९ जुलै २०१७ च्या ‘लोकरंग’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखातील आक्षेपांना उत्तर देणारा डॉ. सांगोलेकर यांचा खुलासा वाचला. त्यांचे म्हणणे असे आहे की, ‘‘माझे आक्षेप मी त्यांना समक्ष अथवा दूरध्वनीद्वारे कळवायला हवे होते. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’तील  लेखाविषयीचे आक्षेप महाराष्ट्र  साहित्य पत्रिकेच्या व्यासपीठावरून मांडले असते तर ते सयुक्तिक ठरले असते. (या वाक्यात त्यांनी वापरलेला ‘व्यासपीठ’ हा शब्दही चुकला आहे. तिथे ‘अंक’ हा शब्द योग्य आहे.) मात्र, त्यातील एकही गोष्ट न करता ‘लोकरंग’ पुरवणीतून जाहीर वाच्यता केली हे त्यांना खटकले.

डॉ. सांगोलेकरांच्या माहितीसाठी सांगते की, त्यांचा लेख ज्या अंकात आला होता त्या अंकातील अनेक लेखांतील शब्दांवरचे माझे आक्षेप आणि डॉ. सांगोलेकरांच्या लेखातील क्षीरसागरांच्या मतांबद्दल चुकीच्या आकलनाबद्दलही मी पत्रिकेच्या संपादकांना पत्राने कळवले होते. त्यात सांगोलेकर यांच्या लेखातील एका मुद्रणदोषाचाही उल्लेख केला होता. मात्र, माझे पत्र संपादकांच्या माहितीसाठी होते. ते पत्रिकेत प्रकाशित करण्यासाठी नव्हते. माझे १७ ऑगस्ट २०१६ चे ते पत्र पत्रिकेत प्रसिद्ध करायला हवे होते असे आज वाटते. संपादकांच्या उत्तराची मी अपेक्षा केली होती, पण त्यांच्याकडून उत्तर आले नाही.  आपला लेख हा शोधनिबंध नसून निबंध आहे, असा ठळक स्वरूपात उल्लेख लेखाच्या प्रारंभी केला आहे, असा बचाव डॉ. सांगोलेकर करीत असले तरी लेखाच्या आरंभी त्या लेखाचे स्वरूप किंवा प्रयोजन सांगणारा मजकूर संपादकांनी लिहिण्याची प्रथा सर्वत्र आहे. या लेखाच्या  आरंभीही ठळक टाईपातल्या मजकुरातच ‘आढावा घेणारा निबंध’ हे शब्द आहेत. म्हणजे हे शब्द सांगोलेकरांचे नसून संपादकांचे आहेत, हे समजणे योग्य ठरते.

डॉ. सांगोलेकर पुढे लिहितात,‘‘लेखांची जंत्री देऊनच मी थांबलेलो नाही, तर त्यावर थोडक्यात भाष्यही केलेले आहे.’’ मात्र, लेखांच्या जंत्रीचा मजकूर बरीच पाने व्यापणारा आहे, त्यामानाने ‘भाष्य’ फारच कमी आहे, असे माझे निरीक्षण आहे.

संदर्भ आणि टिपा एका मथळ्याखाली कुठेच देत नाहीत, हे माझे मत वस्तुस्थितीस धरून नाही. कारण अनेक शोधनिबंधांमध्ये, प्रबंधिकांमध्ये, प्रबंधांमध्ये, संशोधनपर ग्रंथांमध्ये ही पद्धत सर्रास वापरली जाते. उदाहरणादाखल डॉ. र. बा. मंचरकरांचे ग्रंथ सांगता येतील, असे डॉ. सांगोलेकर लिहितात. याचा अर्थ संशोधनपर लेखनातले अराजक संपलेले नसून वाढलेले आहे असा होतो.

संशोधनपर लेखनाचे एक तंत्र आहे. या विषयावरचे जयकर ग्रंथालयातले सर्व इंग्रजी ग्रंथ मी वाचले आहेत. पण त्यातल्या एकाही ग्रंथात ‘संदर्भ आणि टिपा’ एकाच मथळ्याखाली लिहिलेले आढळले नाही, हे मी डॉ. सांगोलेकरांच्या निदर्शनास आणू इच्छिते. १ या क्रमांकाची नोंद टिपेची नसून संदर्भाची आहे, असे सांगोलेकर लिहितात. पण संदर्भाच्या नोंदीमागे क्रमांक नसतात आणि त्या लेखकांच्या आडनावांच्या अनुक्रमाने लावलेल्या असतात. डॉ. सांगोलेकरांनी क्रमांक दिले आहेत आणि नोंदी लेखकांच्या आडनावांच्या वर्णानुक्रमाने दिलेल्या नाहीत.

मी दाखवलेल्या उणिवा अत्यल्प आहेत असे डॉ. सांगोलेकरांना वाटत असेल तर ते आत्मसंतुष्ट आहेत असे म्हणावे लागेल. डॉ. सांगोलेकरांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न मी केला आहे असा आरोप त्यांनी केला आहे. पण हा आरोप चुकीचा आहे. संशोधनाच्या क्षेत्रात लिहिताना किती सावध असावे लागते हे दाखवण्याचा माझा उद्देश होता, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

– डॉ. शकुंतला क्षीरसागर

हा वाद आम्ही आमच्यापुरता इथेच थांबवीत आहोत. – संपादक

एक अट्टल व्यंगचित्रकार!

‘तेंडुलकरांचा अँगल!’ हा लेख वाचला.  तेंडुलकरांच्या स्थानाचा विचार केल्यास ते शंकर (‘शंकर्स वीकली’चे व्यंगचित्रकार), बाळ ठाकरे, आर. के. लक्ष्मण यांच्या पंक्तीतले होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्याकडे दर्जेदार व्यंगचित्रकारांची संख्या खूप कमी आहे. तरुण पिढी या क्षेत्रात फारशी येताना दिसत नाही. समाजातील व्यंगांवर बोट ठेवून हसत, हसवत प्रबोधन करणे हे काम सोपे नाही. ते केवळ अट्टल व्यंगचित्रकारालाच जमते!

– सां. रा. वाठारकर, पुणे</strong>

वेगळ्या वाटेचा प्रवास अवघडच!

‘जसे जगायला हवे होते तसे!’ हा सचिन कुंडलकर यांचा लेख वाचला. आपल्या देशात एकंदरीत पाहता चाकोरीबद्ध आयुष्यच (ते कितीही निरस असले तरी) पसंत केले जाते. फार कमी लोक वेगळ्या वाटा शोधून काहीतरी करू पाहतात. परंतु त्यांना कौटुंबिक व सामाजिक पाठिंबा मिळत नाही. मात्र, अलीकडे परिस्थिती सुधारत आहे असे जाणवते. युवा पिढी चौकट मोडून झेप घेताना दिसते. त्यात त्यांना कौटुंबिक पाठिंबाही मिळत आहे. परंतु त्यात त्यांनी यशस्वी व्हायलाच हवे, ही अपेक्षा असतेच. हे वास्तव आहे. त्यामागे अनेक कारणेही आहेत. त्यामुळे जे आहे त्यात आनंद मानणेच योग्य, असा मतप्रवाह सर्वत्र दिसतो.

– प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक