२० नोव्हेंबरच्या ‘लोकरंग’मधील सुहास पळशीकर यांचा ‘स्मरण इंदिरा गांधींचे; भान वर्तमानाचे!’ हा लेख वाचला. दोन पंतप्रधानांच्या वाटचालीतील साम्यस्थळे व कार्यपद्धती यांची त्यांनी केलेली तुलना समतोल वाटली. लेखात मोदींचे लक्ष्य नेहरूंच्या बरोबरीने स्थान मिळवणे आहे असे दर्शविले आहे. तसे असेल तर विद्यमान पंतप्रधानांना शुभेच्छा. नेहरू करत असलेले संसदेच्या दोन्ही सभागृहांचा आदर, त्यांची उभय सभागृहांतील उपस्थिती व तेथील कामकाजात त्यांनी घेतलेला सहभाग यांचा मोदींच्या ठिकाणी पूर्ण अभाव दिसतो. देशातले सर्वोच्च कायदे मंडळ- ज्याचे नेतृत्व पंतप्रधान करतात- ते मोदींनी दुसऱ्या फळीवर सोपवले आहे. तिथल्या कामकाजात त्यांना फारसा रस नाही. याबाबतीत नेहरू कोसो पुढे आहेत. इथे मोदींचे पाऊल अजून उचललेच जायचे आहे. आजचा मोदी-उन्माद बरूआंच्या ‘इंदिरा इज इंडिया’पेक्षा दोन पावले पुढेच आहे.

 – रामचंद्र महाडिक, सातारा</strong>

खरोखरीच ‘लॉर्ड’ ऑफ म्युझिक!

‘लॉर्ड ऑफ म्युझिक’ हा पं. उल्हास बापट यांचा लेख (लोकरंग, २३ ऑक्टोबर) वाचला. अतिशय सुयोग्य शीर्षक! केरसीजींसमवेत अनेक चित्रपटांमध्ये संतूरची साथ केल्यामुळे निर्माण झालेला व्यक्तिगत जिव्हाळा आणि भावबंधांमुळे पं. उल्हासजींच्या लेखाला विशेष मोल आहे. आजच्या पिढीला केरसी लॉर्ड किंवा त्यांचे अ‍ॅकॉर्डियन विशेष परिचित नाही. केरसीजींना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित केले गेले होते, हेही फार थोडय़ा जणांना माहीत आहे.

‘आराधना’तल्या ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यातले धुंद वातावरण क्षणात् उभे करणारा सुरुवातीचा तो थरारून टाकणारा अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचा पीस आणि नंतर अ‍ॅकॉर्डियन आणि सॅक्सेफोन यांची जुगलबंदी सुरू असावी असे वाटणारे एकाहून एक सरस पीसेस, ‘है अपना दिल’ आणि ‘आईये मेहरबाँ’ गाण्यांतले ठेका धरायला लावणारे चायनीज टेंपल ब्लॉक्स, ‘तस्वीर तेरी दिल में’, ‘मुझे दुनियावालों शराबी न समझो’ अशा शेकडो गाण्यांमध्ये अ‍ॅकॉर्डियनच्या बेलोजचा परिणामकारक वापर करून घातलेले पीसेस, ‘मतवाली आँखोवाले’ या लतादीदींच्या गाण्यात ठेका धरायला लावणारं स्पॅनिश वाद्य कॅस्टनेट्स आणि अ‍ॅसिलेटर नावाचं विचित्र साऊंड देणारं वाद्य- जे ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’, ‘देखा ना हाय रे..’ या आणि अशा कित्येक गाण्यांत वाजलेलं आणि सिगरेट लायटरची ‘हम दोनो’मधील अजरामर झालेली सुप्रसिद्ध थीम- टय़ून.. त्या वाद्याचं नाव होतं- ब्लॉकेन स्पील.. अशी विविध वाद्यं आणि त्यांची म्युझिक अ‍ॅरेंजमेंट केरसीजींनी केली होती. ९० च्या दशकात आर. डी. बर्मन यांच्या  निधनानंतर केरसीजींना न रुचलेल्या तांत्रिक बदलांमुळे त्यांचा संगीत क्षेत्रातील उत्साह पुढे कमी होत गेला आणि २००० मध्ये त्यांनी स्वेच्छेने निवृत्ती घेतली. हजारो गाणी, वेगवेगळी वाद्ये आणि  संगीतकार, गायक-गायिका, संगीत संयोजकांबरोबर सातत्याने ५२ वर्षे केलेले काम आणि त्यासाठी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध झाले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ६० टक्के असलेले लॉर्ड परिवाराचे योगदान आणि १५,००० गाण्यांत व्यक्तिगत योगदान असणाऱ्या केरसीजींच्या अफाट सांगीतिक कार्यकर्तृत्वाला प्रणाम!

