छायाचित्रांमध्ये एक ‘वैशिष्टय़’ असते. त्यातील प्रतिमा कॅमेऱ्याने टिपलेल्या असल्याने त्या खऱ्याच असतात हे मानण्याकडे लोकांचा कल असतो. प्रोपगंडामध्ये म्हणूनच त्याचा अधिक वापर केला जातो..

फिक्रेट अ‍ॅलिक हे नाव सहसा कोणाला माहीत असण्याची शक्यता नाही. त्याची आवश्यकताही नाही. जगातील अब्जावधींमधला तो एक. धर्माने मुस्लीम. जन्मला बोस्नियात. बाकी सांगण्यासारखे फार काही नाही; पण तरीही तो बोस्नियातील यादवी युद्धाचा चेहरा होता. त्याच्या एका छायाचित्राने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. नाझी छळछावण्यांच्या स्मृतींना उजाळा देत सर्बियन ‘अत्याचारां’विरोधात जनमत तयार केले होते.

parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता
Man completely changes his face by applying make up and become whatever he wants to be Watch
मेकअपची जादू! अनेक कलाकारांची रूपे अवघ्या काही सेकंदांत साकार; VIDEO तील ट्रान्स्फॉर्मेशन पाहून व्हाल थक्क
actress neena kulkarni drama aaich ghar unhach
‘ती’च्या भोवती..! : आजही आईचं घर उन्हाचंच?
religion of lion
नावावरून सिंहांचाही धर्म शोधायचा का?

ही गोष्ट आहे १९९२ मधली. युगोस्लाव्हियाची शकले झाली आणि त्यातून बोस्निया-हर्झेगोविना हे नवे राष्ट्र उदयाला आले; पण त्या राष्ट्रात अनेक ‘राष्ट्रे’ होती. बोस्नियन मुस्लीम, सर्ब आणि क्रोएट्स. सर्ब नागरिकांना हवे होते स्वतंत्र सर्ब राष्ट्र. त्यांनी स्लोबोदान मिलोसेविकच्या सर्बियन सरकारशी हातमिळवणी केली आणि बोस्नियातील मुस्लीम आणि क्रोएट्स यांच्याविरोधात युद्ध पुकारले. मिलोसेविकच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांच्या बातम्या आता जगभरातील दैनिकांत प्रकाशित होऊ  लागल्या होत्या. सध्या सीरियातील असाद सरकारच्या अत्याचारांवरचे मोठमोठे लेख अचानक प्रसिद्ध होऊ  लागले आहेत. तसेच ते. आणि अचानक एके दिवशी ब्रिटनमधील काही दैनिकांतून फिक्रेट अ‍ॅलिकचे ते छायाचित्र प्रसिद्ध झाले.

तिशीतला तरुण. ढगळ पँट. गालफडे बसलेली. हातापायाच्या काडय़ामुडय़ा. पोट खपाटीला. छातीचा पिंजरा दिसतोय. मागे त्याच्यासारखेच अनेक जण आणि त्यांच्या पुढे एक रोवलेला खांब. त्या खांबाला काटेरी तारा.

युरोपातील अनेकांच्या ओळखीची ही प्रतिमा होती. खासकरून ज्यूंच्या. यापूर्वी अनेकदा त्यांनी हे दृश्य पाहिलेले होते. ऑश्विट्झ, बर्जन-बेल्सेनसारख्या नाझी छळछावण्यांतून. या छायाचित्राने त्यांना त्याचीच आठवण करून दिली. ‘डेली मिरर’ने (७ ऑगस्ट १९९२) तर पहिल्या पानावर हे छायाचित्र छापून बातमीला भलामोठा मथळा दिला होता- ‘बेल्सन ९२’ असा. तेव्हा ज्यूंना जे भोगावे लागले, तेच आता बोस्नियन मुस्लिमांना भोगावे लागत असल्याचे ध्वनित करणारे ते छायाचित्र आणि तो मथळा. प्रचंड खळबळ माजवली त्याने. ‘टाइम’सारख्या सुप्रतिष्ठित कालिकानेही पहिल्या पानावर हेच छायाचित्र प्रसिद्ध केले. जगभरात मुस्लिमांविषयी सहानुभूती आणि सर्ब आक्रमकांविरोधात संतापाची लाट पसरली. त्यातून मिलोसेविकची नवा हिटलर ही प्रतिमा तयार झाली. त्याचे पुरते ‘दानवीकरण’ झाले. त्यातील राजकारणाचा भाग येथे आपण सोडून देऊ  या. मुद्दा एवढाच की या एका छायाचित्राने जनमत फिरविले.

