‘लोकरंग’मधील (३१ जानेवारी) केतकी गद्रेंचे ‘सह- अनुभूती- एम्पथी’ हा लेख वाचताना ‘एम्पथी’ या इंग्रजी शब्दासाठी त्यांनी ‘सहानुभूती’ या समासाचा संधीविग्रह (अनुभूतीसह व सह +अनुभूती) याच्या आधारे केलेला वापर ‘एम्पथी’ या शब्दाच्या सर्व छटा व्यक्त करत नाही; तसेच ‘सहानुभूती’ या नेहमी वापरात असणाऱ्या शब्दापासून असलेले आपले वेगळेपण हा शब्द नेमकेपणाने दाखवू शकत नाही असे जाणवले. या लेखातले विश्लेषण उत्तम असल्याने ते समर्पक अशा पर्यायी शब्दाने अधिक परिणामकारक झाले असते. विश्लेषणाचा एकूण बाज पाहता ‘सह-अनुभूती’ऐवजी ‘सहसंवेदना’ हा शब्द अधिक अर्थप्रवाही व नेमका आशय व्यक्त करू शकेल असे वाटते. त्यात ‘एम्पथी’च्या गद्रे यांनी मांडलेल्या सर्व छटा (shades  ) तर येतातच, शिवाय ‘सहसंवेदना’तून येणारी / येऊ शकणारी कृतिशीलता; जी ‘सहानुभूती’त बहुधा शब्दांच्या पलीकडे क्वचितच जाते, हा फरकही यथोचितरीत्या व्यक्त होऊ शकेल.
तसेच शेवटच्या परिच्छेदात वापरलेले दोन शब्द ‘व्यक्तीची आत्मिक स्थिती’ व ‘आपले आत्मज्ञान’ हे आधीच्या एकूण प्रतिपादनाहून वेगळेच असल्याने त्यांचा वापर सहेतूक कीसहज, हे स्पष्ट झाले असते तर लेखाचे मूल्य वाढायला मदत झाली असती. यादृष्टीने विचार झाल्यास ‘मनोविश्लेषण’ हे सदर अधिक वाचनीय होईल.
रवींद्र परतेकर, नागपूर.

पाटलांची ‘झाडाझडती’!
१७ जानेवारीतच्या ‘लोकरंग’ पुरवणीतील ‘दाह’चे लेखक सुरेश पाटील यांचा ‘पाटलांचा विश्वासघात’ हा लेख वाचनात आला. १९५७-५८ साली मी कराडला हायस्कूलमध्ये असताना विश्वास पाटलांच्या कराडजवळ असलेल्या नेर्ले गावात वरचेवर पडणाऱ्या खुनांमुळे हे गाव त्याकाळी कुप्रसिद्ध होते. याच दरम्यान नेर्लेच्या विष्णू बाळा पाटलाने आपल्या भाऊबंदांचे खून पाडले होते व तो पोलिसांना सापडत नव्हता. कराडला देवल सर्कसच्या एका खेळाला आलेल्या विष्णू बाळा पाटलला त्याच्या बाजूच्याच खुर्चीवर बसलेल्या खुद्द डी. एस. पी.ना ओळखता आले नाही अशी वदंता त्याकाळी होती. असो. तर नेर्ले गाव त्याकाळी खुनांसाठी प्रसिद्ध होते. ते काही विश्वास पाटलांनी ‘ग्लोरिफाय’ केलेले नाही.
मात्र, विश्वास पाटलांनी आपल्या कादंबरीतील बरीचशी पात्रे आणि स्थळे ‘ओव्हर ग्लोरिफाय’ केलेली आहेत याची कल्पना सुरेश पाटलांच्या लिखाणावरून येते. मराठीत वैश्विक दर्जाचे साहित्य निर्माण होत नाही, अशी खंत बऱ्याचदा व्यक्त करण्यात येते. मराठीत वैश्विक दर्जाचे साहित्य केव्हा निर्माण व्हायचे ते होवो; पण ‘तुमच्या लिखाणात मला ‘ला मिझरेबल’सारखे काहीतरी दिसल्याची’ विश्वास पाटील यांनी दिवंगत कविवर्य नारायण सुर्वे यांची काढलेली साक्ष क्लेश देऊन जाते. एकूणच, विश्वास पाटलांनी उचलेगिरी केल्याच्या सुरेश पाटील यांच्या म्हणण्यात काहीएक तथ्य आहे असे दिसते. यास्तव विश्वास पाटलांच्या कादंबऱ्यांबद्दल साहित्यातील जाणकारांनी लिहिणे गरजेचे आहे. एकुणात, ‘पानिपत’ ते ‘लस्ट ऑफ लालबाग’ची झाडाझडती करणे योग्य ठरेल. सध्या मी एवढंच म्हणेन की, हे ‘ला मिझरेबल’ नसून ‘लाय एन्ड’ मिझरेबल आहे!
– अहमद खोजा, बेळगांव .

raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
kumar vishwas on arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर कुमार विश्वास यांची सूचक पोस्ट; दोनच ओळींमध्ये मांडली भूमिका!