आपल्या देशाप्रमाणेच इंडोनेशियाचा विस्तार मोठा आहे आणि इथे विविधताही प्रचंड आहे. त्यांनाही आपल्यासारखाच प्राचीन इतिहास आहे. पण पर्यटनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मुद्दा आला की ही साम्यं संपून प्रचंड फरक जाणवायला लागतो.

रात्री दहाची वेळ, स्थळ योग्यकर्तामधील मुख्य बाजारपेठ. रस्त्याच्या कडेला दहा-पंधरा तरुणांचा वाद्यवृंद चांगलाच रंगलेला असतो. कुतूहलाने डोकावल्यावर लक्षात येतं हे काही इंग्लिश खूळ नाही. मग आणखीनच कुतूहल जागृत होते. तर तो असतो तेथील स्थानिक बॅण्ड. अस्सल इंडोनेशियन बॅण्ड. येणारा-जाणारा आवडीप्रमाणे एखादं गाणं ऐकतो, आवडलंच तर दोन घटका विसावतो. आणि पुढे जातो. लोक अगदी आवडीने गाण्याचा आनंद घेत असतात. जवळपास तास दोन तास हा वाद्यवृंद सुरू असतो. तोदेखील वाहत्या रस्त्यावर. बरं तेव्हा कोणताही उत्सव सुरू नसतो की काही अन्य फेस्टिवल. योगकर्तामध्ये फिरताना या अशा काही गोष्टी तुम्हाला एकदम वेगळ्या विश्वात घेऊन जातात.

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
couple destination wedding in Spiti Valley
हाडे गोठवणाऱ्या थंडीत जोडप्याने केलं लग्न! स्पिती व्हॅलीतील Destination Wedding व्हिडीओ बघाच
How did Indian young man go to fight in Russia-Ukraine war Will they be rescued
विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी भारतीय तरुण कसे गेले? त्यांची सुटका होणार का?
loksatta analysis adani group wins bid to redevelop bandra reclamation
विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही?

तुगू चौकापासून सुरू झालेल्या मालियोबोरो या रस्त्यावर दोन्ही बाजूंच्या फुटपाथवर असाच तरुणाईचा वावर असतो. रस्त्याकडेला चक्क फुटपाथवरच चटई टाकलेली असते आणि मस्त गप्पा मारत लोक कॉफी, ज्यूस, खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत असतात. रेल्वे स्टेशनच्या जवळच असणाऱ्या एका भल्या मोठय़ा गल्लीच्या दोन्ही फुटपाथवर तरुणांचाच वावर असतो. कोणी गिटार वाजवत असते, कोणी आपल्या मैत्रिणीशी छान गप्पांमध्ये रमलेले असते, तर कोणी उगाच निवांत बसलेले असते. थोडं पुढे गेल्यावर तर आणखीनच भन्नाट प्रकार दिसतो. तो म्हणजे तुगू चौकात एखाद्या प्रसंगाचे प्रतीकात्मक सादरीकरण सुरू असते. सारा चौक जणू काही चैतन्याचा स्पर्श केल्याप्रमाणे फुललेला असतो. योगकर्तामध्ये दिसणारा हा अनोखा उत्साह पाहिल्यावर नकळतच मुस्लीम देशातील या मोकळेपणाचं कौतुक पुन्हा एकदा करावंसं वाटतं.

जकार्ता हे राजधानीचं शहर, तर बांडुग हे इंडोनेशियाचं हिल स्टेशन आणि जिवंत ज्वालामुखीचं आकर्षण. तर योग्यकर्ता हे मात्र आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आवडणारं आणि पर्यटकांमुळे विकसित झालेलं शहर म्हणावं लागेल. इंडोनेशियात विशेष दर्जा असणारा हा प्रांत खरेच विशेष असाच आहे.

योग्यकर्ताच्या जवळ असणाऱ्या बोरुबुद्दूर आणि प्रांबननमुळे देशोदेशीच्या पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. अनेक पर्यटन पॅकेजमध्ये बोरोबुद्दूर आणि प्रांबनन दोन्ही ठिकाणं एकाच दिवशी उरकण्यावर भर असतो. जागतिक दर्जाची ही वारसास्थळे पाहायची असतील तर प्रत्येकी किमान एक-एक दिवस तरी द्यावा लागेल. अचाट आणि अफाट म्हणावं असं हे काम आहे. ज्वालामुखीने या परिसरावर इतके प्रहार केले आहेत की अनेक वास्तू होत्याच्या नव्हत्या झाल्या होत्या. पण जणू काही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे हे सारं पुन्हा उभे राहिले आहे. सातवे शतक ते साधारण ११-१२ व्या शतकापर्यंत येथे झालेल्या सांस्कृतिक, धार्मिक घुसळणीचा ही प्रतीकं आज दिमाखात उभी आहेत. धार्मिक अस्मितांच्या पलीकडे जाऊन हा वारसा येथे जोपासला गेला आहे.

