मोदी राजवटीच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्ताने सध्याचे सत्ताकारण व नेतृत्व यांचा लेखाजोखा मांडणारे लेख वाचले. ते वाचून बालपणीची एक गोष्ट आठवली. ‘घोडा अडला का? पानं सडली का?’ या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच : ‘न फिरवल्याने’! त्याप्रमाणे आपल्या सर्व समस्यांचे मूळ एकच : भारतीय जनता सजग नाही. ती भाबडी, भावनिक आहे. निवडणुकीतील विजय हेही एक ‘डील’ असते. अमुक एक पंतप्रधान म्हणून मान्य केल्यास तमुक पक्ष विजयी करून दाखवतो, हे म्हणजे सुमार दर्जाच्या नेमबाजाने आधी गोळी झाडून मग भोवती ‘बुल्स आय’ रेखण्यासारखे आहे. ई. व्ही. एम. यंत्रात फेरफार करणे अशक्य असेल तर मग इंग्लंडमध्ये ब्रेग्झिटबद्दल जनतेचा कौल मतपत्रिकांद्वारे का घेतला गेला? ‘पंतप्रधानांचा जनतेशी संवाद’ म्हणजे प्रत्यक्षात ते एकतर्फी व्याख्यानच असते. कारण संवाद हा दोन्ही बाजूंनी होतो, हेही आज जनतेला कळत नाहीए.

सेवा हमी कायदा लोकप्रतिनिधींना का नको? किती तास काम अधिवेशनात झाले? कोण गैरहजर होते व किती विधेयके गदारोळात संमत झाली, यावर जनता भाष्य केव्हा करणार? शेतकऱ्यांना कर्ज देताना ‘तारण’ व ‘कारण’ यांची छाननी केली गेली होती का? नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधानांनी ३१ मार्च २०१७ पर्यंत रिझव्‍‌र्ह बँक जुन्या नोटा स्वीकारेल असे म्हटले होते; परंतु बँकेने ते ३० डिसेंबरलाच अमान्य केले. ही जनतेची केलेली फसवणूकच आहे. आता या घोळात जे पैसे बॅंकांमध्ये पडून राहिले त्याच्या व्याजाचे काय? बँक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम केल्याबद्दल दुप्पट पगार द्यावा लागला. या नस्त्या खर्चाचे काय? याचा सारासार विचार न करता जनता मात्र भ्रष्टाचार संपून स्वस्ताई येईल या स्वप्नरंजनात मग्न आहे.

संकेत नहार, मुंबई

 

पांडित्य, रसिकता आणि गोष्टीवेल्हाळपणा!

सेतुमाधवराव पगडी यांच्या समग्र साहित्याच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाविषयीचा वृत्तलेख वाचला आणि मनाने ४० वर्षांमागे पोहोचलो. साल १९७४ असावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३०० वर्षे पूर्ण होत होती. महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मी शिवचरित्राचा एक अभ्यासक. याच काळात प्रसिद्ध झालेले पगडींचे इंग्रजीतील शिवचरित्र माझ्या संग्रही होते. याच सुमारास एक अमृतयोग जुळून आला. पगडींचे व्याख्यान मडगावच्या गोमंत विद्यानिकेतन या संस्थेत होणार होते. पगडींचे छत्रपतींवर अप्रतिम भाषण झाले. व्याख्यान संपताच पगडींना कोलवा बीच दाखवण्यासाठी घेऊन जायचे; तिथून त्यांना गेस्ट हाऊसवर पोहोचवायचे, जेवण घ्यायचे आणि निरोप द्यायचा, ही जबाबदारी माझ्याकडे होती. पगडींना घेऊन मी कोलव्याला गेलो. शिवचरित्रातल्या काही शंका त्यांना विचारत होतो. त्यांचे मोठेपण हे, की कोणतीही आढय़ता न दाखवता ते त्या सर्व शंकांची मोकळेपणाने उत्तरे देत होते.

