत, रवी सोळंके, गजानन बावणे, आशीष कनोजे, बबलु बावणे उपस्थित होते.
खामगाव नगरपालिकेत दर सोमवारी जनता दरबार
खामगाव, ३ जुलै / वार्ताहर
खामगाव नगरपालिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोककुमार सानंदा यांनी नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी जनता दरबार ही अभिनव संकल्पना सुरू करण्याचे ठरविले आहे. दर सोमवारी शहरातील प्रत्येक वॉर्डातील नागरिकांसाठी खुल्या जनता दरबाराचे आयोजन पालिकेत केल्या जाणार आहे. नागरिकांच्या वतीने मांडण्यात येणाऱ्या समस्या व तक्रारींचे निवारण तात्काळ नगर परिषदच्या विविध विभागाच्या खातेप्रमुखांच्या व संबंधित वॉर्डाच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत निराकरण करण्यात येईल. खामगाव शहरात प्रथमच ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत असून नगर परिषदचे प्रशासक अधिकाधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सदर संकल्पना राबविण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष अशोक सानंदा यांनी सांगितले.
बल्लारपूर पेपरमिलचे १३४ कर्मचारी सेवानिवृत्त
बल्लारपूर, ३ जुलै / वार्ताहर
बल्लारपूर पेपरमिलसारख्या ख्यातनाम उद्योगातील आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर ज्यांनी १ जून २००९ पूर्वी व १ जुलै २००८ नंतरच्या काळादरम्यान आपल्या वयाची ६० वर्षे पूर्ण केली असे अधिकारी, कारकून व कर्मचारी मिळून १३४ सेवानिवृत्तांना निरोप देण्याचा कार्यक्रम ऑडिटोरियम पेपरमिल बल्लारपूर येथे ३० जून रोजी आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट पेपरमिल मजदूर सभेचे सरचिटणीस वसंत मांढरे उपस्थित होते. १३ लिपीक, ७ अधिकारी व उर्वरित कामगार अशा १३४ सेवानिवृत्तांना भावी आयुष्याविषयी शुभेच्छांसह व्यवस्थापनातर्फे भेटवस्तू देऊन यावेळी निरोप देण्यात आला.
महाबीज सोयाबीन बियाणे विक्रीस उपलब्ध
बुलढाणा, ३ जुलै / प्रतिनिधी
खरीप २००९ हंगामात महाबीज सोयाबीन बियाणे जे.एस. ३३५ विपणनाचे जिल्ह्य़ात तालुका स्तरावर, महाबीज विक्रेत्यांकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे महाबीज जिल्हा व्यवस्थापक बी.बी. देशमुख यांनी कळविले आहे. बियाणे हे प्रमाणित असल्यामुळे उत्पादनात वाढत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाबीज सोयाबीन जे.एस. ३३५ वाणाची खरेदी करून पेरणी करावी, असे आग्रही प्रतिपादन केले आहे. महाबीज बियाणे इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत सुद्धा रास्त आहे.
खामगाव रुग्णालयाची पाहणी
खामगाव, ३ जुलै / वार्ताहर
जिल्हा शल्य चिकिस्तक आर.जे. नरवाडे यांनी सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना सूचना केल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेळेवर ‘डय़ुटी’वर हजर राहण्यासोबतच पूर्णवेळ डय़ुटी करण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सन्मानजनक वागणूक देण्यासही सुचविले. पावसाळ्याच्या दिवसात रुग्णालय स्वस्छ ठेवण्यासंबंधी आदेश दिले. यावेळी वैद्यकीय अधिकारी ठोसर, डॉ. कलंत्री उपस्थित होते.
