लोकरंगमधील (५ फेब्रुवारी) प्रवीण बांदेकर आणि रमेश वरखेडे यांचे अभ्यासपूर्ण लेख बोलींचे साहित्यातील स्थान आणि महत्त्व नेमकेपणाने अधोरेखित करणारे आहेत. ‘भूमिनिष्ठ लोकसंस्कृती’चं खरं दर्शन बोलीभाषांमधूनच आपल्यापर्यंत येत असतं. त्यांची शब्दकळा अत्यंत आविष्कारक असते. संस्कृतीची लय जणू बोलीभाषेत खेळत असते. त्या लयीचा स्रोत थेट निसर्गाच्या आणि जीवनाच्या लयीशी संबद्ध असतो. ती लय लोकसंस्कृतीला आंदोलत ठेवत असते. आणि ती त्या त्या बोलीभाषेतील लेखकाला लिहितं ठेवत असते. इतकी ती मौलिक असते. म्हणून तिचं विस्थापित होणं खटकतं. साहित्यसंमेलनात अनेक परिसंवाद होतात. बोलीभाषेच्या वाटय़ाला एकही परिसंवाद येऊ नये याचं वाईट वाटणं स्वाभाविक आहे.

पण बोलीभाषेच्या प्रश्नासोबत प्रमाणभाषेचं वास्तव सावलीसारखं जात असतं. साधारणत: दोनशेपेक्षा अधिक बोलीभाषा आहेत आणि भाषिक नकाशावरून त्यांची संख्या कमी होते आहे. विविध प्रदेशांत विविध बोलीभाषा असतात. त्या त्या प्रदेशाचं सांस्कृतिक वैशिष्टय़ त्यांच्यात एकवटलेलं असतं. त्या प्रदेशाची अस्मिता त्या बोलीभाषेशी जोडली गेलेली असते. पण सर्वसामान्य मानवी व्यवहार-आदान-प्रदानासाठी इतक्या अस्मितांचं अस्तित्व अडचणीचं ठरत असतं. म्हणून तर सर्वसमावेशक प्रमाणभाषेची गरज असते. शिक्षणक्षेत्रापासून ते मानवी जीवन विकसित करणारी जी क्षेत्रं आहेत तिथं प्रमाणभाषेचा वापर आहे. आणि आज तर ज्ञानाची क्षितिजं इतकी खुली होताहेत की प्रमाणभाषेला आपली खोळ मोठी आणि लवचीक ठेवणं अपरिहार्य झालं आहे. तसं पाहिलं तर प्रमाणभाषेनं अनेक शब्द बोलीभाषेतून स्वीकारलेले आहेत. आणि आज हायटेक तंत्रज्ञानातून येणाऱ्या शब्दांची आवक वाढली आहे. प्रमाणभाषेचा भाषिक धर्म म्हणजे सोवळेपण सोडून नवनवीन शब्दांचा स्वीकार करणं.

अजून एका वास्तवाचा भाषिकसंदर्भात विचार केला पाहिजे. प्रमाणभाषेचा सर्वदूर असलेला वापर पाहून काहींच्या मनामध्ये एक विचार येत असावा असं वाटतं. तिचा सर्वदूर वापर म्हणजे तिची भाषिक सत्ता अस्तित्वात येणं. आणि एकदा ही सत्ता प्रस्थापित झाली की अन्य बोलीभाषा दुय्यम समजल्या जातील. खरं पाहिलं तर भाषेला भाषिक सत्तेचं भान नसतं. ती तर जीवनाश्रमी असते. जीवन प्रक्रियेत ज्या संस्था -व्यवस्था अस्तित्वात येतात, ज्या ज्ञान-विज्ञानशाखा विकसित होतात, जो प्रतिभेचा विकास आविष्कृत होतो, त्यातून होणाऱ्या शब्दनिर्मितीचा स्वीकार करत जाणं एवढंच तिला माहीत असतं. बोलीभाषेतील शब्दांचा स्वीकार ती स्वाभाविकपणे करत असते. प्रमाणभाषा बोलीभाषेचं विकसित आणि विकसनशील रूप असतं, असंही म्हणता येईल.

फक्त या संदर्भात एक तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या तिढय़ाचं स्वरूप असं दिसतं- प्रत्येक बोलीच्या भाषकाला आपली भाषा मातृभाषा वाटत असणं रास्त आहे. पण मग या न्यायानं मातृभाषांची संख्या वाढत जाईल आणि मराठी भाषेच्या मुख्य प्रवाहात अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या अडचणी ना बोलीभाषा निर्माण करते ना प्रमाणभाषा. कुठं तरी भाषिक अस्मितेचं टोक हे काम करत असतं. भाषिक अस्मितेला भाषिक सत्ता-संवेदनेचं परिमाण असतं. आणि ते परिस्थितीला जटिल करत जातं. भाषांचे अभ्यासक या गोष्टीला अपवाद असतात. आणि बोलीभाषा व प्रमाणभाषा तटस्थपणे आदान-प्रदान करत असतात. बोलीभाषा आपली समृद्ध भाववाचकता प्रमाणभाषेला देत असते आणि प्रमाणभाषा आपली निर्देशात्मकता बोलीभाषेला देत असते. फक्त गरज कशाची असेल तर भाववाचकता आणि निर्देशात्मकता यांच्यामधील आंतरक्रिया गतिमान होण्याची. म्हणून तर जिल्हास्तरावरील आणि अ. भा. साहित्य संमेलनात बोलीभाषांवर परिसंवाद घेतले जावेत.

प्रा. प्रभाकर बागले, औरंगाबाद</strong>