लछमन हर्दवाणी यांचा ‘मराठीने नुक्ता स्वीकारावा’ हा लेख  वाचला. यासंदर्भात मलाही जाणवलेल्या गोष्टी लिहाव्याशा वाटल्या. एम. जे. अकबर यांच्या ‘टिंडरबॉक्स : पास्ट अ‍ॅण्ड फ्युचर ऑफ पाकिस्तान’ आणि ‘द शेड ऑफ स्वोर्ड्स’ या पुस्तकांचे अनुक्रमे ‘ज्वालाग्राही पाकिस्तान’ आणि ‘तलवारीच्या छायेत’ हे अनुवाद करताना अनेक अरबी, फारसी, उर्दू शब्द त्यांच्या योग्य त्या उच्चारांसहित देवनागरीत लिहायला हवेत असे मला प्रकर्षांने वाटत होते. मूळ ‘आजमद’ हा शब्द मराठीत सरसकट ‘आझाद’ असा लिहिला जातो आणि उच्चारही ‘झाडा’तल्या ‘झ’सारखा केला जातो. ‘आजाद’ असे लिहिले तर उच्चार ‘गजानन’मधील ‘जा’सारखा केला जाण्याची भीती असते. ‘मुगम्ल’ हा शब्द ‘मुघल’ असा लिहिला जातो आणि जणू दिल्ली ते मुंबई प्रवास व्हाया लंडन केल्यासारखे वाटते. म्हणून मराठी वाचकांपुढे विशिष्ट विषयावरील पुस्तकाचा अनुवाद आणताना त्यातल्या मूळ वातावरणासहित, सामाजिक-भाषिक संस्कृतीसह आणण्यासाठी मी अनुवादातही ‘जम्, गम्, फम्’ वगैरे उच्चारांसाठी नुक्ते द्यायचे ठरवले. त्यासाठी सत्त्वशीला सामंत यांचाही सल्ला घेतला. त्यांनीही याचे स्वागत केले. ‘ज्वालाग्राही पाकिस्तान’मध्ये अनुवादकाच्या मनोगतात मी नुक्ते देण्यामागचे कारणही विशद केले आहे. श्रीपाद जोशीकृत ‘उर्दू-मराठी कोश’ आता शासनाच्या पुस्तक भांडारात उपलब्ध नाही. चर्नी रोडस्थित भांडारात मी स्वत: त्यासाठी जाऊन आले होते. नागपूर पुणे येथील भांडारांतही तो उपलब्ध नसल्याचे कळले. साधारण २०११-१२ च्या सुमारास मधु मंगेश कर्णिक हे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना मी त्यांना याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनीही यासंबंधातली असमर्थता व्यक्त केली. पुस्तकाची आवृत्ती संपली असेल तर नवी आवृत्ती काढण्यात सा. सं. मंडळाला रस नाही असे त्यांनी सांगितले. खरे तर अनेकांना ती हवी आहे. परंतु साहित्य संस्कृती मंडळाच्या अनास्थेचा अनुभव मी २०१० ते २०१६ या काळात दुसऱ्याही एका प्रकल्पात घेतला. मराठी भाषा विकास परिषद वगैरे इतर संस्थांचा मला अनुभव नाही. आशा बाळगायला जागा आहे की नाही, माहीत नाही! परंतु लेखाद्वारे हा मुद्दा जाहीरपणे वृत्तपत्रांतून पुढे आणल्याबद्दल धन्यवाद.

रेखा देशपांडे, ठाणे

 

आदर्शवाद टिकवणे अवघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील गोव्यातील घटनांबाबतचे पुरवणीतले दोन्ही लेख वाचनीय होते. त्यातील केळकर यांच्या लेखामधील डॉ. हेडगेवार आणि देवरस यांच्या आठवणी हृद्य होत्या. अहंकाराचा टकराव तात्त्विक मुलामा देऊन मतभेद म्हणून समोर येतो, हे मार्मिक निरीक्षण सर्वानी लक्षात घेण्यासारखे वाटले. सत्ता दूर असताना जोपासलेला आदर्शवाद सत्ता प्राप्त झाल्यावरही टिकवणे किती कठीण असते ते सध्याच्या या वादळावरून लक्षात येते.

गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर

 

निसर्गआनंदाचा पुन:प्रत्यय

मुकुंद संगोराम यांचा ‘जंगलांचा देश’ हा लेख वाचला. मनापासून आवडला. दक्षिण आफ्रिकेतील जंगलांचे, तेथील रस्त्यांचे, पर्यटन व्यवस्थेचे, लोकांचे आणि तेथील सार्वजनिक स्वच्छतेचे अगदी यथार्थ वर्णन त्यांनी केले आहे. २००३ ते २०१२ अशा दहा वर्षांच्या प्रदीर्घ काळात दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनजवळील स्टेलेनबॉश विद्यापीठात शिकवण्यासाठी अतिथी प्राध्यापक म्हणून माझे दरवर्षी जाणे-येणे राहिले आहे. त्यामुळे तेथील परिस्थितीशी मी पूर्णपणे अवगत आहे. या देशातले वास्तव लेखात खूप छान रीतीने मांडले आहे. तेथील सुंदर, प्रसन्न व शांत निसर्ग मला अजूनही भुरळ घालत असतो. या लेखाने मला तेथील माझ्या वास्तव्याच्या पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. दक्षिण आफ्रिकेकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे आहे, या लेखातील निष्कर्षांशी मी पूर्णपणे सहमत आहे.

तारक काटे