युद्धकाळात शत्रूला बदनाम  करण्यासाठी बनावट कथा पसरविल्या जातात.  १३ मे १९१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळे भर बाजारातील बलात्काराच्या, लहान मुलांचे हात, कान कापल्याच्या आणि सामान्य नागरिकांच्या हत्याकांडांच्या कहाण्या वाचून अपेक्षेनुसार ब्रिटन आणि अमेरिकेत संतापाची लाट उसळली..

भय, घृणा, संताप, द्वेष या नकारात्मक भावना म्हणजे जसे प्रचारतज्ज्ञांचे खेळणे, तसेच अहवाल हे त्यांचे आवडते साधन. एखाद्या घटनेबद्दल अहवाल तयार करायचा. त्यातून या भावनांचा खेळ करायचा आणि आपणांस हवे ते लोकांच्या गळी उतरवायचे असा हा उद्योग. तो सर्व क्षेत्रांत चालू असतो. सगळेच अहवाल अप्रामाणिक असतात असे नाही; परंतु नागरिकांचे मत तयार करण्यासाठी, मतपरिवर्तन करण्यासाठी एखाद्या अहवालाचा उपयोग केला जातो, तेव्हा तो नक्कीच प्रोपगंडा असतो. त्याचे दोन प्रकार असतात. चांगला आणि वाईट. या दोन्ही प्रकारांसाठी अहवालांचा वापर केला जातो. याचे एक कारण म्हणजे अशा अहवालांमागे असलेले अधिकृततेचे वलय. अहवाल म्हटले की तो अभ्यासपूर्ण असतो. त्यासाठी संशोधन केलेले असते. त्यातून तार्किक निष्कर्ष काढलेले असतात. हे सारे गृहीतच धरलेले असते आपण. त्यात शंका राहू नये, म्हणून असे अहवाल तयार करण्याचे काम नेहमीच त्या-त्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीस दिले जाते. अहवाल समितीवर नेहमीच समाजमान्य तज्ज्ञ नेमले जातात. एखाद्या विद्यापीठाचे, बडय़ा संस्थेचे, बुद्धिमंतांच्या गटाचे नाव त्यामागे असले तर अधिक उत्तम. प्रोपगंडासाठी अशा अहवालांचा वापर करणे, खरे तर त्यासाठीच ते बनविणे याचे सर्वात गाजलेले उदाहरण पहिल्या महायुद्धकाळातच सापडते. ते म्हणजे ब्राइस अहवाल. एखादा अहवाल प्रोपगंडासाठी किती परिणामकारक ठरू शकतो हे त्यातूनच सर्वाच्या लक्षात आले. पुढील अनेक प्रचारतज्ज्ञांचे ते प्रेरणास्थानच बनले. म्हणूनच हे प्रकरण मुळातून समजून घेतले पाहिजे.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

ते महायुद्धाच्या आरंभीचे काही दिवस होते. जर्मनीने आंतरराष्ट्रीय करार गुंडाळून बेल्जियमवर आक्रमण केले होते. तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले जात होते. असंख्य बेल्जियन परागंदा झाले होते. अनेक जण ब्रिटनच्या आश्रयाला आले होते, त्यांच्या अत्याचाराच्या कहाण्या सांगत होते. ‘टाइम्स’च्या २७ ऑगस्ट १९१४च्या अंकात अशीच एक कहाणी प्रसिद्ध झाली होती- एका बेल्जियन बालकाचे हात कापल्याची. ‘टाइम्स’च्या पॅरिसमधील प्रतिनिधीने लिहिले होते- ‘कॅथॉलिक सोसायटीच्या अधिकाऱ्यांना एका व्यक्तीने सांगितले, त्याच्या डोळ्यांदेखत एका जर्मन सैनिकाने, आईच्या स्कर्टला धरून बसलेल्या लहान मुलाचा हातच कलम केला.’ ‘टाइम्स’नेच २ सप्टेंबर १९१४ रोजी एका फ्रेंच निर्वासिताच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत म्हटले होते की, ‘फ्रान्ससाठी कोणी लढायला राहूच नये यासाठी जर्मन सैनिक लहान मुलांचे हात कापून टाकत आहेत.’ अशा मुलांची चित्रेही तेव्हा फ्रान्स आणि इटलीतील दैनिकांतून छापून येत होती. ‘ले रिव्हे रुज’ नामक दैनिकात तर जर्मन सैनिक मुलांचे हात खात असल्याचे चित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. लहान मुलांना संगिनीने भोसकल्याच्या, दरवाजाला खिळे ठोकून लटकावल्याच्या घटनाही तपशिलाने सांगितल्या जात होत्या.

