दत्तक प्रक्रियेविषयी अनेकांच्या मनात प्रश्न असतात. गैरसमज असतात. या सदराच्या माध्यमातून ही प्रक्रिया तसेच दत्तक पालकत्वाविषयी,  दत्तक मुलांविषयी मूल दत्तक घेणाऱ्या पालकांविषयी माहिती करून घेणार आहोत. आजच्या लेखात दत्तक प्रक्रियेविषयी..

दत्तक प्रक्रियेविषयी अनेक जण अनभिज्ञ असतात. त्याविषयी गैरसमजच जास्त असतात. भीती असते.  मला खात्री आहे की हे सदर वाचून खूप साऱ्या लोकांची भीती तसेच दत्तक या विषयातला गूढपणा नक्कीच कमी होईल. म्हणूनच आजच्या लेखात दत्तक प्रक्रियेविषयी माहिती घेणं आवश्यक वाटतं.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

अर्थात विस्तारभयास्तव फक्त मोघम टप्पे काय आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत.

बालसंगोपन केंद्रात आलेलं मूल दत्तक प्रक्रियेत कसं येतं?

बालसंगोपन केंद्रात येणारं प्रत्येक मूल हे त्या बाळांच्या पालकांनी संस्थेत आणून दिलेलं असतं अथवा कुठेतरी कुणाला तरी बेवारस सापडलेलं असतं. दोन्ही प्रकारात  ते बाळ कुठल्या बालसंगोपन केंद्रात दाखल केले जाईल याचा अंतिम निर्णय बालकल्याण समिती घेते.(महिला बालविकास विभागाकडून स्थापन केलेली ही अल्पवयीन मुलांसाठीची (जुवेनाईल) समिती आहे.)

एकदा संस्थेत बाळ आलं की दत्तक प्रक्रिया सुरू करून ते बाळ एका कुटुंबाचा भाग होईपर्यंत त्याची संपूर्ण काळजी घेणं यासाठी ही संस्था बांधील असते. जे पालक बाळाला संस्थेमध्ये आणून देतात त्यांच्याकडून एका प्रतिज्ञापत्रावर सही घेतली जाते आणि त्यानुसार ६० दिवस या पालकांना बाळ परत घेऊन जाण्याची संधी दिलेली असते. जर बाळ हे सापडलेलं असेल तर वर्तमानपत्रातून जाहीर नोटीस दिली जाते, ज्यात ६० दिवसांच्या आत त्या बाळाचे पालक येऊन बाळ घेऊन जाऊ  शकतात.

बाळ संस्थेत आल्यानंतर त्याची पूर्ण वैद्यकीय तपासणी करून जरुरीप्रमाणे उपचार सुरू केले जातात. वयाच्या टप्प्यानुसार लसीकरण होतं. वरील ६० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आणि या काळात त्याचे पालक घेऊन जाण्यासाठी आले नाहीत तर बालकल्याण समिती या बाळाची दत्तक प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी देते.

दत्तक एजन्सी व दत्तक प्रक्रिया कशी होते?

पूर्वी म्हणजे दोन वर्षांपूर्वीपर्यंत दत्तक ही प्रक्रिया दत्तक एजन्सी वा संस्थेमार्फत होत असे. या दत्तक एजन्सी बऱ्याचशा बालसंगोपन केंद्राचा एक भाग म्हणून कार्यरत होत्या. याचा अर्थ प्रत्येक बालसंगोपन केंद्र हे दत्तक एजन्सी म्हणून काम करत होती असा नव्हे. या सगळ्या दत्तक एजन्सीचं वेळोवेळी निरीक्षण करण्याचं काम हे ‘कारा’ (CARA) व जिल्हा महिला बाल विकास विभागाकडून होत असतं. या सगळ्या संस्थांना देशांतर्गत तसेच एनआरआय, ओसीआय आणि पूर्ण परकीय कुटुंबात दत्तक देण्याची मार्गदर्शिका दिलेली असायची. बालकल्याण समितीकडून दत्तक परवानगी आल्यानंतर दत्तक एजन्सी ते आपल्या इथे ज्या इच्छुक पालकांनी अर्ज केलेले असतात, त्यातील पालकांना त्याच्या क्रमानुसार बोलावून घेऊन दत्तक प्रक्रिया सुरू करायची असते. कायदेशीर लागणारे कागदपत्र पालकांकडून अर्जासोबत आधीच घेतलेले असतात.

