मिलिंद आणि मनिषा म्हैसकर  या दाम्पत्याने त्यांच्या मुलाच्या.. मन्मथच्या दुर्दैवी आत्महत्येवर लिहिलेल्या ‘प्रिय चि. मन्मथ..’ या पत्रलेखावर असंख्य प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया इथे प्रसिद्ध करीत आहोत..

मन्मथच्या आई-वडिलांचे त्याला उद्देशून लिहिलेले अत्यंत मार्मिक असे पत्र वाचले आणि प्रकर्षांने जाणवले की, दुर्दैवी माता-पिता पुत्रवियोगाचे दु:ख करायलासुद्धा मोकळे नाहीत. त्यामुळे अनुत्तरित प्रश्नांचा भडिमार आणि अपराधीपणाची भावना त्यांच्या शोकाकुल अवस्थेवर वर्चस्व गाजवीत असणार.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

आपल्या अपत्याबद्दल प्रत्येक पालकाला ममता असते. किंबहुना, ती नैसर्गिकच. त्यामुळे कुठलेही आई-वडील स्वत:च्या मुलांचे हितचिंतक नसावेत, हे शक्य आहे का? मग नक्की काय आणि कुणाचे चुकतेय? तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण का वाढले आहे? १५ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये वाढणारे नैराश्य ही  वस्तुस्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटना आत्महत्येला सर्वाधिक सार्वजनिक प्राधान्य असलेली सामाजिक समस्या मानते. यात मृत्यूचा मार्ग स्वेच्छेने एकच व्यक्ती निवडते; बळी मात्र सबंध कुटुंबाचा घेतला जातो. पण त्यासंबंधात केवळ पालकांना दोष देणे उचित आहे का? आज सबंध कुटुंबव्यवस्थेवरच असुरक्षिततेचे सावट आहे. आपले घर, आपले प्रेम आणि आपले आश्वासक अस्तित्व आपल्या मुलांना पुरेसे आहे असे वाटणे भाबडेपणाचे ठरते आहे. घरातील वातावरण आणि बा जग यांत असलेली तफावत आज मुलांना गोंधळून टाकते आहे.

आज सर्वत्र ऐकिवात येते की, हे स्पर्धेचे युग आहे, मुलांना ‘टफ’ केले पाहिजे. पण त्यांच्या आई-वडिलांचे काय? बाहेरच्या जगामध्ये निरंतर होणाऱ्या तांत्रिक आणि इतर बदलांशी जुळवून घेण्यास ते सक्षम आहेत का? कदाचित ‘मुलांचे यश ते आपले यश आणि मुलांचे अपयश ते आपलेच अपयश’ ही भावना खोडून काढण्यासाठी पालकांनाही समुपदेशनाची आवश्यकता असू शकेल.

दुसरे म्हणजे समाजमाध्यमांचा आपणा सर्वाच्या जीवनवशैलीवर नको तितका पगडा आहे, हे निश्चित. पण हे माध्यम जितके आकर्षित करते तितकेच एकलकोंडेसुद्धा करते. या माध्यमांची जबाबदारी हीसुद्धा आहे की, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि भावनिक आधार व मदतीचा हात पुढे करणाऱ्या सेवाभावी संस्थांची माहिती तरुणांपर्यंत पोहोचवावी.

आत्महत्या ही एक सामाजिक व्याधी आहे. परंतु तिला युद्धपातळीवर  प्रतिबंध केला जात आहे का? त्यासाठी माध्यमे, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, पालक, शिक्षक, मानसिक स्वास्थ्य क्षेत्रातील तज्ज्ञ, सरकारी व गैर-सरकारी संस्था यांच्यात सहयोग व सहकार्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली यंत्रणा त्यादृष्टीने सक्षम आहे का?

– मृणालिनी ओक

(यासंदर्भात पुढील हेल्पलाईनकडे मोफत मदत मिळेल. समारीतांस हेल्पलाईन, मुंबई. दूरध्वनी क्रमांक-  ९१२२-६४६४ ३२६७, ९१२२- ६५६५ ३२६७, ९१२२- ६५६५ ३२४७.)

शोकान्तिकेच्या निमित्ताने..

