ट्रान्ससैबेरियन रेल्वेप्रवासातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे उलानउडे. रशियातलं हे शहर पाहून पुन्हा रेल्वेने मंगोलियाची राजधानी असलेलं उलानबटर गाठलं. उघडय़ा आकाशाखाली तंबूत राहण्याचा नितांतसुंदर अनुभव घेतला.

‘उलान उडे’ हे ‘बुर्यातिया’ प्रजासत्ताकाचे मोठे शहर!  २६ जुलै २०१५ ला तिथे पोहचलो. हे शहर सैबेरियाच्या दक्षिण भागात बैकाल सरोवराच्या पासून १०० कि.मी.वर आहे. याची लोकसंख्या चार लाखांवर आहे. सेलंगा आणि उदा या दोन नद्यांच्या क्षेत्रांत हे शहर आहे. मंगोलियात उगम पावणाऱ्या सेलंगातील ७० टक्के पाणी बैकाल सरोवराला जाते. उदा तिच्या मानाने लहान नदी आहे.

इथे बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. येथील बुरियत जमात बौद्ध धर्माचे आचरण, पालन करते. येथे ‘डाटस्न’ नावाचे रशियातील सर्वात मोठे बौद्ध मंदिर आहे. १७ व्या शतकात स्थापन झालेले हे शहर बौद्ध युरोपियन संस्कृतीचे केंद्र आहे. स्थानिक संग्रहालय बघून, दुपारचे जेवण करून, बैकाल सरोवराच्या पूर्व किनाऱ्याकडे निघालो. रस्ता सेलंगा नदीच्या काठाने, वळणावळणाने जात होता. वाटेत अनेक पूल लागले. मध्येच एका बाजूला ट्रान्स सैबेरियन रेल्वेचा एक मार्ग दिसत होता. आमचा मुक्काम सरोवराजवळ हॉटेल ‘ग्रेमॅचिन्स्क’मध्ये होता. सबंध रस्ता अगदी निसर्गरम्य होता. आमच्या गाइडच्या मते पुढे एका टेकडीरून छान फोटो काढता आले असते, पण तिथे पोहोचेपर्यंत सूर्यास्त झाला होता आणि गुलाबी संधी प्रकाश पसरला होता. तिच्या आग्रहास्तव आम्ही टेकडीवर चढून गेलो. सरोवराच्या पाण्यावर एक तांबूस रंगाची छटा पसरलेली दिसली. इथून सूर्यास्त निश्चितच चांगला दिसला असता, पण खूप आधी यायला हवं होतं. वर टेकडीवर छान बाग केली होती, तिथे एका लाकडाच्या स्तंभावर एका दाढीधारी व्यक्तीचे शिल्प कोरलेले होते. ते पाहून कॅनडा आणि न्यूझीलंडमध्ये आदिवासी लोकांनी केलेले मोठे ‘टॅटम् पोल’ आठवले, त्या मानाने हा टॅटम पोल लहान होता. येथे काही झाडांना, निळ्या, पांढऱ्या, गुलाबी रिबिन्स बांधल्या होत्या. पांढऱ्या- कौटुंबिक शांततेसाठी, निळी- भरभराटीसाठी आणि गुलाबी प्रेमासाठी! आम्ही मिळेल ती रिबीन ‘शुभेच्छा’ म्हणून झाडाला बांधली अन् खाली उतरलो. पुढे रस्ता अरुंद झाला व अंधारही पडला. बऱ्याच वेळाने बस ‘ग्रेमॅचिन्क्स’च्या आवारात थांबली. आमच्या खोल्या काचेच्या मोठय़ा  खिडक्या असलेल्या होत्या. बिछान्यांत पडूनही बाहेरची बाग पाहता येत होती. सामान ठेवून लगेच जेवणासाठी गेलो तर टेबलवर बशांमधून वाढून ठेवलेले. करंजीसारखा एक पदार्थ त्यात होता,  पण गारीगार आणि बेचव! भातही गारच. बरोबरच्या चटणी-लोणच्याने चव आणून जेवण आटोपले!

