१३ ऑगस्टच्या ‘लोकरंग’मधील ‘इतना सन्नाटा क्यूं है भाई?’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. लेखातील त्यांच्या बहुतांश मतांबद्दल मी व्यक्तिश: सहमत नाही. कारण एक खासदार म्हणून काम करताना वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे अनुभवास आले आहे. ती आपल्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराच्या निदर्शनास आणावी, म्हणून हा पत्रप्रपंच..

कुबेर दिल्लीत फेरफटका मारायला आले होते, असा उल्लेख लेखात त्यांनी केलेला आहे. ‘फेरफटका’ या शब्दाच्या वापरातूनच ते मोदी सरकारची गांभीर्याने चिकित्सा करायला नव्हे, तर निष्कर्ष तयार करून गेले होते व त्यास अनुसरून भूमिका मांडण्यासाठी त्यांनी फेरफटका मारला होता, हे स्पष्ट होते. या देशातील जनतेने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे देशातील अनेक पत्रकारांना आलेले वैफल्य अद्याप संपलेले नाही याची पुन्हा एकदा खात्री पटली.

दिल्लीत मंत्री त्यांना दरवाजापर्यंत सोडायला आले होते, हेच खरे तर दिल्लीत बदललेल्या संस्कृतीचे दर्शन आहे. एखाद्या ज्येष्ठ पत्रकाराला मंत्र्याने दरवाजापर्यंत सोडणे हा सुसंस्कृतपणाचा भाग आहे, त्याचा लेखकाने विपरीत अर्थ काढल्याचे फारसे आश्चर्य वाटले नाही. कारण या संस्कृतीची त्यांना सवय नाही. पदाची व गोपनीयतेची शपथ घेतलेल्या मंत्र्यांनी केवळ पत्रकार म्हणून त्यांच्याशी गप्पांचा फड  रंगवला असता तर कदाचित पत्रकाराचा अहंकार कुरवाळला गेला असता.

मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या राजवटीत भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण झाले नाही आणि लेखकाच्या भाषेत ज्या दोघांच्या हातात सत्ता एकवटलेली आहे त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. याचा त्यांना बसलेला धक्का समजण्यासारखा आहे. निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळे या देशात काळा पैसा आणि रोखीच्या ताकदीवर काही करता येणार नाही, हा संदेश गेला आहे. ५६ लाख करदाते वाढले. सामान्य माणूस नरेंद्र मोदींच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहिला आणि देशासाठी त्याग करायला जनता आजही तयार आहे. पण त्यासाठी मोदींसारखे विश्वासार्ह नेतृत्व लागते. मी पं. दीनदयाळ उपाध्याय यांना पाहिलेले नाही, पण त्यांच्यासारखेच मोदी अहर्निश कष्ट करताहेत आणि सामान्य माणसाच्या उद्धारासाठी  टीकेचे हलाहल पचवून संयमाने वाटचाल करताहेत. याची कदर सामान्य जनता करते आहे.

सरकारच्या प्रमुखाला कणा, भूमिका, कृतिशीलता असणे आणि सत्तेवर असणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षालाही तितकेच महत्त्व असणे, हे देशाच्या  इतिहासात प्रथमच घडत असल्याने, त्याविषयीही लेखकास अचंबा वाटणे साहजिक आहे. देशातील बदल वरवरचा नाही, खोल आहे. तो समजून घेण्यासाठी राजधानीत ‘फेरफटका’ नव्हे, तर निर्भेळ दृष्टी ठेवून अधिक कालावधी घालवावा लागेल.

– अनिल शिरोळे (भाजप खासदार)

‘त्यांच्या’ क्षमता आम्ही जाणतो!

‘इतना सन्नाटा क्यों है भाई..?’ हा कुबेर यांचा लेख वाचला. मि. नमो हे बडोद्यात प्रचारक म्हणून बरीच वर्षे होते. आमच्याबरोबर व हाताखाली त्यांनी बरीच वर्षे काम केलेले आहे. फक्त आणि फक्त नशीब व डावपेचांमुळे आणि संघामुळेच ते येथवर पोहोचले आहेत. आम्ही सर्व त्यांच्या क्षमतेबद्दल चांगलेच परिचित आहोत. He is Reliably unreliable and not at all Trust- worthy.. हे ‘सौ चूहे खाके बिल्ली हज को चली’सारखे आहे. लेखातील मते तंतोतंत खरी आहेत. अण्णा हजारे अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसविरुद्ध देशात उभी केलेली लाट भाजप- विश्व हिंदू परिषद (संघाने) आपल्या बाजूने वळविली आणि म्हणूनच मोदी हे आज पंतप्रधानपदी आहेत.

– जय सिंह, बडोदे

सफाई कामगारांबद्दल आदर हवा..

डॉ. विकास आमटे यांचा ‘कुष्ठ-मैत्र!’ हा लेख वाचून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मी सध्या अमेरिकेत शिकतोय. मुंबईच्या यूडीसीटीमध्ये डॉ. आमटे यांचं मनोगत पहिल्यांदा ऐकलं. त्यानंतर श्रमसंस्कार छावणीमध्ये त्यांच्यासोबत आणि सोमनाथ प्रकल्पातील सर्व गोड लोकांसोबत राहून जीवनाला एक वेगळंच वळण मिळालं. रिलायन्समधील नोकरी सोडून मग मी मुंबईतल्या कचऱ्याच्या प्रश्नावर काम करू लागलो. शहरी रहिवाशांनी वर्गीकरण न करता सहज फेकून दिलेला कचरा उचलताना त्या सफाई कामगारांचे किती हाल होतात हे पाहूनच मला अपराधी वाटायचं. काही लोक कचरा सफाई करणाऱ्या कामगारांकडे पाहून हळहळ व्यक्त करतात. काही जण तिरस्काराने, तर काही त्यांना घाणेरडे म्हणून त्यांच्यापासून दूर राहतात. पण ही गोष्ट कोणी लक्षातच घेत नाही, की आपणच फेकलेला कचरा ते सफाई कामगार उचलत असतात. मग त्यांच्याबद्दल तर आपल्याला आदर असायला हवा ना!

– विवेक पाटील, अ‍ॅटलांटा (अमेरिका)