अशीच एक कहाणी होती ग्रेस ह्य़ूम नावाच्या तरुण परिचारिकेची. बेल्जियममध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर वैद्यकीय सेवेसाठी ही २३ वर्षांची तरुणी तेथे धावून गेली. तर जर्मन सैनिकांनी तिला पकडले. तिच्यावर अत्याचार केले. तिचे स्तन कापून टाकले. मरण्यापूर्वी तिने आपल्या कुटुंबाला एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात तिने लिहिले होते, ‘प्रिय केट, हे माझे निरोपाचे पत्र. आता मी जास्त काळ जगणार नाही. इस्पितळाला आग लावलीय. क्रूर आहेत हे जर्मन. एका माणसाचे शिर उडवले त्यांनी. माझा डावा स्तन कापून टाकलाय.. गुड बाय. -ग्रेस.’ हे पत्र लिहिल्यानंतर तिचा उजवा स्तनही कापून टाकण्यात आला. ही माहिती दिली दुसऱ्या एका परिचारिकेने. ग्रेसने जर्मनांशी कसा लढा दिला, तिने एका सैनिकाला कशा गोळ्या घालून ठार केले, मग ती कशी शहीद झाली, हे सारे तिने सांगितले. ‘द स्टार’ने १६ सप्टेंबर १९१४च्या अंकात हे प्रसिद्ध केले. ‘इव्हिनिंग स्टँडर्ड’नेही ही कथा छापली.

या अशा बातम्यांमुळे ब्रिटिश जनमत अर्थातच प्रक्षुब्ध होत होते. या घटनांच्या चौकशीची मागणी होत होती. तेव्हा पंतप्रधान हर्बर्ट अ‍ॅस्क्विथ यांनी ते काम सोपविले चार्ल्स मास्टरमन यांच्याकडे. ते वॉर प्रोपगंडा ब्युरोचे प्रमुख. त्यांनी या चौकशीचे काम सोपविले लॉर्ड जेम्स ब्राइस यांच्याकडे. ही निवड लक्षात घेण्यासारखी आहे. ब्राइस हे तेव्हाचे जगप्रसिद्ध इतिहासकार होते. अमेरिकन लोकशाहीवर त्यांनी द्विखंडीय ग्रंथ लिहिला होता. तो अमेरिकेत गाजला होता. तेथील बुद्धिमंत अभिजनांच्या वर्तुळात त्यांना मान होता. अमेरिकी आणि जर्मन विद्यापीठांनी त्यांना मानद पदव्या दिल्या होत्या. जर्मनीचे सम्राट कैसर विल्हम द्वितीय यांनी तर त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान दिला होता. अशा व्यक्तीकडे चौकशी समिती देणे हा मास्टरमन यांचा ‘मास्टरस्ट्रोक’च म्हणावा लागेल. जर्मनीने गौरविलेल्या व्यक्तीने जर्मन अत्याचारांची चौकशी करणे यात पक्षपाताला जागाच राहणार नसल्याचा भ्रम त्यातून निर्माण होत होता; पण बेल्जियमवरील आक्रमणामुळे आता ते कडवे जर्मनविरोधक बनले होते. त्यातूनच ते इतिहासकाराचे ‘प्रोपगंडाकार’ बनले.