प्रत्येक तालुक्यात औषध उद्यान निर्मिती
कारंजा (घाडगे), ३ जुलै / वार्ताहर
सामाजिक वनीकरणाचे सहाय्यक संचालक जर्नेलसिंग यांनी वर्धा जिल्ह्य़ातील आष्टी व कारंजा तालुक्यातील वनीकरण कामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत वर्धा जिल्हा सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक प्र.शं. पवार होते. प्रत्येक तालुक्यात केंद्र शासनाच्यावतीने औषधी उद्यानाची निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटी दरम्यान त्यांनी मॉडेल हायस्कूल कारंजा येथील जागेची पाहणी केली. सोबतच राष्ट्रीय हरित सेनेच्या उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक पी.पी. मोहोड, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रभारी शिक्षक विलास वानखडे, सामाजिक वनीकरणाचे सहाय्यक लागवड अधिकारी जनार्दन ढोबाळे उपस्थित होते.
पोलीस पाटलांच्या संस्थाध्यक्षपदावर गदा
चिखली, ३ जुलै / वार्ताहर
बोरगाव काकडे येथील पोलीस पाटील विजय काकडे यांच्या सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदावर सहकार विभागाने नोटीस पाठवून गदा आणली आहे. स्वयंप्रकाश मजूर कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष असलेले विजय काकडे हे बोरगाव काकडे येथील पोलीस पाटील आहेत. पोलीस पाटील या पदासाठी वेतन मिळत असल्याने ते ‘मजूर’ या संज्ञेत येऊ शकत नसल्याचे या पदावरील व्यक्ती सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सहभागी होऊ शकत नसल्याचा दाखला देत सहकार कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत संस्थाध्यक्ष पदापासून कमी करण्याबाबत ‘कारणे दाखवा’ सूचना दिली आहे.
शहर काँग्रेस उपाध्यक्षपदी अक्कलवार
घाटंजी , ३ जुलै / वार्ताहर
शहर काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर अक्कलवार यांची निवड झाली. या निवडीबद्दल कार्यकर्त्यांत आनंद व्यक्त होत आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, शिक्षणसभापती देवानंद पवार, सुरेश लोणकर यांनी निवडीचे स्वागत केले आहे.
चिखलीत वृक्षतोड
चिखली, ३ जुलै / वार्ताहर
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील येत्या १७ जुलैला येथे येत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील काही भागातील मोठे वृक्ष तोडण्यात येत आहेत. खंडाळा मार्गावरील एका शाळेजवल राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड तयार करण्यात येत आहे. या मार्गावरील काही मोठय़ा झाडांवर निर्दयपणाने कुऱ्हाड चालवण्यात येत आहे. जिल्हा परिषद मैदानावर आयोजित सभास्थळापर्यंत अनेक झाडे कापण्यात आली आहेत. पिंपळ, निलगिरी, अशोका इत्यादी मोठय़ा व बहारदार वृक्षांची तोड होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गुणवंतांचा सत्कार
पुलगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पुलगाव, ३ जुलै / वार्ताहर
धम्मशील महिला सेवा संघाच्यावतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार व गुणवत्ताप्रश्नप्त विद्यार्थ्यांचा गौरव सोहोळा नाचणगावच्या भिक्षू निवास प्रश्नंगणात नुकताच झाला. प्रीती मानवटकरांच्या स्वागतगीतानंतर गौतम ताकसांडे यांनी प्रश्नस्ताविक केले. पाहुण्यांच्या हस्ते पी.एम.टी. व पी.ई.टी. परीक्षेत गुणवत्ताप्रश्नप्त विद्यार्थी रोशन मोकाती, शशांक म्हात्रे, पल्लवी मेश्राम, नेहा बोराटणे, हर्षा करोडे, रोमी थुल, आकाश शेतेवार, प्रवीण किंदर्ले, वैभव रोठे, प्रिया बोबडे, रेशमा चांदोरे यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नाचणगावचे नवनिर्वाचित सरपंच शंकर राऊत, उपसरपंच वर्षा तडस, सदस्य दिलीप बन्नगरे, देवकांत चिचाटे, राम पोलकडे, प्रवीण घोडेस्वार, वर्षा नंदेश्वर, ज्येष्ठ नागरिक सुभाष मैत्रे, माजी सरपंच हरिभाऊ साठे व पत्रकार प्रमोद बोराटणे यांचा सत्कार करण्यात आला.