जिल्हा न्यायालयात कायदेशीर दत्तक प्रक्रिया सुरू करून मूल हे ‘जोपासना काळाच्या’च अंतर्गत या पालकांच्या घरी पाठवले जाते. दोन-तीन महिन्याच्या अवधीत न्यायालयात ‘हिअरिंग’ होतं आणि बाळाची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी आणि हक्क हे पालकांना दिले जातात. अशा रीतीने एक बाळ त्या कुटुंबाचं होतं. खूप सारी कायदेशीर प्रक्रिया जरी झालेली असली तरी या काळात बाळ आणि पालक हे एक कुटुंब झालेलं असतं, त्यामुळे ही प्रक्रिया पालकांना फारशी त्रासदायक वाटत नसते.

सध्याची दत्तक प्रक्रिया :

गेल्या २ वर्षांपासून सरकारने पूर्ण दत्तक प्रक्रिया ही ऑनलाइन केलेली आहे. ही प्रक्रिया ‘कारा’ या सरकारी विभागाकडून चालवली जाते. सध्याची प्रक्रिया ही मुलं संस्थेत दाखल होऊन दत्तक प्रक्रियेत येण्यापर्यंतचे टप्पे वर सांगितले त्याप्रमाणेच आहेत. पूर्वी पालक जे संस्थेकडे जाऊन आपला अर्ज द्यायचे ते आता पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रियेतून होतं. यामुळे काही गोष्टी सोप्या झाल्यात तर काही विपरीत परिणाम पण झालेत. थोडंसं या नवीन प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ या..

पूर्वीच्या ज्या दत्तक संस्था होत्या, त्या सगळ्या आता एसएए म्हणजे (स्पेशल अ‍ॅडॉप्शन एजन्सी) आहेत. एकदा मूल एसएएमध्ये दाखल झालं की ते ‘कारा’च्या ऑनलाइन पोर्टलवर त्या बाळाचे सगळे तपशील भरते. ज्या वेळेस बालकल्याण समितीतर्फे दत्तक प्रक्रियेसाठी परवानगी देते, त्या वेळेस हे बाळ त्या पोर्टलवर दत्तक प्रक्रियेकरिता उपलब्ध आहे, असं एसएएकडून सांगितलं जातं. अधिक माहितीसाठी ही लिंक बघावी.-http://www.cara.nic.in/InnerContent.aspx ?Id=153#SAA

पालक जे दत्तक प्रक्रियेतून बाळ घेऊ  इच्छितात, त्यांनी या ऑनलाइन पोर्टलवर आधी अर्ज करायचा असतो. अर्ज करतेवेळेस त्यांना बाळ कशा प्रकाराचे अपेक्षित आहे, जसं त्या बाळाचा वयोगट, लिंग व वैद्यकीयदृष्टय़ा शारीरिक आरोग्य तसेच कुठल्या एक किंवा तीन राज्यातून किंवा भारतातून चालेल हे सांगावे लागते. अर्ज केल्यानंतर त्या भागातील एसएए या पालकांचा ‘होम स्टडी’ करून ‘कारा’च्या पोर्टलवर अपलोड करते. पालकांना या ऑनलाइन पोर्टलवर आपला प्रतीक्षा क्रमांक मिळतो. अधिक माहितीसाठी ही लिंक जरूर बघा: http://carings.nic.in/Parents/parentregshow.aspx

ज्या वेळेस दत्तक प्रक्रिया सुरू होते, त्या वेळेस बऱ्याच पालकांना तीन बाळाचे सगळे तपशील आणि वैद्यकीय माहिती दिली जाते. ४८ तासांत पालकांना त्यापैकी एका बाळासाठी आपली पसंती देऊन ते ‘कारा’ पोर्टलवर कळवणे बंधनकारक आहे. पालक संस्थेमध्ये आल्यानंतर   District Child Protection Unit ( डिसीपीयु) ऑफिसर, संस्थेचे डॉक्टर आणि कार्यकर्ता पालकांची सगळी कागदपत्रे व त्यातील माहिती याची पडताळणी करून घेतात आणि त्यानंतर बाळाची भेट पालकांसोबत होते. यानंतरची न्यायालयीन प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे. वरील नवीन प्रक्रियेमध्ये काही फायदे असे झालेत ते असे : १. दत्तक प्रक्रियेचा आधी प्रतीक्षा कालावधी जो एक ते दीड वर्ष होता तो बराच कमी होऊन सहा महिने ते एक वर्ष असा झालाय. २. सगळे नियम हे ‘कारा’ पोर्टलवर असल्याने पालकांना सविस्तर माहिती मिळते. ३. प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आली.

