‘लोकरंग’ (१० एप्रिल) मध्ये हेन्री मिलरच्या ‘The Time of the Assassins’ या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार आणि लेखक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या ‘विनाशवेळा’ या अनुवादाबद्दलचे मनोगत प्रसिद्ध झाले आहे. या लेखात ज्यां निकोलस ऑर्थर रँबो यांच्या नावाने प्रसिद्ध झालेले छायाचित्र हे त्यांचे नसून, ते आल्फोन्स दोदे यांचे आहे. चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

ग्रेसांचा नवा अर्थ
‘लोकरंग’मधील ‘ग्रेसांचा रॅम्प’ हा आशुतोष जावडेकर यांचा लेख वाचला. प्रत्येक विषय घेताना ते जो वेगळा दृष्टिकोन लावता ते फार आवडते. आपलेच घर अगदी वेगळ्या कोनातून पाहिले की जसे वेगळे भासते तसे वाटते. मी नागपूरकर असल्याने या लेखाविषयी जास्तच आपलेपणा वाटला. ग्रेसांकडे मी व माझे पती नेहमी जात येत असू. त्यांच्या वक्तृत्वाचा धबधबा आम्ही अनुभवलेला आहे. ‘वरून आदेश आल्याशिवाय मी लिहीत नाही,’ असे ते नेहमी म्हणत.
या लेखात कंगनाच्या रँपवॉकशी त्यांच्या कवितेचं जुळविलेलं नातं विलक्षणच आहे. जुन्या पारंपरिकतेला ते कदाचित थिल्लर वाटेल, मला मात्र ते फारच आधुनिक वाटतेय. हा नव्या-जुन्याचा समन्वय लेखकाने फारच छान साधला आहे.
– माधुरी कानेटकर