दत्तक प्रक्रियेतून झालेले पालक बऱ्याचदा या संभ्रमात असतात की, आपल्या मुलाला दत्तक नात्याविषयी केव्हा आणि कसं सांगावं? याविषयी संस्थेमधून तसेच समुपदेशनातून या पालकांना मार्गदर्शन मिळत असतं. आज याविषयी दत्तक प्रक्रियेतून आलेल्या मुलांचे अनुभव मांडावेसे वाटतात.

मला नेहमीच वाटतं, मुलांना त्यांच्या वयाच्या सहा वर्षांच्या आत आईबाबांनी सगळं सत्य सांगावं. बऱ्याच पालकांना वाटतं, मुलांना कळत्या वयात म्हणजे तेरा-चौदा वर्षांचा झाल्यावर दत्तक नात्याविषयी सांगितलं तर ते नीट समजू शकेल आणि त्यांना या सत्याचा सामना करणं सोपं जाईल. माझं पालकांना सांगणं असतं, जी गोष्ट तुम्ही तेरा-चौदा र्वष सांगत नाही त्या वेळेस तुम्ही स्वत: एका अनामिक भीतीमध्ये जगत असता. याच अनामिक भीतीचं रूपांतर नंतर असुरक्षितेत होतं, त्यामुळं मुलांना दत्तक नात्याविषयी बोलावं की बोलू नये? या संभ्रमात पुढील काही र्वष निघून जातात.

मुलांना जितक्या लहानपणी आपण दत्तक नात्याविषयी सांगू तेवढं त्यांच्यासोबतचं नातं दृढ व्हायला मदत होते. मुलांच्या अंतर्मनात दत्तक नात्याविषयी ‘दत्तक ही फक्त कुटुंब पूर्ण करण्याची एक प्रक्रिया आहे. त्यात दया, तिरस्कार किंवा राग मानण्यासारखं काही आहे असं नाही,’ असं आपण सांगू शकतो. मात्र एवढं सांगून आपलं काम संपलं असं होत नाही. मुलांना त्यांच्या वयानुरूप अनेक प्रश्न येत राहणार, या प्रश्नांची उत्तरं घरात एकमेकांसोबतचा मनमोकळा संवाद असेल तर सापडायला मदत होते. सहसा मुलांना वयाच्या वीस-बावीस वर्षांपर्यंत अनेक प्रश्न असतात, ज्यात पालक म्हणून त्यांच्यासोबत आपण असलो तर हे प्रश्न गंभीर होण्याचं प्रमाण नक्कीच कमी होतं. त्यानंतर मात्र प्रश्नही कमी होतात आणि मुलं स्वत: उत्तरं शोधायला सक्षमही होतात.

दत्तक प्रक्रियेतून आलेल्या मुलांच्या दत्तक असण्याबाबत, त्यांना हे सत्य कसं, कधी कळलं आणि त्यांना आलेले प्रश्न म्हणजे आव्हानं याबद्दल बोलायला हवं. वेगवेगळ्या वयांत हे विचार थोडय़ाफार फरकाने सारखेच असतात, असं या मुलांशी बोलल्यानंतर जाणवतं. अर्थात माझा संपर्क आला तो जवळपास तीस-चाळीस मुलांसोबत. ही परिस्थिती सगळ्याच मुलांच्या बाबतीत समान असेल असं मी अजिबात म्हणू इच्छित नाही; परंतु एवढं मात्र नक्की, मुलांना त्यांच्या दत्तक नात्याविषयी आपल्या आईबाबांकडून कळलं आणि आईबाबांसोबत त्यांचा मनमोकळा संवाद असेल, त्या वेळेस त्यांना फारसे प्रश्न येत नाहीत आणि समजा, आले तरी त्या प्रश्नांची उत्तरे ते सहजपणे शोधू शकतात.