२७ जुलै २०१५

सकाळी नाश्ता करून बैकाल  सरोवराच्या पूर्व किनाऱ्यावर आलो. स्वच्छ, सुंदर सूर्यप्रकाशात सरोवराची निळाई नजरेत भरत होती. लिस्टव्यांकाला ढगाळ हवेमुळे हे सौंदर्य अनुभवू शकलो नव्हतो. इथे तुलनेने पर्यटक खूपच कमी होते. जणू काही संपूर्ण किनारा आमच्यासाठीच होता. एखाद दुसरे कुटुंब आणि दोन-तीन मुले एवढीच गर्दी! आमच्यापैकी काहींनी पाण्यात जाऊन पाय बुडवले, काहींनी पोहण्याचा आनंद घेतला. काही आजूबाजूचे गुळगुळीत गोटे जमवण्यात रमले होते! मी सरोवरांच्या निळ्या रंगाच्या निरनिराळ्या छटा डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत होतो. दीड-दोन तास कसे गेले कळले नाही. हॉटेलवर येऊन परत उलान उडेकडे निघालो. वाटेत इव्होलगिन्सकी डाटसन मोनॅस्ट्री बघायला थांबलो. येथून उलान उडे २३ कि.मी.वर आहे. हे बुरियात जमातीचे रशियामधील एकमेव बुद्धिस्ट मंदिर आणि सांस्कृतिक केंद आह्रे. रशियन सर्वोच्च लामाचे हे निवासस्थान. त्याचे मूळ बांधकाम १९४० मध्ये केलेले असले तरी १९४५ मध्ये ते सर्वासाठी खुले केले गेले. बुरियात कला, पूजेच्या वस्तू जमवून येथे जपून ठेवल्या आहेत. तिबेटियन भाषेत रेशमात विणलेली ग्रंथसंपदा हे येथील वैशिष्टय़! बागेत बोधी वृक्षही जतन करून ठेवला आहे. ही मोनॅस्ट्री उंच टेकडीवर आहे. येथील भोजन गृहाला कैलास असे नाव आहे. तसेच येथून सेलंगा नदीचे खोरे आणि त्यात वसलेले उलान उडे यांचे भव्य दर्शन होते! १९२७ साली प्रमुख लामा इटीगेलॉव्ह यांचे निधन झाले. त्यांनी आपले शव येथे पुरून ठेवावे आणि नंतर तीस वर्षांनंतर उकरून काढावे असे आपल्या अनुयायांना सांगितले. त्याप्रमाणे तीस वर्षांनंतर शव बाहेर काढले तर ते नुकताच मृत्यू झाला असावा तसे होते. मात्र नंतर त्यांचे दफन करण्यात आले! दुपारच्या जेवणानंतर स्थानिक स्थलदर्शनासाठी निघालो. सिटी स्क्वेअर ही एक प्रचंड मोठी मोकळी जागा छान बांधून काढली होती. बाजूने मोठय़ा शासकीय इमारती होत्या. मध्यभागी एका चबुतऱ्यावर लेनिनचे ४२ टन वजनाचे भले मोठे मस्तक ठेवलेले होते. ते समोरून पाहिले तर त्याचे डोके मानेवर तोलले आहे असे वाटते तर बाजूने पाहिले तर ते एका टोकावर ठेवले आहे, असे वाटते. १९७० साली लेनिनच्या जन्मशताब्दीनिमित्त हा २५ फूट उंचीचा ४२ टन वजनाचा ब्रांझचा पुतळा उभारण्यात आला. जगातील सर्वात मोठे मस्तक असा त्याचा स्थनिक लोक उल्लेख करतात.