विषुववृत्तीय प्रदेशामुळे येथे सूर्य लवकर उगवतो. अगदी पहाटेच. त्यामुळे अगदी सकाळी सहा वाजताच आपल्याला बोरोबुद्दूरमध्ये जाता येते. बौद्ध धर्माच्या जगातील अत्यंत महत्त्वाच्या अशा ठिकाणामध्ये बोरोबुद्दूरचा समावेश होतो. एखाद्या पिरॅमिडप्रमाणे आकार असणारी ही दहा मजली वास्तू निर्वाणाचा मार्ग दाखवणारी आहे. नवव्या शतकातील राजा सैलेंद्रच्या काळातील हे बांधकाम मधल्या काळात ज्वालामुखीने जवळपास बहुतांश उद्ध्वस्त झाले होते. बाराव्या शतकानंतर पूर्णत: निसर्गावरच हवाला असल्यासारखी अवस्था होती. अठराव्या शतकात जावानीज लोकांनी येथे भेटी दिल्याचे काही उल्लेख सापडतात, पण ते पुन्हा खऱ्या अर्थाने प्रकाशात आणले ते १८१५ मध्ये सर स्टॅमफोर्ड राफेल्स या ब्रिटिशाने. त्यांनी संवर्धनाचे काही प्रयत्नदेखील केले. नंतर १८८५ मध्ये इजरमान यांच्या काळात येथे बरेच उत्खनन झाले. त्यातूनच जमिनीखाली गाडले गेलेले अनेक अवशेष हाती लागले. त्यातच सापडलेल्या संस्कृत शिलालेखांवरून याचा काळ ठरवता आला.

१९०७ मध्ये व्हॅन इर्प या डच व्यक्तीने चार वर्षे पुनर्उभारणीचे काम सुरू केले. त्यामुळे ही वास्तू काही प्रमाणात आकारास आली, टिकून राहिली. मात्र त्या कामात काही त्रुटी  होत्या. काही शिल्पांच्या जोडकामाचे संदर्भ नीट लागत नव्हते. १९५६ पासून युनेस्कोचं लक्ष या वास्तूकडे गेलं. १९६३ ते १९६८ या काळात प्रचंड मोठं काम हाती घेतलं गेलं. जगभरातून तज्ज्ञांनी येथे डेरा टाकला आणि आज दिसणारं बोरोबुद्दूर साकार झालं.

साधारण आयताकृती रचना असणारी ही प्रचंड वास्तू समरसून, प्रत्येक टप्पा आत्मसात करून पाहावी अशी आहे. धावतपळत भोज्ज्याला हात लावायचा असेल तर जाण्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येक टप्प्यावर असंख्य शिल्पाकृती कोरल्या आहेत. बुद्धाचा सिद्धार्थ ते बुद्ध असा प्रवास, जातक कथा आणि निर्वाणाचा मार्ग अशी दहा टप्प्यांची रचना येथे आहे.  हे सारं मार्गदर्शकाकडून व्यवस्थित समजावून घेता येते. जवळपास ऐंशी प्रशिक्षित मार्गदर्शक येथे आहेत.

हा सारा परिसर दोन भागांत विभागला आहे. मुख्य वास्तू आणि परिसरातील पार्क. पार्क परिसरात वस्तुसंग्रहालय, जहाज संग्रहालय, माहिती केंद्र, अभ्यास केंद्र अशा अनेक सोयीसुविधा आहेत. पार्कमधून बोरोबुद्दूरला हत्तीवरून व छोटय़ा ट्रेनमधून सफारीची सुविधा आहे.