दुसऱ्या दिवशी पणजीला महाराष्ट्र परिचय केंद्रात त्यांचा गप्पांचा कार्यक्रम होता. त्यास चिकित्सकांची उपस्थिती होती. ‘आग्य्रावरील गरुडझेप’ या बाबाराव सावरकरलिखित पुस्तकाबद्दल पगडींना प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा ‘मी एक इतिहास संशोधक आहे. कागदाचा कपटा पुरावा म्हणून हाती मिळाल्याखेरीज मी कोणतीही घटना सत्य मानणार नाही,’ असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर ‘इतकी जोखमीची झेप मारताना छत्रपतींसारखा हिकमती धुरंदर मागे पुरावा ठेवेल का?’ असा उपप्रश्न आला. पगडींनी बोलायला सुरुवात केली.. ‘शिवाजी कळायला हवा, तर औरंगजेब आणि मोगल साम्राज्य समजून घ्यायला हवे. त्यांच्या सामर्थ्यांपुढे छत्रपतींसारखा विचारवंत राजा असे साहस करणार नाही. अशी विधाने पोवाडे वा कथा-कादंबऱ्यांत ठीक आहेत.’ त्याच दिवशी सायंकाळी म्हापशाला पगडींचे ‘शिवाजी युगपुरुष का?’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी अनुभवलेले त्यांचे पांडित्य, रसिकता आणि गोष्टीवेल्हाळपणा यांचा संगम या लेखाच्या निमित्ताने पुन्हा ताजा झाला.

र. वि. जोगळेकर, गोवा.

 

ते त्यांचे खासगी आयुष्य

‘हम  सजाते  रहेंगे नये काफिले’ हा नंदा खरे यांचा ‘आजचा सुधारक’ बंद झाला त्यानिमित्ताने लिहिलेला लेख आणि अभिजीत ताम्हणे यांनी ‘पुढे जाण्याचे निमंत्रण’ या लेखातून परदेशी चित्र-प्रदर्शनांची घेतलेली कलासक्त दखल हे अत्यंत वाचनीय लेख होते. परंतु सचिन कुंडलकर यांच्या सदरातील ‘गुणी आणि कर्तबगार नटय़ा’ हा लेख मात्र रीमा लागू यांच्या कौतुकासाठी लिहिला आहे की बदनामीसाठी, असा प्रश्न पडला. एक तर नट-नटय़ांचे व्यक्तिगत आयुष्य हे कसेही असले तरी ते खासगी असते याचे भान ठेवायला हवे.

सौमित्र राणे, पुणे

 

गेले, ते दिन गेले!

सुधीर गाडगीळ यांचा ‘पुणं बदलतंय’ हा लेख मला भूतकाळात घेऊन गेला. १९७१-७२ साली नोकरीनिमित्ताने माझे पुण्यात वास्तव्य होते. एकटाच राहात असल्याने नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत हॉटेलवरच अवलंबून असल्याने त्यावेळी सारी हॉटेले पालथी घातली होती. तेव्हा रविवारचा नाश्ता बहुधा ‘वैशाली’ किंवा ‘रूपाली’तच व्हायचा. संभाजी पार्कसमोर ‘रसना’, ‘रुचिरा’ ही भावंडं छान जेवण देत असत. तर ‘जीवन’मध्ये एका दुपारी चक्क पांडुरंग साळगांवकर व कानिटकरसोबत एकाच टेबलवर जेवण्याचा योग आला होता.

तेव्हा मी संभाजी पार्कसमोर राहत असे. त्यामुळे ‘बालगंधर्व’मध्ये नाटक पाहणे हा नेहमीचा रिवाज होता. त्यावेळी कित्येक अभिनेते-अभिनेत्रींना भेटण्याचा योग आला. दौंडहून परत येताना मद्रास-मुंबई मेलमध्ये डॉ. जब्बार पटेल यांच्याबरोबर गप्पा मारत प्रवास कधी संपत असे, हेही कळत नसे. त्यावेळी ‘पूनम’च्या बाहेर एका पंजाबी दाम्पत्याने चालवलेले फळांच्या रसाचे छोटेखानी दुकान होते. लोक ‘पूनम’मध्ये जेवत व स्वीट डिश खाण्यासाठी या दुकानाला भेट देत असत. त्या वास्तव्यात जवळपास त्यावेळची सारी हॉटेले पालथी घातली होती. गेले ते दिन गेले! सुधीर गाडगीळ यांचा लेख वाचताना ‘ती’ चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.

