राजीव काळे यांचा ‘लढाई बिकट आहे..’ हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ योजलेल्या दक्षिणायन परिषदेवरील लेख (२७ नोव्हेंबर) वाचला. सध्या देशात प्रत्यक्ष आणीबाणी जाहीर झालेली नसली तरीही भाजपा, रा. स्व. संघाच्या पिट्टूंनी सोशल मीडियावर आणि जाहीररीत्याही पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ जी प्रच्छन्न मोहीम उघडली आहे आणि मोदी व भाजपाविरोधात बोलणाऱ्यांना ज्या प्रकारे देशद्रोही ठरवून त्यांच्यावर ही मंडळी तुटून पडत आहेत, ती एक प्रकारे अघोषित आणीबाणीच होय. मोदी आणि भाजपवाले तेवढे स्वच्छ, धुतलेल्या तांदळासारखे आणि बाकी सगळे भ्रष्टाचारी असा त्यांचा दावा आहे. स्वपक्षीय नेत्यांवर होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवर स्वच्छतेचं (क्लीन चीट) प्रमाणपत्र देताना त्यांची साधी चौकशीही करण्याचे कष्ट ही मंडळी घेत नाहीत. ‘यांचा तो बाब्या आणि इतरांचं ते करट’ अशीच सगळी परिस्थिती आहे. कर्नाटकातील येडियुरप्पा तसंच निवडणूक काळात ज्या भ्रष्ट कॉंग्रेसजनांना तसेच अन्यपक्षीयांना भाजपामध्ये घेऊन पावन करण्यात आले, ते भाजपात आल्यावर लगेचच धुतल्या तांदळागत कसे काय झाले? भाजपामध्ये विनय सहस्रबुद्धे यांच्यासारख्या विचारी, संयत नेत्याला (चर्चेत असूनही) मंत्रिमंडळात घेतले जात नाही, पण गणंगांना मात्र आवर्जून स्थान दिले जाते. यावरूनच भाजपात कशाची चलती आहे हे स्पष्ट होते.

सध्या देशात सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणं म्हणजे देशाशी द्रोह असा मामला झाला आहे. देशात इतकी असहिष्णुता आणि विखारी वातावरण आणीबाणीचा कालखंड सोडल्यास कॉंग्रेस राजवटीत कधीच अनुभवायला मिळाली नाही. जनताही अजून मोदींच्या दररोजच्या नवनव्या (नुसत्याच) घोषणांच्या गुंगीत निपचित झाली आहे. प्रत्यक्षात त्या वास्तवात येतात की नाही याच्याशी कुणालाच घेणंदेणं उरलेलं दिसत नाही. इथे पुंगीवाल्या गारुडय़ाच्या मागे हिप्नोटाइझ अवस्थेत विनाशाप्रत जाणाऱ्या जनसमूहाची आठवण होते. ती वेळ भारतीय जनतेवर न येवो, हीच इच्छा. लेखात म्हटल्याप्रमाणे संवेदनशील आणि विचारी लोकांनी आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देशातील लोकशाही प्रणाली टिकवण्यासाठी व सत्ताधाऱ्यांच्या झुंडशाहीविरुद्ध एकजुटीने लढा देण्यासाठी कधी नव्हे एवढी एकत्र येण्याची निकड निर्माण झालेली आहे.