छायाचित्रांमध्ये असतेच तेवढी ताकद. १९११ मध्ये जाहिराततज्ज्ञांसमोरील एका भाषणात विख्यात अमेरिकन संपादक आर्थर ब्रिस्बेन मार्च म्हणाले होते, ‘चित्र वापरा. त्याचे मोल हजार शब्दांएवढे असते.’ ते खरेच आहे. याचे कारण आपला मेंदू अधिक वेगाने शब्दांपेक्षा प्रतिमेचे विश्लेषण करीत असतो. मनाला, भावनांना ते अधिक जोमाने भिडत असते. हे झाले चित्रांचे. छायाचित्रांमध्ये आणखी एक ‘वैशिष्टय़’ असते. त्यातील प्रतिमा कॅमेऱ्याने टिपलेल्या असल्याने त्या खऱ्याच असतात हे मानण्याकडे लोकांचा कल असतो. प्रोपगंडामध्ये म्हणूनच त्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. त्यासाठी छायाचित्रे ‘तयार’ही केली जातात.फिक्रेट अ‍ॅलिकचे छायाचित्रही तसेच ‘तयार’ केलेले होते. ते बनावट होते का? तर नाही. ते खरेच होते. ‘आयटीएन’ या ब्रिटिश संस्थेची पत्रकार पेनी मार्शल आणि कॅमेरामन जेरेमी आयर्विन यांनी बोस्निया-हर्झेगोविनातील तेर्नोपोलेय येथील बोस्नियन सर्ब छावणीत ते टिपले होते आणि तरीही ते छायाचित्र दिशाभूल करणारे होते, कारण ते ज्या छावणीत घेतले होते ती छळछावणी नव्हती. तो निर्वासितांसाठीचा तळ होता. शिवाय छायाचित्रात ते सारे काटेरी तारेपलीकडे म्हणजे छावणीच्या आत असल्याचे दिसत असले, तरी ते मुळात कंपाऊंडच्या बाहेर उभे होते आणि छायाचित्रकार आत होता. एका जर्मन पत्रकाराच्या हे लक्षात आले ते त्याच्या पत्नीमुळे. तिला संशय आला, की साधारणत: आपण काटेरी तारा खांबाला ठोकतो ते बाहेरच्या बाजूने. यात तर त्या आतून दिसताहेत. त्याने मग त्याचा नीट तपास केला. तेर्नोपोलेयला भेट दिली. अनेकांशी बोलला आणि मग लंडनमधील ‘लिव्हिंग मार्क्‍सिझम’ या मासिकात लेख लिहून त्याचा गौप्यस्फोट केला. त्यावरून पुढे आयटीएनने या मासिकावर बदनामीचा खटला दाखल केला. तो जिंकलाही; पण तो तांत्रिक मुद्दय़ांवर. त्या छायाचित्राचा प्रोपगंडासाठी लबाडीने वापर करण्यात आला हे कोणी नाकारू शकले नाही. ते छायाचित्र आणि त्याखालील मजकूर यांची सांगड सर्वत्र अशा रीतीने घालण्यात आली होती, की त्यातून मुस्लिमांना सोसाव्या लागणाऱ्या छळाची तुलना जर्मनीतील ज्यूंशीच व्हावी.

छायाचित्रांचा अशा प्रकारे प्रोपगंडासाठी वापर करण्याच्या प्रचारकलेला व्यवस्थित आकार मिळाला तो पहिल्या महायुद्धाच्या काळात. प्रोपगंडाच्या इतिहासातील तो एक महत्त्वाचा टप्पा. तेव्हा छायाचित्रांचे तंत्रही आजच्यासारखे पुढारलेले नव्हते; पण त्यांच्या प्रोपगंडासाठीच्या वापराचे आदर्श मात्र तेव्हाच्या प्रोपगंडातज्ज्ञांनीच घालून दिले आहेत. आजही त्यांचाच कित्ता गिरवला जात आहे. आपल्याकडेही तशी उदाहरणे आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांच्या फेसबुक खात्यावरून बांगलादेशातील एक छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. जमावाच्या हाणामारीचे. त्यावर लिहिले होते- बांगलादेशात मुस्लिमांकडून हिंदूंवर होत असलेला हल्ला. छायाचित्र खरेच होते ते. फक्त ते हिंदूंना केल्या जाणाऱ्या मारहाणीचे नव्हते, तर निवडणुकीदरम्यानच्या दोन पक्षांतील हिंसाचाराचे होते. अलीकडेच अशीच एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात आली होती. ती राजस्थानातील हिंदूंना केल्या जाणाऱ्या मारहाणीची असल्याचे म्हटले होते. ध्वनिचित्रफीत खरीच होती; पण ती राजस्थानातील नसून, बांगलादेशातील सडकेवरील मारहाणीची होती. गोहत्याबंदीवरून भडकलेल्या वातावरणात तेल ओतण्यासाठी तो प्रोपगंडा केला जात होता. अगदी पहिल्या महायुद्धातील ब्रिटिश प्रोपगंडातज्ज्ञांची शिकवणी लावून प्रचार केल्यासारखे ते होते.