सध्या मोठी झालेली जी मुलं आहेत त्यातील बऱ्याच मुलांना दत्तक नात्याविषयी त्यांच्या पालकांकडून किंवा बाहेरच्या लोकांकडून वयाच्या तीन ते बारा या वयात कळते. त्यामुळे त्यांचे अनुभव हे आजच्या पालकांसाठी नक्कीच उपयोगी आहेत. काही जणांना त्यांचे अनुभव नावाशिवाय सांगायचे आहेत, त्यामुळे त्यांची नावं बदलली आहेत. चिराग, सहा वर्षांचा असताना मित्रांसोबत खेळत होता आणि काही कारणानं त्यांचं भांडण सुरू झालं. त्यात लगेच एक मित्र म्हणाला, ‘‘तुझे आईबाबा हे खरे आईबाबा नाहीत. त्यांनी तुला संस्थेतून आणलं आणि संस्थेतील मुलं म्हणजे टाकून दिलेली बाळं असतात.’’ चिरागला सगळं कळलं नाही; परंतु खूप राग आला. तसाच घरी आला आणि आईला म्हणाला, ‘‘तुम्ही मला संस्थेतून घरी आणलं?’’ आईला जाणवलं आपल्या लेकाला बाहेरून कुणी तरी काही तरी बोललं आहे. तिने लगेच त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, ‘‘बाळा, फक्त एक वाक्य ऐकून कुठलाही टोकाचा विचार करू नकोस. प्रत्येक गोष्टीच्या अनेक बाजू असतात. बाहेरचे जे बोलले ते तू लगेच घरी येऊन माझ्याशी बोललास हे मात्र खूप छान केलंस. आपण यावर थोडं सविस्तर बोलू या, जेणेकरून तुला कळेल दत्तक नातं म्हणजे काय ते.’’

आईनं चिरागला सगळं सांगायचं ठरवलं. आई म्हणाली, ‘‘चिराग, मी आणि बाबांनी लग्न तर केलं, परंतु निसर्गाला कदाचित माझ्या पोटी तुला पाठवायचं नसावं, त्यामुळं मला मूल झालं नाही; परंतु मी आई व्हावं असंही सारखं वाटायचं, म्हणून मी आणि बाबांनी ठरवलं आपलं बाळ दत्तक प्रक्रियेतून घरी येऊ देत. संस्थेत आम्ही जेव्हा गेलो, तिथे तू आम्हाला भेटलास. तुझी जन्मदात्री, ही एका अपघातात मरण पावली होती. तुझ्या बाबांना एवढय़ा छोटय़ा बाळाला सांभाळणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी तुला संस्थेत आणून दिलं. त्यांना विश्वास होता की, तुला एक चांगलं घर, तुझ्यावर प्रेम करणारे आईबाबा नक्की भेटतील. त्यांचा विश्वास सार्थ ठरला, तू आम्हाला भेटलास आणि आपण एकत्र आलोत. तू त्यांनाही हवा होतास आणि आम्हालाही हवा आहेस. एक लक्षात ठेव चिराग, बाहेरचे लोक त्यांना हवं तसं कधी रागानं, कधी तिरस्कारानं, तर कधी हेव्यापोटी तुझ्याशी दत्तक असण्याबद्दल बोलतील. तुला मात्र तुझं अस्तित्व काय आहे हे जर नीट कळलं तर लोकांच्या अशा बोलण्याचा आणि त्यांच्या क्षुद्रपणाचा तुला कधीच त्रास होणार नाही.’’ चिराग म्हणतो, ‘‘मावशी, या विषयावर आईबाबांनी वेळोवेळी माझ्याशी मनमोकळा संवाद ठेवला आणि जेव्हा जेव्हा मला कधी त्रास झाला तेव्हा तेव्हा मी त्यांच्याशी बोलून स्वत:ला त्यातून बाहेर काढत आलो. मला नेहमीच वाटतं, फक्त आईबाबा आपल्यासोबत या विषयावर प्रामाणिकपणे बोलू शकतात आणि पूर्ण सत्य फक्त तेच सांगू शकतात. बाहेरचे जे बोलतात ते नेहमीच अर्धसत्य असतं. कुणी काही बोललं तरी मला आता काही फरक पडत नाही. माझं अस्तित्व आणि माझं आईबाबांसोबतचं नातं हे फक्त मला माहिती आहे, त्यावर बाहेरचे कुणी काहीही शिक्का मारू शकत नाहीत. मला हेही वाटतं की, मुलांना दत्तक नात्याविषयी स्वत: पालकांनी सांगावं आणि जेवढं लवकर तेवढं चांगलं.’’

