‘‘तुम्हाला खऱ्या फुलांची आणि मार्केटमध्ये मिळणाऱ्या चविष्ट मिठायांची अ‍ॅलर्जी आहे का?’’

आमचे स्नेही करवादले. त्यांचा राग अगदीच अनाठायी नव्हता. पटकन हातावेगळ्या होणाऱ्या एका लहानशा गोष्टीसाठी आम्ही त्यांना कामाला लावले होते. आणि त्यांच्या मते त्यामध्ये सर्वाचेच श्रम, वेळ व पैसे वाया जाणार होते. एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रमुख अतिथींचा सत्कार, त्यांच्यासाठी व आयोजित केलेल्या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वासाठी भेटवस्तू, विजेत्यांसाठी बक्षिसे काय द्यायची, यावर चर्चा सुरू होती आणि तेथे हा प्रेमळ संवाद सुरू झाला.

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती

साधारणत: पुष्पगुच्छ, शाली, श्रीफळ, घाऊक प्रमाणात मिळू शकणाऱ्या विविध प्रकारच्या भेटवस्तू यांवर शिक्कामोर्तब झाले की भराभर कामांची विभागणी होऊन एका महत्त्वाच्या विषयाला पूर्णविराम मिळतो. पण आम्ही जरा वेगळे पर्याय सुचवले आणि विषय संपायचा राहिला.

बाजारात तयार मिळणाऱ्या ताज्या पुष्पगुच्छांऐवजी आम्ही कापडी फुलांचा पर्याय समोर ठेवला. त्यामागे व्यावहारिक व तात्त्विक अशी दोन्ही कारणे होती. एकतर बहुतांश कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी पुष्पगुच्छ तेथेच ठेवून देतात, बरोबर घेऊन जाण्याचे विसरतात किंवा टाळतात. त्यांचे काय करायचे? आणि समजा घेऊन गेलेच तर दुसऱ्या दिवशी ते केराच्या टोपलीतच जातात ना? ताज्या फुलांवर अक्षरश: वायफळ खर्च केला जातो. शिवाय पर्यावरणाची हानी होते ती वेगळीच! एवढय़ा प्रचंड प्रमाणात फुलांची तोड करून आपण नैसर्गिक परागीभवनाच्या प्रक्रियेत अडथळे आणतो, कीटक, फुलपाखरे यांचे अन्न हिरावून घेतो आणि एकूणच निसर्गसाखळीमध्ये असंतुलन निर्माण करतो. त्यापेक्षा दीर्घकाळ टवटवीत राहणाऱ्या कापडी फुलांचा वापर का करू नये? अर्थात कापडी फुले हा आमच्या दृष्टीने नकारात्मक पर्याय नाही. त्यामागे काही ठोस कारणे आहेत.

अनाथ, अपंग, शारीरिक मानसिकदृष्टय़ा विकलांगांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था त्यांच्या मुला-मुलींना कापडी फुले बनवण्याचे प्रशिक्षण देतात. त्यांचा वापर करून आपण त्यांच्या उत्पादनांना व्यवसाय व कलाकारीला व्यासपीठ असे दोन्ही उपलब्ध करून देऊ  शकतो. आमचा अनुभव तर यापुढेच आहे. अशी वेगवेगळी कापडी फुले बघून आमच्या परिचयातील कितीतरी गृहिणी, तरुण मुली पुढे सरसावल्या आणि आपल्या कल्पकतेने त्यांनी फुलांचे व पुष्पगुच्छांचे अनेक सुंदर प्रकार तयार केले. आमच्या अनेक कार्यक्रमांसाठी तर त्या फुले तयार करून देतातच, पण त्यांच्या उत्पादनांना आता बाहेरची मागणीसुद्धा येऊ  लागली आहे; त्यांना घरबसल्या रोजगार उपलब्ध झाला आहे. यातली एक अभिनव कल्पना तर सर्वाना सांगायलाच हवी. लग्नांमध्ये नवरानवरी एकमेकांना हार घालतात, हे आपल्याला माहिती आहे. पण आमच्या एका मैत्रिणीने तिच्या जवळच्या नातलगांच्या लग्नात कापडी फुलांचा केवळ एकच मोठा हार तयार केला व तो नवरानवरी दोघांना मिळून घातला. त्या फुलांचे सौंदर्य जसे दीर्घकाळ टिकते तसेच वैवाहिक नात्यातील माधुर्य दीर्घकाळ टिको या सदिच्छेने!

