‘लोकरंग’मधील (२७ नोव्हेंबर) ‘लढाई बिकट आहे..’ हा राजीव काळे यांचा लेख वाचला. दक्षिणायन परिषदेने पुरोगामी विचारविश्वात पसरलेले चैतन्य ध्यानात घेता या परिषदेनंतर वाढलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा हा लेख आहे. आपल्याकडील पुरोगामी विचारविश्व हे पूर्वीही मोजक्याच लोकांच्या वर्तुळापुरते मर्यादित होते आणि आजही ते तसेच आहे. पुरोगामी, विवेकनिष्ठ विचारांचा प्रसार व्यापक स्तरावर होण्यासाठी वैचारिक परिभाषेवर येत्या काळात काम करावे लागेल, हेही तितकेच खरे. आज पुरोगामी वर्तुळाची झालेली शतखंडित अवस्था ही या समविचारी मंडळींतील विसंवादामुळेच आहे. चिकित्सेला महत्त्व देणाऱ्या विवेकनिष्ठ विचारपरंपरेत वाद होणारच.. आणि ते व्हावेतही. पण त्यासाठी आधी संवाद व्हायला हवा. दक्षिणायन परिषद ही अशा संवादाची सुरुवात ठरेल असे वाटते. आणखी एक मुद्दा म्हणजे, विचारवंतांनी, साहित्यिकांनी राजकारणापासून दूर राहावे अशी अपेक्षा आपल्याकडे केली जाते. बुद्धिवादी वर्ग या अपेक्षेच्या ओझ्यामुळेच स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणापासून तुटत गेला आणि त्याचे देशाच्या राजकीय-सामाजिक स्थितीवर झालेले विपरित परिणाम आपण अनुभवतो आहोतच. दक्षिणायन परिषद बुद्धिवादी वर्गाला पुन्हा विधायक राजकीय हस्तक्षेपाकडे वळवत असेल तर ते नक्कीच देशहिताचे होईल. पण हे करत असताना सामान्य जनतेलाही खऱ्या आणि मूलभूत देशप्रश्नांविषयी सजग करण्याची आवश्यकता आहे. एकूणच हे दक्षिणायन या पुरोगामी  वर्तुळाचा परीघ मोठा करणारे ठरेल अशी आशा निर्माण झाली आहे.

संतोष राऊत, ठाणे</strong>

डाव्यांची असहिष्णुता

‘लढाई बिकट आहे..’ या लेखात लेखक लिहितात की, ‘पुरोगामी मंडळींना सांधू पाहणारे व्यासपीठ म्हणजे दक्षिणायन.’ पुढच्या भागात ते सरळ सांगतात की, ‘मोदींविरुद्ध लढायचे.’ मात्र, या दोन परिस्थितींत विरोधाभास जाणवतो. कारण लेखात भाजप किंवा मोदी ही एकमेव प्रतिगामी शक्ती दिसते. डाव्यांच्या केरळमधील विरोधी आवाज दाबणाऱ्या कारवाया त्यांना दिसत नाहीत. नक्षलवाद्यांचे रक्तरंजित कारनामे दिसत नाहीत. मोदींविरुद्ध लढून त्यांना हटवणे हे एकमेव ‘पुरोगामी’ लक्ष्य असल्याचे लेखात म्हटले आहे. खरे तर ही मंडळी स्वत:ला पुरोगामी म्हणवून आपण इतरांपेक्षा वेगळे कसे, हे सांगण्यात गर्क आहेत.

प्रत्येक समाजात अतिरेकी शक्ती असतात. पण मग सगळ्याच घटनांसाठी एकाच पक्षाला किंवा व्यक्तीला जबाबदार धरायचे का? जेव्हा आपण एखादा विचार मांडतो तेव्हा त्याच्या विरोधकाची बाजू ऐकण्याची तसेच आपल्याला पटत नसलेल्यांचे विचार ऐकण्याची शक्ती माणसाने ठेवावी. डाव्या चळवळी व त्यांच्या समर्थकांचा अहंभाव असतो, की आम्हीच तेवढे योग्य. अन् विरोधी मोठय़ा संख्येने बोलत असतील तरी त्यांचे विचार झुंडशाहीचे म्हणून ते सरळ नाकारायचे, हे त्यांचे तंत्र. ही त्यांची असहिष्णुता नव्हे तर काय? पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून भाजपविरुद्ध आघाडी उघडणे हेच ‘दक्षिणायन’चे उद्दिष्ट दिसते. त्यामुळे जे खरोखरच प्रतिगामी शक्तींविरुद्ध लढणारे आहेत ते दक्षिणायनला कधीही स्वीकारणार नाहीत. कारण यात फक्त एक पक्ष व व्यक्तीविरुद्ध गरळ ओकण्याची मोहीम दिसते.

– डॉ. नितीन शृंगारे, पुणे</strong>