शलाका सरदेशमुख, नवी मुंबई</strong>

डोळ्यांत अंजन घालणारा लेख

‘लोकरंग’मधील (१८ डिसेंबर) वैद्य अश्विन सावंत यांचा ‘पाश्चात्त्य खाद्यान्न : आरोग्यदायी की हानीकारक?’ हा अभ्यासपूर्ण लेख वाचला. वैद्य सावंत यांनी तपशीलवार केलेल्या विवेचनावरून खरोखरच केवळ जाहिरातींच्या भडिमाराला बळी पडून तरुण पिढी पाश्चात्त्य खाद्यपदार्थाच्या आहारी गेली आहे. लहान मुले तर टी. व्ही.वरील सर्व प्रकारच्या आकर्षक जाहिराती पाहून आई-वडिलांकडे त्या गोष्टींसाठी आग्रह धरतात. त्यांच्या रडण्या-ओरडण्याला शरण जाऊन आई-वडील नाइलाजास्तव अशा वस्तू, चॉकलेटस्, बिस्किटे, पिझ्झा, बर्गर असे आरोग्याला हानीकारक असणारे पदार्थ मुलांना देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या संभाव्य दुष्परिणामांची काळजी घेत नाहीत. अशाच प्रकारे मुंबईसारख्या शहरांमधील धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात नोकरदार महिलांनासुद्धा अशा आकर्षक जाहिराती भुरळ घालतात आणि त्यासुद्धा मग आकर्षक सजावट असलेल्या भाज्या, फळे व अन्य तयार पदार्थ खरेदी करतात व वेळ वाचवितात. या सर्व पाश्र्वभूमीवर वैद्य सावंत यांनी खरोखरच वाचकांच्या डोळ्यांत अंजन घातले आहे. जाहिरातींच्या माध्यमातून ऑलिव्ह तेल, ओट्स्, ब्रोकोली किंवा परदेशी सफरचंदे इ. गोष्टी लोकांच्या माथी मारल्या जातात. परंतु प्रत्यक्षात या वस्तू किंवा खाद्यपदार्थ त्यांच्या दाव्याप्रमाणे आरोग्यदायी नसून हानीकारकच आहेत. आपल्या भूमीमध्ये निसर्गत: उगवणाऱ्या भाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये या गोष्टीच भारतीय जीवनशैलीला आरोग्यदायी ठरणाऱ्या आहेत. खेडेगावांतूनही स्थानिक लोकांनी आपल्या परसात निदान भाजीपाला किंवा फळांची लागवड केल्यास ते आरोग्याला वरदान ठरेल.

रमेश र. शिर्के, मुंबई</strong>

ही संख्या नेमकी कोणती?

‘लोकरंग’च्या १८ डिसेंबरच्या अंकातील वैद्य अश्विन सावंत यांचा लेख वाचला. लेखातील बऱ्याच मतांशी सहमत असूनही लेख प्रचारकी थाटाचा व ‘रामदेवी’ बाण्याचा वाटतो. परदेशी ते सर्व खोटं व टाकाऊ हा अभिनिवेश नसावा. पोषणमूल्यांसाठी फक्त ‘क’ जीवनसत्त्वाचा त्यांनी जास्त विचार केलेला दिसतो. वैद्य सावंतांचा बदामावरील राग कळत नाही. बदामाचं पोषणमूल्य हे त्यातील लोहापुरतं मर्यादित नाही, तर त्यातील मॅग्नेशियम व मँगनीजसाठी आहे; जे दोन्ही हृदयविकाररोधक आहेत. शिवाय बदामातील ओमेगा तेल हेही प्रकृतीसाठी चांगले असते. अर्थात मी या विषयातील तज्ज्ञ नाही व तो या पत्राचा उद्देशही नाही. लेखात जी आकडेवारी दिली आहे, त्यात ऑलिव्ह तेलासाठी आपला देश दोन अब्ज सातशे कोटी रुपये खर्च करतो, असं नमूद केलं आहे. ही रक्कम नेमकी काय आहे? शंभर कोटी म्हणजे एक अब्ज. त्यामुळे सातशे कोटी = सातशे अब्ज. मग आधीच्या दोन अब्जाचे काय? त्यामुळे दोन अब्ज सातशे कोटी अशी कोणतीही संख्या असू शकत नाही. सावंतांना संदर्भग्रंथात बहुधा दोन बिलियन सातशे मिलियन असा संदर्भ मिळाला असावा व त्यांनी ती रक्कम म्हणजे दोन अब्ज सातशे कोटी असा अर्थ लावला असावा. एक बिलियन म्हणजे एक अब्ज हे बरोबर असलं तरी मिलियन म्हणजे कोटी नाही, तर दहा लाख हे विसरले जाते. बरेच लेखक आपल्या लेखाला भारदस्त करण्यासाठी आकडेवारी वापरतात व त्यात चुकीची आकडेवारी देतात. सर्वसामान्य वाचकांचंही त्याकडे दुर्लक्ष होतं. विशेषत: ट्रिलियन, बिलियन, मिलियन या संख्यांचं भारतीय आकडय़ांत रूपांतर करताना या चुका हटकून होताना दिसतात.