वस्तुत: बेल्जियन युद्धनिर्वासितांकडून सांगण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी सांगोवांगीच्या, तिखटमीठ लावलेल्या, अर्धसत्य अशा होत्या. वर उल्लेखलेली परिचारिकेची कहाणी तर बनावटच निघाली. पुढे ‘टाइम्स’नेच तिचे पितळ उघडे पाडले. हीच गत मुलांचे हात कापल्याच्या घटनांची; पण युद्धकाळात शत्रूला बदनाम करण्यासाठी, त्याच्याबद्दल घृणा, संताप निर्माण करण्यासाठी अशाच कथा पसरविल्या जातात. ब्राइस समितीने १२०० जणांच्या साक्षी घेतल्या; पण त्यातून खरे ते बाहेर आलेच नाही. कारण तसे ते आणायचेच नव्हते. हे साक्षीदार सूडबुद्धीने खोटे सांगत असावेत, अशी शंका अनेकांच्या मनात होती; परंतु त्या लोकांनी जे पाहिले आहे, सोसले आहे ते सांगणे ही बाबच असामान्य आहे, असे सांगत समितीने या शंका उडवून लावल्या. ब्राइस यांच्या प्रतिष्ठेमुळे त्या बनावट कथांनाही अधिकृत मान्यता मिळाली. एखाद्या व्यक्तीची वा संस्थेची प्रतिष्ठा दुसऱ्या गोष्टीशी जोडून त्या गोष्टीला प्रतिष्ठा मिळवून देणे हे प्रोपगंडातील ट्रान्सफर नामक तंत्र. त्याचाच येथे वापर करण्यात आला होता.

हा अहवाल १३ मे १९१५ रोजी प्रसिद्ध झाला. ब्रिटनच्या ‘वॉर प्रोपगंडा ब्युरो’ने तो ३० भाषांत छापून मित्र आणि अलिप्त राष्ट्रांत वितरित केला. त्या भर बाजारातील बलात्काराच्या, लहान मुलांचे हात, कान कापल्याच्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य नागरिकांच्या हत्याकांडांच्या कहाण्या वाचून अपेक्षेनुसार ब्रिटन आणि महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेत संतापाची लाट उसळली. जर्मनीच्या राक्षसीपणावर शिक्कामोर्तब झाले. अमेरिकी नागरिकांमध्ये जर्मनीविषयी सूडभावना निर्माण झाली. त्याचे श्रेय जेवढे ब्रिटनच्या अन्य प्रचारसाधनांचे, त्याहून अधिक ते ब्राइस अहवालाचे होते.

एकंदर हे प्रोपगंडाचे अत्यंत परिणामकारक असेच साधन म्हणावे लागेल. आजही विविध क्षेत्रांत त्याचा वापर केला जातो. याचे अलीकडचे जगभरात गाजलेले उदाहरण म्हणजे २००७च्या हवामान बदलविषयक अहवालाचे. तो तयार केला होता हवामान बदलविषयक आंतरराष्ट्रीय समितीने (आयपीसीसी). ही समिती संयुक्त राष्ट्रांनी नेमलेली. बडे बडे तज्ज्ञ त्यात होते. आपल्या ‘टेरी’ या संस्थेचे (माजी) अध्यक्ष राजेंद्र पचौरी समितीचे अध्यक्ष होते. अशा संस्थेने हा अहवाल तयार केला होता आणि त्यामुळेच त्याचे निष्कर्ष पाहून सगळे जग हादरले. २०३५ पर्यंत हिमालयातील हिमनद्या नामशेष होणार. अमेझॉन खोऱ्यातील ४० टक्क्यांपर्यंतची पर्जन्यवने नष्ट होणार. असाच बराच विनाश होणार आणि ते सगळे हवामान बदलामुळे होणार म्हटल्यावर जगभरात खळबळ माजली. पुढे लक्षात आले की त्यात बरेच गोलमाल आहे. तरीही या अहवालाने पर्यावरणविषयक जागतिक जनमत बदललेच. त्याचा फायदा अर्थातच त्यातील दबावगटांना झाला.

एकंदर दबावगटांच्या अर्थकारणाला हा अहवालीय प्रोपगंडा चांगलाच उपयोगी पडतो असे दिसते. याचे कारण अहवाल नेहमी तथ्यांवरच आधारित व निष्पक्षपाती असतात हा भ्रम. हीच बाब छायाचित्रांबाबतही. त्यात काही खोटेपणा असू शकतो हे कोणी लक्षातच घेत नाही. प्रोपगंडातज्ज्ञ म्हणूनच त्याचा व्यवस्थित वापर करतात. त्याचेही शास्त्र तयार झाले ते महायुद्धाच्या काळातच..

 

– रवि आमले

ravi.amale@expressindia.com