नवव्या शतकातील निर्माणकर्त्यांच्या कल्पकतेला, कौशल्याला तर दाद द्यावीच लागेल, पण आजदेखील हे सारं इतक्या आत्मीयतेने जोपासणाऱ्यांनादेखील सलाम करावा लागेल असं हे पाहिल्यावर नक्कीच वाटतं. मूळ वास्तू आणि पार्क मिळून तब्बल ७०० कर्मचारी येथे कार्यरत आहेत. जागृत ज्वालामुखीचं संकट आजही आहेच, पण येथील व्यवस्था हवामान खात्याशी सततच्या संपर्कात असते. संकटाची चाहूल मिळताच धूलिकणांनी या वास्तूवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून संपूर्ण वास्तू झाकता येईल अशी प्लास्टिकची आच्छादनं जपान सरकारने पुरवली आहेत. आत्पकालीन प्रसंगी स्वयंसेवकांची फौज आहे. अर्थात, महिन्यातून एकदा संपूर्ण वास्तूची स्वच्छता केली जात असतेच.

बोरोबुद्दूरची वास्तू ही बऱ्याच अंशी पुनर्बाधणी केलेली आहे. तिचा विस्तार अवाढव्य असला तरी येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर बंधन आहे. एकावेळी १५ हजारांहून अधिक पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. महत्त्वाचे म्हणजे येथे आणि प्रांबनन दोन्ही ठिकाणी कमालीची स्वच्छता आहे, पण ‘कचरा टाकल्यास दंड’ अशा फलक कोठेच दिसत नाही.

बोरोबुद्दूर एक पर्यटनस्थळ तर आहेच, पण ते बुद्ध धर्माच्या जगभरातील अभ्यासकांचे महत्त्वाचे ठिकाण आहे. या वास्तूवरील बुद्धाच्या चार मुद्रा दर्शविणाऱ्या ५०४ मूर्ती असून २ हजार ६७२ इतक्या शिल्प पट्टिका आहेत. आजही अनेक पट्टिकांचा अर्थ पूर्णत: लागलेला नाही. ललित विस्तारची शिल्पं कोरलेल्या पट्टीकांचा अर्थ उलगडला आहे. बाकी काम अजून सुरूच आहे. पार्क परिसरात असणाऱ्या मनोहरा सेंटर ऑफ बोरोबुद्दूर स्टडीमध्ये हा अभ्यास सुरु आहे. अभ्यासकांच्या राहण्याखाण्याची आणि अभ्यासासाठी सर्व प्रकारच्या सुविधा येथे उपलब्ध आहेत.

येथून साधारण चार- पाच किलोमीटरवरचं पर्यटन डोळ्यांसमोर ठेवून एक मस्त संकल्पना साकारली आहे. तेथे पारंपरिक इंडोनेशियन खेडेगाव जपण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीची घरं, वाद्यं, शेती असं सारं काही येथे आहे. पर्यटकांची पुरेशी संख्या असेल तर वाद्यवृंद वादनाचा आनंददेखील घेता येतो. कपसा या झाडाच्या खोडापासून तयार केला जाणारा पापडसदृश पदार्थ खाता येतो आणि या कपसाची शेतीदेखील पाहता येते.

असो, तर बौद्ध धर्माचे हे वास्तुवैभव पाहून आपला मोर्चा वळवायचा तो प्रांबनन प्लेनकडे.  सातव्या-नवव्या शतकातील हिंदू आणि बौद्ध धर्माच्या येथील अस्तित्वांच्या खुणा दर्शवणाऱ्या जवळपास ३० साइट्स येथे आहेत. ‘प्रांबनन प्लेन’ नावानेच हा सारा परिसर ओळखला जातो. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बहुतांश वास्तू जमीनदोस्त झाल्या होत्या. पण युनेस्कोने लक्ष घालून हा परिसरदेखील १९९१ मध्ये जागतिक वारसा यादीत समाविष्ट करून घेतला. प्रांबनन प्लेनमध्ये महत्त्वाचं आकर्षण आहे ते प्रांबनन मंदिर संकुलाचं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची गगनचुंबी या सदरात मोडणारी ही मंदिरं म्हणजे पुरातत्त्व संवर्धनाचे उत्तम नमुने म्हणावे लागतील.

येथील हिंदूू मंदिरं नवव्या शतकात संजय घराण्यातील राजा रकाई पिकातन याच्या कारकीर्दीत बांधली गेली आहेत. याच काळात सैलेंद्र राजाच्या बोरोबुद्दूरला उत्तर म्हणून याचं बांधकाम सुरू झालं असल्याचंदेखील सांगितलं जातं. बाराव्या- तेराव्या शतकात ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर मात्र येथील हिंदू राजे बाली बेटाकडे स्थलांतरित झाल्याच्या नोंदी आहेत.

