‘हम तो चले परदेस’ या निखिल रत्नपारखी यांच्या लेखात उच्चशिक्षितांची एकेकाळची विचार करण्याची पद्धत नेमकी दिसते. परंतु तसा विचार करण्याचा काळ आता संपला आहे. नव्वदच्या दशकात आय. टी. उद्योगाला धुमारे फुटताना परदेशगमनाचे प्रचंड आकर्षण होते. त्यानंतर मात्र अनेक मध्यमवर्गीय घरांतून कोणी ना कोणी अमेरिका आदी देशांत स्थायिक झाले आहेत. अनेक पालक, ज्येष्ठ नागरिकही परदेशगमन करून आले आहेत. गेली काही वष्रे ‘तो काही स्वर्ग नव्हे’ ही समज बऱ्याच भारतीयांना येऊ लागली आहे. नोकरीतील अस्थिरता, सर्व घरकामे स्वत:ला करावी लागणे, प्रचंड महागाई, घराची समस्या इत्यादीची जाणीव आता सर्वानाच होऊ लागली आहे. याचवेळी भारतातील वाढत्या संधींमुळे ‘फॉरेन’चे आकर्षण पूर्वीसारखे आज राहिलेले नाही.

देशापासून बराच काळ दूर गेल्यावर काही गोष्टींची किंमतही नव्याने कळू लागते. न्यू ऑर्लिन्समधील २००५ च्या पुरात रस्तोरस्ती झालेली लूटमार आणि त्याच वर्षी मुंबईमधील पुरात दिसून आलेला बंधुभाव मग जाणवतो. तेथे शाळकरी मुलांकडूनही वर्गात झालेले गोळीबार दिसतात. आता अनेक पाश्चिमात्य देश व्हिसाचे नियम कडक करून तिथे शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधी कमी करत आहेत. त्यामुळे आता परतीचा ओघही सुरू झाला आहे. भारताने अनुकरण करावे अशा चांगल्या गोष्टी तेथे नक्कीच आहेत. परंतु पंचतारांकित हॉटेल आणि घर यांत फरक असतोच. १५-२० वर्षांपूर्वी परदेशगमनाच्या मधुचंद्राचा काळ होता. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

– विनिता दीक्षित, ठाणे</strong>