‘न्यू यॉर्क जर्नल’ आणि  ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’ ही अमेरिकेतील दोन मातब्बर वृत्तपत्रे. एकमेकांची स्पर्धक. नंतर या दोन वृत्तपत्रांतील वादातून पीत पत्रकारिता हा शब्द  पुढे आला. ही पत्रकारिता म्हणजे प्रच्छन्न प्रोपगंडाच.  पुढे त्याचाच वापर या दोन्ही वृत्तपत्रांनी केला तो १८९८च्या स्पॅनिश-अमेरिकन युद्धात..

सध्या माध्यमक्षेत्रात ‘फेक न्यूज’ या विषयाची चर्चा सुरू आहे. अर्थात त्यात काही नवे नाही. माध्यमे सनसनाटी निर्माण करतात, खोटी, अतिशयोक्त माहिती वा अर्धसत्ये प्रसिद्ध करतात असे आरोप पूर्वीही होत असत. तेव्हा त्याला पीत पत्रकारिता म्हणत. ती पत्रकारिताही अंतिमत: ‘अदृश्य सरकार’चेच अस्त्र होती. समाजातील विशिष्ट हितसंबंधांची जपणूक करण्याचे काम ती करीत होती. तिची सुरुवात कधी झाली ते नेमके सांगणे अवघड. तिचे बारसे झाले ते मात्र स्पॅनिश-अमेरिकी युद्धकाळात. माध्यमतज्ज्ञ डॉ. स्यू करी जान्सेन यांनी ‘ऑक्सफर्ड हँडबुक ऑफ प्रोपगंडा स्टडीज’मध्ये ‘न्यूजपेपर वॉर’ अशा शब्दांत त्या युद्धाचे वर्णन केले आहे. त्या सांगतात, ‘राष्ट्रवाद, भांडवलशाही आणि जनसंपर्काची आधुनिक तंत्रे या गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्या अतिशय परिणामकारक युद्धयंत्रणा तयार करू शकतात, हे त्या युद्धाने दाखवून दिले.’ हाच कित्ता पुढे अनेकांनी गिरवला. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे उरी हल्ल्यानंतरचे आपल्याकडील माध्यमांचे वर्तन. अमेरिकेतील त्या वृत्तपत्रीय युद्धात दोन ‘सेनापती’ होते. एकाचे नाव पुलित्झर. दुसरे हर्स्ट.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण

तो एकोणिसाव्या शतकाचा संधिकाल होता. विल्यम रँडॉल्फ हर्स्ट हे तेव्हाचे मोठे वृत्तपत्र प्रकाशक. नुकतेच त्यांनी ‘न्यू यॉर्क जर्नल’ हे वृत्तपत्र ताब्यात घेतले होते. त्यांना स्पर्धा होती जोसेफ पुलित्झर यांच्या ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’ची. माध्यमक्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो तेच हे पुलित्झर. त्यांच्यात तेव्हा जोरदार लढाई सुरू होती. या लढाईची तऱ्हा तीच. आजच्यासारखीच. हर्स्ट यांनी ‘जर्नल’ ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदा काय केले, तर किंमत निम्म्याने कमी केली. पाने तेवढीच, पण मूल्य दोनऐवजी एक पेनी. हा पुलित्झर यांना मोठाच झटका होता. त्याशिवाय हर्स्ट यांनी पुलित्झर यांच्याकडचे चांगले पत्रकारही फोडले. त्याचा ‘वर्ल्ड’च्या दर्जा आणि खपावर परिणाम झालाच. पण अजूनही पुलित्झर यांच्या हातात एक हुकमाचा पत्ता होता. तो म्हणजे रविवारची पुरवणी. ती अतिशय लोकप्रिय होती. त्याचे एक कारण होते त्यातील कार्टून. अध्र्या पानभर असलेली ती ‘होगन्स अ‍ॅली’ नावाची व्यंगचित्रमालिका आणि त्यातील ते अवखळ बालक. त्याचा वाटोळा टकलू चेहरा, पुढे आलेले दोन दात आणि घोटय़ापर्यंत येणारा पिवळा झगा. त्यावरून त्याचे नाव पडले ‘यलो किड’. हर्स्ट यांनी पुलित्झर यांच्या रविवार पुरवणीच्या संपादकाला तर फोडलेच, पण या यलो किडसह त्याचे जनक रिचर्ड एफ ऑऊटकॉल्ट यांनाही त्यांनी आपल्याकडे वळविले. ही मालिका आता हर्स्ट यांच्या पत्रात वेगळ्या नावाने येऊ  लागली. त्यातही यलो किड होताच. शिवाय तो पुलित्झर यांच्या ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’मध्येही होताच. पुढे तर ‘वर्ल्ड’मधील मालिकेत तशी पिवळ्या झग्यातील दोन-दोन मुले दिसू लागली. हे प्रकरण एवढय़ा टोकाला गेले की त्यावर अन्य वृत्तपत्रेही भाष्य करू लागली.