ही फुले व पुष्पगुच्छ आम्ही ज्यांना देतो त्यांच्याप्रती आम्ही हीच भावना व्यक्त करतो व आम्हाला प्रतिसादही छान मिळतो. मुळात, आपल्यासाठी कोणीतरी खास विचार करत आहे, ही जाणीवच लोकांना सुखद असते.

जी गोष्ट फुलांची, तीच मिठायांची. आलेल्या अतिथींचे तोंड गोड करण्यासाठी आपण बाजारातील तयार मिष्टान्न वापरू शकतो, सर्वच दृष्टींनी ते सुटसुटीत असते. पण खाद्यपदार्थामधील भेसळ, कृत्रिम खाद्यघटकांचा वापर, त्यातून आरोग्याला पोचणारी हानी या सर्वाचा गंभीरपणे विचार करताना आमच्यापैकी काही जणांच्या डोक्यात काही नवीन कल्पना आल्या. सोलार ड्रायरवर चिकू, पपनस, आवळा यांच्या कँडी तयार करून आम्ही त्या कार्यक्रमात वाटायला सुरुवात केली. त्याच पद्धतीने हापूस आंब्याच्या गरापासून टॉफीज तयार करून त्यांची सजवलेली परडी विशेष अतिथींसाठी खास भेट म्हणून द्यायला सुरुवात केली. या कुठल्याच पदार्थामध्ये कृत्रिम किंवा हानिकारक घटक नसतात. सोलार ड्रायरच्या वापरामुळे ते रासायनिक व पर्यावरणदृष्टय़ा सुरक्षित असतात; आणि मुख्यत: त्यातले नावीन्य व अकृत्रिम स्नेह समोरच्या व्यक्तींपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही.

आमच्या प्रेमसिंचन करणाऱ्या अनेकविध कार्यक्रमांमध्ये आम्ही कापडी फुले व अशा वेगवेगळ्या कँडीज यांचा आवर्जून वापर करतो. एका वर्षी रिक्षावाल्यांसाठी तिळगूळ समारंभ करताना एका लहान मुलीने एक वेगळी कल्पना सुचवली. रिक्षाचालकांना द्यायच्या भेटकार्डावर एक लहानशी प्लास्टिकची रिक्षा चिकटवायची. त्या वर्षी सर्व रिक्षावाल्यांना संक्रांतीच्या दिवशी रिक्षा चिकटवलेले, कापडी फुल जोडलेले भेटकार्ड व त्याबरोबर घरचा तिळगूळ असे हातावर ठेवले. इतके सजवलेले कार्ड बघून त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यांवरून ओसंडून वाहात होता. मग काय? टॅक्सीचालक, बसचे चालक वाहक, पोस्टमन यांच्यासाठी कार्यक्रम करताना आम्ही ही कल्पना वेगवेगळ्या प्रकारे राबवली. टॅक्सीचालकांसाठी टॅक्सीची प्रतिकृती, पोस्टमन्ससाठी एक वर्ष पोस्टाच्या पेटीची प्रतिकृती, त्यानंतर पोस्टाच्या पेटीच्या डिझाइनचे कार्ड, बस वाहकचालकांसाठी एक वर्ष बसच्या डिझाइनचे कार्ड, त्यानंतर बसची मोठय़ा आकाराची पुठ्ठय़ाची प्रतिकृती अशा भेटवस्तू त्यांना देऊन त्यांच्यासाठी तो तो दिवस संस्मरणीय केला. हे आमचे शब्द नाहीत, तर त्यांच्याच भावना आहेत.

हा सगळा नस्ता उपद्व्याप आहे का? म्हटलं तर हो, पण गोड उपद्व्याप आहे. आपण कुठलाही कार्यक्रम करताना केवळ उरकल्याच्या भावनेने करण्यापेक्षा किंवा पैसे आहेत, कसेही उधळा अशा वृत्तीने करण्यापेक्षा कार्यक्रम केल्याचे सर्वानाच समाधान मिळेल, या पद्धतीने केला, तर त्यात सर्वाचा मनापासून सहभाग मिळतो. वैज्ञानिक दृष्टिकोन, नावीन्याचा शोध घेण्याची वृत्ती व भावनिक गुंतवणूक यांचा योग्य समन्वय केला, तर कुठल्याही कार्यक्रमात उपहार हा उपचार राहात नाही, ती मनापासून दिलेली भेट ठरते. आपल्यालासुद्धा अशीच भेट आवडते ना?
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com