मन्मथच्या आई-वडिलांनी लिहिलेलं पत्र (लोकरंग, ३० जुलै) वाचल्यावर वाटलं, पैसा, प्रतिष्ठा, प्रेम, शिक्षण इतकं सारं आणि शिवाय उच्चपदस्थ, सुजाण, सुसंस्कृत आई-वडिलांचं संरक्षक कवच अष्टोप्रहर असून जर असं अघटित घडू शकतं, तर निश्चितच ही केवळ एक खाजगी, वैयक्तिक दुर्घटना नाही! त्याचे संदर्भ जास्त गहन, सूक्ष्म, व्यापक आहेत. वरवर सगळं आलबेल असणाऱ्या निरोगी, हसत्या-खेळत्या माणसाच्या आत पसरलेल्या कॅन्सरसारख्या रोगाने अनपेक्षित हल्ला करावा तशी ही घटना, हा धक्का आहे.

सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण व्यक्तीचं जीवनमान ठरवीत असतं. आणि हा काळाचा प्रवाह, दिशा उलटी फिरवणं एकटय़ादुकटय़ा माणसाच्या हाती नसतंच. हे बदलते वारे आपलं, विशेषत: तरुणाईचं जीवन प्रभावित करतात. ही वेगवान पडझड, घुसळण २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकातच तीव्र बनली आहे. पाश्चात्यीकरण, जागतिकीकरण, आधुनिकीकरण या सगळ्याच्या अतिरेकाची किंमत म्हणजे आज आपला विस्कळीत, विस्थापित झालेला समाज आणि त्याचा वैचारिक, सांस्कृतिक कणा हरपलेला मध्यमवर्ग. कुटुंबव्यवस्था आणि भावनिक, वैचारिक मूल्ये हा २० व्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत मध्यमवर्गीयांचा कणा होता. आज त्याचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. आयुष्याची गती, व्यग्रता, व्यक्तिस्वातंत्र्य या सगळ्यात नात्यांचा समतोल सांभाळणे, व्यक्तिमनाची कोवळीक, स्पंदनं जपणं (जे निवांत, स्वस्थ, शांत जीवनक्रमात शक्य असतं) जिकिरीचं बनलं आहे. स्पर्धा, गती, माहिती, प्रेम, पैसा, सोयी, तंत्रज्ञान, स्वातंत्र्य या साऱ्याच्या वर्षांवात स्थिर, खंबीर उभं राहण्याचं बळ, भावनिक समतोल सर्वाजवळ असणं शक्यच नसतं. खेरीज दु:ख, वेदना, अपयश, उपेक्षा यांचे चटके वाढाळू वयात सोसावे लागतात. त्यातून चुकणं, पडणं, खरचटणं, भरकटणं हे सारं अटळ, अपरिहार्य. पण त्यातून नव्या दमाने उभं राहण्यासाठी पैसे, सुखसोयींची व्यावहारिक तटबंदी पुरत नाही. त्यासाठी खरी शिदोरी हवी ती भक्कम, विवेकी भावनिकतेची.

 प्रा. उषा कोटणीस

जीवनशैली कारणीभूत

‘प्रिय चि. मन्मथ..’ व ‘धोक्याचे सिग्नल वेळीच ओळखा!’ हे लेख वाचले. कळत्या-नकळत्या वयातील मुला-मुलींच्या आत्महत्यांना आजची जीवनशैलीच कारणीभूत असावी असे वाटते. कारण हल्ली उच्चभ्रू व उच्च मध्यमवर्गीय ज्या सोसायटय़ांमध्ये राहतात, तिथे शेजाऱ्यांचा एकमेकांशी संबंधच नसतो. आता इंटरनेट-मोबाइलमुळे मुलांचा मित्रपरिवारही कमी असतो. त्यामुळे त्यांच्यात विचारांचे आदानप्रदान होत नाही. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे वा आपुलकीने काही सांगण्यास कोणी नसते. त्यामुळे एखादी समस्या उद्भवली की गोंधळून जाऊन मुले आत्महत्येचे पाऊल उचलत असावीत. गावांतली वा गरीब घरची मुलेही आत्महत्या करतात, पण त्यांची कारणे वेगळी असतात. गरिबीमुळे पालक त्यांच्या इच्छा पुऱ्या करू शकत नाहीत किंवा परीक्षेतील अपयश वा तत्सम कारणांनी ही मुले असे पाऊल उचलतात. मानसिक दडपणाखाली जशी श्रीमंत घरची मुले आत्महत्या करतात तसे गावाकडील वा गरीब मुले करीत नाहीत.                                                        – अनिल शांताराम गुडेकर, मुंबई

