१४ मेच्या ‘लोकरंग’मध्ये माझा ‘ब्लू ओकलिफच्या शोधात..’ हा लेख प्रकाशित झाला. लेखाचा उद्देश या फुलपाखराविषयी माहिती व्हावी हा होता. आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या झाडांवर ही फुलपाखरे एवढय़ा मोठय़ा संख्येने ठरावीक कालावधीत येतात, हे लोकांपर्यंत पोहोचवावेसे वाटले. अनेकांनी हे फुलपाखरू कुठे बघायला मिळेल, असे विचारले. परंतु यावर्षीचा त्यांचा येण्याचा कालावधी संपला आहे. साधारणत: जानेवारीपासून एप्रिलपर्यंत ही फुलपाखरे मोठय़ा प्रमाणावर या झाडांवर येतात. त्यामुळे आता ही फुलपाखरे दिसणं शक्य नाही. अनेकांनी कॅशिया ग्रॅण्डिसविषयीही विचारले. मी सहा-सात झाडे शोधली होती. अनिरुद्ध वैद्य यांनी कोथरुड परिसरातील एका बागेत चार झाडे असल्याचे सांगितले. आणखी एक मित्र सागर पवार यांनीही पुण्यातील एस. पी. कॉलेज आणि एस. एन. डी. टी. कॉलेजजवळील झाडांबद्दल सांगितले. पुढील वर्षी या झाडांना रस (SAP) आला तर हे फुलपाखरू दिसण्याची शक्यता आहे.

कौस्तुभ मुदगल, पुणे</strong>

‘हिंदू पंच’विषयी..

‘मराठी वळण’ या सदरातील प्रसाद हावळे यांचा ‘पंच आजोबा’ हा लेख  (२१ मे) वाचला. आवडला. व्यंगचित्रांच्या इतिहासात ‘पंच’ या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या नावाचा दबदबा सर्वत्र होता. ठाण्यातील ‘हिंदू पंच’ या मराठी ‘पंच’प्रमाणे बंगाली, गुजराती, कन्नड, तेलुगू वगैरे भाषांमधूनही विविध प्रकारे ‘पंच’ प्रकाशित होत असे. ‘हिंदू पंच’ विलक्षण लोकप्रिय झाले होते. गोपाळ गोविंद दाबक हे त्याचे संस्थापक-संपादक होते. त्यांच्यानंतर काशीनाथ विष्णू फडके आणि कृष्णाजी काशीनाथ ऊर्फ तात्या फडके हे संपादक झाले. परंतु तात्या फडके यांच्या काळात ‘हिंदू पंच’वर मोठीच आपत्ती कोसळली. लोकमान्य टिळकांना १९०८ साली राजद्रोहाच्या आरोपावरून सहा वर्षांची शिक्षा झाली. यासंदर्भात ‘हिंदू पंच’ने नामदार गोखले यांच्यावर झोंबणारी टीका केली. गोखल्यांनी फडक्यांवर अब्रूनुकसानीचा दावा लावला. कोर्टकचेऱ्यांमुळे फडके आर्थिक संकटात आले. दाव्याचा निकाल फडक्यांच्या विरोधात लागला. ‘हिंदू पंच’च्या छापखान्यावर जप्ती आली. त्यांना पाच रुपये दंड आणि दाव्याचा खर्च देण्यास फर्मावले गेले. तो खर्च देणे फडक्यांना अशक्य होते. गोखल्यांच्या मनाचा मोठेपणा असा, की त्यांनी तेवढी पूर्ण रक्कम (आणि आणखीही काही पैसे) फडक्यांकडे पोहोचती केली आणि त्यांना कर्जमुक्त केले.

काही वर्षांपूर्वी मी ‘हिंदू पंच’वर एक लेख लिहिला होता. ‘संवाद हास्यचित्रांशी’ या माझ्या पुस्तकात, तसेच ‘निवडक मराठी व्यंगचित्रं’ (संपादन- प्रशांत कुलकर्णी) या पुस्तकात तो समाविष्ट आहे.