पुढच्या अशाच एका चौकात एक भलं मोठं कारंजे होते. सभोवती बाग आणि ३१ पुतळे होते! समोरचं एक मोठं बॅले थिएटर आणि त्याच्या बाजूला त्याला साजेसा बॅले नर्तक-नर्तकीचा पुतळा होता. इथून हॉटेलवर येईपर्यंत साडेचार-पाच झाले होते. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था ‘ओल्ड बिलीव्हर व्हिलेज’मध्ये एका बुरियत – रशियन कुटुंबामध्ये केली होती. या खेडय़ाकडे जाणारा रस्ता खूप रम्य होता. सेलंगा आणि उडे नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी आम्ही सूर्यास्त होत असताना पोहोचलो. तिथे सोनेरी प्रकाशात आसमंत उजळून निघाला होता. यजमानांच्या घरी पोहोचलो. आणि पारंपरिक वेषभूषा केलेल्या स्त्रियांनी खास बुरियत पद्धतीने स्वागत केले. प्रवेशद्वार तसंच आतील सजावट छान फुलापानांची नक्षी असलेली होती. एका छोटय़ा हॉलमध्ये टेबलावर डिश तसंच ग्लासेस मांडून ठेवले होते. पाण्याऐवजी तांबूस रंगाच्या पेयाचे बुधले भरून ठेवले होते. नंतर कळले की ती घरी केलेली ‘व्होडका’ होती. जेवण चांगले होते! जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होता! आमचे स्वागत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम काही लोकगीते गायिली. नंतर आमच्यामधीलच तरुण जोडप्याला सहभागी करून ‘बुरियत’ लग्नसोहळा सादर करून दाखवला. त्यांनाही ‘बुरियत’ वेषभूषा करायला लावली. कार्यक्रम बुरियत भाषेत होता, पण गाइड भाषांतर करत होती.

२७ जुलै २०१५

सकाळी नाश्त्यानंतर हॉटेल सोडले. दुपारी एक वाजता उलान बटरला जाणारी गाडी पकडायची होती. मधल्या वेळात उलान उडेमधील ऐतिहासिक संग्रहालयाला भेट दिली. इथे बुद्धांचे असंख्य संगमरवरी पुतळे आहेत. इतर देव देवतांचे पुतळेही होते. तत्कालीन राजघराण्यातील राजे-राण्या यांचे अत्यंत कलाकुसर केलेले पोशाख जतन करून ठेवले होते. ते बघून, जेवून स्टेशन गाठले. बरोबर एक वाजता आमची गाडी १७ तासांच्या ५८१ किमीच्या प्रवासासाठी उलान बटारकडे  निघाली.

२८ जुलै २०१५

उलानउडे सुटले तसे सैबेरियन जंगल कमी होऊन सपाट रूक्ष वाळवंटी प्रदेश सुरू झाला. उघडे बोडके डोंगर, खुरटी झाडे दिसू लागली. सकाळी साडेसहा वाजता उलान बटार येणार होते. त्यामुळे लवकर उठून बाहेर आलो तर सूर्योदय होत होता. थोडा पाऊसही पडत होता आणि त्यामुळे पश्चिमेला छान सोनेरी प्रकाश पसरला होता आणि या पाश्र्वभूमीवर दोन इंद्रधनुष्ये दिसत होती. ‘उलान बटार’ हे मंगोलियाचे राजधानीचे शहर. ‘तूळ’ आणि ‘सेलब’ नदीच्या संगमावर हे शहर आहे. ते समुद्रसपाटीपासून चार हजार ४२९ फूट उंचीवर असून जगातील सर्वात थंड असे राजधानीचे शहर अशी त्याची ओळख आहे. त्याची लोकसंख्या सव्वाबारा लाखाच्या आसपास आहे. हे ट्रान्स सैबेरियन रेल्वेवरील महत्त्वाचे औद्योगिक, सांस्कृतिक राजकीय शहर आहे. २० व्या शतकात ते इथले प्रमुख शहर म्हणून उदयाला आले.

स्टेशनवर आमचा वाटाडय़ा आला होता. त्याला त्यामानाने इंग्रजी बोलता येत नव्हते. बरेच मधले शब्द आम्ही ‘मोकळ्या जागा भरा’ असे करत त्याला शब्द सुचवायचे किंवा त्याला काय म्हणायचंय हे समजून घ्यायचे. आमचे इथले हॉटेल बयाँगाल हे होते. मंगोलियातील तेरेलज नॅशनल पार्कमध्ये ‘गेर’ नावाच्या तंबूत राहणे हे इथले मुख्य आकर्षण होते. एक रात्र तिथे काढायची होती आणि हवा बऱ्यापैकी थंड असणार होती. त्याप्रमाणे कपडे घेऊन बाहेर पडलो. प्रथम मंगोलियन नॅचरल हिस्टरी म्युझियमला भेट दिली. नेहमीप्रमाणे मानवाची उत्क्रांती, मंगोलियन राजे-रजवाडे विशेषत: चंगिझखानचे कपडे, बूट यांचेच प्रदर्शन होते! तिथून जवळच शहरांतला प्रचंड मोठा चौक होता त्याचे नाव ‘सुखबटार स्क्वेअर’ किंवा ‘चेंगिझखान स्क्वेअर’ आहे. आजूबाजूला पोस्ट ऑफिस आणि शासकीय इमारती आहेत. तसेच ‘ब्लू  स्काय स्क्रॅपर’ ही उंच इमारत आहे. मंगोलियन नेता डॅमडीन सुखबटार याचा अश्वारूढ पुतळा चेंगिझखानच्या स्मारकाकडे तोंड करून उभा आहे.

