‘महिरपी कंसातला चित्रपट’ हा अभिजीत ताम्हणे यांचा लेख वाचला. हे रडगाणे, पोटशूळ इ. आहे असं न समजता प्रामाणिक व अस्सल भावना आहेत असं गृहीत धरून ही प्रतिक्रिया देत आहे. मीही या चित्रपटाच्या अवाढव्य व्यापाचा एक छोटा घटक असलो तरी ही माझी व्यक्तिगत प्रतिक्रिया असून चित्रपटकर्त्यांच्या वतीने मी बोलत नाहीये. कोणताही चित्रपट एखाद्याला न आवडणं अगदीच शक्य आहे. तेव्हा ‘आमच्या सिनेमाला असं कसं बोललात?’ असा सूर नसून ‘तुम्हाला हे असं का वाटलं?’ याची निराश उत्सुकता आहे. प्रेक्षक-परीक्षण करावंसं वाटणं यावरही आक्षेप नाही. तेव्हा ही चर्चा ‘सहिष्णुतेच्या चौकटीत’ नक्कीच पुढे जाऊ शकेल.
पहिली गोष्ट म्हणजे ‘कटय़ार’ला उचलून धरणारा सर्व प्रेक्षकवर्ग एकसुरी असल्याचे विधान मला मान्य नाही. चित्रपटाची प्रसिद्धी, समाजमाध्यमांतील चर्चा व आपण जिथे चित्रपट पाहिला तिथल्या प्रेक्षकांचे चेहरे/कपडे पाहून हा निष्कर्ष काढणं कितपत सयुक्तिक आहे? पुणे-मुंबईच नव्हे, तर सर्वत्र प्रत्येक थरांतून ‘कटय़ार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवाय मी स्वत: तीन शहरांत चार पिढय़ांचा अफलातून प्रतिसाद अनुभवलाय; ज्यात ‘कटय़ार’ कोळून प्यालेले, वसंतरावांची भूमिका पाहून धन्य झालेले इथपासून ते नाटय़संगीत तर दूरच, पण मराठी सिनेमेही न पाहणारे, शंकर महादेवन व सचिन पिळगांवकरही फार माहिती नसलेले (वय वर्षे ऐंशी ते चार!) असे अनेकजण आहेत. या सर्वावर एकच शिक्का मारून आपण काय सिद्ध करू पाहताय?
दुसरा मुद्दा- पसंतीचे सूर म्हणून आपण दिलेली वाक्ये (म्हणजे ‘शंकर-एहसान-लॉय यांनी मराठीत संगीत दिलं, हेच मोठं!’, ‘मराठी सिनेमात एवढा खर्च केला, हेच खूप!’ इ.) अभावानेच ऐकायला मिळाली. बहुतांश प्रेक्षकांनी हे सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवत पडद्यावर जे दिसतंय त्याला टाळ्यांनी, डोळ्यांनी व तिकीट खिडकीतूनही मनापासून दाद दिली. मग ‘सुबोध भावेचा पहिलाच प्रयत्न’, ‘सचिन पिळगांवकर-सुबोध भावे यांच्या पूर्वीच्या भूमिका यांचा (अनावश्यक!) ताण आपणच वागवतोय का?’ प्रेक्षक ‘स्वतंत्र कलाकृती’ म्हणून आनंद घेत असताना आपणच ‘हे तुम्ही उपकृत भूमिकेतून करताय’ असा आरोप त्यांच्यावर करतोय का?
‘ही लाट फसली असती.. पण चित्रपट नाटकापेक्षा खरोखरच निराळा आहे, ही धारणा अखेर प्रबळ ठरली आणि तुलना झाली नाही.’ हे जर सत्य असेल तर हे खरं तर कौतुकास्पद नव्हे काय? की कौतुकही मोकळेपणानं केलं तर सुजाण प्रेक्षक म्हणून आपला वेगळेपणा सिद्ध होत नाही? नाटकावर आधारित चित्रपट हे माध्यमांतर करताना कथेत जे काही बदल केले गेले, त्या सर्वाना ‘सुलभीकरण’ या एकाच सदरात टाकणं हेच सुलभीकरण नव्हे काय? उलट, ‘मैलाचा दगड’ ठरलेल्या नाटय़कृतीमध्ये ‘प्रयोग’ करणं आणि ते लोकांनी स्वीकारणं ही दुर्मीळ गोष्ट आहे.
