१३ नोव्हेंबरच्या ‘लोकरंग’मधील ‘गोवराची साथ’ हा गिरीश कुबेर यांचा लेख जागतिक स्तरावरील सध्याच्या जनमानसाचे नेमके विश्लेषण करणारा आहे. जगभरातल्या वंशविद्वेषाच्या लाटेत अमेरिकेसारख्या महासत्तेची जनतादेखील डुबक्या मारते आहे, हे तेथील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले. या तथाकथित ‘प्रगत’ समजल्या जाणाऱ्या मतदाराच्या वैचारिक परिपक्वतेचा दर्जा किती सुमार आहे हेच यातून उघड झाले. (यापूर्वी जॉर्ज बुश यांच्यासारख्या मठ्ठ व्यक्तीला अध्यक्षपदी बसवणारी जनता प्रत्यक्षात मागासलेल्या विचारसरणीची आहे, हे लक्षात आलेच होते. आताही त्यांचेच वर्चस्व वाढलेले दिसून आले आहे.) मतदारांची परिवर्तनाची अपेक्षा चुकीची नाही. परंतु पर्याय निवडण्यात त्यांचा संकुचित दृष्टिकोनच प्रभावी ठरतोय. बदलाच्या अट्टहासापायी आणि स्थितीप्रियतेला विरोध करण्यासाठी ज्याच्या क्षमतेबद्दल काहीही माहीत नाही अशा देखण्या, पण अननुभवी घोडय़ावर पसे लावण्याचा जुगार अमेरिकी मतदारही खेळताना दिसतात. मतदारांतील ‘खरा असंतुष्ट’ वर्ग आणि ‘आभासी असंतुष्ट’ वर्ग ही विभागणीही यथायोग्य अशीच आहे.

मानवाच्या उत्क्रांतीमध्ये सुरुवातीला टोळ्यांची पद्धत होती. आताही (प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून) तीच जात-धर्म-वंश यांवर आधारलेल्या ‘राष्ट्र’ नामक टोळ्यांची समाजरचना होताना दिसते आहे. जगभरात समतावादी डाव्या विचारसरणीची पीछेहाट आणि वंशवादी उजव्या विचारसरणीची सरशी होत असल्याचे दिसते आहे. पण ‘जागतिकीकरण’ हे तर उजव्या विचारसरणीचे अपत्य आहे. आणि त्याचा अंतकाळ जवळ आल्याचे दिसून येत आहे. या विसंगतीचा अर्थ कसा लावायचा? यावरून जागतिकीकरणात अभिप्रेत असलेली ‘विश्वबंधुत्व’ ही भ्रामक संकल्पना आहे, हेच सिद्ध होत नाही का?

loksatta analysis imd predict india to receive above normal monsoon
विश्लेषण : यंदा दमदार पावसाचा अंदाज का वर्तवला जात आहे?
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?
nashik, ncp ajit pawar group, local leader, party members, not speak publicly, lok sabha candidate, elections, mahayuti,
अंतर्गत वादांमुळे महायुतीच्या प्रतिमेस धक्का; उमेदवारीविषयी जाहीर वक्तव्य न करण्याचा राष्ट्रवादीचा सल्ला
samajwadi party
समजावादी पक्ष आणि अपना दलमध्ये जागावाटपावरून मतभेद; इंडिया आघाडीवर परिणाम होणार?

प्रमोद तावडे, डोंबिवली

कामाचे मूल्यमापन अमान्य

‘गोवराची साथ’ हा लेख वाचला. आपल्याकडे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून ही साथ चांगलीच पसरते आहे. कामाचे मूल्यमापनच लोकांना मान्य नाही. प्रश्न विचारलात तर तुम्ही वाईट. मोदी सरकारला फक्त चांगलंच म्हणायचं! आणि या सगळ्यात वाईट गोष्ट ही, की उच्चशिक्षित लोक या सर्व एकतर्फी पोस्ट लाइक करतायत, शेअर करतायत.

– चंदन काळे

..ही ऱ्हासाची सुरुवात?

‘गोवराची साथ’ हा लेख वाचला. लेखकाने अलीकडेच दिलेल्या अमेरिका भेटीदरम्यान त्यांना या संभाव्य बदलाची जाणीव नक्कीच झाली असावी. आपण म्हणता तशी ही अमेरिकेच्या ऱ्हासाची सुरुवात आहे का? काही काळ लोटल्यावरच याबद्दलची शंका दूर होईल किंवा गडद होईल. तूर्तास वाट पाहणे..

– श्रीकांत कुलकर्णी, पुणे</strong>

जागतिकीकरणाला फटका

‘गोवराची साथ’ हा कुबेर यांचा लेख आजच्या जागतिक पटलाशी संबंधित आहे. जागतिक पातळीवर या समस्या जाणवत आहेत. अमेरिकेत बहुतांश लोक ‘राष्ट्रवादी’ बनत चालल्याचे दिसते. त्यामुळे तेथे स्थलांतरितांचे भविष्य कठीण आहे; खरं तर जे त्या देशाच्या विकासात मोठा हातभार लावत आहेत. पण याचा जागतिकीकरणाला मोठा फटका बसेल. स्थलांतरित भारतीयांना कदाचित ही समस्या भेडसावणार नाही. कारण ते सुधारणावादी विचारांचे, शिक्षित आणि सुसंस्कृत पाश्र्वभूमी असलेले आहेत.  भारतीय लोक तिथे व्यवसायांत स्थिर झालेले आहेत. आणि जे तिथे कमी दर्जाची कामे करतात, तेही खूप मेहनती आणि आधुनिक विचारांचे आहेत. भारतीय लोक स्थानिकांच्या जीवनशैलीत कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न आणता आपली प्रगती साधतात. भारतीयांचा जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचा वाटा आहे.

– राहुल धरणकर

संवादिनी आणि रीड ऑर्गनमध्ये मूलभूत फरक

‘संवाद संवादिनीशी’ हा राहुल रानडे यांचा ‘मैफिलीत माझ्या’ सदरातील लेख वाचला. त्यांचे हे लेखन प्रत्यक्ष अनुभवातून केलेले असल्याने रसरशीत वाटते व म्हणूनच आवडते. या लेखात संवादिनीविषयी त्यांनी लिहिले आहे. त्या अनुषंगाने तिचा इतिहासही थोडक्यात मांडला आहे. त्यातल्या एका मुद्दय़ाकडे लक्ष वेधावेसे वाटते, ते म्हणजे संवादिनी, तिची मोठी बहीण पायपेटी आणि मराठी संगीत नाटकांत अढळ स्थान मिळवलेला रीड ऑर्गन यांत मूलभूत फरक आहे, हा मुद्दा अनवधानाने सुटलेला दिसतो. संवादिनी व पायपेटी या हवेच्या दाबावर (positive pressure) काम करतात, तर रीड ऑर्गन नेमका याविरुद्ध म्हणजे वात-पोकळी (vacuum/ suction) निर्माण करून स्वरनिर्मिती करतो. या फरकामुळे ऑर्गनच्या सुरांना जास्त गोलाई व भरदारपणा मिळतो. अर्थात या वेगळ्या tonal quality  मागे ऑर्गनच्या अधिक जाडीच्या सूरपट्टय़ाही (reeds) कारणीभूत आहेत, हेही तितकेच खरे. मात्र, हवेचा दाब व वात-पोकळी या दोन मूलभूत यंत्रणांमधला फरक tonal quality  वाढवण्यास प्रामुख्याने कारणीभूत आहे.

 – राजा पुंडलिक, नाशिक

हे तर उन्नत्तीचे पहिले पाऊल!

२३ ऑक्टोबरच्या ‘लोकरंग’मधील ‘मराठा मोर्चा- काही प्रश्न!’ हा रंगनाथ पठारे यांचा लेख वाचला. या लेखाच्या अनुषंगाने काही मते मांडू इच्छितो. ‘Shivaji- the great leader’ या पुस्तकाच्या सुरुवातीसच सर यदुनाथ सरकार या बंगाली इतिहासकारांनी मराठय़ांविषयी एक सुंदर मत व्यक्त केले आहे, ते असे : ‘गेल्या तीनशे वर्षांतील मराठय़ांचे कर्तृत्व जर असेच पुढे सुरू राहिले, तर पुढच्या शंभर वर्षांत मराठे जगावर राज्य करताना दिसतील, एवढी प्रचंड क्षमता मराठय़ांमध्ये आहे.’ (अर्थातच सर यदुनाथांच्या दृष्टीने मराठे म्हणजे सर्व जातीसमावेशक समाज होय. नुसतीच मराठा ही जात नव्हे.) परंतु मराठय़ांनीच त्यांच्या या विश्वासाला तडा दिला. आज मराठय़ांची परिस्थिती बिकट आहे. स्वाभिमान तर केव्हाच गमावला आहे. राज्याची आíथक राजधानी असलेल्या मुंबईपुरताच विचार करायचा झाला, तर एकीकडे आज ते माथाडी कामगार म्हणून ओझी वाहत वा रेल्वेस्थानकांवर हमाली करत आहेत, किंवा कुठल्यातरी कार्यालयात चिकटून लाचारीचे जीवन जगताहेत आणि दुसरीकडे ‘शिवाजी महाराज की जय!’ही म्हणताहेत. असा हा विरोधाभास आहे. यात बदल व्हावा असे त्यांना कधी वाटले नाही. शिवाजी- महाराजांकडून आपला हा मराठा समाज काही शिकला नाही, हीच खरी शोकांतिका आहे. शिवजयंतीला (त्यातही तारखेचा वाद!) चौकाचौकांत भोंग्यांवरील पोवाडे वा रायगडावर शिवराज्याभिषेकाची सालाबाद उत्सव-पूजा (त्यातसुद्धा दुहीचे राजकारण) करण्यापलीकडे मराठय़ांनी काही केले नाही.

