‘जातकारणाची प्रखर जाणीव’ हा सचिन कुंडलकर यांचा लेख वाचला. या लेखातून अप्रत्यक्षपणे त्यांनी आपली जात सूचित केली आहे. आरक्षणामुळे त्यांच्या पिढीला त्यांच्या जातीची जाणीव झाली, असे ते म्हणतात. का बरे, गांधीहत्येच्या इतिहासातून नाही झाली? १९९२ च्या बॉम्बस्फोटामुळे त्यांना धर्माची जाणीव झाली, असे ते म्हणतात. म्हणजे कमालच आहे! फाळणीचा इतिहास वाचताना त्यांना धर्म समजले नाहीत? तसेच त्यांच्या शिक्षकांनी जे काही त्यांच्या विद्यार्थी मित्रमंडळीस आरक्षणाबाबत सांगितले असे ते लिहितात, ते एक तर मुळात पटणारे नाही, आणि म्हणून ‘अनेक मित्र आपणास देशात नोकऱ्या मिळणार नाहीत म्हणून देश सोडून गेले’ म्हणे. हे त्यांचे म्हणणे वस्तुस्थितीला धरून अजिबात वाटत नाही. शतकानुशतके विशिष्ट जातींना उच्चवर्णीयांचे व्यवसाय-नोकऱ्या करण्यास बंदी होती. तेव्हा मात्र त्या जाती कुठे देश सोडून निघाल्या नाहीत त्या. मग खरे देशभक्त कोण? लेखाच्या शेवटी तेच म्हणतात, ‘खासगी उद्योग आणि व्यवसाय, तसेच तंत्रज्ञान ही क्षेत्रे बुद्धिमान माणसांना खुणावू लागली आणि स्थलांतराचा फार मोठा ओघ सुरू झाला.’ म्हणजे दुसरीकडे शेवटी लेखकच आरक्षणामुळे ते स्थलांतरित झाले नाहीत, हे मान्य करतात. आपले सुखवस्तू हेतू साध्य करण्यासाठी उच्चवर्णीयांनी देश सोडलेला आहे, हे आपण मान्य न करता विशिष्ट जातींवर त्याचे खापर चलाखीने फोडणे, हीच तर उच्चवर्णीयांची खासियत आहे. या लेखातील हे एवढेच एक विधान सत्य म्हणावे लागते. बाकी सर्व लेखन हे आव आणून ओढूनताणून उच्चवर्णीयांची बाजू घेणारे म्हणून केविलवाणा प्रयत्न म्हणावा लागतो.

– मंगला सामंत, पुणे</strong>