प्रांबनन मंदिर समूह हा तब्बल २४७ मंदिरांनी तयार झालेला आहे. त्यापैकी आठ मंदिरांची पुनर्बाधणी झाली असून इतर अवशेष तसेच व्यवस्थित जपून ठेवले आहेत. आपल्याकडे हिंदू देवदेवतांची असंख्य मंदिरं आहेत. पण ब्रह्मा आणि विष्णूची मंदिरं तुलनेने विरळाच म्हणावी लागतील. त्या तिघांची तीन मंदिरं आणि त्याच्या वाहनांची मंदिरं पुन्हा उभारण्यात आली आहेत. संपूर्णपणे जमीनदोस्त झालेली ही मंदिरं पूर्णपणे नव्याने उभी करण्यात आली आहेत. शंकराचे मंदिर हे मुख्य मंदिर असून तब्बल ४७ मीटर उंच आहे. ही रचना पाहिल्यावर दक्षिणेतील गोपुरांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. शिवाचे मंदिर मोठे असून चार द्वारं आहेत, त्या दिशांना दुर्गा, गणेश आणि अगस्त्य यांची मंदिरं आहेत. तर प्रदक्षिणा मार्गावर संपूर्ण रामायण शिल्पांकित करण्यात आलं आहे. जोडीला यच्चयावत हिंदू देवतांची शिल्पांकने येथे पाहायला मिळतात. केवळ ही तीन मंदिरच पाहायची असतील तरी तीन चार तास तरी हवेतच. आणि संपूर्ण प्रांबनन प्लेन पाहायचे असेल तर एक दिवस तरी रिकामा ठेवावा लागेल.

आपल्याकडे एखाद्या वास्तूकडे पाहताना त्याच्या धार्मिक बाजूला खूप महत्त्व दिले जाते. तसे ते द्यायलाही हरकत नाही. पण त्याही पलीकडे जात एक वास्तुकला, शिल्पकला म्हणून अशा ठिकाणी जायला काय हरकत आहे. त्यातून देशाची जडणघडण कशी झाली याचा अंदाज येतो, आणि आजच्या काळाकडे पाहण्याची नवी दृष्टी लाभते.

असो..  तर मागील लेखात वर्णन केल्याप्रमाणे इंडोनेशियात रामायण खूप वेगळ्या प्रकारे सादर केले जाते. प्रांबनन मंदिर संकुलापासून जवळच एका खुल्या मैदानात रामायण बॅले सादर केला जातो. रामायणाचे नृत्य सादरीकरण ही खास इंडोनेशियन खासियत म्हणावी लागेल. महाकाव्य कलेच्याच माध्यमातून जपण्याची ही त्यांची अनोखी पद्धत वाखणण्याजोगी आहे.

योगकर्तामध्ये पुराविस्ता अ‍ॅम्पी थिएटरमध्ये गेली चाळीस र्वष रोज या बॅलेचे सादरीकरण होत असते. जपानी शास्त्रीय नृत्यावर आधारित असा हा अनोखा दीड तासाचा कार्यक्रम रोज रात्री सादर केला जातो. तुम्ही धार्मिक असाल तर धार्मिकतेचा एक वेगळा अनुभव तर आहेच, पण त्याहीपलीकडे जाऊन संगीत नृत्याची अनोखी मेजवानी म्हणूनही याकडे पाहावे लागेल.

योगकर्तामध्ये खरेदीला प्रचंड वाव आहे. इंडोनेशियातले प्रसिद्ध बाटिक प्रिंट असणारे कपडे खरेदीसाठी नक्कीच या बाजारपेठेला भेट द्यावी लागेल. मुख्य म्हणजे इतर ठिकाणांपेक्षा बऱ्यापैकी स्वस्त आहे. अनेक हेरिटेज हॉटेल्स तर आहेतच, पण त्याचबरोबर तारांकित हॉटेल्सदेखील बरीच आहेत. स्ट्रीट फूड जागोजागी पाहायला मिळतं.

बोरोबुद्दूर आणि प्रांबनन हा सारा परिसर मध्य जावामध्ये मोडणारा आहे. त्यापलीकडे पूर्व जावा आणि त्याला लागून बाली बेट आहे.

बालीची निसर्गरम्य आणि नैसर्गिक अशी किनारपट्टी जगभरातल्या पर्यटकांना भुरळ घालणारी आहे. किंबहुना बाली म्हणजे इंडोनेशिया असाच समज एकंदरीत दिसून येतो. बाली बेट हा इंडोनेशियातील हिंदू बहुल भाग. मध्य जावा भागातील हिंदू राजे ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बाराव्या शतकात येथे स्थलांतरित झाल्याचं तर सांगितलं जातंच, पण त्याचबरोबर जावा प्रांतात सत्ताधाऱ्यांपैकी एक राजपुत्र आपलं स्वत:चं राज्य असावं म्हणून बाली बेटांवर आल्याची कथादेखील सांगितली जाते. तोच राजा नंतर उबुदला स्थिरावल्याचं नमूद केलं जातं.

