मासिक पाळी ही जगभरातल्या बहुसंख्य स्त्रियांच्या प्रगतीतला अडथळा ठरलेला आहे. कारण त्याभोवती असणारं आरोग्यविषयक अज्ञानाचं, शरमेचं वा धर्माचं कोंडाळं. र्अध जग व्यापणाऱ्या स्त्रीसाठी आरोग्य आणि शिक्षणाची दारं मोकळी करायची असतील तर धर्ममरतडांनीही रजस्वलेला अपवित्र, अशुद्ध मानणं सोडून द्यायला हवंय..

स्त्री च्या मासिक पाळीला विटाळ, अपवित्र, अशुद्ध मानल्यानं तिचं जे काही आध्यात्मिक, धार्मिक नुकसान झालं आहे त्याहीपेक्षा किती तरी गंभीर नुकसान तिच्या शैक्षणिक प्रगतीचं आणि आरोग्याचं झालं आहे. आजही बहुसंख्य देशांत मासिक पाळी ही कुजबुजण्याचीच गोष्ट आहे. अगदी अमेरिकेसारख्या विकसित देशात, भारत, चीनसारख्या विकसनशील देशांत आणि अगदी कंबोडिया, केनियासारख्या मागास भागातही. बाईचं प्रजननक्षम असणंच तिच्या प्रगतीच्या आड येत आहे ही आजच्या एकविसाव्या शतकाची शोकांतिका आहे.
जगातल्या ६६ टक्के मुलींना त्या वयात येईपर्यंत मासिक पाळीविषयीची माहिती नसते. अमेरिकेतही अगदी १९८० पर्यंत ही शरमेची, लपवून ठेवायची गोष्ट होती. त्यातूनच मग एका १४ वर्षांच्या मुलीची मासिक पाळी सुरू झाल्यावर आपल्याला काही तरी भयंकर लैंगिक रोग झालाय असं समजून आत्महत्या करण्यासारखी घटना घडते. तर अनेक मुली आपल्याला कर्करोगासारखं काही तरी जीवघेणं झालंय असं वाटून नैराश्यग्रस्त होत असल्याचं आढळून आलंय. ‘युनिसेफ’च्या अहवालानुसार इराणमधल्या दहापैकी चार जणींना मासिक पाळी म्हणजे रोग वाटतो. (भारतातही प्रत्येक तिसरी मुलगी याबाबतीत अनभिज्ञ असते. त्यामुळे स्त्रीरोगग्रस्तांमधले ७० टक्के आजार हे मासिक पाळी संदर्भातील असतात.) अमेरिकेसारख्या देशातल्या अगदी दुर्गम भागांत राहणाऱ्या स्त्रियांना दरमहिना महाग सॅनिटरी पॅडपेक्षा टॉयलेट पेपर वापरणं परवडतं, पण त्यामुळे त्यांनाही आजारांना बळी पडावं लागतंय. मासिक पाळीत वापरायच्या गोष्टींवर आजही स्वस्त, आरोग्यदायी उपाय सापडला नसल्याने स्वच्छतेच्या बाबतीतले प्रश्न निर्माण झाले आहेत.
प्रत्येक स्त्री साधारण १२ ते ५० वर्षे या काळात प्रजननक्षम अवस्थेत असते. दर महिन्यातले चार ते पाच दिवस म्हणजे आयुष्यभरातले साधारण तीन ते साडेतीन हजार दिवस तिला या स्थितीतून जावं लागतं. या काळात दुखणारं ओटीपोट, पाय, कंबर त्याचबरोबर सॅनिटरी पॅड किंवा स्वच्छ कपडे नसणं. ते धुण्यासाठी पाणी, साबण इतकंच नाही तर लाजेस्तव ते कपडे सुकवण्यासाठी उन्हाचा एक छोटासा तुकडा नशिबी नसणं ही जगभरातल्या असंख्य स्त्रियांची शोकांतिका आहे. ही शोकांतिका झाली आहे ती पूर्वापार चालत आलेल्या अंधविश्वासामुळे, अंधश्रद्धेमुळे. मासिक स्राव अपवित्र वा अशुद्ध मानला गेल्यामुळे. तो अशुद्ध मानला गेला कारण शरीराला नको असलेल्या गोष्टींचं जिथून उत्सर्जन होतं तिथूनच हाही स्राव जात असल्यानं तोही अशुद्ध वा घाणेरडा मानला गेला असावा, असा मेरीलँड विद्यापीठातील स्त्रीरोग विषयाच्या प्राध्यापक जेन फेहेय यांचे मत आहे.