या ब्रिटिश प्रचारतज्ज्ञांचा तो प्रचार पाहण्यासारखा आहे. ल्युसितानिया हे ‘प्रवासी’ जहाज होते आणि ते जर्मनांनी बुडविले असा प्रचार त्यांनी केला. ही घटना मे १९१५ मधील. त्यावरून तेव्हा अमेरिकी आणि ब्रिटिश नागरिकांना भडकावण्यात आलेच; पण पुढे तीन महिन्यांनी फ्रान्सच्या प्रचारतज्ज्ञांनी जर्मनविरोधी भावना भडकाविण्यासाठी ही घटना वापरली. फ्रान्समधील ‘ल मॉँद इलस्ट्रे’ या दैनिकाने २२ ऑगस्ट १९१५च्या अंकात बर्लिनमधील एक छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यात अनेक जर्मन आनंदोत्सव साजरा करताना दिसत होते आणि त्याची छायाचित्र ओळ होती : रानटी लोकांचा उत्साह. ल्युसितानिया बोट बुडवल्याच्या घटनेबद्दल आनंद व्यक्त करताना जर्मन नागरिक. हेही छायाचित्र बनावट नव्हते; पण छायाचित्र ओळ मात्र दिशाभूल करणारी होती. ते छायाचित्र आनंदोत्सवाचे असले, तरी ते युद्धापूर्वी १३ जुलै १९१४ रोजी राजवाडय़ासमोर जमलेल्या जमावाचे होते. जर्मन सरकार मेलेल्या सैनिकांची चरबी काढून त्यापासून साबण बनविते या खोटय़ा प्रचाराला अधिकृतता यावी याकरिताही अशाच प्रकारे छायाचित्रांचा उपयोग करण्यात आला होता. सैनिकांचे मृतदेह वाहून नेणाऱ्या रेल्वेच्या खऱ्या छायाचित्राखाली, साबण बनविण्याच्या कारखान्यात चाललेली रेल्वे अशी चुकीची ओळ प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रोपगंडाची दोन लक्ष्ये होती. जर्मन नागरिक आणि सैनिकांमध्ये आपल्याच सरकारबद्दल अप्रीती निर्माण करणे आणि इतरांच्या मनात जर्मनांबद्दल तिरस्कार उत्पन्न करणे. हा तिरस्कार एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाला होता, की त्यातून पुढे ब्रिटनमध्ये तेथील जर्मन नागरिकांविरोधात दंगली झाल्या. त्यांना छावण्यांत कोंडण्यात आले. अनेकांच्या मालमत्तेची नासधूस करण्यात आली. हे सारे आपण, आजच्या फोटोशॉप आणि समाजमाध्यमांच्या युगात नीट समजून घेतले पाहिजे. व्हॉट्सअप आणि फेसबुकवरून फिरणारी अशी छद्म-छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती यांचे उद्दिष्ट प्रोपगंडा हेच असते. आजवर प्रोपगंडापंडित आणि सत्ताधारी मुख्य प्रवाहातील माध्यमांचा त्याकरिता वापर करीत असत. आताही तो होतोच, पण त्याहून समाजमाध्यमे, संकेतस्थळे ही त्यांना आता अधिक सोयीची झाली आहेत. मुख्य प्रवाहातील माध्यमांची स्वत:ची अशी तथ्ये तपासण्याची यंत्रणा असते. ती कमजोर असू शकते. त्यांचीही फसगत केली जाऊ  शकते; परंतु समाजमाध्यमांना आणि संकेतस्थळांना सगळे रानच मोकळे असते. तेथे ती ‘कोणतेही माध्यम तुम्हाला हे दाखवणार नाही’ असे सांगत सहजी आग पेटवू शकतात. ब्रिटनमध्ये त्या काळी असेच झाले होते. दंगलीच उसळल्या होत्या तेथे..

 

रवि आमले

ravi.amale@expressindia.com