बाली बेटावरील सर्वाधिक मंदिरं उबुदलाच आहेत. त्यामागे मार्कण्डय़ा नावाच्या ऋषीची कथा ऐकायला मिळते. मार्कण्डय़ासोबत काही अनुनायीदेखील होते. उबुद परिसरातील वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव झाला. तेव्हा मार्कण्डय़ा यांनी तपश्चर्या केली व देवतांची मंदिरं स्थापण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. मदर टेंपल उत्तरेकडे समुद्रकिनारीच कडय़ावर स्थापलं गेलं. तर उबदमध्ये सरस्वती मंदिर वगैरे. मार्कण्डय़ा ज्या ठिकाणी तपश्चर्येला बसले तेथेच एक मंदिरदेखील आहे. हे उबुदमधलं सर्वात जुनं मंदिर. या जागेला चंपावूह म्हटलं जातं. म्हणजेच संगमाची जागा.

पण बालीतलं मदर टेंपल सोडलं तर बाकी सर्व मंदिरं कायम बंद असतात. बाली दिनदर्शिकेनुसार २१० दिवसांनी सामूहिक उत्सव पूजेसाठी ही मंदिरं उघडली जातात. अर्थात आजही अनेक मंदिरांत काही प्रमाणात कर्मठपणा दिसून येते. गुडघ्याच्या वर जाणारे कपडे असतील, तर उर्वरित शरीर झाकण्यासाठी वस्त्र दिलं जातं. सरस्वती मंदिराच्या बाहेर पोशाखाबद्दल लिहिलं आहेच, शिवाय मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी मंदिर प्रवेश करू नये असंदेखील लिहिलं आहे. सरस्वतीच्याच दारात महिलांना अटकाव करणारं बाली धार्मिक बाबतीत मागासच वाटू लागते.

असो, पण बालीतलं इतर वातावरण याच्या नेमकं उलटं आहे. टिपिकल पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेल्या बालीमध्ये जगभरातील पर्यटक अगदी मुक्तपणे भटकत असतात. वेश्या व्यवसायदेखील तेजीत आहे, आणि दारूदेखील मुक्तपणे वाहत असते. काही प्रमाणात आपल्या गोव्याचाच नमुना म्हणायला हरकत नाही. पण बाली हे जिवंत आहे, ते या पर्यटकांच्या वावरामुळेच.

अर्थात इंडोनेशियाच्या प्रत्येक प्रांताचं स्वत:चं असं खास वैशिष्टय़ आहेच. १०० किमी उत्तर दक्षिण आणि ५ हजार ११० किमी पूर्व पश्चिम असा अनेक खंडाच्या देशात काही चांगलं आणि काही वाईट हे असणारच. पण वारसा जपण्याचा चांगला गुण घ्यायला काय हरकत आहे.

तरुणाईच्या उत्साहाचे प्रतीक – आर्ट सेंटर

देशाची संस्कृती जपण्याची आच असेल तर काय होऊ शकते याचा सुंदर नमुना बालीत ‘आर्ट सेंटर’मुळे पाहता येतो. तब्बल दहा एकरावर वसलेलं हे आर्ट सेंटर बालीतल्या तरुणाईच्या उत्साहाचं प्रतीक आहे. चित्रकला, नृत्य, संगीत अशा कलांची अगदी निगुतीने येथे जपणूक केलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून तर दर रविवारी सकाळी चार तास हौशी कलाकारांसाठी नृत्य, चित्रकला आणि संगीत मोफत शिकवले जाते. पारंपरिक बाली नृत्य करणारे अनेक छोटेमोठे गट येथे दिसतात. स्पर्धा सुरू असतात. विशेष म्हणजे अनेक तरुण मुलंमुली आपल्या संगीत नाटकांची तालीम करत असतात. प्राचीन वास्तुकला जोपासलेल्या इमारती, वस्तुसंग्रहालय आणि नृत्य संगीताचा एक सुखावून जाणारा कलात्मक अनुभव येथे मिळतो. बालीला गेलात तर बीचेसच्या जोडीने या केंद्रासाठी किमान एक तास तरी काढा. त्या देशाच्या संस्कृतीशी ओळख तर होतेच, पण आपणदेखील उत्साहित होतो.

