‘लोकरंग’मधील (१८ जून) विनायक जोशी यांच्या ‘स्वरभावयात्रा’ या सदरातील लेख वाचताना त्या संदर्भातील काही घटना आठवल्या. १९६२ च्या आगेमागे दादरच्या रानडे रोडवरील कोहिनूर सिनेमासमोरून दुपारवेळी जात होतो. नाकीडोळी तरतरीत-देखणा, मध्यम वयाचा एक माणूस दिसला. गव्हाळ वर्णाच्या त्या माणसाने गुडघ्यापर्यंत असलेली अर्धी पँट (चड्डी नव्हे) घातली होती – बाकी उघडी बंबच होती स्वारी. अनवाणी पावलांनी उभा असलेला तो माणूस भिकारी किंवा वेडा वाटत नव्हता. त्याच्या हातात व्हायोलिन व बो होता. फुटपाथवर ताठ उभे राहून एक नाटय़पद तो वाजवत होता. ते व्हायोलिन वाजत नव्हते तर गात होते असेच म्हणावे लागेल. गीत संपल्यावर तो माणूस प्रसन्न हसला. काही नाणी बऱ्याच लोकांनी त्याच्या हातावर ठेवली. पण तो माणूस पसे घेण्यासाठी एखाददोन पावलेसुद्धा पुढे-मागे होत नव्हता, हे मला जाणवले. लोक पुढे येऊन त्याला हसतमुखाने पसे देत होते. त्याला लोककलेची ‘बिदागी-मानधन’ देत होते. तो भीक मागत नव्हता! नंतर तो वादक तेथून पंधरा-वीस दुकाने पुढे गेला. तेथे त्याचे व्हायोलिनने एक हिंदी गाणे गायले. परत काही मानधन त्याला मिळाले. माझ्या ओळखीचे एक वयस्क गृहस्थ मला तेथेच वादन ऐकताना भेटले. त्यांनी सांगितले, की हे गृहस्थ म्हणजे फार मोठे संगीतकार ‘श्रीधर पास्रेकर’ आहेत. व्यसनामुळे ते अशा अवस्थेत आहेत. मी तेव्हा पंधरा वष्रे वयाचा होतो. त्यानंतर त्याच भागात पास्रेकर मला एकदोनदा दिसले. माझ्याकडे पसे नसायचे म्हणून त्यांचे वादन संपले, की मी त्यांच्या समोर जाऊन त्यांना नमस्कार करायचो. ते डोळे मिचकावत मंदसे हसायचे. पास्रेकरांबद्दल याच प्रकारची अधिक माहिती नटवर्य प्रभाकर पणशीकरांच्या ‘तोच मी!’ या आत्मचरित्रात वाचायला मिळाली.
कॅ. आनंद बोडस

भावगीताच्या शोधात..

‘लोकरंग’मधील ‘स्वरभावयात्रा’ हे विनायक जोशी यांचे सदर वाचतो. अवीट गोडीच्या पण विस्मरणात गेलेल्या भावगीतांचा या सदरात नव्याने परिचय करून दिला जात असल्याने वाचताना मन भरून येते. मी अशाच एका भावगीताच्या शोधात गेली अनेक वष्रे आहे, पण आजवर मला कुणाकडून अधिक माहिती किंवा ते भावगीत मिळू शकलेले नाही. ‘झुरते कुणी तुजसाठी हे तुला कळेल का?’ हे या भावगीताचे सुरुवातीचे शब्द आहेत. हे भावगीत नागपूर नभोवाणी केंद्रावरून १९६० च्या काळात पुष्कळदा ऐकवले जात असे. ‘आठवणी दाटतात, धुके जसे पसरावे’ हे गाणेही ऐकवले जाई त्याच काळात. ‘विसरा तर आशेचे जळले ना पंख पुरे’, ‘आतुर मन भिरभिरते काळीज तिळ तिळ तुटते’ अशा काहीशा ओळी या भावगीतात होत्या. मी श्री. चांदवणकर यांच्याकडे रेकॉर्डबद्दल विचारणा केली होती, तेव्हा त्यांनी हे गीत कदाचित आकाशवाणीचे ध्वनिमुद्रण असावे, अशी शंका व्यक्त केली होती.
– मुकुंद नवरे