दत्तक प्रक्रियेची सुरुवात झाल्यावर मूल घरी कधी येईल याचा प्रत्येकाचा अनुभव निराळा आणि ते घरी येईपर्यंतचा कालावधीही वेगळा. मात्र प्रत्येक पालकांच्या आयुष्यात  बाळाच्या पहिल्या भेटीचा अनुभव अविस्मरणीय असतो आणि जवळजवळ सारखाच. ते ऐकल्यावर वाटतं, किती आनंदाने या सगळ्यांनी आपलं कुटुंब पूर्ण होण्यासाठी ‘दत्तक’ प्रक्रिया स्वीकारली.

घरात मूल आलं की घराला घरपण येतं असं सगळेच जण म्हणतात. सहसा सगळ्यांच्या आयुष्यात मूल येतं त्याची नऊ  महिने आधी चाहूल लागलेली असते; परंतु दत्तक प्रक्रियेतून घरी येणाऱ्या मुलांच्या कथा काही निराळ्याच.. इथे दत्तक प्रक्रियेची सुरुवात झाल्यावर मूल घरी कधी येईल याचा प्रत्येकाचा अनुभव निराळा आणि घरी येईपर्यंतचा कालावधीही वेगळा. प्रत्येक पालकांच्या आयुष्यात मात्र आपल्या या बाळाच्या पहिल्या भेटीचा अनुभव हा अवर्णनीय असाच असतो. आज जरा असे थोडे अनुभव वाचून आपणही सगळे वेगळ्या अनुभूतीचा आनंद घेऊ या.. मोह होतोय तो माझ्या स्वत:च्या अनुभवाने सुरुवात करण्याचा..

२८ मे २०११ मला ‘सोफोश’मधून फोन आला, ‘‘संगीता, लेक तुझी वाट बघतेय.. ३० मे सकाळी ११ वाजता तिला भेटायला ये.’’ मला काय बोलावं काहीच सुचेना, फक्त ‘हो’ म्हणाले. २९ मे रविवार होता, त्यामुळे दोन दिवस वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. ३० मे ला सकाळी १०.३० लाच मी ‘सोफोश’मध्ये हजर झाले. तिथले सगळेच मला ओळखत असल्यामुळे माझी अस्वस्थता बघून त्यांनाही मजा वाटली. लगेच तिथल्या ताई मला ‘श्रीवत्स’मध्ये घेऊन गेल्या. प्रत्येक क्षण किती मोठा वाटत होता मला! ताई मला म्हणाल्या, ‘तू थांब इथे, मी आलेच बाळाला घेऊन.’ पुढल्या २ मिनिटात त्यांच्या कडेवर एक बाळ, केस एकदम विरळ, हाताच्या मुठी बंद, हिरवा रंगाचा फ्रॉक घालून माझं कोकरू माझ्याकडे येत होतं. मोठे मोठे डोळे, गोबरे गाल आणि तो मऊ मऊ स्पर्श.. आजही तो क्षण तसाच थांबलेला आहे. माझ्या जवळ आल्यावर ताईने तत्परतेने लगेच आम्हा मायलेकींना कॅमेरात कैद केलं. मी तशीच तिला घेऊन बसले, गप्पा केल्या तिच्याशी. थोडय़ा वेळात झोपली माझ्या हातात. ताई म्हणाल्या ‘झोपवू का तिकडे?’ मी म्हणाले, ‘छे! अजिबात नाही. असू दे माझ्याकडे.’ दोन तास मी तिथेच बसले, शेवटी ताई म्हणाल्या, ‘अगं, थोडे दिवस, मग घरी येईलच. तोपर्यंत रोज ये भेटायला!’ खूप कष्टाने तिथून निघाले, पण निमिषाला भेटण्याचा आनंदही तेवढाच मोठा होता.

दीपा आमची मुंबईची एक मैत्रीण, तिनेही एकल पालकत्वाचा निर्णय घेतला. तिचा मुंबईमध्ये बऱ्याच संस्थांनी अर्जही स्वीकारला नाही, कारण काय तर तिचं एकल पालकत्व! तिलाही १३ महिने वाट बघावी लागली आपल्या लेकीला भेटायला. तिची लेक औरंगाबाद संस्थेत होती. तिथून २६ मे २०१० ला फोन आला की १६ जूनला भेटायला या. दीपा सांगते, ‘‘त्या दिवशीची रात्र खरंच खूप मोठी वाटली. सकाळी लवकर उठून मी संस्थेत गेले. मनाशी ठरवलं होतं, संस्थेने जरी सांगितलं की तुम्हाला तीन बाळांतून तुमचं बाळ निवडण्याची संधी आहे, पण ज्या पहिल्या बाळाला प्रथम भेटू तेच आपलं बाळ. तितक्यात तिथल्या ताई माझ्या पिल्लूला घेऊन आल्या. डोक्यावर जेमतेम चार केस असतील, तेही तेल लावून भांग केलेला, तिला बघितल्यावर वाटलं, ‘अरे, माझी लेक अशा लुकमध्ये अजिबात असू शकत नाही, आधी तिचे केस विस्कटले आणि मग तिला कडेवर घेतलं. आता कशी बम्बईवाली दिसतेय, असं म्हणून मी स्वत:शीच हसले. पिल्लू एकदम वळवळं, चंचल! त्यामुळे लगेच जाणवलं ‘आपली परेड सुरू आता.’ आज दिव्यशक्ती सात वर्षांची आहे, धमाल करतात दोघी मायलेकी, दोघीही बिनधास्त, बडबडय़ा आणि कायम क्रियाशील असतात.

आमच्या नीलिमाची कथा थोडी निराळी, थोडंसं तिच्याच शब्दात जाणून घेऊ या, ‘‘शाळेत असताना मी ठरवलं, ‘माझ एक बाळ हे दत्तक प्रक्रियेतून घरी येणार.’ माझं हे स्वप्न माझ्या नवऱ्याने आणि मुलाने जोपासलं. २० डिसेंबर २००९ आम्ही आमच्या सुफीला भेटायला संस्थेत गेलो. आमचं पिल्लू तिच्या ताईकडून आमच्याकडे आल्यावर जोरात रडायला लागलं; परंतु मला मात्र त्यातून एवढचं ऐकू आलं, ‘आई, इतके दिवस कुठे होतीस गं तू? किती वाट बघितली मी!’ माझे आनंदाश्रू गालावरून ओघळत होते आणि हृदय मात्र सांगत होतं, ‘सुफी! आई आलीय आणि आता कायम सोबत राहणार आहे.’ तो क्षण आम्हा तिघांच्या आयुष्यातला अतिशय मोलाचा क्षण होता.

दीपाली आणि सिद्धार्थ माझे शेजारी. बराच काळ वाट बघून, वैद्यकीय उपचार करून त्यांनी ठरवलं, आपलं बाळ दत्तक प्रक्रियेतून घरी येईल. सध्याच्या नवीन ऑनलाइन प्रक्रियेप्रमाणे त्यांनी सुरुवात केली. दीपाली म्हणाली, ‘‘आठ महिन्यांनी आम्हाला तीन मुलींची माहिती पाठविण्यात आली. थोडासा विचार करून मुंबईच्या संस्थेमधून ज्या बाळाची माहिती दिली होती, ते आम्ही नक्की केलं. १३ जून २०१६ रोजी आम्ही सकाळी लवकरच मुंबईला निघालो, इतक्या वर्षांचं आमचं स्वप्नं पुरं होताना दिसत होतं. पुणे-मुंबई प्रवास केवढा लांबचा वाटला त्या दिवशी. डोक्यात फक्त एवढेच विचार चालू होते, टीसीपीओसोबत मीटिंग होऊन आज आपली भेट होईल का? कशी दिसत असेल आपली लेक? तिची प्रतिक्रिया काय असेल? येईल का आपल्याकडं? ४-५ तासांनी आम्ही संस्थेत पोहोचलो, तिथे गेल्यावर आमची मीटिंग झाली, नंतर आम्ही दिविजाला भेटायची वाट बघत बसलो होतो, तितक्यात तिथल्या ताई आमच्या दिविजाला घेऊन आल्या. ताई तिला म्हणाल्या, ‘काय पिल्लू, जाणार का आईकडं?’ दिविजा चटकन झेप घेऊन आमच्याकडे आली. त्या क्षणी जाणवलं, आपल्याला हिने स्वीकारलं. आई-बाबा होण्याचं आमचं स्वप्नं दिविजाने एका क्षणात पूर्ण केलं.’’ दीपाली आणि सिद्धार्थला भेटले की नेहमी असं वाटतं, दिविजा आली आणि यांचं कुटुंब ‘पूर्ण’ झालं. त्याचं समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर भरभरून दिसतं.

समीक्षा आणि परेश आमचे बारामतीचे मित्र. यांनी पण ठरवलं होतं, एक बाळ दत्तक प्रक्रियेमधून घरी येऊ  देत. कबीर, त्यांचा लेक सहा वर्षांचा झाल्यावर, त्यांनी दत्तक प्रक्रिया सुरू केली, सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला १५ महिने लागले. समीक्षा सांगत होती, ‘‘१६ जानेवारी २०१४ ला ‘सोफोश’मधून परेशला फोन आला, ‘उद्या सकाळी ११ ला लेकीला भेटायला या. अडीच महिन्यांची आहे, देवयानी नाव आहे तिचं!’ परेश म्हणाला, ‘‘त्या दिवशी रात्री झोपच येईना, सारखे विचार चालू, ‘आपलं बाळ घरी येणार, परत एकदा शी-सू, छोटे छोटे कपडे.’ १७ डिसेंबरला सकाळी लवकरच आवरलं आणि निघालो, मनात हुरहुर, उत्सुकता होती. तिथं गेल्यावर तिथल्या ताईंनी देवयानीची फाईल दाखवली व म्हणाल्या, ‘तिच्या आईनं तिचं नाव देवयानी ठेवलंय.’ माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं, ‘त्या आईला किती यातना झाल्या असतील, एवढय़ाशा जीवाला वेगळं करताना.’ ताईंनी निरोप पाठवला, ‘देवयानीचे आई-बाबा आलेत, तिला छान तयार करून घेऊन या.’ ती ५-१० मिनिटंसुद्धा कैक तासांसारखी वाटली. ताई देऊला घेऊन आल्या, ‘एवढसं टोपडं, दुपटय़ात गुंडाळलेलं एवढसं ते पिल्लू’ आमच्याकडे देऊन म्हणाल्या, ‘बघा कशी आहे तुमची लेक.’ परेशनं तिला घेतलं, वाटलं ‘दुसरा कबीरच.’ आपसूकच विचारलं, ‘एवढी कबीरसारखी कशी काय?’ त्या फक्त हसल्या. आम्ही तिला फक्त अनुभवत होतो. गाढ झोपलेली होती, मधेच चुळबुळ करायची, मऊमऊ गाल, मऊमऊ हात, इवलसे पाय, सगळं आम्ही मनात, नजरेत भरून घेत होतो. थोडय़ा वेळानं निघावं लागणार होतं, आमची कुणाचीही इच्छा नव्हती. तिचा स्पर्श, तिच्या हालचाली, सगळं मनात साठवून निघालो. निघताना एकदा वाटलं, ‘आताच घेऊन जाऊ या का?’ आपल्याशिवाय कशाला ठेवायचं अजून, कशी झोपेल एकटीच, आई-बाबांशिवाय? ताईंनी आमची घालमेल ओळखली, म्हणाल्या, ‘‘अजून थोडेच दिवस थांबा, हेही दिवस लगेच भुर्रकन उडून जातील.’’

अशा सगळ्यांना मी जेव्हा भेटत असते तेव्हा नेहमी वाटतं, ‘‘किती आनंदाने या सगळ्यांनी आपलं कुटुंब पूर्ण होण्यासाठी ‘दत्तक’ प्रक्रिया सहजपणे स्वीकारली.’’ हे सगळे अनुभव वाचून नक्कीच काही जण स्वखुशीने दत्तक प्रक्रिया निवडतील ना की एक तडजोड म्हणून या प्रक्रियेकडे बघतील?

संगीता बनगीनवार sangeeta@sroat.org