ही दोन्ही पत्रे तशी अगदी प्रतिष्ठित. मातब्बर लेखक, पत्रकार त्यांत लिहीत. गंभीर विषय त्यांत असत. पण सनसनाटी मथळे, तृतीयपर्णी बातम्या, रंगवून मांडलेली गुन्हेवृत्ते ही त्यांची वैशिष्टय़े होती. या व्यंगचित्रवादामुळे या पत्रकारितेला नाव पडले ‘पीतबालक पत्रकारिता’. त्यातील ‘बालक’नंतर गळाले. उरली ती ‘पीत पत्रकारिता’. हर्स्ट यांच्यासोबत काम केलेल्या पत्रकार फ्रेमॉन्ट ओल्डर यांनी त्यांच्या ‘विल्यम रँडॉल्फ हर्स्ट अमेरिकन’ (१९३६) या चरित्रग्रंथात दिलेल्या माहितीनुसार ‘न्यू यॉर्क प्रेस’ या लंगोटीपत्राच्या एव्‍‌र्हिन वार्डमन नामक संपादकाने या वादावर बरीच संपादकीये लिहिली होती. त्यात त्यांनी पहिल्यांदा पीत पत्रकारिता हा शब्द वापरला. ही पत्रकारिता म्हणजे प्रच्छन्न प्रोपगंडाच. खप हा त्याचा हेतू. पुढे त्याचाच वापर या दोन्ही वृत्तपत्रांनी केला तो १८९८च्या स्पॅनिश-अमेरिकन युद्धात.

विल्यम मॅक्किन्ले तेव्हा नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्याच काळात तिकडे क्युबामध्ये स्पॅनिश सत्तेविरोधात वणवा भडकला होता. एकेकाळचे बलाढय़ स्पॅनिश साम्राज्य आता कमकुवत झाले होते. त्याच्या ताब्यातील वसाहती अमेरिकेतील उद्योजकांना खुणावत होत्या. क्युबा ही स्पेनची वसाहत. तेथे अनेक अमेरिकी उद्योजक, व्यावसायिकांच्या मालमत्ता होत्या. व्यवसाय होते. त्या देशातील नागरिकांवर स्पेनने पाशवी अत्याचार चालविले होते. त्या जनतेच्या लढय़ाला पुलित्झर यांची सहानुभूती होती. त्यांच्याप्रमाणेच अनेक सामाजिक-राजकीय नेत्यांची मागणी होती की अमेरिकेने त्यात हस्तक्षेप करावा. सरकार मात्र अजूनही स्पेनला इशारे देण्यापलीकडे काही करीत नव्हते. आता पुलित्झर यांच्याप्रमाणेच हर्स्ट यांनीही तो मुद्दा हाती घेतला. त्यांच्या ‘न्यू यॉर्क जर्नल’च्या पहिल्या पानावर रोज ठळक टंकात छापून येऊ  लागले. – ‘क्युबा मस्ट बी फ्री.’ पण ते एवढय़ावरच थांबले नाहीत. त्यांनी क्युबात आपले दोन प्रतिनिधी पाठविले. कादंबरीकार रिचर्ड डेव्हिस आणि चित्रकार फ्रेडरिक रेमिंग्टन.