हावळे यांच्या लेखात डॉ. सरोजिनी वैद्य यांचा उल्लेख आहे. सरोजिनीबाई म्हणजे मूर्तिमंत अभ्यासूवृत्ती. मी ‘हिंदू पंच’वर थोडेसेच लिहिले होते. मात्र, माझ्या लेखासाठी ‘केसरी मराठा’ संस्थेच्या सहकार्याने ‘हिंदू पंच’मधील काही चित्रांच्या छायांकित प्रती काढून आणल्या होत्या. हे कळल्यावर काही अधिक संदर्भासाठी आणि चित्रे बघण्यासाठी सरोजिनीबाई मुद्दाम मला भेटायला आल्या होत्या. त्यावेळी काही छायांकित चित्रे मी त्यांना दिली होती. ब्रिटिश सरकारला विरोध हे मुख्य कारण आणि कुजकट, कडवट टीकेचा अतिरेक यामुळे ‘हिंदू पंच’ बंद पडले. तरीसुद्धा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात ‘हिंदू पंच’चे स्थान फार महत्त्वाचे आहे.

शकुंतला फडणीस, पुणे

अमेरिकेतील ‘मल्टिलेव्हल’!

मंदार भारदे यांच्या ‘बघ्याची भूमिका’ या सदरातील ‘मल्टिलेव्हल मर्कटलीला’ हा लेख (२८ मे) वाचला. त्यावरून हा प्रकार जागतिकीकरणाच्या नव्हाळीच्या दिवसांत अगदी अमेरिकेतसुद्धा किती बोकाळला होता आणि भाबडे भारतीय तरुण त्याला कसे फशी पडत होते, ते आठवले. ‘आयटी’च्या लाटेवर स्वार होऊन १९९० च्या दशकात अमेरिकेत दाखल झालेले भारतीय मध्यमवर्गीय तरुण अनेक गोष्टींनी भारावलेले असत. ज्या देशाबद्दल आपण फक्त वाचले होते तो देश प्रत्यक्ष पाहणे, तेथील चोख कायदा-सुव्यवस्था, अनोळखी असूनही अदबीने ‘गुड मॉìनग’ म्हणणारी गौरवर्णी माणसे, डॉलरचा रुपयांतील भाव.. हे सारे त्यांच्यासाठी स्वप्नवतच होते. भारतात ठरावीक मध्यमवर्गीय चौकटीत वाढलेल्या या तरुणांच्या आकांक्षांना अशा ‘फील गुड’ वातावरणात अनेक धुमारे फुटत होते. त्याचा अचूक (गर)फायदा अनेक देशी-विदेशी ‘मल्टिलेव्हल’वाल्यांनी उचलला आणि त्यांना धंद्याचे आमिष दाखवून ‘मेंबर’ करून घेतले. मग आणखी मेंबर मिळवण्याकरिता ओळखी वाढाव्यात म्हणून असे अनेक भाबडे तरुण/तरुणी वा जोडपी तेथील भारतीय किराणामालाच्या दुकानांसमोर घुटमळत. आणि ‘तुम्ही दादरचे का?’ वगरे प्रश्न विचारून अनोळखी भारतीयाशी संभाषण सुरू करत. परदेशात ‘होमसिक’ झालेल्या अनेकांना अशा आस्थेवाईक चौकशीने उचंबळून येत असे आणि त्यांच्यात जन्मजन्मांतरीची ओळख असल्यासारख्या गप्पा सुरू होत. मग अशा कंपन्यांच्या सभांना सुटाबुटात जाणे, व्यासपीठावर उभे राहून भाषण करणे, त्याला टाळ्यांचा प्रतिसाद मिळणे अशा मोहवून टाकणाऱ्या वातावरणात अनेक भाबडे भारतीय तेव्हा स्वत:ला खरोखरीच यशस्वी उद्योगपती समजू लागले होते! उच्चशिक्षित हुशार व्यक्तींच्याही बुद्धीवर कसा पडदा पडू शकतो, हे पाहणे धक्कादायक होते. ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’ याचे ‘मल्टिलेव्हल मार्केटिंग’ हे उत्कृष्ट उदाहरण आहे.

प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>