सरसकट सर्वपक्षीय राजकारणी मंडळींनी तर केवळ स्वत:च्या फायद्यासाठीच मराठय़ांना सरळसरळ गंडवले असेच म्हणावे लागेल. शिवराळ भाषा व गल्लीबोळातली दादागिरी यात या मावळ्यांना गुंतवून ठेवले. आणि त्यातच या मावळ्यांना शौर्य वाटू लागले. पानिपतावर मराठय़ांची एक पिढी कामास आली असे म्हणतात; परंतु या राजकारणी मंडळींमुळे तर मराठय़ांचे सात पिढय़ांचे नुकसान झाले आहे. भोळसट मराठय़ांना त्यांची लबाडी कधीच कळली नाही. किंबहुना, कधी कळणारही नाही. असे सर्व निराश वातावरण असताना अचानक एकाएकी मराठय़ांचे (इथे मराठा जातीचे) मोच्रे महाराष्ट्रभर निघायला लागले व तेही शिस्तबद्ध आणि राजकारण्यांना चार हात लांब ठेवून- म्हणजे जरा ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’च होऊन गेले. या मोर्चाना सर्व सामाजिक स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. अगदी मुसलमान समाजाकडूनही. हे तर अत्यंत चांगले लक्षण आहे. या सर्व समाजांचा मराठा समाजावर अजूनही विश्वास आहे. अजूनही काही धड होईल तर ते या मराठा समाजाकडूनच- हा तो विश्वास! पठारे यांनी लेखात मराठा समाजाचा भोळसटपणा अधोरेखित केला आहे. परंतु हा भोळसटपणा बाजूला ठेवून चतुर होणे हीच काळाची गरज आहे. भावनेच्या आहारी जाऊन मोर्चात सामील होणे आणि नंतर ‘ये रे माझ्या मागल्या’- अर्थात परिस्थिती पुन्हा जैसे थे- असे होण्याचीच शक्यता जास्त! तसे होऊ न देता पुढचे पाऊल पडणे आवश्यक आहे. याच अंकातील शुभांगी गबाले यांच्या ‘मराठा तरुणींपुढील आव्हाने’ या लेखातही याची चर्चा आली आहे. मराठा समाज हा कर्मकांडांत गुरफटलेला, जग काय म्हणेल याचा सदैव ताण घेतलेला असा आहे. परंतु या मोर्चाच्या निमित्ताने मराठा जागा होतोय. त्याच्या उन्नत्तीसाठीचे हे पहिले पाऊल ठरावे. मोर्चाच्या मागण्या पूर्ण होतील- न होतील; त्यात गुंतून न राहता चाकरीच्या मानसिकतेतून बाहेर येऊन उद्योगरूपी स्वराज्य निर्माण करून स्वत:चा, समाजाचा आणि देशाचा आर्थिक स्तर उंचावण्याचा निश्चय प्रत्येक मोच्रेकऱ्याने करणे आवश्यक आहे.

शेखर राजेशिर्के

‘मराठा’ शब्दाचा चुकीचा अर्थ

‘मराठा मोर्चा- काही प्रश्न!’ हा पठारे यांचा लेख वाचला. लेखातील  मुद्दे पटले. गरीब व श्रीमंत या दोन शक्तिशाली चाकांखाली मराठा समाज आणि त्यातील जाती-जमाती- म्हणजेच कुळे-उपकुळे कशी भरडली जाताहेत, हे त्यांनी काही उदाहरणांनी स्पष्ट केले हे चांगलेच आहे. गॅस कनेक्शन ते पेट्रोल पंप व अन्य उद्योगही सवर्ण धनदांडग्यांनी मागासांच्या नावाने, परंतु स्वतच्या कब्जेदारीने चलाखीने कसे चालवलेले आहेत, हे सुरस कथाजाल ऐकल्यावर नवल वाटतेच; पण चीडही येते.