अनेक देशांतील रजस्वला स्त्रियांच्या वागण्यावर त्यामुळे मर्यादा आणल्या गेल्या. तिच्या स्पर्शाने पाण्याचा विटाळ होतो इतकंच नाही तिच्या शरीरात या काळात जी काही ऊर्जा वा उष्णता निर्माण होते त्यात म्हणे लोणचं खराब करण्याची ताकद असते आणि वाईन आंबट करण्याचीही. त्यामुळे तिचा स्पर्शही नको अशी भूमिका घेतली गेली. गंमत म्हणजे तिला स्पर्श केलेली व्यक्तीही अस्पर्श होते आणि अंघोळ केली की पुन्हा ‘पवित्र’ होते, असा समज अगदी आपल्याकडेही आत्ता आत्तापर्यंत होताच. यामुळे आपल्याप्रमाणेच नेपाळ, बांगलादेश, इराण, अफगाणिस्तान, चीन, इंडोनेशिया, केनिया, आदी देशांत किंवा तिथल्या काही भागांत आत्ता आत्तापर्यंत पारंपरिक विचाराचं जाळं घट्ट होतं. चीनमध्ये तिला देवळात जायला, लग्नात, अंत्ययात्रेला, वाढदिवस समारंभात जायलाही मनाई असते, तर पूर्व कंबोडियामध्ये आजही काही भागांत त्या दिवसांत तिला स्वत:साठी वेगळी झोपडी करून त्यात राहावं लागतं. नेटिव्ह अमेरिकी लोकांमध्ये मात्र अशा रजस्वला स्त्रीला खूप महत्त्व असायचं. त्या काळात तिच्या शरीरात वेगळी ताकद येते असं मानून महत्त्वाच्या निर्णयात तिचा सल्ला घेतला जायचा, पण असे अनुभव अपवादात्मक. एकूणच पुरुषप्रधान संस्कृतीनं तिच्या स्वातंत्र्याला मासिक पाळीचं कडं घालून ती शरमेची गोष्ट करून टाकली आणि पर्याय नसल्यानं कदाचित स्त्रीजातीनेही ते एकजात स्वीकारलं असावं. ते स्वीकारणं खूप लवकर झालं असावं. मात्र त्यातून बाहेर पडणं हे खूप जिकिरीचं, विज्ञाननिष्ठेचा कस लावणारं असल्यानं जुन्या पारंपरिक, रूढी, दृष्टिकोनाला शास्त्र काटय़ाच्या कसोटीवर उतरावं लागणार आहे.
विकसित देशांत शिक्षणानं सुशिक्षित झालेल्या स्त्रीला मात्र आपलं हे संकुचित जगणं मान्य नव्हतं. आपल्याच शरीराची लाज आपण का बाळगावी म्हणून ‘हॅव हॅपी पीरिएड’ म्हणत त्यावर स्पष्टपणे बोलणं सुरू झालंय. पण जेव्हा इतर देशांची परिस्थिती अभ्यासली गेली तेव्हा मात्र शरमेनं मान खाली जाईल अशीच स्थिती होती. महिन्यातले ते चार-पाच दिवस तिला अंधाऱ्या खोलीत घालवावे लागत होते. काही जणी तर सुकी पानं, वर्तमानपत्रं यांचाही वापर करताना आढळल्या. मात्र सर्वात दु:खदायक बाब होती ती शिक्षणाचा अभाव. इतर अनेक कारणांबरोबरच तिची मासिक पाळी हे त्याचं मुख्य कारण आहे. अनेक मुली या काळात शाळेत जाऊच शकत नाहीत,आजही. कारण अनेक शाळांमध्ये मुलींसाठी पुरेशी शौचालये, पाण्याची व्यवस्था नाही. अशा अवस्थेत पॅड वा कपडा बदलण्याची सोय नाही. शिवाय मनात रुजवून ठेवलेली लाज आणि शरीरवेदनाही सोबत असतेच. आज जगातल्या अशिक्षित मुलांमध्ये दोनतृतीयांश या मुली आहेत, तर अशिक्षित प्रौढांमध्ये दोनतृतीयांश स्त्रिया!