आता ‘जर्नल’मध्ये स्पॅनिश अत्याचाराच्या सचित्र कहाण्या प्रसिद्ध होऊ  लागल्या. त्यातील एक चित्र होते क्युबन तरुणीचे. स्पॅनिश सैनिकांच्या गराडय़ात ती तरुणी. नग्न. तिची वस्त्रे इतस्तत: पडलेली. ते सैनिक तिची अंगझडती घेत आहेत. ‘जर्नल’मध्ये पाच स्तंभांत प्रसिद्ध झालेल्या या चित्राने मोठी खळबळ माजली. पण तरीही सरकार शांतच होते आणि पुलित्झर आणि हर्स्ट यांच्यात रोजच्या रोज सनसनाटी बातम्या, प्रक्षोभक लेख प्रसिद्ध करण्याची स्पर्धा सुरू होती. विरोधकांचे राक्षसीकरण हे प्रोपगंडाचे एक तंत्र. हर्स्ट आणि पुलित्झर यांनी त्याचा पुरेपूर अवलंब केला. अमेरिकी जनतेसमोर त्यांनी स्पॅनिश दानव उभा केला.

तशात हर्स्ट यांच्या हाती लागले अमेरिकेतील स्पॅनिश राजदूत एनरिके डेलोमे यांचे पत्र. त्यात डेलोमे यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांचा ‘कमकुवत आणि लोकप्रियतेसाठी हपापलेले’ अशा शब्दांत उद्धार केला होता. मनमोहन सिंग यांना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ ‘देहाती औरत’ असे म्हणाल्याचे नरेंद्र मोदी यांनी एका प्रचारसभेत जाहीर केल्यानंतर भारतात त्याची जशी संतप्त प्रतिक्रिया उमटली, तसेच तेव्हा अमेरिकेत झाले. फक्त ते पत्र खरे होते आणि मोदी यांनी गुजरात दंगलीबाबत बोलताना ज्या प्रमाणे कुत्र्याच्या पिल्लाचा दाखला दिला होता, तसाच ‘देहाती औरत’ हाही शरीफ यांनी दिलेला दाखला होता. ती उपमा नव्हती. पण मोदी यांच्या प्रचारयंत्रणेने राष्ट्रवादी भावनांना फुंकर घालण्यासाठी त्याचा पद्धतशीर वापर केला. हर्स्ट यांनी ते पत्र छापून तेच केले. अमेरिकेत संतापाची लाट उसळली. त्यात भर पडली हवाना बंदरात ‘मेन’ हे अमेरिकी जहाज बुडाल्याच्या बातमीने.

क्युबातील अमेरिकी हितसंबंधांच्या रक्षणासाठी अमेरिकेने ही युद्धनौका पाठविली होती. १५ फेब्रुवारी १८९८च्या रात्री अचानक स्फोट होऊन ती बुडाली. त्या स्फोटाचे कारण तेव्हा अस्पष्टच होते. पण हर्स्ट यांनी बातमी दिली, स्पॅनिश पाणसुरुंगामुळे ती बुडाल्याची. काही पत्रांनी तर स्पॅनिश सैनिक जहाजाखाली जाऊन सुरुंग पेरत आहेत अशी चित्रेच प्रसिद्ध केली. पुढे समजले की तो स्फोट जहाजातल्या कोळशाला लागलेल्या आगीमुळे झाला होता. पहिल्या महायुद्धातील ल्युसितानिया प्रकरणाशी प्रचंड साम्य असलेले हे प्रकरण. त्यावरून हर्स्ट आणि पुलित्झर यांनी प्रचाराचे वादळ उठविले. एकीकडे ते अशा सनसनाटी बातम्यांतून, लेखांतून, चित्रांतून स्पेन हे कसे क्रूर आणि अत्याचारी राष्ट्र आहे हे वाचकांच्या मनावर बिंबवत होते. त्यातून त्यांनी पद्धतशीरपणे अमेरिकेतील नागरिकांच्या राष्ट्रवादी भावना भडकावल्या. क्युबामध्ये अमेरिकेतील उद्योजक, व्यावसायिकांचे हितसंबंध होते. सर्वसामान्य नागरिकांना त्याच्याशी फारसे देणेघेणे नव्हते. पण हर्स्ट आणि पुलित्झर यांच्या प्रचारामुळे लोकमानसात लोकशाहीवादी, स्वातंत्र्यवादी, राष्ट्रवादी भावनांचे वादळ उठले. त्या भावनांचा दबाव सरकारवर आणण्यात आला. अखेर त्या पिवळ्या प्रचारापुढे सरकारला झुकावे लागले.

रवि आमले ravi.amale@expressindia.com