परंतु तरीही तमाम, समग्र, सकल, अखिल मराठा समाजाचा अन् संकुचित वा आकुंचित झालेल्या मराठा समाजाचा प्रश्न शिल्लक राहतोच. कारण ‘मराठा’ या शब्दाचा चुकीचाच अर्थ मनावर बिंबवला गेला आहे. त्यामुळे ‘जहागिरी गेली, पण फुगिरी गेली नाही’ या वृत्तीने जगत असताना ज्या काही घटकांना यातील जहागिरी व फुगिरी या दोन्ही गोष्टी हातून जाऊ द्यायच्या नव्हत्या, त्यांनी आपली चलाखी वापरली आणि आपली मिरासदारी कायम टिकवत, गोरगरीबांना वापरून घेत ते जातीवाद जोपासत राहिले. मुळात ‘मराठा’ शब्द आला कोठून व मराठी भाषा विकसित कशी होत गेली, याचे जे पुरावे अभ्यासक देतात ते एकांगी अन् ‘आम्ही म्हणतो तेच सत्य’ अशा हुकमी व सरंजामी वृत्तीने जनमनावर बिंबवीत गेल्याने आजचे हे औदासीन्य आलेले आहे. शहाण्णव कुळाचा गरवाजवी अर्थ जोपासत राहिल्याने समग्र समाजाचा विग्रह होत गेला व मराठा समाज विस्कळीत होऊन त्याचा इस्कुटा केला गेला. तो पुन्हा एकत्र होण्यासाठी कुणबी, माळी, वंजारी, धनगर वगरेंना समजून घेऊन शहाण्णव कुळांचे आकलन करून घेणे मराठा समाजाच्या हिताचे आहे. काही घराणी हीच ‘शहाण्णव कुळी’ हा गरवाजवी व अहंभावी अर्थ चुकीचाच व वेगळेपणा मिरविण्याचा थाटमाटी भाग आहे.

दिनेश रोडे-पाटील

 पण गुणवत्तेचे काय?

‘मराठा मोर्चा- काही प्रश्न!’ हा लेख वाचला. पठारे यांनी मांडलेले विचार व मते अत्यंत योग्य आहेत. सध्या मराठा मूक मोर्चानी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. शांततेने व शिस्तबद्धतेने आणि कोणतेही राजकीय नेतृत्व नसताना निघणाऱ्या या मोर्चानी नक्कीच एक आदर्श घालून दिला आहे. आज देशाची आणि राज्याची एकूण परिस्थिती पाहता संपूर्ण जगात आपल्याकडे तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे. अशावेळी त्यांच्याकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. घटनेनुसार आरक्षण असावे यात दुमत नाही. पण त्यापलीकडे जाऊन काही तरतुदी करायच्या असतील तर संसदेचे अधिवेशन बोलावून सर्वानुमते बदल करणे अपेक्षित आहे. पण अशा प्रकारे शक्तिप्रदर्शनातून समाजात अप्रत्यक्षपणे विषमताच पसरवली जात नाही का, याचाही विचार होणे आवश्यक आहे. आíथक निकषावर आरक्षणाबद्दल दुमत असण्याचा प्रश्नच नाही. मात्र आजच्या तरुण पिढीत नक्कीच जागरूकता आहे आणि जातीपातीपेक्षा ती गुणवत्तेला प्राधान्य देणारी आहे. म्हणूनच मनात एक प्रश्न अनुत्तरित राहतो. तो म्हणजे- आरक्षणाबद्दल व्यापक आंदोलने, मोर्चे होतील; पण गुणवत्तेचे काय?

पुरुषोत्तम आठलेकर, डोंबिवली

मराठा मोर्चाचे वास्तव चित्रण

‘मराठा मोर्चा- काही प्रश्न!’ हा लेख वाचला. लेखात मराठा मोर्चाचे व समकालीन  प्रश्नांचे समर्पक व मोजक्या शब्दांत अतिशय वास्तव चित्रण केले आहे. मराठा समाजाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मराठा समाज व अन्य मागासवर्गीय समाज यांच्यात सदरील मोर्चामुळे ध्रुवीकरण झालेले आहे. या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेच्या शेवटच्या सभेत बोलताना ‘यापुढे आपण आपले प्रश्न संवैधानिक मार्गानेच सोडवावेत,’ अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण दुर्दैवाने सर्वच समाजांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरची लढाई हा डॉ. आंबेडकरांनी त्याज्य करायला सांगितलेला पर्यायच निवडला. तथापि सर्वच समाजघटकांनी सद्य:परिस्थितीत सामंजस्याची भूमिका घेऊन आरक्षणासारखे जटिल प्रश्न सोडवले पाहिजेत. तसेच कुठल्याही अत्याचारांना जात-धर्माचा लेप न लावता त्याचा एकमुखाने प्रतिकार व निषेध करावा. सरतेशेवटी, मराठा आरक्षण हा न्याय्य मागणीचा मुद्दा असला तरी तो मांडण्याची पद्धती चुकीची वाटते. मागणी संवैधानिक मार्गानेच मांडायला हवी.

हर्षवर्धन घाटे, नांदेड</strong>