आतडे पिळवटणारे वास्तव

मुळापासून उन्मळून दोन आठवडेदेखील झालेले नसताना म्हैसकर दाम्पत्याने ‘प्रिय चि. मन्मथ’ या पत्रलेखातून ज्या संयमितपणे आपले मन मोकळे केले आहे त्याला तोड नाही. परंतु ‘तरीदेखील?’ या एकशब्दी प्रश्नाचा भुंगा त्यांची मने कुरतडतच राहणार आहे. आई-वडील मुलांचे संगोपन, लाड करतात. ती मोठी झाल्यावर त्यांच्या भावनिक, वैचारिक विश्वाला योग्य आकार देण्यासाठी सजग प्रयत्न करतात. तरीदेखील वैश्विक सत्य हे आहे, की प्रत्येक मूल हे त्या, त्या काळाची निपज असते. भोवती घडणाऱ्या घटनांच्या थपडा त्यांच्या आंतरिक विश्वाला आकार देत असतात. आजच्या इलेक्ट्रॉनिक युगात ही प्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे. मुलांना जन्म देणाऱ्या आई-वडिलांना त्यात काहीच स्थान नाही. त्यातून तरुणांची मने सृदृढच बनतात असे नाही; कमकुवत, रक्तबंबाळदेखील होतात. मूल जेवढे विचारी, संवेदनशील, त्या प्रमाणात त्यांची घुसमट जीवघेणी. आपल्या र्अधकच्च्या वैचारिक हत्यारांनी या सगळ्याचे अर्थ लावण्याचा, त्यांना स्वत:च्या आयुष्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न मुले करीत असतात. आपल्याला वाटते, आपले मूल आपल्याशी बोलते आहे. पण त्याचे स्वत:शी समांतर बोलणे सुरूच असते. शरीराने ते आपल्याजवळ असते, पण त्याचवेळी ते त्याच्या स्वत:च्या- फक्त त्याच्या विश्वात इतस्तत: भरकटत असते. बाळसे धरण्यासाठी, धडधाकट बनण्यासाठी प्रत्येक मुलाला स्वत:चे अन्न स्वत:च पचवावे लागते. या सत्याची विचारी व संवेदनशील युवकांना जाणीवही असते. त्याची तयारीदेखील ते करीत असतात. पण या प्रक्रियेदरम्यान काळाचा घाला आला की ती कोसळून पडतात. हे सारे आतडे पिळवटून टाकणारे आहे.

संजीव चांदोरकर, मुंबई

‘त्या’ कृतीचा अन्वय नाही

मिलिंद व मनीषा म्हैसकर यांनी मन्मथला लिहिलेले अनावृत पत्र वाचले. त्यातून मन्मथच्या कृतीचा मागोवा किंवा अन्वय लावण्याचा प्रयत्न आढळत नाही. तसा अन्वय लावला गेला असता तर ते इतरांना मार्गदर्शक ठरले असते.

प्रकाश मधुसूदन आपटे

नाण्याची दुसरी बाजू

‘प्रिय चि. मन्मथ..’ व ‘धोक्याचे सिग्नल वेळीच ओळखा!’ हे लेख वाचनात आले. पालकांच्या पत्रातील आशय वाचून शंकेला जागाच उरत नाही, की मन्मथला आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मानसिक आधार मिळत होता. शेवटच्या क्षणीसुद्धा ‘मित्राकडे जातोय,’ असे सांगून घरातून बाहेर पडणे हे लक्षण आत्महत्येच्या नेहमीच्या चौकटीत बसणारे नाही. दु:ख, उद्वेग, बेचनी अशी लक्षणे त्यात नव्हती.

आत्महत्येच्या घटनेनंतर फक्त पालकांच्या संगोपनाबद्दल चर्चा होते किंवा आजची जीवघेणी स्पर्धा वगरेकडे बोट दाखवले जाते. मानसशास्त्रीय कारणांची अतिरेकी चर्चा होते. ‘मानसरोग’ यास कारणीभूत असेल याचा विचार मात्र होत नाही.

