‘लोकरंग’ (१७ जुलै)मधील ‘उदास वाटते जीवी’ हा समर्थ साधक यांचा लेख वाचला. ‘उदास विचारे वेच करी’ म्हणजे काय, याचा उलगडा आजच्या तरुणाला जे. आर. डी. टाटांपर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर होऊ शकतो. ‘earn honestly and spend judiciously’ असे जे. आर. डी. म्हणत असत. यावरून ‘उदास विचारे’ म्हणजे ‘judiciously’ हे समीकरण ध्यानात येईल. परंतु हा ‘उदास विचार’ व्यवहारात आणि परमार्थातही सहजसाध्य नाही. व्यवहारात नाही तो याकरिता, की त्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे. आणि या लक्षणाची तर २१ व्या शतकात प्रकर्षांने वानवा जाणवते आहे. दुसरे म्हणजे परमार्थ. यासाठी गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगितलेली ‘स्थितप्रज्ञा’ची लक्षणे किती प्रयासानंतर प्राप्त होतात याची वेगळी चर्चा करावयास नको. स्थितप्रज्ञास शीत-उष्ण, सुख-दु:ख या दोनही टोकांच्या अवस्थांमध्ये विवेक सांभाळणे जमते ते त्याच्या परिस्थितीपलीकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे! ही ‘उदास विचारा’त स्थिरावलेली स्थितप्रज्ञाची दृष्टी जरी सहजसाध्य नसली, तरी ‘विवेक’ आचरणात आणण्यास विलंब करता कामा नये. ‘विवेक’ साधल्याने आपण सुखाच्या मार्गाचे पांथस्थ आणि शांतीच्या राज्याचे पाईक होणार आहोत. त्यामुळे ‘दुष्टांचा नाश होवो’ ही नव्हे, तर ‘खळांची व्यंकटी सांडो’ (दुष्टांचा वाकडेपणा जावो) ही विश्वबंधुत्वाची संकल्पना आपले बाळकडू आहे आणि तीच ‘वसुधैव कुटुम्बकम्’  हे आपले सर्वसमावेशक ध्येय साध्य करण्यास सहाय्यक
ठरणार आहे.
जीवन तळेगावकर,  हरियाणा.