१९५१ मध्ये गव्हर्नमेंट पॅलेस बांधण्यात आले. २००६ साली चेंगिझखानच्या राज्याभिषेकाच्या ६०० व्या जयंतीनिमित्त भव्य स्मारक उभारले गेले. इथे चेंगिझखानचा पुतळा आहे. या स्मारकाच्या ३६ खांबांना चेंगिझखानच्या वेगवेगळ्या भावांची नावे देण्यात आली आहेत. आहेत. चौकात कृत्रिम गवतात कोरलेल्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रतिकृती होत्या. त्या फुलांनी सजवल्या होत्या. तिथून आम्ही तूल नदीच्या काठावर असलेल्या गोरखी तेरेलज् – नॅशनल पार्ककडे निघालो. त्यासाठीचा रस्ता गोरखी दावा खिंडीतून जातो. या भागात चहू बाजूंनी ग्रॅनाईट खडकांचे डोंगर, उतारावर पाईन वृक्षांची गर्द हिरवी झाडं आणि हिरवीगार चराऊ कुरणे होती. ग्रॅनाईट दगडांचे नैसर्गिक विविध आकार आणि राहण्यासाठी टोपीच्या आकाराचे गोल तंबू! हवेत सुखद गारवा होता. बसमधून उतरताच पारंपरिक वेष धारण केलेल्या सुंदर युवतीने दूध शिंपडून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. समोर टेकडीच्या उतारावर ‘गेर’चा स्वागत कक्ष आणि भोजन गृह होते. जेवणासाठी टेबलं मांडून ठेवलेली होती. बटाटावडय़ांसारखा तसंच पाटवडय़ांसारखा पदार्थ आणि तांबडय़ा रंगाची पालेभाजी आकर्षक पद्धतीने वाढून ठेवली होती.  पिण्याचे पाणी स्वच्छ आणि पारदर्शक; मात्र बेचव होतं. सुदैवाने गरम भात मिळाला आणि बरोबरच्या चटणी लोणच्याबरोबर रिचवला. नंतर ‘गेर’   तंबूंचे वाटप झाले. साधारणपणे एका तंबूत दोन व्यक्ती!

‘गेर’ म्हणजे मंगोलियन भाषेत ‘घर’! गेरसाठी साडेतीन फुटांच्या उंचीच्या गोल चौथऱ्यावर लाकडी चौकटींनी बांधकाम करतात. छपराला हवा, प्रकाश येण्यासाठी एक झरोका असतो. कॅनव्हासच्या कापडाचे आवरण असते, मध्ये एक जाड ‘फेल्ट’चा थर असतो. या ‘फेल्ट’चे उत्पादन जनावरांच्या केसांपासून करतात. ही साधारण एक इंच जाडीची घोंगडी म्हणायला हरकत नाही. यामुळे तंबूंचा अंतर्भाग उबदार रहातो. शिवाय आत मोठी शेगडी असते. धूर बाहेर जाण्यासाठी धुरांडे असते. जवळ एका खोक्यांत, कागद लाकडांचे तुकडे ठेवलेले असतात. सूर्यास्तानंतर कर्मचारी येऊन शेगडी पेटवून जातात. एका तंबूत दोन ते चार प्रवाशांची सोय असते. लाकडी पलंग,  टेबल- खुर्ची होते. एकच सीएफएलचा दिवा होता आणि तंबूचे प्रवेशद्वार एकदम लहान बुटके होते, डोकं वाकवूनच ये-जा करावी लागत होती. स्वच्छतागृहाची इमारत वेगळी होती. टेकडीच्या निरनिराळय़ा स्तरावर असे तंबू बांधले होते. या ठिकाणी एक रात्रच काढायची होती. संध्याकाळी एका आदिवासी ‘गेर’ला भेट होती. दुधापासून अनेक पदार्थ तयार करून विकणे हा तेथील लोकांचा गृहउद्योग! तंबू आतून खूप सुंदर सजवला होता. विणकाम केलेले पडदे, झालरी तंबूची शोभा वाढवत होते. मध्यभागी दुधाच्या बरण्या, पातेली इ. साहित्य होते. यजमानीण बाईंनी त्यांनी तयार केलेले काही पदार्थ चव पाहण्यासाठी दिली. पण ‘गोटचीज’च्या वासाने कोणीही चव घेण्याच्या भानगडीत पडले नाही. सूर्य मावळण्याच्या बेतात होता. ग्रेनाइट दगडांचे विविध आकार पाहायला निघालो. आजूबाजूंचे बोडके डोंगर, हिरवीगार कुरणे, आणि सूचिपर्णाची  झाडे कॅमेऱ्यात टिपत होतो.