ज.मु. पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत
भंडारा, ३ जुलै / वार्ताहर
ज.मु. पटेल महाविद्यालयातील ११ विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २००८ च्या परीक्षांमध्ये विविध विषयांच्या गुणवत्ता यादीत चमकले. गृहअर्थशास्त्र विषयात एम.ए. द्वितीय वर्षाला प्रियंका लेखराज बावणकर गुणवत्ता यादीत प्रथम तर गीता सुखदास मेश्राम द्वितीय स्थानी आली. इतिहास विषयात सुनंदा बालेश्वर तुरकर सातवी आली. भूपेंद्र हरिश्चंद्र भुसारी आठवा आला तर पुंडलिक जयपाल चौधरी दहावा आला. समाजशास्त्र विभागात तृप्ती मार्गेश गणवीर चौथा, मंगला प्रेमलाल कटरे आठवी, मंजू हरिश्चंद्र थोटे दहावा आहे. डिप्लोमा इन बिझिनेस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात सीमा राजकुमार साजिदा ही गुणवत्ता यादीत सातवी आली. एम.बी.ए.च्या अभ्यासक्रमात भूषण ओमप्रकाश गभणे गुणवत्ता यादीत पाचवा आला. एम.कॉम. अभ्यासक्रमात सीमा अ. हुसैन गुणवत्ता यादीत तिसरी आली.
रिसोडचे विद्यार्थी चमकले
रिसोड, ३ जुलै / वार्ताहर
स्थानिक भारत माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी स्नेहल विठ्ठलराव खरात हिने शालेय परीक्षेत एकूण ९३.२३ टक्के गुण मिळवून रिसोड तालुक्यातून मुलींमधून दुसरी येण्याचा बहुमान प्रश्नप्त केला आहे. भविष्यात स्नेहलला इंजिनिअर व्हायचे आहे. तिने गणितामध्ये १५० पैकी १५० गुण मिळवले आहेत. भावना पब्लिक स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सर्व २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेमधून निखिल दिनकर नागरे हा ८८.३० टक्के गुण घेऊन प्रथम आला. निखिलला गणित विषयात १५० पैकी १४८ गुण आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे खासदार भावना गवळी, प्रश्नचार्य जोसेफ लिंकन, मेरिएट नेल्सन यांनी अभिनंदन केले. आशीष काळे याने २००९ च्या पी.एम.टी. परीक्षेत १७८ गुण प्रश्नप्त करून ओ.बी.सी. प्रवर्गातून राज्यातून ७७ वा आला आहे. त्याला आई, वडील कुटुंबीयांचे मार्गदर्शन लाभले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक.
कृषक इंग्लिश विद्यालयात विद्यार्थ्यांचा गौरव
आर्वी, ३ जुलै / वार्ताहर
कृषक इंग्लिश विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेचे ४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी एकूण ८ विद्यार्थी ९० टक्के च्या वर गुण मिळवून यशस्वी झाले व एकूण १७ विद्यार्थ्यांनी ८० ते ८९ टक्के गुण प्रश्नप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेची विद्यार्थिनी खुशबू रमेशचंद्र मंशानी ९४.१५ टक्के गुण मिळवून जिल्ह्य़ातून द्वितीय आली आहे तर तुषार पुरुषोत्तम तडस ९३.८४ टक्के गुण मिळवून जिल्ह्य़ातून चौथा व मुलांमधून द्वितीय आला आहे. संकेत वासुदेव अग्रवाल याने ९३.२३ टक्के गुण मिळवून शाळेतून तृतीय क्रमांक प्रश्नप्त केला आहे.या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सत्कार सोहोळा नुकताच झाला. |