सिनेमात एकही चूक नाही असे कुणीच म्हणणार नाही. कुठलाही चित्रपट परिपूर्ण असू शकत नाही. केवळ भव्य आहे म्हणून लोकांनी तो स्वीकारावा, किंवा मग ‘कटय़ार’ही ‘केवळ भव्य’ आहे म्हणून तोही नाकारावा, असं विचित्र काहीतरी लेखातून सूचित होत आहे. चित्रपट आपल्याला मुळीच भावला नसेल हे मान्य करूनही प्रश्न पडतो की, चित्रपटातील एकही गोष्ट खरोखरच आवडली नाही? कारण नकारात्मक बाजू इतक्या तपशिलांत मांडल्यावर सकारात्मक बाजू मात्र ‘मानलं तर’ या एकाच सदरात? दृश्यमाध्यमातून साकारलेला सर्वच तपशील आपल्या मते अनावश्यक, भव्यतेच्या हव्यासापोटी, ‘आतून प्रकाश पाडण्याची’ क्षमता नसल्याने आलेला आहे? एकही क्षण आतपर्यंत भिडत नाही?
लेखात चित्रपटाच्या कथेतील काही दोषांची चर्चा आहे. तीही संक्षिप्त. महिरपीविषयी सविस्तर तक्रारी करून शेवटी ‘मूर्तीपण फार काही खास नाही’ असा शेरा मारल्यागत. खरं तर याविषयी सविस्तर चर्चा व्हायला हवी. प्रेक्षक-परीक्षण करायचेच असेल तर मूळ नाटकापेक्षा इतके बदल (आणि इतके दोष!) असलेला चित्रपट प्रेक्षकांना का हवाहवासा वाटला, याची कारणेही शोधायला हवीत. कारण आपल्याकडचा इतिहास असा आहे की, नवख्या सुधीर फडके यांनी आपली स्वतंत्र (व समर्थ) गायकी सादर केली तरी ‘बालगंधर्वाची सर नाही’ म्हणत नाकं मुरडणारे असतातच! तरीही जुन्या नाटय़पदांशी ‘खेळण्याचं’ आणि वर त्यात नवी गाणी ‘घुसडण्याचं’ धाडस लोकांच्या पचनी कसं पडलं, हा कुतूहलाचाच विषय आहे.
आपणच म्हटल्याप्रमाणे एक रसिक म्हणून होत असलेल्या लाभ-हानीचं गणित मांडूनच प्रेक्षक प्रतिसाद देतात. ‘आक्षेपाचे मुद्दे असूनही ते दबलेलेच आहेत’ याचे कारण लोकांना ते तितके महत्त्वाचे वाटत नाहीत, हेही असू शकते. आपण एकतर प्रेक्षकांना काय वाटतं हे पाहू किंवा मग आपले वैयक्तिक आक्षेप काय आहेत ते सांगू; दोन्हींची गल्लत करून दोघांवरही अन्याय नको. आणि जाहिरातशरणता हे आजचे वास्तव आहे. पण जाहिरातींचा भडिमार प्रेक्षकाला थिएटपर्यंत आणू शकतो; मात्र बाहेर पडताना गहिवरलेला प्रेक्षक हे चित्रपटकर्त्यांचे कर्तृत्व नाही का?
वैयक्तिकरीत्या मला ही ‘सुष्ट सुष्टच असतात आणि दुष्ट दुष्टच- असं ठसवणारी’ गोष्ट न वाटता एखादा उमद्या मनाचा उत्तम कलाकारही असूया व अहंकाराने पछाडला जाऊन किती टोकाचा विचार करू शकतो आणि त्याच्यातील गुणग्राहकता त्याच्या हिंसकतेवर विजय मिळवून त्याला आत्मभान देते, याची गोष्ट वाटते. अर्थात हा अनुभव व्यक्तिसापेक्ष आहे. तेव्हा चित्रपटातून काय पोहोचतं, काय पोहोचत नाही, काय भावतं, अजून काय करता आलं असतं, कुठे चित्रपट बाजूला राहतोय आणि गाणंच भाव खाऊन जातंय (किंवा कदाचित याउलटही!), याची सविस्तर व तटस्थ चर्चा झालेली नक्कीच आवडेल. आणि नाटक-चित्रपट तुलना करायचीच असेल तर नाटय़संहितेतील तर्कदोष, गायक-नटांच्या अभिनयातील मर्यादा, इ. मुद्दे घेऊन नि:पक्षपाती पद्धतीने करावी लागेल. जाता जाता ‘डेकोरम’ला मराठी प्रतिशब्द ‘पावित्र्य’ हाही असू शकेल. पण असं पावित्र्य वा डेकोरम जपण्यासाठी ‘कटय़ार’वर टीका करू नका. ‘एवढा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे म्हणून चांगलं म्हणा’ असं मी तरी म्हणणार नाही. उलट, विधायक टीका ही आवश्यकच आहे. साधकबाधक चर्चा उपयोगीच ठरते. पण ती महिरपीपेक्षा मूर्तीबद्दल केली तर अधिक उचित ठरेल, नाही का?
मंदार कमलापूरकर