ग्रेनाईट दगडांची विविध रूपे पाहताना चक्रावून जायला होतं. प्रकाश कमी होत चालला होता. त्यामुळे जमेल तसे विविध बाजूंनी ‘टर्टलरॉक’चे फोटो काढले. एका टेकडीच्या टोकाचा आकार माकडाच्या चेहऱ्यासारखा होता.

तंबूत परत आलो तर सूर्यास्त झाला होता आणि सूर्याचे सोनेरी किरण समोरच्या डोंगरांच्या शिखरावर पडले होते, ही शिखरे सोन्यासारखी झळकत होती. हा अनुभव अगदी क्षणिक असतो, तो पटापट कॅमेऱ्यांत टिपून ठेवला. रात्रीच्या जेवणाला बराच वेळ होता, त्यामुळे तंबूच्या ओटय़ावर बसून संधिप्रकाशात सुरापान करण्याची मजा घेतली. जेवण करून येईपर्यंत तंबूतली शेगडी पेटवून ठेवली होती. त्यामुळे तंबू उबदार झाला होता. पहाटेपर्यंत छान ऊब राहिली, पण नंतर छान गारवा जाणवला!

२९ जुलै २०१५

आज सकाळी हवा खूपच स्वच्छ होती. हिरव्यागार कुरणावर पांढऱ्या टोपीचे ‘गेर’ उठून दिसत होते. निळ्याशार आकाशाच्या पाश्र्वभूमीवर उघडे बोडके डोंगर आणि हिरवीगार पाईन वृक्षाची रांगच रांग फारच सुंदर दिसत होती. मंगोलियामध्ये अशा जागी येऊन फक्त एकच दिवस राहायचे याची खंत वाटली. पण हेहि नसे थोडके. या अशा प्रसन्न वातावरणांत हॉटेलच्या बाहेर एका निष्पर्ण झाडावर चिमण्या आणि इतर बरेच पक्षी होते. जमेल तेवढे कॅमेऱ्यात पकडले. नाश्ता करून बाहेर पडलो. काल संधिप्रकाशांत न दिसलेले दगडी आकृत्यांचे निरनिराळे आकार आणि रंग स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये खूप खुलून दिसत होते. एकाच आकृतीचे वेगवेगळ्या कोनातून निरनिराळे रंग दिसत होते. वळणावळणाच्या रस्त्याने आम्ही एका आर्याबल मोनॅस्ट्रीच्या  पायथ्याशी आलो. डोंगरामध्ये उंच पायऱ्या चढून जायचे टाळले. खाली बसभोवती फिरून फोटो काढणे पसंत केले. तिथून परत येऊन या सुंदर जागेचा निरोप घेतला. निरोप समारंभही पारंपरिक पद्धतीने दूध शिंपडून झाला!

बस अनेक डोंगरांमधून वळणांच्या घाटरस्त्याने जात होती. मध्येच छोटय़ा वसाहती लागत होत्या, येताना पाऊस पडत असल्याने न बघता आलेले सृष्टिसौंदर्य नजरेत आणि कॅमेऱ्यात साठवता येत होते. नंतर डोंगर संपून सपाट पठार लागले. मैलोन्मैल हिरवीगार कुरणे, त्यावर चरणारे घोडे, गायी आणि शेळ्यांचे कळप आणि मधून सरळसोट रस्ता. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधल्या कुरणांची आठवण झाली.