‘युनिसेफ’नुसार आफ्रिकेतील दहापैकी एका मुलीची दर महिन्याला एक वा दोन सुट्टय़ा ठरलेल्याच असतातच पण नंतर त्या शाळेत येणं कायमचं बंद करतात. केनियाच्या शिक्षण मंत्रालयानुसार प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ८० टक्के मुली हायस्कूलला पोहोचेपर्यंत २० टक्केच उरतात. त्यामुळे शैक्षणिक अनास्था आपोआपच येते. त्यातून मग एके दिवशी शाळा सुटते आणि ती मुलगी थेट लग्नाच्या बोहल्यावर चढवली जाते. मग बालविवाह, बालमाता असं दुष्टचक्र सुरूच होतं. ‘एफएडब्ल्यूए’नुसार युगांडातल्या तर ९४ टक्के मुलींच्या मासिक पाळीसंदर्भात तक्रारी आहेत. आणि त्यातल्या ६१ टक्के मुलींची या काळात शाळेत सुट्टी असतेच असते. तेच घडतं अगदी घाना, नैरोबी, इथिओपिया येथेही!
दर महिन्याला जगभरातल्या अशा असंख्य मुलींची शाळा किमान २ ते ३ दिवस बुडतेच. कारण, मासिक पाळीभोवती रचून ठेवलेलं अस्वच्छतेचं, घाणेरडेपणाचं कडं! हे कडं तोडायला हवंच होतं. तोच प्रयत्न सुरू झाला २०१३ पासून. काही एनजीओंनी मिळून जगभरात २८ मे हा ‘मेन्स्ट्रअल हायजीन डे’ म्हणून साजरा करायला सुरूवात केली आहे. जगभरातील मुलींना स्वस्तातील सॅनिटरी पॅड मिळवून देणं वा कपडे तयार करायला शिकवणं. आरोग्यविषयी जागरूक करणं आणि मुख्य म्हणजे आपल्या शरीराचा अभिमान बाळगणं हा या चळवळीचा मुख्य उद्देश. जगभरात सुरू असलेल्या या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळत असून अगदी पुरुष वर्गही यात हिरिरीने सहभागी होतोय. माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला मला अधिक चांगल्या रीतीने समजून घेता येतंय, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडूनही येताहेत, हे सुचिन्हच!
आजही बहुसंख्य स्त्रियांना मासिक पाळीशी सामना करावा लागतोय तो कधी न परवडणारे महागडे सॅनिटरी पॅड वा टॅम्फून मिळत नाही म्हणून, तर कधी त्यांच्या विल्हेवाटीची व्यवस्था नाही म्हणून. (दररोज हजारो टनांचा सॅनिटरी पॅडचा कचरा तयार होतो) कधी त्याविषयीचं आरोग्यविषयक अज्ञान आहे तर कधी त्याभोवती धर्माचं कोंडाळं, कधी अस्वस्थ करणाऱ्या मनसंवेदना तर कधी बधिर करणाऱ्या शारीरसंवेदना.. ही कोंडी फुटायलाच हवीय.. अर्ध जग व्यापणाऱ्या स्त्रीसाठी आरोग्य आणि शिक्षणाची दारं मोकळी करायची असतील तर धर्ममरतडांनीही या रजस्वलेला अपवित्र मानणं सोडून द्यायला हवंय.
arati.kadam@expressindia.com
(सदर समाप्त)