– श्रीकांत डिग्रजकर, कोल्हापूर</strong>

श्वानांचा प्रत्यक्षानुभव वेगळाच!

‘कुत्ता कही का’ हा निखिल रत्नपारखी यांचा ‘गाजराची पुंगी’ या सदरातील (३० ऑक्टोबर पुरवणी) लेख वाचला. साक्षात् पुलंनी आपल्या ‘पाळीव प्राणी’ या लेखामध्ये कुत्रे आणि त्यांना पाळणारे यांच्यावर इतकं जबरदस्त लिहून तमाम मराठीजनांना हसवलं आहे, की त्यानंतर अशा लेखांचे काहीच वाटू नये. पण मूळ मुद्दा असा आहे की, कुत्र्यांवर व ते पाळणाऱ्यांवर टीका करणारे लोक हे कुत्र्याच्या प्रेमाचा प्रत्यक्ष अनुभव न घेताच लिहीत वा बोलत असतात. म्हणजे मला असं म्हणायचं नाही, की त्यांचे सगळेच मुद्दे चुकीचे असतात. पण सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे त्याचा त्यांना अनुभवच नसतो. त्यामुळे त्यांची टीका, शेरे, किस्से हे पोकळ, भुसभुशीत पायावर आणि केवळ विनोदनिर्मितीसाठी पवित्रा घेऊन सांगितलेले वा लिहिलेले असतात.

मुळात आपल्यापैकी बहुतेकांचा कुत्र्याशी संबंध पहिल्यांदा कसा येतो, हे कधी नीट लक्ष देऊन बघितलंत तर तुम्हालाही दिसून येईल की, रस्त्यातून एखाद्या छोटय़ा मुलाला कडेवर घेऊन जाणारे आजी-आजोबा किंवा आई-बाबा एखादे भटके कुत्रे वाटेत मुटकुळे करून झोपलेले असेल किंवा निरुद्देशपणे बसलेले असेल, तरी त्या लहानग्याचं त्याच्याकडे लक्ष गेल्यास सोबतचे मोठे माणूस त्याला काय शिकवतं? ‘हा२२२तरे भूभू’ असं म्हणून त्या कुत्र्याच्या दिशेनं मारण्याच्या पवित्र्यात हात उगारून दाखवलं जातं. मग ते बाळ मोठय़ांचा अनुनय करत पुढे नेहमी तसंच करायला शिकतं. त्यातूनही चुकून एखादं मूल न राहवून कुत्र्याला हात लावायला पुढे झालं की ‘त्याला हात लावून नकोस, चावेल भूभू..’ अशी त्यास भीती घातली जाते. त्यामुळे त्या इवल्याशा मुलाच्या कोवळ्या मनातही कुत्रा हा चावणारा, धोकादायक प्राणी आहे अशी प्रतिमा पक्की होते. मग शाळकरी वयातली मुलं टोळक्यानं येता-जाता रस्त्यातल्या कुत्र्याच्या खोडय़ा काढायला एकमेकांच्या नादाने शिकतात. एकटा-दुकटा असताना समोर कुत्रा दिसल्यावर हळूच फुटपाथ बदलणारा मुलगा घोळक्यात असताना मात्र कुत्र्याला दगड मारायला धजावतो. पुढील आयुष्यातही मग तो असाच ‘टोळक्याच्या मानसिकते’त (मॉब मेंटॅलिटी) राहतो.

खरं तर बहुतेक सर्व लहान मुलांना निसर्गत: प्राण्यांविषयी कुतूहल, प्रेम असतं. पण त्यांच्या या मानसिकतेत त्यांचे पालकच गढुळपणा आणतात. कुत्रा आणि माणूस यांच्यातलं सहजीवन हजारो वर्षांपासून सुरू आहे. त्यावर खूप लेखन झालेलं आहे. त्यांच्या नात्यावर कितीतरी सुंदर चित्रपट निर्माण झाले आहेत. ‘मार्ली अ‍ॅण्ड मी’ या चित्रपटात एक लॅब्राडॉर कुत्रा आणि एक कुटुंब यांच्यातले आयुष्यभराचे नाते अत्यंत सुंदररीत्या दाखविले आहे. कुत्र्याएवढं निरपेक्ष (किंवा किमान अपेक्षा ठेवून) प्रेम कुणी करू शकत असेल असं मला तरी वाटत नाही.