आत्महत्येचा प्रयत्न हे एक ‘लक्षण’ आहे. ते ‘निदान’ नव्हे. आजच्या ताणतणावांचा विचार मानसशास्त्रज्ञ आणि मानसरोगतज्ज्ञ या ज्ञानशाखांनी एकत्र बसून करायला हवा. मेंदूतील काही रसायनांचे संतुलन बिघडल्यानेसुद्धा त्या व्यक्तीचे भावनिक संतुलन व पर्यायाने वर्तणूक बिघडते, ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही. सर्वच बाबतींत पालकांना दोष देणे किंवा उपदेश करणे चूक आहे.  आज ‘बालपणातील शिस्त’ हा प्रकारच नामशेष झाला आहे. मुले आपली आहेत, पण त्यांच्यावर पकड मनोरंजन माध्यमांची आहे. मुले वागताना चुकत असली तरी पालकांनी ‘ब्र’ काढायचा नाही असेच वातावरण गेल्या काही काळात निर्माण झाले आहे. आजच्या जगात पालकसुद्धा तणावात आहेत. मुद्दा हा, की ‘नराश्य’ या आजाराबरोबरच इतर काही मानसिक आजारही आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेणाऱ्यास असू शकतात, हा विचारही व्हायला हवा.

डॉ. हेमंत बेलसरे (मानसरोगतज्ज्ञ), मालाड

दुसऱ्या बाजूचाही विचार व्हावा!

मिलिंद व मनीषा म्हैसकर यांचा पत्रलेख वाचला व गहिवरलो. डॉ. शुभांगी पारकर यांच्या ‘धोक्याचे सिग्नल वेळीच ओळखा!’ या लेखात लिहिलेली सामाजिक-कौटुंबिक वातावरणाची कारणे तर पहिल्या लेखात कुठेच जाणवली नाहीत.

मुलांनी जीवनाचा शेवट करून घेतल्यावर नेहमी पालकांना लक्ष्य करणे अयोग्य. अशा प्रसंगी इतरेजन नस्ते सल्ले देण्याचा आगाऊपणा करतात. ‘सक्ती करू नका, हवं ते शिकू/ करू द्या, शिस्तीचा आग्रह धरू नका,’ हा बालमानसशास्त्रज्ञांचा मंत्र झाला. परंतु दुसऱ्या बाजूचा विचार का मनात येत नाही?

आत्महत्या करणारा हा वेगळ्याच विश्वात मग्न असतो, हे खरे. मानसिक तणावामुळे अपरिपक्व विचार बळावतात. त्यात पुन्हा त्या व्यक्तीचे भावविश्व वास्तव दुनियेपेक्षा समाजमाध्यमे, इंटरनेटमुळे भरकटलेले असते. पालकांच्या चुकांमुळे दिशा चुकून भरकटलेली मुले आणि मुलांच्या हट्टामुळे हताश झालेले पालक या नाण्याच्या दोन्ही बाजू सारख्याच तीव्र आणि गंभीर आहेत.

– श्रीनिवास स. डोंगरे, मुंबई

भेदरलेल्या समाजमनाला धीर

म्हैसकर दाम्पत्याच्या एकुलत्या एका मुलाच्या- मन्मथच्या आत्महत्येनंतर घराघरांत चर्चा झाली, मने हेलावून गेली, डोळे पाणावले. या घटनेने अनेकांची चिंता वाढली. विशेषत: पती-पत्नी दोघेही नोकरी करणाऱ्या घरांत अस्वस्थता पसरली. या पत्रातून म्हैसकर दाम्पत्याने वस्तुस्थिती समाजासमोर ठेवली आहे. इतकेच नव्हे तर स्वत:चे डोंगराएवढे दु:ख बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकी महत्त्वाची मानत समाजमनाला धीर दिला आहे. त्यांना इतरांनी धीर देण्याची आवश्यकता असताना भेदरलेल्या समाजाला धीर देण्यासाठी ते पुढे आले.