हे जरी फायदे दिसत असलेत तरी, ज्या काही त्रुटी जाणवतात त्या अशा : . प्रक्रिया ऑनलाइन असल्याकारणाने जे पालक तंत्रज्ञान वापरत नाहीत त्यांना ही खूप मोठी अडचण वाटते आहे. एसएएने हे काम केल्यास ही अडचण दूर होऊ शकेल.२ ‘कारा’ मार्गदर्शिकेप्रमाणे प्रत्येक पालकांना जास्तीत जास्त सहा बाळांची माहिती देण्यात येईल असं म्हटलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात काही पालकांना तीन तर काही पालकांना फक्त एका बाळाची कागदपत्रे पाठवली जात आहेत. काही वेळेस पालकांना जर काही अडचणी असतील तर त्याचं निरसन दिलेल्या वेळेत झालं नाही की अडचण होते. मागील महिन्यात एक पालक म्हणाले, त्यांना दोन वर्षांच्या आतील मुलगा, जो वैद्यकीयदृष्टय़ा योग्य आहे, असा हवा होता आणि त्यांनी तसं अर्जात दिलं होतं. या पालकांना एकाच बाळाची कागदपत्रे पाठवण्यात आली आणि बाळाचे वय व त्याच्या प्रगतीचे टप्पे यात बरीच तफावत आढळली. पालकांनी बाळाचे ‘प्रगती मोजमाप’ जे की प्रत्येक संस्थेने करून घ्यायला हरकत नाही, ते मागितले. परंतु ‘कारा’आणि बाळाची संस्था दोन्ही दिवस फक्त एवढंच सांगत होती, बाळ अगदी नॉर्मल आहे आणि तुम्ही पोर्टलवर ‘हो’ म्हणून क्लिक करा. या पालकांना त्यांचा होम स्टडी केलेल्या एसएएकडूनही काहीच आधार मिळाला नाही. दोन दिवसानंतर हे पालक परत प्रतीक्षेच्या यादीत खालच्या क्रमांकावर गेले. या सगळ्या काळात होणारा मानसिक त्रास याचा कुठे तरी विचार व्हावा.

आणखी दोन पालक असे भेटले की बाळाचे प्रगतीचे टप्पे नीट माहीत नसूनही त्यांनी ‘हो’ म्हटलं, आणि जेव्हा प्रत्यक्षात बाळाला संस्थेमध्ये भेटायला गेले तेव्हा त्यांना वैद्यकीय समस्या आढळल्या.  आपण कदाचित असा विचार करू की, या पालकांच्या पोटी असं बाळ जन्माला आलं असतं तर? परंतु ज्या वेळेस दत्तक प्रक्रियेत वैद्यकीयदृष्टय़ा योग्य, असं पालकांनी दिलेलं असतं, अशा वेळेस वैद्यकीयदृष्टय़ा काही समस्या असणाऱ्या बाळांची कागदपत्रे पालकांना देणे ही त्रुटी आहे. पालक मानसिकरीत्या खचलेला असतो आणि त्यानंतर असं काही झालं कीते अधिकच हताश होतात.

३. बाळाची संस्था ही जर त्या शहरात किंवा जवळपास नसेल तर दत्तक प्रक्रियेनंतर पालकांचा संस्थेसोबत फारसा संबंध राहत नाही. संस्थेसोबतच नातं असणं हे पालकांना आणि पुढे जाऊन मुलांना मदतीचा आधार असतं.

या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये थोडा माणुसकीचा ओलावा वाढला तर हीच प्रक्रिया पालकांना आणि बाळांना एकत्र आणून कुटुंब पूर्ण करण्याचं मोठं काम या समाजात करतेय असं नक्कीच वाटेल.

१६ जानेवारीपासून  ‘कारा’चे  नवीन रेग्युलेशन अमलात आले आहेत. अधिक माहितीसाठी ही लिंक पाहू शकता.

Click to access NTESCL_636201813101455214_NTESCL_636194033071198891_english%20regulation.pdf

टीप : वरील माहिती ही ‘कारा’ वेबसाईट तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ तसेच काही पालक यांच्याकडून घेतलेली आहे. अपूर्ण अथवा चूक आढळल्यास ‘कारा’वरील माहिती  ग्राह्य़ धरावी.

संगीता बनगीनवार – sangeeta@sroat.org