एका भव्य कमानीमधून प्रवेश करून बस वाहनतळावर थांबली. तिथून पुढे चालत चेंगिझखानच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर जायचे होते! उलान बटारपासून ३३ किमी अंतरावर तूल नदीच्या काठी ३२ फूट उंचीच्या ‘चेंगिझखान व्हिजिटर सेंटर’च्या इमारतीवर हा ४० मीटर (१३१ फूट) उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. या गोल चबुतरावजा इमारतीला चेंगिझखान ते लिगड्रान खान या खानांच्या स्मरणार्थ ३६ खांब बांधले आहेत. २००८ साली उभारला गेलेला हा जगातील सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा स्टेनलेस स्टीलचा असून आतून पोकळ आहे. त्याच्या घोडय़ाच्या डोक्यावर प्रवासी जाऊ शकतात. त्यासाठीची लिफ्ट तिसऱ्या मजल्यापर्यंत आहे. नंतर सहा मजले चढून जावे लागते. जिना व्यवस्थित बांधलेला आहे आणि प्रत्येक मजल्यावर आपोआप दिवे लागतात. नवव्या मजल्यावर घोडय़ाच्या डोक्यावर एक मोठी गॅलरी आहे. तिथून ‘तूल’ नदीचे नयनरम्य खोरे पाहता येते. तसेच पुतळ्याचा घोडय़ावर बसलेला भाग आणि भव्य चेहरा दिसतो. पुतळ्याच्या चेहऱ्यासह ‘सेल्फी’ काढण्यासाठी खूप गर्दी होती. चबुतऱ्याच्या इमारतीमध्ये एक संग्रहालय तसंच भेटवस्तूंनी खचाखच भरलेली अनेक छोटी दुकाने होती. समोरच चेंगिझखानचा प्रचंड मोठा बूट तयार करून, आकर्षकपणे सजवून ठेवला होता. त्याच्या छोटय़ा प्रतिकृती तसंच ‘मंगोलिया’च्याही काही वैशिष्टय़पूर्ण वस्तू इथे स्मृतिचिन्हाच्या स्वरूपात मिळतात. हा अश्वारूढ पुतळा पूर्वेकडे तोंड करून चेंगिझखानच्या जन्मस्थानाकडे पाहतो आहे, अशी त्याची रचना आहे. चार दशलक्ष डॉलर्स खर्च करून तो तयार केला आहे. या जागेवर चेंगिझखानला त्याचा सोन्याचा चाबूक मिळाला अशी दंतकथा सांगितली जाते. हा पूर्ण परिसर ५२० एकरचा आहे. तिथून आम्ही उलान बटार शहराकडे निघालो. वाटेत आमचे दुपारचे जेवण एका ‘कझाग’ कुटुंबाच्या ‘गेर’मध्ये होते. छान चविष्ट, मसालेदार जेवणाची अपेक्षा होती. पण अपेक्षाभंग झाला. त्यामुळे आम्ही जवळजवळ उपाशीपोटीच हॉटेलवर आलो. या कुटुंबाचे ‘गेर’ मात्र खूपच छान होते!  संध्याकाळी ‘नमस्ते’ या भारतीय रेस्टॉरंटमध्ये मंडळी जेवणावर तुटून पडली. मंगोलियामध्ये भारतीय जेवण मिळणे हेच खूप होते. तृप्त होऊन हॉटेलवर परत आलो. सकाळी सात वाजता बिजिंगला जाणारी गाडी पकडायची होती.