आपली आणि त्यांची भाषा

इंडोनेशियात स्थानिक आणि बोली भाषा मिळून ७०० हून अधिक भाषा आहेत. पण मलय भाषेशी जवळीक असणारी भाषा ही त्यांची राष्ट्रभाषा आहे. इतिहासकाळातील हिंदू संस्कृतीचा प्रभाव असल्यामुळे संस्कृतचा भरपूर वापर दिसून येतो, तर लिपी मात्र रोमन असून त्यातील इंग्लिश शब्दांवर डचांचा प्रभाव आहे. धर्म मुस्लीम असला तरी चित्रा, विद्या, अरिहंतंम अशी येथील मुलामुलींची नावं आहेत. हेल्मेटला टोपी संबोधून त्यांची नाळ काही प्रमाणात आपल्याशीदेखील जुळली आहे की काय असे वाटू लागते.

अर्थात बहुतांश लोक स्थानिक भाषाच बोलतात. पर्यटन क्षेत्रात मात्र इंग्रजी सर्रास आढळते. स्थानिकांशी बोलताना मात्र कधी कधी अडचणीचे ठरू शकते.

भाषेतील बदलामुळे काही गोंधळदेखील होऊ शकतो. उदा: ‘आभारी आहे’ याला इंडोनेशियन भाषेत ‘तेरी मा कासी’ म्हणतात. दुधाला चक्क सू-सू म्हटले जाते. अशा वाक्यांनी बावरून जाऊ नका. येथे इंग्लिश बोलणाऱ्या मार्गदर्शकांची कमतरता नाही, त्यामुळे आरामात संवाद साधू शकता.

अशी करावी भटकंती

इंडोनेशिया हा पाच मुख्य भागांत विस्तारलेला आहे. आपल्या देशाप्रमाणेच येथे प्रचंड विविधता आहे. एकाच ट्रिपमध्ये सारं काही पाहायला मिळणं अवघड आहे. त्यासाठी पंधरा-वीस दिवस लागतील. जकार्ता, बांडुग, योग्यकर्ता, बालीसाठीच आठ-दहा दिवस लागतील. त्यापलीकडे पूर्वेला मनमोहक अशी फ्लोरेस बेटं अजून बाकीच आहेत. तेथे ज्वालामुखीची अद्भुत तळी आहेत. अनेक संरक्षित अभयारण्य आहेत. पुलावेसी बेटांवर आजदेखील काही आदिवासी जमातींचं वास्तव्य आहे. हे सगळं वैविध्य अनुभवयाला तेवढा वेळ लागेल. बाली हे करायलाच हवे अशा यादीत असल्यामुळे, बालीला जाऊन मग आपल्या आवडीनुसार सात-आठ दिवसाचं पॅकेज घेता येईल. आपल्या देशातून इंडोनेशियाला जाण्याचाच खर्च तुलनेनं अधिक आहे, प्रत्यक्षात तेथे बऱ्यापैकी स्वस्ताई आहे. आपल्या देशात राहायला, भटकायला जितका किमान खर्च येईल त्यापेक्षा थोडा कमीच खर्च लागेल. बालीमध्ये तर आडबाजूला असणाऱ्या नुसा दुवा या प्रतिष्ठित आणि काहीशा निवांत बीचवरील हॉटेलमध्ये तर सध्या स्पर्धाच सुरू आहे. मेलिया बालीसारख्या तारांकित हॉटेल्समध्ये तर एका दिवसाचा संपूर्ण खर्च आठ-दहा हजारांमध्ये होऊ शकणारी योजनाच सुरू आहे. इंडोनेशियन सरकार सध्या पर्यटनाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत आहे. त्याअंतर्गत अनेक नवीन सुविधा तर होत आहेतच, पण जे आहे ते अधिक चांगल्या प्रकारे कसे दाखवता येईल यावर भर आहे. अधिक माहितीसाठी

इंडोनेशिया पर्यटन खाते http://www.indonesia.travel / visitindonesia.co.in, बाली आर्ट सेंटर infortcentre.blogspot/  infortcentre@yahoo.com, बोरोबुद्दूर आणि प्रांबनन http://www.borobudurpark.co.id / http://www.manoharaborobudur.com रामायण बॅले www.purawistajogjakarta.com
सुहास जोशी
response.lokprabha@expressindia.com, twitter – @joshisuhas2