डॉ. हिरालाल खैरनार, नवी मुंबई</strong>

पालकत्व हे कौशल्याचे काम

मन्मथला पालकांनी लिहिलेले अनावृत पत्र वाचले. वाचून मन विषण्ण झाले. एक बालरोगतज्ज्ञ म्हणूनच नव्हे, तर एक पालक म्हणून मनात अनेक प्रश्न उभे ठाकले. अनेक पालकांनीही मला याविषयी विचारले होते. त्यांच्या प्रश्नांची मी माझ्या परीने उत्तरेही दिली होती. पण काही प्रश्न अनुत्तरितही होते. हे असं का घडलं असेल? पालकत्वाच्या सर्व आघाडय़ा यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या म्हैसकर दाम्पत्याच्या बाबतीत असे का घडले असेल? अत्यंत सुसंस्कृत, बुद्धिमान सनदी अधिकाऱ्यांची ही अवस्था, तर मग मुलांच्या संगोपनाबाबत फारसा जागरूकतेने विचार न करणाऱ्या पालकांची काय गत होत असेल? मन्मथने आपल्या जीवनाचा शेवट करून घेण्याचे कारण काहीही असेल; पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकाला आपलेही कुठेतरी चुकत आहे असे त्यामुळे वाटायला लागले. तसे वाटणे स्वाभाविक आहे. कारण मुलांच्या बाबतीत घडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपणच जबाबदार असतो असेच पालकांना वाटत राहते. पालकत्वाची जोखमीची जबाबदारी पार पाडणे हे मोठय़ा कौशल्याचेच काम आहे.

– डॉ. संजय जानवळे, बीड

जबाबदारीचे भान

मन्मथचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर समाजमाध्यमांवर चांगलाच धुराळा उडाला. प्रत्येकाने ‘मी सांगतोय तेच खरे!’ असा आव आणून पोस्ट लिहिल्या आणि शेअर केल्या. मात्र, या सगळ्या ‘विचारवंतां’(!)ना सत्य परिस्थिती माहिती होती का? त्यांचा आणि मन्मथचा संवाद होता का? या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असेच असल्यामुळे त्यातली एकही ‘पोस्ट’ परिपूर्ण चित्र समोर ठेवणारी नव्हती. मात्र ‘प्रिय चि. मन्मथ..’ या पत्रलेखात मन्मथच्या आई-बाबांनी अत्यंत धीराने, भावनेच्या आहारी न जाता आणि प्रामाणिकपणे ज्या गोष्टी मांडल्या, त्यामुळे पालक म्हणून मला काही मूलभूत गोष्टींविषयी विचार करायला भाग पाडले.

मन्मथचे आई-बाबा म्हणून असलेली जबाबदारी त्याच्या आई-बाबांनी योग्य प्रकारे पार पाडली. त्यांच्या अत्यंत व्यग्र दिनक्रमातूनही मन्मथशी संवाद कायम राहील याची पूर्ण काळजी त्यांनी  घेतली होती, हे लेखातून लक्षात येते. तरी असे का घडले?

लेखातून आणखी एक गोष्ट लक्षात येते, की मन्मथ स्वतंत्र विचारशैली असलेला, संवेदनशील मन असलेला मुलगा होता. परंतु त्याचे स्वतंत्र विचार आणि संवेदना समजून घेण्याची क्षमता असलेले जग त्याच्या आजूबाजूला होते का? आणि ते नसल्याने त्यातून त्याची घुसमट झाली असेल का? ही घुसमट आपण व्यक्त केली तर आपली खिल्ली उडवली जाईल, अशी भीती तर त्याच्या मनात आली नसेल? आणि जर आपल्या कल्पना प्रत्यक्षात येण्याची कोणतीही शक्यता समोर दिसत नसेल तर जगून करायचे तरी काय, असा विचार त्याच्या मनात सुरू होऊन, तो मुळातच संवेदनशील असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला असेल का?

पालक म्हणून मुलांच्या अभिनव कल्पनांचे कौतुक करीत असताना त्या वास्तवात आणणे शक्य आहे का, आणि जर असेल तर त्यासाठी लागणारी सहनशक्ती व प्रयत्नांतील सातत्य कसे आवश्यक आहे याची जाणीव मुलांना करून देणे अत्यंत आवश्यक आहे, ही बाब हा लेख वाचून जाणवली.

मन्मथच्या आई-बाबांनी जो धीर आणि संयम दाखवला, तो नक्कीच कौतुकास्पद आहे. जरी आज मन्मथ त्यांच्यापासून दुरावला असेल, तरी पालक म्हणून त्यांनी जे प्रामाणिक प्रयत्न केले, त्यातून नक्कीच अनेक मन्मथ त्यांच्याशी जोडले जातील आणि आई-बाबा म्हणून त्यांना कधीच पोरके वाटणार नाही अशी खात्री आहे.

चेतन श्रीनिवास एरंडे, पुणे</strong>