३० जुलै २०१५

उलान बटारचे स्टेशन खूप सुरेख आहे. ट्रान्स सैबेरियन रेल्वेवरील हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण मंगोलियाच्या राजधानीला शोभेसे होते. आतापर्यंतचा प्रवास रशियन गाडय़ांनी केला होता. आता चिनी गाडीतून जायचे होते. चिनी गाडय़ा रशियन गाडय़ांएवढय़ा चांगल्या नसतात असे इंटरनेटवर वाचले होते. पण समोर एक चकचकीत हिरवीगार गाडी उभी होती. स्टेशनवर जुने वाफेचे इंजिन छान रंगवून ठेवले होते. गाडीच्या प्रत्येक डब्याला चीनच्या निरनिराळ्या भागांची नावे दिली होती. डब्याची अंतर्गत सजावट रचना रशियन गाडय़ांसारखी होती पण लाल रंगाचा वापर मोठय़ा प्रमाणात होता. गाद्यांना निळ्या रंगाचे आच्छादन होते. गुलाबी रंगाचे उशीचे अभ्रे आणि पांढऱ्या शुभ्र चादरी होत्या. पण ही गाडी रशियन गाडीसारखी वातानुकूलित नव्हती तर प्रत्येक केबिनमध्ये पंखे होते. केबिन आणि जाण्या-येण्याच्या जागेत जाजम अंथरले होते. डब्यातील स्वच्छतेबद्दल खूप जागरुकता होती. अटेंडन्ट सारखा फिरून सूचना देत होता. बीजिंगपर्यंतचा एक हजार ९०८ किमीचा प्रवास २९ तासांचा होता. वाटेत मंगोलिया आणि चिनी सरहद्दीवर तपासणीसाठी गाडी दोन-दोन तास थांबणार होती. या गाडीला दोन डिझेल इंजिने आणि बारा डबे होते. उलान बटार सोडल्यावर वाटेत दिसणाऱ्या नागरी वस्तीतील निवासी इमारती अगदी एकसारख्या साच्यातून काढल्याप्रमाणे होत्या. झोपडपट्टीत ‘गेर’तंबू खूप दिसले, तसेच एकदोन मजली झोपडीवजा घरेही दिसली. आमचा प्रवास आशिया खंडातील मोठय़ा गोबीच्या वाळवंटातून होणार होता. गोबीबद्दल ऐकले आणि वाचले होते त्यामुळे ते पाहण्याची खूप उत्सुकता होती. या सपाट वाळवंटी प्रदेशातही अनेक वळणे होती, त्या वळणांवर गाडीच्या इंजिनचे तसेच शेवटच्या डब्याचे फोटो काढता आले! नुकताच पाऊस झाल्याने वाळवंटांत खुरटे गवत उगवले होते आणि मधून मधून, जंगली घोडे, गायी, शेळ्या मेंढय़ा यांचे कळप चरताना दिसत होते दोन वशिंडे असलेले उंटांचे कळपही चरताना दिसले. लडाखमधील नूर वाळवंटात असे उंट पाहिल्याचे आठवले. वाटेत एका स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा उतरून तिथल्या विशिष्ट प्रकारच्या पिवळ्या रंगाच्या घुमटासारख्या दुकानांचे फोटो काढले.  वाटेत वाळवंटातील वाळूचा फिकट पिवळा रंग मधून मधून बदलत होता. एकदा तर चक्क तांबडय़ा, राखाडी रंगाचे वाळूचे डोंगर दिसले. तसेच पाण्याचे साठेही दिसले. अर्थात ते मृगजळ असावे. मात्र गोबी वाळवंटातील सूर्यास्त काही टिपता आला नाही.