श्रीपाद वडोदकर

कान टोचले ते बरे झाले!

‘पाश्चात्त्य खाद्यान्न : आरोग्यदायी की हानीकारक?’ हा वैद्य अश्विन सावंत यांनी लिहिलेला लेख वाचला. या लेखाद्वारे खासगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण (खाजाउ)मुळे आíथक क्रयशक्ती वाढलेल्या तरुण पिढीचे कान टोचले ते बरे झाले. खरं म्हणजे आपल्या देशातील भाज्या, फळांना उत्तम स्वाद व चव असते. नागपूरची संत्री, कोकणचा हापूस, काश्मीरचे सफरचंद, घोलवडचे चिकू, नाशिकची द्राक्षं, जळगावची केळी अशी अनेक रसाळ, चवदार फळे असताना परदेशी माजलेली बेचव फळे आपण का खातो? बारा महिने सीझन नसताना फळे, भाज्या खायची आपण वाईट सवय लावून घेतली आहे. तसेच परदेशी कंपन्यांचे ‘रेडी टू कूक’ या पाकिटातले पदार्थ खायची सवय केल्यामुळे हल्ली सगळ्यांकडे फ्रिज तुडुंब भरलेले असतात.

जर कडधान्ये तीन-चार वेळा उन्हात वाळवली तर कीड लागत नाही. पण वेळ कोणाला आहे? प्रक्रिया केलेले धान्य वापरले की झालं, ही वृत्ती. पूर्वीची पिढी पापड, लोणची, मोरंबा बारा महिने प्रक्रिया न करता कसे टिकवत असत, याचा विचार करायला हवा. जाई, जुई, चमेली, मोगरा ही फुले नुसती बाऊलमध्ये ठेवली तरी किती सुगंध घरात पसरतो. पण आपण परदेशी बिनवासाची फुले नुसती फ्लॉवरपॉटमध्ये ठेवण्यात धन्यता मानतो.

पाटर्य़ा देणं आणि पाटर्य़ा झोडणे या संस्कृतीमुळे व जाहिरातींच्या भडिमारामुळे पाश्चात्त्य ब्रॅन्डेड  खाद्यान्ने, फळे, भाज्या याचा बडेजाव वाढला आहे. आयुर्वेदानुसार, जे आपल्या मातीत, हवामानात उगवते तेच आपल्या आरोग्यासाठी योग्य असते, हेच खरे. आहारशास्त्र, अर्थशास्त्र आणि मनुष्यबळ या तिन्हींचा एकत्रित परिणाम आरोग्यशास्त्रावर- म्हणजे अप्रत्यक्ष माणसावर होत आहे, हे आपण विसरता कामा नये.

– श्रीनिवास स. डोंगरे, मुंबई

मोलाचे मार्गदर्शन

वैद्य अश्विन सावंत यांचा ‘पाश्चात्त्य खाद्यान्न : आरोग्यदायक की हानीकारक?’ हा लेख वाचला. पाश्चात्त्य कंपन्या त्यांच्या जाहिरातकौशल्याच्या जोरावर इथल्या शहरी (आता ग्रामीणही!) लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे इथला समाज त्या खाद्यान्नाच्या आहारी जातोय. या पदार्थाचे स्वास्थ्यावरील हानीकारक परिणाम लोकांना कसे त्रासदायक होत असतात याचा परामर्ष या लेखात घेतला गेला आहे. त्यामुळे पाश्चात्त्य जीवन व आहारपद्धतीच्या आहारी गेलेल्यांसाठी हे मोलाचे मार्गदर्शन ठरले आहे. या जीवनावर, या मातीवर, या देशावर आणि आपल्या संस्कृतीवर मनापासून प्रेम करावे, हे सांगण्यात व आपली भारतीय जीवनपद्धती आरोग्यदायी व हितकारक आहे हे पटवून देण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.

उत्तम भंडारे, मुंबई