अलीकडेच काळाच्या पडद्याआड गेलेले ज्येष्ठ साहित्यक वि. ग. कानिटकर यांच्या बहुआयामी लेखनाचा उल्लेख त्यांच्या निधनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या लेखात व्यक्त  झाला आहे. कानिटकरांची ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ ही लेखमालिका  सा. ‘माणूस’मधून  क्रमश: प्रसिद्ध होत होती. ती मी शाळेत असताना वाचत असे. ही लेखमालिका ‘रा. म. शास्त्री’ या नावाने प्रसिद्ध होत असे. वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर लेखकाचे हे टोपणनाव आहे हे स्पष्ट झाले. कानिटकरांची  सर्व  पुस्तके वाचण्याचा योग मला आला नसला तरी ‘उदयास्त’च्या जातकुळीतली ‘माओ :  क्रांतीचे  चित्र  आणि  चरित्र’, ‘व्हिएतनाम : अर्थ आणि अनर्थ’, ‘होरपळ’ ही  पुस्तके मी वाचली होती. पुढे  कानिटकरांची  माझ्या  सासऱ्यांशी ओळख आहे हे समजले, तरीही ‘रा. म. शास्त्री’ हे वैशिष्टय़पूर्ण  टोपणनाव घेणाऱ्या कानिटकरांशी आपला कधी थेट संबंध येईल अशी कल्पना तो येईपर्यंत- २००८ सालापर्यंत मी कधी केली नव्हती. २००८ मध्ये १८५७ च्या उठावाबाबतच्या माझ्या लिखाणाबाबत  कानिटकरांचे मत अजमावून पाहावे असा आग्रह  मुंबई विद्यापीठाशी संबंधित एका विदुषींनी मला केला. कानिटकरांची मते हिंदुत्ववादी विचारसरणीशी संबंधित असल्याने त्यांची प्रतिक्रिया कशी असेल याचा मला अंदाज येत नव्हता.  पण २००८ च्या  सुरुवातीला हे लिखाण त्यांच्याकडे पाठवल्यावर यथावकाश त्यांचा अभिप्राय प्राप्त झाला; जो लिखाणाचे कौतुक करणारा होता! हे लिखाण प्रसिद्ध करावे व त्याबाबत ते मदतही करू शकतील, असा देकारही त्यांनी दिला होता.

त्यांच्या या अभिप्रायाने कानिटकरांचे मत आजमावून पाहण्याचा मूळ  हेतू साध्य झाला असला तरी माझ्या मनातील कानिटकरांच्या प्रतिमेशी त्यांचा अभिप्राय जुळत नव्हता. त्यामुळे उत्तरी लिहिलेल्या पत्रात त्यांच्या अभिप्रायाबद्दल मला  वाटलेला आनंद व्यक्त करतानाच त्यांच्याकडे अभिप्राय मागताना माझ्या लिखाणावरील त्यांचे आक्षेप आणि त्यांना खटकलेले मुद्दे जाणून घेण्याचा माझा हेतू होता, हे मी नमूद केले. शिवाय वि. दा. सावरकर आणि न. र. फाटक यांच्या पुस्तकांबाबत मी घेतलेल्या भूमिकेशी आपण सहमती व्यक्त केली असली तरी शेषराव मोरे यांच्या पुस्तकावरील माझ्या टिप्पणीबाबत आपण काहीच लिहिले नाही, यावरून पहिल्या पत्रसंपर्कात काही अप्रिय गोष्टी लिहिणे तुम्ही टाळले असेल तर त्या जरूर कळवा असा त्यांना आग्रहही  केला होता. आपण हातचे काही राखून लिहिल्याचा इन्कार करत शेषराव मोरे यांचे पुस्तक आपण वाचले नसल्याने त्याबाबत लिहिले नाही, हे नमूद करतानाच १८५७ चा  वर्तमानसंदर्भात विचार करताना ब्रिटिश राजवटीचे हिंदू-मुसलमानांत फूट पाडण्याचे धोरण किंवा भारताची फाळणी या घटनांना फार महत्त्व द्यायला नको, या पुस्तकातील भूमिकेशी मतभेद दर्शवत त्यांनी पाच-पानी सविस्तर पत्र पाठवले. स्वत: लिहिलेले हे पत्र संपवताना ‘हस्ताक्षराबाबत मी काही लिहीत नाही; ते तुम्हाला सहन करणे भाग आहे,’ असे लिहून आपले अक्षर चांगले नसल्याचे सुचवले होते. या पत्रव्यवहारातील माझा सहभाग टंकलिखित स्वरूपातील नसता तर माझ्या अक्षरापेक्षा त्यांचे अक्षर अनेक पटीने सुवाच्य ठरते, हे त्यांना मान्य झाले असते. १८५७ वरील माझे लिखाण नंतर पुस्तकरूपात प्रकाशित झाले ते त्यांनी सुचवलेल्या ‘१८५७ चा उठाव : काल आणि आज’ या शीर्षकाने.

त्यांच्या या प्रतिसादाने  प्रोत्साहित  होऊन आणखी दोन वर्षांनी  २०१० मध्ये माझे महाराष्ट्र या विषयावरील लिखाण त्यांच्याकडे पाठवले तेव्हा त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे मी सविस्तर अभिप्राय देऊ  शकत  नाही, असे  त्यांनी  नमूद  करत ‘‘माझ्या समाचाराला दिलीप माजगांवकर आले असताना तुमच्या लिखाणाबाबत त्यांच्याशी बोलणे  झाले व त्यांनी त्याबाबत औत्स्युक्य दर्शवले आहे,’’  असे  सांगत त्यांच्याकडे हे लिखाण पाठवावे असे त्यांनी सुचवले. या लिखाणावर संपादकीय संस्कार होऊन राजहंस प्रकाशनातर्फे ते २०१२ मध्ये प्रसिद्ध  झाल्यावर त्यांचे अभिप्राय दर्शवणारे पत्र आले. ‘तुमचे पुस्तक परत संपूर्ण वाचले’ असे लिहीत असतानाच ‘महाराष्ट्राच्या  हिताचा विचार करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत सावरकरांचा समावेश  नसावा हा  दैवदुर्विलास आहे,’ या शब्दांत आपली ‘तक्रार’ त्यांनी व्यक्त केली. सावरकरांचा अनुल्लेख अनवधानाने झाला नसल्याने  तसे  होण्याची कारणमीमांसा मी उत्तरी कळवली, पण  ती  त्यांना  कितपत  रुचली/ पटली  ते  स्पष्ट  झाले  नाही.  कारण आमचा पत्रव्यवहार त्यानंतर थांबलाच. आपली मते परखडपणे मांडणारे कानिटकर इतरांची मते आणि विचार जाणून घेण्यास व त्याबाबत खुली चर्चा करण्यास तयार असत. वर्तमान परिस्थितीत त्यांचा हा स्वभावगुण अनुकरणीय आहे.

माधव दातार,  खारघर, नवी मुंबई</strong>