मंगोलियाची सीमा ओलांडून चिनी प्रदेशात प्रवेश करेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते. स्टेशनवर गाडी थांबली पण आम्हाला उतरायला परवानगी नव्हती. इथे कडक तपासणी होणार होती. पासपोर्ट, व्हिसा, तिकीट हातात धरून बसायचे. प्रत्येकाची कसून तपासणी होईपर्यंत जागेवरून हलायचे नाही, अशा सूचना होत्या. साधारण दोनेक तासांनी गाडी हलली, वाटले की सुटली, पण नाही. येथून पुढे मीटर गेज अर्थात लहान रुळांवरून प्रवास होता आणि त्याकरता गाडीची चाके बदलण्याचा खूपच रोमांचक आणि अविस्मरणीय कार्यक्रम होता. त्यासाठी गाडीचे डबे सुटे करून घेतले गेले. एकाच वेळी अनेक डब्यांचे चाके बदलण्याचे काम चालते. खाली उतरता येत नसले तरी आपल्या डब्यांतून दुसऱ्या डब्याचे काम पाहता येते. डबे सुटे केल्यावर प्रथम डब्याची चाकांची जोडणी सुटी केली गेली. प्लॅटफॉर्मवर असलेल्या मोठय़ा शक्तिशाली ‘जॅक’ने डबा वर उचलला गेला. पहिली चाके बाजूला केली गेली, नवीन जोडणी आली. मग डबा खाली घेऊन नवी जोडणी डब्याला लावली गेली. मग सर्व डबे परत जोडून गाडी  बीजिंगकडे निघाली. या सर्व कामाला बराच वेळ लागला. रात्री दीड वाजेपर्यंत हे पाहत जागा होतो, नंतर झोपलो. पहाटे अडीच वाजता जाग आली ती स्वच्छ चंद्रप्रकाशामुळे. बाहेर आकाशात गुरुपौर्णिमेचा चंद्र लखलखत होता. त्याला कॅमेऱ्यात टिपून परत झोपलो. सकाळी जाग आली आणि बाहेर पाहिले तर वाळवंटाचा मागमूसही नव्हता. सर्वदूर हिरवीगार शेती, मधून जाणारे रस्ते, छोटी छोटी घरे. सर्व आदी आखीवरेखीव! मैलोन् मैल लांब मक्याची शेते दिसली! काही ठिकाणी ग्रीन हाऊसेस दिसली. एका ठिकाणी तर डुकरांची पैदास करणारी पिंगरीही दिसली. गाडी मोठय़ा धरणांच्या काठावरून तसेच असंख्य प्रकारच्या दगडांच्या रचनेच्या डोंगरामधून जात होती. दगडांचे रंगही निरनिराळे होते. मधेमधे बोगदे लागत होते. प्रवास निसर्गरम्य होता. बीजिंग जवळ आले तसे उपनगराची स्टेशन्स व बुलेट ट्रेनसारख्या काही गाडय़ा दिसल्या. वाळवंटाचे वृंदावन करणाऱ्या चिन्यांना सलाम करत बीजिंगमध्ये शिरलो. प्रचंड मोठे स्टेशन. सरकत्या जिन्यावरून खाली उतरून, जमिनीखालच्या मोठय़ा रस्त्याने बॅगा ओढत स्टेशनच्या बाहेर आलो.  आमची बस लांब वाहनतळावर उभी होती. भूकही लागली होती. सुदैवाने ‘स्वागत’ नावाच्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये छान जेवण मिळाले.

हॉटेलवर जेमतेम दाढी-आंघोळ करण्याइतकाच वेळ मिळाला. कारण सर्वाना मॉलमध्ये जाऊन खरेदी करायची होती. एका पाच मजली मोहजालामध्ये शिरलो. तळघरात दोन मजले आणि वर पाच मजले होते. दुकाने मालाने खच्चून भरली होती आणि माणसांची गर्दीही तेवढीच! गाइडने ५० टक्केपर्यंत घासाघीस करा असा सल्ला दिला होताच, पण अनेक ठिकाणी ७० ते  ७५ टक्क्य़ांपर्यंत घासाघीस करता येत होती. एकच गोष्ट निराळ्या दुकानांत आणखी स्वस्त मिळू शकत होती त्यामुळे खरी किंमत कळतच नव्हती.  वेड लावणारी मायानगरी होती। संध्याकाळी सात वाजेपर्यंत खरेदी करायला वेळ होता. ते दोन-अडीच तास कसे संपले कळले नाही. जमेल तशी आणि हवी तेवढी खरेदी करून सगळे बसमध्ये बसले. कोणी, काय, किती घासाघीस करून खरेदी केली या गप्पांत ‘स्वागत’ कधी आले कळले नाही. जेवण करून प्रवासातील शेवटच्या मुक्कामासाठी हॉटेलवर आलो. सकाळी नाश्ता करून लवकर विमानतळ गाठायचे होते. त्यासाठी बीजिंगमधील प्रसिद्ध ट्रॅफिक जॅममधून जायचे होत. हाँगकाँगमार्गे मुंबई.. आता घरचे वेध लागले होते. अनेक दिवस मनात असलेला जगातील एक सर्वात लांबचा रेल्वेप्रवास संपला होता. एक खडतर पण रम्य प्रवास केल्याचे समाधान होते.
(समाप्त)
डॉ. रमेश करकरे – response.lokprabha@expressindia.com