– महेश खरे

डाव्यांची असहिष्णुता!

‘गोवराची साथ’ हा लेख व त्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रिया बघता अजून ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारलाही नसताना त्यांना पुरेसा वेळदेखील न देता लगेचच ऱ्हासाची सुरुवात, उन्मादी राष्ट्रवादाचा ज्वर असल्या अधीर प्रतिक्रिया पाहून गंमत वाटते. निवडणुकीतील वक्तव्यांवरून फक्त अंदाज बांधायचा तर निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेशी किती जण प्रामाणिक राहतात? यात उजवे, मध्यममार्गी आणि डावे सारेच आले. व्यावसायिक वृत्तीच्या ट्रम्प यांना प्रचारात वापरलेली संकुचित विचारधारा कवटाळून बसणे प्रत्यक्ष व्यवहारात शक्य होईल का? आणि त्यांच्यातला उजवा व उदार विचारांचा व्यावहारिक फायदा मिळालेला व्यावसायिक त्यांना तसे करू देईल का, याचा विचार व्यक्त झालेल्या अधीर प्रतिक्रियांतून कोणीच करताना दिसत नाही. निदान वर्षभर तरी वाट बघा. तरुण मंडळी नव्याला संधी द्यायला तयार आहेत. ज्येष्ठांनाच निष्कर्ष काढायची घाई झालेली दिसते. एका पत्रात डाव्या विचारसरणीला समतावादी वगरे विशेषणे लावण्यात आली आहेत. डावे तरी समता, विवेक, सहिष्णुता या गोंडस शब्दांना व्यवहारात किती स्थान देतात? लेनिन-स्टॅलिनचा रशिया, माओचा चीन ते भारतातल्या बंगाल, केरळ, त्रिपुरामध्ये डाव्या राजवटींनी विरोधकांचे केलेले नृशंस शिरकाण, डाव्या विचारांच्या नक्षलवाद्यांनी जनावराला लाजवेल अशा क्रूर पद्धतीने घडवलेली हत्याकांडे आणि वर त्याचे वैचारिक मुलामा फासून केलेले प्रच्छन्न समर्थन हे सर्व पाहिले तर डावे सहिष्णु, उदार, समतावादी असतात, हा समज कुठल्या तरी नंदनवनात वावरण्याचे निदर्शक आहे, हे सांगण्याची गरज नाही. सध्या डाव्यांनी सुरू केलेली ‘गोवराची साथ’ ही कुबेरांच्या लेखात म्हटलेल्या साथीपेक्षा भयानक आहे. ती म्हणजे- आपल्याला नाकारून विरोधी विचारांना लोकांनी सत्ता व संधी दिली की त्यांनी कामास सुरुवातसुद्धा केली नसताना कोल्हेकुई सुरू करण्याची! डाव्यांची सहिष्णुता व उदारमतवाद फक्त स्वत: पुरताच असतो. याचं कारण आपल्याशिवाय दुसरा कुणी सहिष्णु, उदार असूच शकत नाही, या समजुतीतून आलेला अहंकार व आम्ही म्हणू तेच विवेकी- हा वैचारिक माज! हे करताना सरकार निवडण्याचा जनतेचा लोकशाही हक्क व तो बजावण्याची जनतेची सारासार बुद्धी नाकारून आपण वैचारीक दंडेली करतो आहोत  याचे भानही त्यांनी सोडले आहे. भारतात मोदी सरकार येण्याची चिन्हे दिसू लागल्यापासून डाव्यांची वर्तणूक पाहिली तर हे ध्यानात येईल. राष्ट्रवादाच्या गोवराच्या साथीला झोडपण्याच्या नादात बुद्धिवादाचा आव आणत जनतेचा निवडीचा हक्क नाकारणाऱ्या या घातक डाव्या गोवराच्या साथीकडे दुर्लक्ष होणेही धोक्याचेच.

– संकेत देशपांडे, ठाणे</strong>