प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, मुंबई.

 

शिक्षणाचे व्यापारीकरण..

मंगला गोडबोले यांचा ‘विद्यार्थीपेठ.. शिक्षणाची!’ हा नर्मविनोदी लेख शिक्षणाच्या व्यापारीकरणाचा गांभीर्याने चिंतन करायला लावणारा वाटला. हल्ली पूर्व-प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण व्हायला सुरुवात होते. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्याशिवाय व्यावहारिक जगात तरणोपाय नाही, हेच मुलांच्या मातांवर आणि पर्यायाने मुलांवर िबबवले जात आहे. त्यात मराठी माध्यमाच्या शाळेत पाल्याला घालू इच्छिणाऱ्या पालकांना चांगला पर्यायही उपलब्ध नाही.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एकदा का मुलांना टाकलं की ती व्यवहारचतुर होऊनच बाहेर पडणार, हा फाजील आत्मविश्वास पालकांमध्ये निर्माण करायला ‘व्यापारी’ गणितं जमवणारी ही शाळा-कॉलेजेच कारणीभूत आहेत. यातली बहुसंख्य शाळा-कॉलेजे ही विनाअनुदानित असल्याने डोनेशनपासून विविध कारणांसाठी ते सतत पालकांकडून मनमानी शुल्क उकळत असतात. मग त्यांच्या कचाटय़ात सापडलेल्या पालकांना दुसरा इलाजच नसतो. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी करायची पशांची तरतूद प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणातच संपते. अशा परिस्थितीत आíथकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबांतली मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची व त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची शक्यता वाढते.

एकीकडे शिक्षण हक्काच्या, सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळांची आíथक कोंडी करायची, जाचक अटी लादायच्या, शाळांतील शिक्षकांना विश्वासात न घेता अभ्यासक्रम आणि शैक्षणिक धोरणे ठरवून त्याची अंमलबजावणी करायला लावायची, त्यांच्या कार्यभारात अवाजवी वाढ, अशैक्षणिक कामे करायला लावणे असे प्रकार करायचे, आणि वर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे खापर त्यांच्याच माथी फोडायचे, या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्याची हमी उरली नाही. शिक्षकांनाच शिकवण्यात रस नसेल तर विद्यार्थ्यांना तरी गोडी कशी लागणार? यासाठी शिक्षणाचे व्यापारीकरण कमी कसे करता येईल ते पाहिले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य कसे देता येईल, पालकांना बोजा वाटेल असे शुल्क लावणाऱ्या शिक्षणसंस्थांना चाप कसा लावता येईल, मराठी माध्यमाच्या शाळांना ऊर्जतिावस्था कशी आणता येईल, नवीन शाळांना मान्यता देताना मराठी माध्यमाच्या शाळा काढायला आणि त्यांना त्यांच्या प्रगतीनुसार, विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाप्रमाणे अनुदान वाढवता कसे येईल, हे प्राधान्याने पाहायला हवे.

कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी िशदे यांसारख्यांनी ज्या निरपेक्षतेने शाळा काढून, ती एक निरलस समाजसेवा समजून या संस्थांचे वटवृक्ष केले, तो आदर्श आज मागे पडत चालला आहे. या आदर्शाना संजीवनी मिळाल्यास विद्यार्थी केवळ अगतिक परीक्षार्थी होण्यापासून वाचतील आणि पसा आणि पाल्याचं शिक्षण यांची सांगड घालताना पालकांची होणारी ससेहोलपटही कमी होईल असे वाटते.

श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे