आपला एकूण इतिहास पाहिला तर आपल्याला दस्तावेजीकरणाचं वावडंच होतं. या पाश्र्वभूमीवर नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडियाचे

काम मोलाचे ठरते.

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
nashik bjp marathi news, pravin darekar marathi news
“मोदी द्वेष हेच महाविकास आघाडीचे सूत्र”, प्रवीण दरेकर यांची टीका
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

तसं पाहिलं तर आपल्याला संग्रहालय, अर्काइव्ह वगैरे गोष्टींचं काहीसं वावडंच होतं असं म्हणावं लागेल. आपला सारा भर होता तो मौखिकतेवरच. आपल्याकडील चांगलं काही असेल तर जपून ठेवावं, त्याचा सांभाळ करावा आणि ते जगासमोर अभिमानानं मांडावं यात आपण तसे कमीच पडतो. त्यातच चित्रपटासारखी निव्वळ करमणुकीची आणि केवळ मौजमजेसाठी म्हणूनच समजली गेलेली बाब असेल तर दुर्लक्ष झालं नाही तरच नवल. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरदेखील तब्बल १७ वर्षे आपण याकडे दुर्लक्षच केलं होतं. त्यामुळे पडद्यावरच्या गोष्टी पडद्यावरच राहिल्या.

पुणे येथे सुरू झालेल्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये फिल्म अर्काइव्हयल असावं अशी संकल्पना त्या वेळी पुढे आली. त्यातून देशाचं स्वत:चं असं फिल्म संग्रहालय (नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया) पुणे येथे १९६४ साली सुरू झालं. देशात पहिला चित्रपट तयार झाल्यानंतर तब्बल ५१ वर्षांनंतर.

पण ही दिरंगाई आपणास चांगलीच महागात पडली. सुरुवातीला चित्रपटांच्या फिल्ममध्ये नायट्रेटचा वापर होत असे. नंतर आलेल्या सेल्यूलाइडपेक्षादेखील कैक पटीने ज्वालाग्रही असं हे रसायन होतं. या नायट्रेटमुळे काही कालावधीनंतर फिल्म खराबदेखील होत असे. परिणामी काही फिल्म खराब झाल्या तर काही सांभाळणं शक्य नसल्यामुळे दुर्लक्षित राहिल्या व गहाळदेखील झाल्या.

पारतंत्र्यातील एकूणच निर्नायकी अवस्था आणि ध्येयवादामुळे चित्रपटाकडे पाहण्याचा काहीसा ००० दृष्टिकोन यामुळे त्या काळातले बरेच चित्रपट आज आपल्याकडे नाहीत. पण उशिराने का होईना सुरू झालेल्या संग्रहालयाने मात्र चांगलीच प्रगती केली. त्याचं श्रेय अर्थातच पी. के. नायर यांना जातं.  संग्रहालयाच्या स्थापनेच्या वेळी क्यूरेटर म्हणून दाखल झालेल्या नायर यांनी १९८१ला संचालक म्हणून निवृत्ती घेईपर्यंतच्या काळात अनेक दुर्मिळ चित्रपटांची रिळं मोठय़ा हिकमतीने मिळवली आणि त्याचं जतन केलं. त्यांच्याच प्रयत्नामुळे राजा हरिश्चंद्र या पहिल्या मूकपटाचं पहिलं आणि शेवटचं रीळ पाहता येऊ शकतं. बोलपट येण्याआधीच्या १३०० पैकी केवळ २५ मूकपटांचं काहीसं का होईना फूटेज आज संग्रहालयात आहे त्यामागे नायक यांची मेहनत महत्त्वाची आहे. ‘कालिया मर्दन’ या चित्रपटाच्या रिळांचा क्रमच नव्हता. फिल्मची अवस्थादेखील चांगली नव्हती. पण नायकांनी मोठय़ा मेहनतीने स्क्रिप्टच्या आधारे सारा मूकपट जोडायचं काम केलं. त्या काळात संग्रहालयात किती फिल्म आल्या यापेक्षा नायकांच्या प्रयत्नातून फिल्म जतनाची परंपरा सुरू झाली असं म्हणावं लागेल.

आपल्याला प्रश्न पडला असेल की हे जतन करणं म्हणजे नेमकं काय? त्यासाठी काय करावं लागतं?

एकविसाव्या शतकात प्रवेश करेपर्यंत आपल्याकडे चित्रपटाचे चित्रीकरण फिल्मवर व्हायचे. लहानपणी तर अनेकांनी अशा फिल्म मिळवून त्या भिंगातून पडद्यावर पाहण्याचा खेळ केला असेल. तर आपण ही जी फिल्म पाहायचो ती म्हणजे पॉझिटिव्ह. चित्रपटसृष्टीच्या भाषेत जिला प्रिंट म्हटले जाते ती हीच. पण मूळ चित्रीकरण व्हायचे ते निगेटिव्हवर. या निगेटिव्हवर योग्य ती प्रक्रिया झाली की त्यापासून मास्टर प्रिंट आणि कॉपीच काढल्या जायच्या. अर्थातच मूळ निगेटिव्हचं महत्त्व खूप असायचं. निर्माता अशा निगेटिव्ह प्राणपणाने जपायचा. कारण त्याचा व्यवसायच त्यावर आधारित असायचा. पण हे जपून ठेवणं दोन कारणांनी कठीण होतं. एक म्हणजे त्यांच्या रासायनिक संयुगामुळे त्या ज्वलनशील असायच्या. आणि दुसरं म्हणजे त्यांची साठवणूक करताना योग्य त्या तापमानाची खबरदारी घेणं गरजेचं असतं. पन्नासच्या दशकात स्टुडिओ पद्धत बंद झाल्यानंतर तर एक हे काम आणखीनच कठीण झालं होतं. एखाद्या निर्मात्याचा व्यवसाय डबघाईला आला तर हे सारं सांभाळणं कठीणच होतं.

येथेच नेमकी फिल्म अर्कायव्हलची गरज अधोरेखित होते. यातील व्यवसायाचा भाग सोडला तरी अभ्यासकांसाठी अशा फिल्म एका ठिकाणी असणं गरजेचं होतं. भारतीयच नाही तर परदेशी दर्जेदार फिल्म्सदेखील सहज मिळणं महत्त्वाचं होतं. आणि तोपर्यंत अनेक देशांनी स्वत:ची अशी संग्रहालयं सुरू केली होती. त्या काळी काही धुरिणांनी ही गरज नेमकी ओळखली. त्यामुळेच आज आपल्याकडे तब्बल १७ हजारांच्या आसपास चित्रपटांची रिळं उपलब्ध आहेत. भारतीयच नाही तर जगभरातील जवळपास सर्वच भाषांतील निवडक चित्रपटांचे येथे जतन केले आहे.

खरे तर चित्रपट निर्मिती हा व्यवसायाचा भाग. त्यामुळे त्याचे जतन करण्यासाठी सरकारने पैसे खर्च करायची काय गरज असा साहजिक प्रश्न पडू शकतो. पण हा व्यवसाय असला तरी अखेरीस ते त्या त्या काळातील समाजाचे चित्रण असते. आणि मनोरंजनाचं माध्यम असलं तरी ती एक कलाकृती असते. त्यामुळेच अशा प्रकारच्या संग्रहालयाची गरज कायमच असते.

अर्थात हे संग्रहालय म्हणजे केवळ निर्मात्याकडून फिल्मची रिळं आणायची आणि कपाटात ठेवून द्यायची असं करून चालत नाही. तर त्यासाठी विशिष्ट यंत्रणा गरजेची असते. फिल्म आल्यानंतर एका विशिष्ट यंत्रावर आलेली सर्व रिळं तपासावी लागतात. एका बाजूला भरलेले रीळ मोटरच्या साहाय्याने दुसऱ्या रिकाम्या रिळावर चढवले जाते. बोटांच्या अलगद अशा चिमिटीतून ही फिल्म पुढे जात असताना त्यावर बारकाईने लक्ष द्यावं लागतं. अर्थात हे सारं अनुभवातूनच शिकण्याचं काम आहे. वर्षांनुवर्षे नजर बसलेला तंत्रज्ञ अगदी सहजपणे फिल्ममधला दोष पकडू शकतो. त्यानंतर दुसऱ्या एका मशीनवर संपूर्ण फिल्म पाहिली जाते. फिल्ममध्ये काही दोष असतील, त्यावर कचरा असेल, काही भाग खराब झाला असेल तर त्यावर प्रक्रिया करून तो भाग कापून या सर्वाची व्यवस्थित नोंद करून मग संग्रहालयाच्या खास डब्यांमध्ये ठेवला जातो. त्यानंतर मग हे सर्व डबे व्हॉल्टमध्ये जमा होतात.

एखाद्या बँकेच्या व्हॉल्टसारखा मजबूत बांधणी असणारे असे १६ व्हॉल्ट आज फिल्म संग्रहालयाच्या नव्या इमारतीत आहेत. एका व्हॉल्टमध्ये किमान सहा हजार फूट लांबीची रिळं ठेवली जातात. हे व्हॉॅल्ट केवळ मजबूतच नसतात तर त्यांचे तापमान नियंत्रित करावे लागते. रंगीत फिल्म असेल तर दोन डिग्री आणि कृष्णधवल असेल तर १२ ते १३ डिग्री तापमानाची गरज असल्याचे फिल्म संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम सांगतात. त्याचबरोबर रिलेटिव्ह ह्य़ूमिडिटी ३५ (उणे/अधिक पाच) इतकी असावी लागते. किंबहुना या ह्य़ूमिडिटीवरच फिल्मचं आयुष्य अवलंबून असतं. आज या संग्रहालयाची २.५ लाख फूट रिळांचं जतन करण्याची क्षमता आहे. जेव्हा केव्हा यातील फिल्म वापरायची असेल तेव्हा थेट कक्ष तापमानाला आणून चालत नाही. दोन-तीन टप्प्यांत हळूहळू तापमानात वाढ करावी लागते. वापरून झाल्यावर पुन्हा हेच सर्व सोपस्कार करून मग परत व्हॉल्टमध्ये ठेवावी लागते.

केवळ चित्रपटांचं जतन इतकंच या संस्थेचं उद्दिष्ट नाही. त्यामुळेच अनेक चांगले माहितीपट संस्थेकडे आज उपलब्ध आहेत. आज डिजिटलच्या जमान्यात चित्रपटांचे पोस्टर हा काही खास नावीन्याचा भाग राहिलेला नाही. किंबहुना सारा भरच डिजिटलवर आहे. पण पूर्वी हाताने रंगविलेली पोस्टर्स हा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा महत्त्वाचा घटक होता.  ही रंगविलेली पोस्टर्स हा खास आकर्षणाचा भाग असायचा. संग्रहालयाकडे आज तब्बल २२ हजार पोस्टर्स आहेत. इतकंच नाही तर त्या काळी साँग बुकलेट नावाची संकल्पना होती. चित्रपटातील सर्व गीतं आणि चित्रपटाशी संपूर्ण श्रेयनामावली या साँग बुकलेटमध्ये असायची. अशी १४ हजार साँग बुकलेट आज संग्रहालयात आहेत. त्याचबरोबर ४० हजार चित्रपटांचं स्क्रिप्टदेखील येथे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाशी संबधित तब्बल २५ हजार पुस्तकांचं सुसज्ज असं ग्रंथालय. थोडक्यात काय तर चित्रपटांच्या संदर्भातील एक सर्वागीण असा मौलिक ठेवाच या वास्तूत आहे.

गेल्या काही वर्षांत सारच डिजिटल झालं आहे. पण तरीदेखील या रिळांचं रुपेरी महत्त्व कमी झालेलें नाही. किंबुहना ते अधिकच वाढलेलं आहे. हल्ली सर्वानाच डिजिटायजेशन झालं की सारं सोप्पं झालं असं वाटतं. पण फिल्मच्या बाबतीत आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. काळानुसार आलेल्या तंत्राच्या माध्यमातून जर फिल्मचं योग्य प्रकारे जतन केलं तर त्या किमान शंभर र्वष टिकू शकतात. इतकंच नाही तर मूळ निगेटिव्ह असेल त्यावरून तेवढय़ाच चांगल्या दर्जाची प्रिंट काढणं शक्य असतं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिजिटलमधील संज्ञा येथे लागू होत नाहीत. किंबहुना डिजिटलपेक्षादेखील कैकपटीने फिल्मची गुणवत्ता अधिक असल्याचं अनेक तंत्रज्ञांचं म्हणणं आहे. डिजिटलने चित्रीकरण, संकलन सोप्पं झालं असलं तरी फिल्मची गुणवत्ता त्याचं डिजिटायजेशन करून मिळत नाही.

दुसरीकडे डिजिटायजेशनचा खर्चदेखील बराच आहे. रंगीत चित्रपटासाठी किमान १५ ते २० लाख रुपये. तर कृष्णधवलसाठी ३० लाखांच्या आसपास. तसेच डिजिटायजेशन केलं तरी ते वारंवार अद्ययावत ठेवावं लागतं. त्यासाठी खर्च लागेल तो वेगळाच.

पण कालानुरूप संग्रहालयाने बरेच बदल केले आहेत. आज निवडक ५६५ चित्रपटांचं डिजिटायजेशन पूर्ण झालं आहे. ही डिजिटायजेशनची प्रक्रिया दोन टप्प्यांत चालते. फिल्म आल्यानंतर त्यात काही त्रुटी नाहीत हे पाहून त्यातील चांगला भाग हा जतनचा पहिला टप्पा. तर ती फिल्म स्कॅन करून त्याचं डिजिटल रूपांतर करणं हा दुसरा टप्पा. पण केवळ स्कॅन केलं म्हणजे काम होत नाही. तर त्यानंतर मूळ फिल्मच्या डिटेल्सच्या जवळ जाता येईल अशा प्रकारे विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काम करावं लागतं. तेव्हा डिजिटल रिस्टोरेशन पूर्ण होतं. हे काम अर्थातच खर्चीक असतं. आज अनेक जुन्या चित्रपटांच्या डिव्हीडी बाजारात दिसतात. व्यापारी दृष्टीने अशी गुंतवणूूक करणं शक्य आहे. पण संग्रहालय हे काही व्यापारी तत्त्वावर चालत नाही. सध्या तरी ५६५ फिल्मच डिजिटाइज झाल्या आहेत.

मात्र सध्या हाती घेतलेल्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनअंतर्गत संग्रहालयात अनेक बदल होत आहेत. संग्रहालायातील सर्व फिल्मचे अ‍ॅसेसमेंट त्यानिमित्ताने होत आहे. त्यातून १००० फिल्म निवडल्या जाणार असून त्यांचं डिजिटायजेशन केलं जाईल. त्या अनुषंगाने काही महिन्यांपूर्वीच येथे एक विशेष वर्कशॉपदेखील घेण्यात आलं होतं.  ज्यात जगभरातील सतरा तंत्रज्ञ मार्गदर्शनासाठी आले होते.

नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचा दुसरा टप्पा हा संग्रहालयाकडे असणारी सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध करणारा आहे. फिल्म, पोस्टर, पुस्तक, साँग बुकलेट असं सारं काही एकाच पोर्टलवर एकाच वेळी लिंक केलं जाणार आहे.

आज एका क्लिक्वर यूटय़ूब वा तत्सम माध्यमातून आपल्याला हवा तो चित्रपट आपण पाहू शकतो. पण फिल्मच्या जमान्यात हे काहीच नव्हतं, तेव्हा संग्रहालयाने हा राष्ट्रीय ठेवा जपला आहे. आपलीपण मानसिकता बदलली आहे. आज निर्माते आपणहून संग्रहालयाला फिल्म देत आहेत. अनेक रसिक जुने दस्तावेज व फिल्मबद्दलची माहिती संग्रहालयाला देत आहेत. तर संग्रहालय अनेकांच्या मदतीने सातत्याने चित्रपटांसदर्भातील विशेष उपक्रम राबवत आहे. संग्रहालयाबद्दलची एकूणच अनास्था कमी होताना जाणवत आहे.

चित्रपट हा खरं तर दोन घटका करमणूक मनोरंजन म्हणूनच आपल्याकडे पाहिला जातो. रसिक प्रेक्षक रुपेरी पडद्यावरील दृश्य मनात साठवून ठेवतो. पण या संग्रहालायामुळे साऱ्या रुपेरी दृश्यांचीच जणू काही जिवंत साठवणूक केली आहे. ती सर्वानीच जपायची आहे.

दुर्मिळ खजिना शोधताना..

संग्रहालय सरकारी असलं तरी एखादा फतवा काढून साऱ्या दुर्मिळ फिल्म जमा करता येत नाही. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच संग्रहालयात दाखल झालेला १९१९ सालचा बिल्वमंगल हा मूकपट.  एलफिन्स्टन बायोस्कोप कलकत्ता यांनी निर्माण केलेला मूकपट रुस्तोमजी दोतीवाला यांनी दिग्दर्शित केला होता. नंतर ह्य़ा कंपनीचं नाव मदन थिएटर्स असं झालं होतं. या थिएटर्सचा सध्या कसलाच ठावठिकाणा नाही. पण बिल्वमंगलची काही रिळं ही सिनेमातिक फ्रान्स्वा या फ्रान्सच्या संस्थेकडे होती. बऱ्याच पत्रव्यवहारानंतर मागच्याच आठवडय़ात ही रिळं संग्रहालयाला सुपूर्द करण्यात आली. त्या बदल्यात ‘जमाई बाबू’ या १९३१ च्या मूकपटाची एक डिजिटल कॉपी आपण या संस्थेला दिली.

संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम सांगतात की, अशा अनेक प्रयत्नांतून वेगवेगळ्या ठिकाणाहून चित्रपटांचा दुर्मिळ खजिना हाती लागतो. मागच्याच वर्षी १९३५ साली बंगाली भाषेतील देवदास आम्हाला मिळाला. बांगलादेश अर्काइव्हकडे तो होता. आपल्याकडे एकूण १३ देवदास तयार झाले होते. आज संग्रहालयात त्यापैकी सात देवदासच्या कॉपीज आहेत. इतकेच नाही तर व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पलातक’ या एकमेव बंगाली चित्रपटाचा काही भाग युमॅटिकवर सापडला. मागच्याच वर्षी ‘पलनाटी युद्ध’ ह्य़ा १९४७च्या  तेलगू चित्रपटाची चक्क नायट्रेट फिल्म मिळाली. इतक्या वर्षांनतरदेखील ही फिल्म टिकून आहे.

अनेकानेक संदर्भातून संग्रहालयाच्या खजिन्यात भर पडत असते. केवळ चित्रपटच नाही तर अनेक दुर्मिळ चित्रीकरणंदेखील येथे दिसून येतात.  दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैनिक (मद्रास रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट) जेथे जेथे लढले त्याचं चित्रीकरण संग्रहालयाला मिळालं आहे. केरळातील पहिलं सरकार हे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं जगातील पहिलं कम्युनिस्ट सरकार. या सरकारच्या शपथविधीची अगदी दोन मिनिटांची फिल्म नुकतीच संग्रहालयात आली आहे.

उपक्रमशील संग्रहालय

केवळ हजारोंच्या संख्येने चित्रपटांचा संग्रह हाच या संस्थेचा उद्देश नाही. तर हा सारा संग्रह सर्वसामान्यांच्या आणि अभ्यासकांच्या उपयोगी यावा या दृष्टीने संग्रहालय अनेक उपक्रम राबवित असते. दरवर्षी एफटीआयआयच्या बरोबर फिल्म अ‍ॅप्रिसिएशनचा एक महिन्याचा निवासी अभ्यासक्रम आयोजित केला जातो. तर फिल्म सोसायटीच्या सहकार्याने एक आठवडय़ाचे रसास्वाद शिबीर मराठीतून आयोजित केले जाते. त्याचबरोबर दर वर्षी चित्रपटाशी निगडित विषयांवर अभ्यासासाठी तीन वेगवेगळ्या पाठय़वृत्ती दिल्या जातात. फिल्म सर्कलच्या माध्यमातून अनेकांना संग्रहालयामार्फत वर्षभर वैविध्यपूर्ण चित्रपट पाहायला मिळतात. संग्रहालयाचे फेसबुक पेजवरून प्रत्येक दिवसाचं चित्रपटाच्या अनुषंगाने दिनविशेष प्रकाशित होत असते. संग्रहालयाच्या वेबसाइटमध्ये मात्र सुधारणा सुरू आहेत. एकंदरीतच संग्रहालयदेखील आता लोकाभिमुख होत आहे. गरज आहे त्याचा सर्वानी लाभ घेण्याची.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
@joshisuhas2