किमयाशी बोलताना तिने तिचे अनुभव सांगितले. किमया आज चोवीस वर्षांची आहे. तिला तिच्या आईबाबांनी दत्तकविषयी अगदी लहानपणापासून सांगितलं. तिचे आईबाबा म्हणतात, ‘‘आमच्या मनात दत्तकविषयी कुठलाही दुजाभाव नसल्याने आम्ही किमयाला नेहमीच सांगत आलो, ‘दत्तक आहेस म्हणून कधी मनात स्वत:चा राग करू नकोस किंवा सहानुभूतीपण मिळवू नकोस. नेहमी हेच लक्षात ठेव, तू आमची आहेस आणि आम्ही तुझे. हेच आणि एवढंच पूर्ण सत्य आहे.’ त्यामुळे आमच्यातील संवाद हा नेहमी स्पष्ट आणि मोकळा असतो.’’

किमया म्हणते, ‘‘मलाही कधी तरी कुणी तरी दत्तक असण्यावरून बोलायचे. बहुतेक वेळा हे बोलणं म्हणजे, नातेवाईकांकडून अभ्यासाबाबत, मित्रमैत्रिणींकडून कधी दिसण्यावरून, तर कधी वागण्यावरून तुलना या प्रकारचं असायचं.

मला माझे आईबाबा अगदी लहानपणापासून माझ्याशी दत्तक नात्याविषयी बोलायचे. मला नक्की आठवत नाही की तेव्हा मला नेमकं काय वाटायचं. माझ्या वाढदिवसाला आम्ही माझ्या संस्थेमध्ये जायचो, आईबाबांनी माझा आणि संस्थेचा संपर्क राहील याची काळजी घेतली होती. मला सहा-आठ वर्षांची असताना वाटायचं, कशाला जायचं

संस्थेत? परंतु थोडय़ा वर्षांनी मग मलाच छान वाटू लागलं. आता तर मी संस्थेत आवर्जून जाते आणि मला तिथे जाऊन आलं की शांत वाटतं. लहानपणापासून मला आईबाबांनी दत्तक नात्याविषयी सांगितलेलं असल्याने मला कुणी कसलीही तुलना केली किंवा माझ्या अस्तित्वाबद्दल काही बोललं तरी फारसा फरक पडत नाही. थोडंसं वाईट वाटायचं, पण मग मी विचार करायची, ‘हे लोक काय समजणार मला आणि माझ्या नात्यांना! सोडून दिलेलं बरं, नाही तरी यांना थोडय़ाच कळणार आहेत माझ्या भावना!’ ताई, मी वाट बघत होते की तुम्ही ‘पालकांचा मुलांशी दत्तक नात्याविषयी संवाद’ या विषयावर कधी लिहिणार. तुम्ही माझे अनुभव या लेखाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवत आहात, त्याची इतरांना काही मदत झाली तर मी स्वत:ला खूप धन्य समजेन.’’

चिराग आणि किमयासारखेच बऱ्याच मुलांचे अनुभव आहेत. एकूण काय, या सगळ्या मुलांना एवढंच वाटतं, पालकांनी आपल्या मुलांशी दत्तक नात्याविषयी लहानपणीच बोलावं आणि नात्यातील सत्यता जपावी. ज्या पालकांनी अजूनही आपल्या मुलांशी या विषयावर संवाद साधला नसेल त्यांनी खरंच हे लवकरात लवकर करावं.

संगीता बनगीनवार

 sangeeta@sroat.org