२ ऑक्टोबरच्या ‘लोकरंग’मधील राजीव साने यांचा ‘गांधीवादात दडलेले संघीय प्रतिगामित्व’ हा लेख  वाचून  आश्चर्य वाटले. साने यांच्यासारख्या अभ्यासकानेच हा लेख लिहिला आहे ना अशी शंका आली.

गांधीजींच्या मनातील अंधश्रद्धा, लैंगिकतेबाबतची त्यांची मते, ब्रह्मचर्याचा आग्रह, त्यांनी संसदेला वेश्या आणि वांझ म्हणणे अशा गोष्टींचा उल्लेख लेखात येतो. मला स्वत:ला गांधीजींनी संसदेला वेश्या आणि वांझ म्हणणे अजिबात पटलेले नाही. पण त्यांची जी मतं टोकाची वाटतात, जे शब्द त्यांनी उच्चारले ते शब्द धरून संपूर्ण गांधी समजून घेता येतात का हा प्रश्न आहे आणि तसे ते समजून घेता येत नाहीत हे त्याचं उत्तर आहे. साने आश्रमातील मुलीच्या केशवपनाचे उदाहरण देतात. केशवपन करणे टोकाचे आहे हे मान्य. पण शाकाहाराचा आग्रह धरणाऱ्या गांधीजींनी खान अब्दुल गफारखान यांना आश्रमात मांसाहार करण्याची अनुमती दिली होती. त्याला काय म्हणणार?
‘हिंद स्वराज’ या पुस्तकातील मांडणीविषयी भरपूर चर्चा झालेली आहे, होतही असते. गांधीजींची मते त्यातही टोकाची असतील, पण मुळात गांधीजी कायमच आदर्श जीवनशैलीचा वेध घेत आले होते. जगण्यातला आदर्श काय आहे याचा ते शोध घेत होते आणि त्यामुळे त्यांचे प्रयत्न माणसाची नतिक उंची वाढवण्याकडे झुकलेले होते. त्यांना ज्या विश्वाचा ध्यास होता ते विश्व सर्वसामान्यांकरिता आणि सर्वसामान्य आकांक्षा व मानवी घडण डोळ्यापुढे ठेवून अर्थशास्त्रीय विचार मांडणाऱ्या अर्थतज्ज्ञ मंडळींकरिता दुबरेध आणि अव्यवहार्य वाटणे स्वाभाविक आहे. राजीव साने अर्थशास्त्र उत्तम जाणतात, पण गांधीजींची मांडणीच मुळात त्यांनी स्वत: विकसित केलेल्या नीतिशास्त्रावर आधारलेली होती. त्यात सानेंना व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा, भौतिक प्रगतीचा संकोच झालेला दिसतो, पण गांधीजी व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या किंवा भौतिक प्रगतीच्या विरुद्ध कधीच नव्हते. त्यांचा भर साध्यसाधन विवेकावर होता आणि अर्थशास्त्र पेलू शकणार नाही इतका होता. त्यांची रेल्वेविरुद्धची मते साने यांनी उद्धृत केली आहेत, पण गांधीजींनी रेल्वेविरुद्ध कधी आंदोलन सुरू केले नाही, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी यंत्राबद्दल त्यांची मते मांडली, पण त्यांनी कारखाने बंद करायची चळवळ चालवली नाही. मला एक प्रश्न राहून राहून पडतो तो हा की, गांधींनी ज्या ‘अव्यवहार्य’, ‘प्रगतीला मारक’ कल्पना मांडल्या त्यातली एकही कल्पना टिकलेली नसताना, त्यांच्या सर्व नतिक आदर्शाचा भारतीय जनतेने पराभव केलेला असताना गांधीजींसारख्या निरुपद्रवी माणसाची अर्थशास्त्रातील जाणकार असलेल्या सानेंना किंवा इतरांना भीती का वाटावी? किंवा त्याबाबत त्यांच्या हत्येनंतर अडुसष्ट वर्षांनी त्यांच्या जन्मदिनीच त्यांच्या विचार करावा असं त्यांना का वाटावं?

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Tejashwi Prasad Yadav eating fish
नवरात्रीच्या काळात मासे खाल्ल्यामुळे तेजस्वी यादव ट्रोल; भाजपा नेते म्हणतात, “हंगामी सनातनी…”
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

साने लिहितात, ‘अहिंसेचे तत्त्व मनुष्यांपुरते अंगीकारले जायलाही वेळ लागणार आहे. ते घडायच्या आधीच इतर जीवांनाही ते तत्त्व लागू करता येण्याइतकी नतिक उन्नती आणि तांत्रिक प्रगती अद्याप झालेली नाही.’ याचा अर्थ हा की, माणूस अजूनही इतर माणसांबाबत पूर्णपणे अिहसक झालेला नाही तर मग तो इतर प्राण्यांबाबत अहिंसक कसा होईल? (‘इतर जीवांनाही’ हे म्हणताना सानेंना माणूस आणि इतर जीव अभिप्रेत असावेत. वाघाने अिहसक होऊन गवत खाणे त्यांना अभिप्रेत नसावे. कारण गांधींनाही वाघाने गवतच खावे असे वाटत नव्हते.) साने पुढे लिहितात, ‘उद्या एखादे उच्च तंत्र सापडून कदाचित आपण प्रत्येक अन्नघटक सिंथेसाइजही करू शकू. अरेच्चा! पण मग ते जैव राहणार नाही.’ हे बरोबर आहे. पण पुढे ते लिहितात. ‘आपल्याला सगळे काही जैव हवे; आणि ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हे मात्र निषिद्ध!’ यात गडबड आहे. ‘जीवो जीवस्य जीवनम’ हे एका सजीवाने दुसऱ्या सजीवाला खाऊन जगणे याअर्थी म्हटले आहे. पण शाकाहाराच्या निर्मितीत, शाकाहारी पद्धतीत हा मुद्दा येतोच कुठे? जीवो जीवस्य जीवनम हे फक्त माणसासाठी नको असे गांधीजींचे म्हणणे होते. वर म्हटले तसे वाघाने अिहसक व्हावे असे ते म्हणाल्याचे ऐकिवात, वाचनात नाही. साने पुढे लिहितात, ‘गांधीजींचा शाकाहाराचा आग्रह हा उल्लेख अशासाठी, की गोरक्षण आणि आता गोहत्याबंदी या धर्मवादी अँटिसेक्युलर प्रकाराचे जनक गांधीजीच आहेत.’ गांधीजींनी गोरक्षणाचा आग्रह धरला होता हे बरोबर आहे. पण त्याला शेती आणि शेतकऱ्याचा संदर्भ होता. हिंदू धर्माचा संदर्भ नव्हता. शिवाय त्यांनी गोरक्षणाचा कायदा व्हावा म्हणून चळवळ उभारली नव्हती. तसा आग्रह त्यांनी एकदाही धरला नव्हता. आता धर्मवादी मंडळींनी गायीला धर्माच्या गोठय़ात बांधले तर त्याला गांधी कसे काय जबाबदार? त्यामुळे साने यांचे वरील विधान तर पूर्णपणे मोडीत निघते.

साने लिहितात, ‘मॅक्रो-इकॉनॉमीला स्वत:चे गतिशास्त्र असते याचे भान न ठेवता ‘मायक्रो’त तथाकथित आदर्श बनवायचा, हे अत्यंत बालिश आहे. स्थानिक अनुभवावरून व्यापक परिणाम कळूच शकत नाहीत. सद्हेतू असला की सुपरिणामच होतील, हेच मुळात खरे नाही.’ हे त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण इथेही पुन्हा वर उल्लेख केलेला मुद्दाच येतो. गांधीजींनी सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी जेव्हा त्यांची कल्पना मांडली तेव्हा ती त्यांच्या प्रयोग करायच्या ऊर्मीतून आलेली होती. त्यांच्या अर्थशास्त्रीय अभ्यासातून आलेली नव्हती. गांधीजींची मांडणी खोडून काढायला काहीच हरकत नाही, पण गांधीजींनी ती मांडणी अर्थतज्ज्ञ म्हणून केलेली नव्हती, एका नव्या रचनेचा उद्गाता म्हणून केली होती हे लक्षात ठेवलेले बरे. गांधीजींची ग्रामस्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आलेली नाही. स्वावलंबनाचा त्यांचा आग्रह प्रत्यक्षात उतरलेला नाही. आज जे स्वावलंबी आहेत त्यातले बरेचसे नाईलाजाने, परवडत नाही म्हणून स्वावलंबी आहेत. गांधीजींची कल्पना, त्यांचा आग्रह टिकलेला नाही हे यातून दिसतेच. एखादा विचार यशस्वी झालेला नाही याचा सरळ अर्थ तो अजून तरी लोकांच्या गळी उतरलेला नाही असा होतो. दुसरीकडे ‘आदर्श’ विचार हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होईल, तसा तो केलाच पाहिजे याकरिता इतरांना ते जे करत आहेत त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला नाही. आणि मुळात स्वावलंबन याचा अर्थ मी माझं अन्न निर्माण करेन, माझे कपडे निर्माण करेन, माझं घर बांधेन, गाडीही मीच निर्माण कारेन आणि पेट्रोलही मीच निर्माण करेन असा होतो का? तसं गांधीजींनी म्हटलं आहे का? स्वावलंबन देशाच्या संदर्भात पाहिले, समूहाच्या संदर्भात पाहिले तर गांधीजी काय म्हणत होते ते लक्षात येईल. ‘स्वावलंबन ही फार महागडी गोष्ट आहे. ज्याला जे काम सर्वात जास्त चांगले जमते, त्यालाच ते करायला देण्यात सर्वाचाच फायदा असतो, हे अर्थशास्त्राचे प्राथमिक तत्त्व आहे. हे तत्त्व नाकारणारे ‘हिंदू अर्थशास्त्र’ हे शुद्ध थोतांड आहे,’ असं साने लिहितात. यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे गांधीजींनी स्वयंपूर्ण खेडय़ाची कल्पना मांडली होती. माणूस त्या अर्थाने स्वयंपूर्ण असू शकत नाही हे त्यांना कळत होतं. पण भारतीय संदर्भातील लघुत्तम एकक खेडे आहे आणि तिथे स्वयंपूर्णता यावी हे त्यांचं स्वप्न होतं. यात खेडय़ातल्या लोकांनी घराबाहेर किंवा खेडय़ाबाहेर कधीच पडू नये, प्रत्येकाने शिंपीकाम, सुतारकाम, शेती, लोहारकाम हे सर्व शिकून घ्यावं, म्हणजे या व्यवसायांची गरजच उरणार नाही असं त्यांनी म्हटलेलं नाही. दुसरं म्हणजे ‘हिंदू अर्थशास्त्र’ ही संज्ञा गांधीजींनी वापरलेली नाही. त्यांनी मुळात ‘अर्थशास्त्र’ हा शब्द तरी किती वेळा वापरला आहे याचीच मला शंका आहे.

साने यांचा मूळ आग्रह मला पटत नाहीत असे नाही. ‘माणूस कसा असावा आणि तो जसा असायला हवा आहे त्यासाठी काय केले पाहिजे?’ या गांधीजींच्या आग्रहासारखाच ‘माणूस कसा असतो आणि तो जसा असतो तसा स्वीकारून त्याच्यासाठी काय केले पाहिजे?’ हा विचार करणेही मला आवश्यक वाटते. पण म्हणून गांधीविचारातील वेगळेपण, ‘माणसाला बदलायची’ त्यांची आस (जी त्यांना शांततामय सहअस्तित्वासाठी महत्त्वाची वाटत होती) दुर्लक्षित करता येत नाही. साने या दोन्हीमध्ये एक रेषा आखून गांधीजी तिकडे आणि आपण इकडे अशी आखणी करतात ती खटकणारी आहे. ‘प्रगती’, ‘आधुनिकता’ या शब्दांच्या गांधीजींच्या व्याख्यांचा मेळ आपल्या व्याख्यांशी बसत नाही. गांधीजी ‘आदर्शाचं’ बोलत होते आणि त्यांच्या दृष्टिपथात ‘आव्हानं’ यायची होती. आता जर आपल्या दृष्टिपथात आव्हानं आहेत तर आपण त्यावर विचार करावाच, पण तो विचार ‘बघा, आम्ही जिंकलो’ या आवेशाने करण्याची गरज नाही.

गांधीविचार हा एकरेषीय विचार नाही. त्यांचे विचार दैनंदिन आयुष्यात छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरदेखील प्रभाव टाकतात, समूहजीवनाला दिशा देतात. आज शांतपणे विचार करणाऱ्याला, समन्वय साधणाऱ्याला गमतीने ‘गांधीवादी’ म्हटलं जातं हे याचंच द्योतक आहे. अशा वेळी त्या विचारांमधील काही गोष्टी निवडून त्याची चिकित्सा एका छोटय़ा लेखात करता येईल का याचाही विचार व्हावा. आपल्या लेखात साने यांनी गांधीजींची जी मते वादग्रस्त ठरतील ती नेमकी निवडली आहेत. आपल्या विरोधकाबाबत बोलताना सहसा असं केलं जातं. परंतु या पद्धतीमधील अडचण अशी असते की, त्यातून ‘निवडक निषेध’च फक्त होतो. साने यांनी केलेला खुलासाच वापरायचा म्हटला तर संबंधित मनुष्य जे ‘मॅक्रो तत्त्वज्ञान’ सांगतो आहे त्याला स्वत:चं गतिशास्त्र असतं, त्यामुळे ‘मायक्रो’कडे किती लक्ष द्यायचं हे ठरवावं लागेल! शिवाय त्यातही काही ढोबळ चुका आहेतच. काही वर दिल्या आहेत. त्यातलीच आणखी एक म्हणजे गांधीजींनी शरीराला नरकद्वार मानल्याचा उल्लेख माझ्या तरी पाहण्यात नाही. शरीराचे चोचले पुरवू नयेत, शरीर हे साधन आहे त्यामुळे ते नीट राखावे असे मात्र त्यांनी म्हटले आहे.

साने यांच्या त्रोटक लेखाच्या पाश्र्वभूमीवर अरुण सारथी यांच्या ‘गांधी आणि गांधीवाद’ या पंचवीस पानी लेखाची आठवण होते. गांधीजींची चिकित्सा करताना त्यांनीदेखील गांधींना पारंपरिक, प्रतिगामी हिंदू ठरवले आहे. ‘महाराष्ट्राची शोकांतिका’ या पुस्तकात हा लेख आहे. या लेखाबाबतची उल्लेखनीय गोष्ट अशी की लेखाचा समारोप करताना सारथी लिहितात, ‘पुढील चच्रेसाठी आवश्यक असा पूर्वपक्ष मी मांडला आहे. त्यावर विचारवंतांनी टीका केली तरच मला समाधान वाटेल. भारतातील आजची परिस्थिती माझ्या दृष्टीने भयानक आहे अशा तऱ्हेच्या विमर्शातून त्याची कारणे सापडण्याची शक्यता आहे.’ राजीव साने व्यासंगी अभ्यासक आहेत. त्यामुळे त्यांनीदेखील निष्कर्षांवर यायची घाई करू नये असे सांगावेसे वाटते.

 – उत्पल वनिता बाबुराव, पुणे</strong>

काय भुललासी वरलिया रंगा?

‘गांधीवादात दडलेले संघीय प्रतिगामित्व’ या राजीव साने यांच्या लेखाचे (२ ऑक्टो.)  दोन भाग करता येतील. लेखाचा बहुतेक भाग गांधीजींवर तेच जुने आरोप आहेत जे गेली शंभर वर्षे गांधी विरोधकांनी केले आहेत. सदानंद मोरे यांच्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या द्विखंडीय पुस्तकात अशा टीकेबाबत- जी बऱ्याचदा निंदा व कुचाळक्यांच्या पातळीला पोचायची- विस्तृत चर्चा आहे. जरी साने यांची काही टीका उदारवादी भूमिकेतून प्रामाणिक मतभिन्नतेमुळे आहे, पण बरीचशी टीका ही अर्धसत्यावर आधारित आहे. उदाहरणार्थ- गांधीजींनी जयप्रकाश नारायणांच्या तरुण पत्नीला ब्रह्मचर्याची शपथ देणे हा गांधीजींचा अतिरेक होता हा आरोप. पती जयप्रकाश विदेशात शिकायला गेल्यावर बिहारच्या गांधीभक्त कुटुंबातली तरुण प्रभावती गांधीजींच्या आश्रमात राहायला आली. गांधीजी व कस्तुरबांनी तिला आपली मुलगी मानले. पुढे तिने आजन्म ब्रह्मचर्य पालनाचा संकल्प करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा गांधीजींनी ‘जयप्रकाशच्या संमतीशिवाय असा एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही’ असे सांगून घाई न करण्याचा सल्ला तिला दिला. तरी प्रभावतीने संकल्प केलाच. पुढे शिक्षण पूर्ण करून जयप्रकाश भारतात परतल्यावर गांधीजी त्यांना म्हणाले की ‘तुझ्या संमतीशिवाय प्रभावतीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिच्याशी विवाहविच्छेद करून दुसरे लग्न करण्याचा तुला पूर्ण हक्क आहे.’ (जयप्रकाशांनी दुसरे लग्न न करता प्रभावतीचा संकल्प स्वीकारून आजन्म विवाहित ब्रह्मचर्य स्वीकारले – ही त्यांची थोरवी.) पण यात गांधीजींनी जबरदस्ती केली किंवा अन्याय केला हे म्हणणे अर्धसत्य सांगून विपर्यास करणे होईल.

ब्रह्मचर्य, अहिंसा, ग्रामस्वराज्य अशा अनेक गंभीर विषयांमागची पूर्ण वैचारिक व तात्त्विक भूमिका समजून घेऊनच मग योग्य-अयोग्य निर्णय करता येईल. त्याचा एक तुकडा, एक अर्धवट प्रसंग अथवा एक वाक्य धरून- गांधीजी असे होते बघा, हे म्हणणे म्हणजे एखाद्या कारचा मडगार्ड वेगळा दाखवून तो कसा बेढब आहे किंवा तो स्वत: पळू शकत नाही असे म्हणणे होय. आपल्या मूळ स्थानापासून तोडून केवळ तुकडा पाहिल्यास सुंदर कलाकृतीही विरूप वाटेल.

गांधी विचारांची आजच्या काळात प्रासंगिकता याविषयी भरपूर तात्त्विक चर्चा गेल्या काही वर्षांत अन्य लोकांनी केली असल्याने (सु. श्री. पांढरीपांडे यांचे ‘नवे मन्वंतर- महात्मा गांधींचे हिंदस्वराज्य’, अनुराधा वीरावल्ली यांचे ‘गांधी इन पोलिटिकल थिअरी : ट्रथ, लॉ अ‍ॅण्ड एक्सपेरिमेंट’) याबाबत अधिक चर्चा करण्याची गरज वाटत नाही.

पण साने यांचा दुसरा मुद्दा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिगामित्वाचे छुपे गुरू महात्मा गांधी आहेत- हा एकदम नवा शोध आहे. त्यासाठी अगदीच तोकडा पुरावा मांडून त्यांनी अचानक तार्किक हनुमानउडी मारली आहे.  या शोधाची नीट चर्चा करणे आवश्यक आहे.

मला अशी शंका येते की संघाची काही बाह्य़ चिन्हे आणि सेवेचे विविध कार्यक्रम यासोबत संघाची विचारप्रणाली व कार्यपद्धती यांची गल्लत झाल्याने त्याचे मूळ गांधी विचारात आहे असा गैरसमज झाला आहे.

१९७७ पर्यंत रा. स्व. संघ समाजसेवेची सर्व कामे काटेकोरपणे टाळत होता. १९७५ ते १९७७ या इमर्जन्सीच्या काळात जेलमध्ये असताना संघनेतृत्वाच्या लक्षात आले की आपल्या केवळ मैदानी कवायती व संघशाखांच्या कार्यक्रमांचे सामान्य लोकांना काहीही देणेघेणे नसून आपल्या मागे फार लोक उभे झाले नाहीत. संघटनेसाठी सेवेच्या व रचनात्मक कामांची गरज बहुधा तेव्हा त्यांच्या लक्षात आली. १९७७ मध्ये जेलमधून सुटल्यावर तत्कालीन सरसंघचालक  बाळासाहेब देवरस (व कदाचित नानाजी देशमुख) यांच्या पुढाकाराने संघाने लोकसंग्रहासाठी सेवेच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात केली. गांधींचे कार्यक्रम- गोसेवा, आदिवासी सेवा, स्वदेशी, गाव चलो, ग्रामोद्योग, खादी, स्वच्छता हे संघसंस्थांना सोयीस्कर व अनुरूप वाटले. संघसंस्थांपासून तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांनी ते उचलले, वापरले व आपले केले. यासाठी गांधीजींना किंवा संघाला दोष देता येणार नाही. यामुळे काही संघ गांधीवादी होत नाही की गांधी संघाचे छुपे गुरू होत नाहीत. खरा प्रश्न हा की संघाच्या व गांधींच्या मूळ विचार व तत्त्वांमध्ये एकरूपता आहे का?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयात एका राष्ट्रीय शिबिराचा प्रमुख पाहुणा म्हणून जाण्याचा दहा-बारा वर्षांपूर्वी मला योग आला. तेथील एकूण वातावरण बघून सरसंघचालक सुदर्शनजींना मी प्रश्न विचारला – संघातील साधी राहणी, पांढरे धोतर, लुंगी व पांढरा सदरा हा वेश, ब्रह्मचर्याचा आग्रह, हिंदीचा वापर, शाकाहारी जेवण, जेवणापूर्वी म्हटलेले मंत्र- सर्व बघून मला गांधीजींच्या आश्रमाची आठवण आली. पण या बाह्य़ साम्याखेरीज संघ व गांधी यांमध्ये मूलभूत फरक तुम्हाला काय वाटतो?

सुदर्शनजी स्पष्ट बोलणारे होते. ते पटकन म्हणाले – दोन फरक आहेत. एक, तुम्ही गांधीवादी सर्व धर्माना समान मानता व मुस्लिमांचे अतिरेकी लाड करता, आम्ही हिंदुधर्म सर्वात श्रेष्ठ मानतो. दोन, तुम्ही अहिंसेला तत्त्व मानून अतिरेकी महत्त्व देता, आम्ही आवश्यक असल्यास हिंसा स्वीकारार्ह मानतो.

मी त्यांची क्षमा मागून त्यांना अजून एक तिसरा फरक सांगितला. ‘‘गांधीजी सत्याला ईश्वर मानायचे. त्यामुळे सत्य त्यांच्यासाठी प्राणाहून प्रिय होते. तुम्ही गरजेनुसार असत्याचाही आधार घेता व गनिमी कावा किंवा चाणक्य नीती म्हणून त्याचे समर्थन करता.’’

सत्य, अहिंसा व सर्वधर्मसमभाव हे गांधींचे तीन तात्त्विक मूलाधार होते. ‘ईशावास्यम् इदं सर्वम्’ – ईश्वर सर्वत्र वसलेला आहे ही ईशावास्य उपनिषदातली व ‘वासुदेवं सर्वमिति’ ही गीतेतली मांडणी त्यांच्या विचार, वृत्ती व आचाराचा गाभा होती. ईश्वर सर्वत्रच वसलेला असेल तर तो हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन व शीख – सर्वातच समान वसलेला आहे. मग कोण्या धर्माचा किंवा मुस्लिमांचा द्वेष खऱ्या हिंदूला कसा संभव आहे?

सत्य ईश्वरस्वरूप आहे व अहिंसा हे सत्यापर्यंत पोचण्याचे शुद्ध व नेमके साधन आहे. मग या दोघांचा सोयीस्कर स्वीकार व अस्वीकार कसा करता येईल?  सत्य, अहिंसा व सर्वत्र समभाव ही हिंदू, बौद्ध व जैन धर्माची अबाध्य तत्त्वे आहेत. त्यांचा सौदा गांधीला शक्य नाही. संघाला ही तिन्ही तत्त्वे सोडता येतात.

गांधी व संघामधला हा मूलभूत तात्त्विक भेद सुदर्शनजींना लख्ख कळला होता.  साने यांची बा रूपावरून गल्लत झाली. संत चोखामेळा म्हणतातच-काय भुललासी वरलिया रंगा?

– डॉ. अभय बंग, गडचिरोली</strong>