‘‘आज आम्हाला काहीतरी मोठ्ठं बक्षीस मिळायला हवं, एवढा पराक्रम आम्ही केला आहे.’’

‘‘अरे वा! आम्हाला ऐकवा तरी.’’

‘‘आज आम्ही दादरपासून बोरिवली नॅशनल पार्कपर्यंत बेस्ट बसने प्रवास केला. आमच्या नात्यातल्या एका वृद्ध मावशींना आणायचे होते. लोकल ट्रेनमध्ये चढणे शक्य नाही, टॅक्सी त्यांना नको होती. म्हणून त्यांच्याबरोबर बसने आमचीही यात्रा निघाली. हॉरिबल टाइम! गर्दी, प्रदूषण, ट्रॅफिक जॅम्स, सिग्नल्स आणि भरीसभर म्हणून खड्डय़ांनी चाळण झालेले रस्ते. एरवी कधी बसने प्रवास करायची वेळ येत नाही हे अगदी भाग्यच आमचं.’’

‘‘दहा लाखांपेक्षा अधिक मुंबईकर रोज बसने प्रवास करतात. ते तुमच्याएवढे भाग्यशाली नाहीत म्हणायचे.’’

‘‘एवढय़ा सर्वाचा विचार करणं आम्हाला शक्य नाही. पण आता यानंतर बसच्या प्रवासाच्या बाबतीत अगदी कानाला खडा.’’

‘‘काय हो, तुम्ही बसने आलात तेव्हा या सर्व कटकटींना ड्रायव्हर-कंडक्टर म्हणजेच वाहक-चालकसुद्धा कंटाळले असतील ना? ड्रायव्हर खड्डय़ांतून मुद्दाम जोरात नेत असेल, कंडक्टर प्रवाशांशी हुज्जत घालत असेल?’’

त्यांनी काही क्षण विचार केला आणि मग अगदी उस्फूर्तपणे म्हणाले  ‘‘ती एक आश्चर्यकथाच आहे. इतक्या सगळ्या वैतागवाडी प्रवासात ते दोघं अगदी शांतपणे आपलं काम करीत होते. ड्रायव्हर त्याच्या कौशल्याने खड्डय़ांतून रस्ता शोधत होता. कंडक्टरही सगळ्या गर्दीला बरोब्बर तोंड देत होता. बेस्टने आपल्या कर्मचाऱ्यांना स्थितप्रज्ञतेचे किंवा मेडिटेशनचे धडे द्यायला सुरुवात केली की काय?’’

‘‘मग बसमधून उतरताना तुम्ही त्या दोघांना थॅँक यू म्हटलंत की नाही?’’

आमच्या अतिचौकस प्रश्नाने ते अगदी ओशाळले.

‘‘नाही हो, इतक्या दमवणाऱ्या प्रवासानंतर असे एटिकेट्स पाळायचं भान राहिलं नाही.’’

यातला गमतीचा भाग सोडला तर ड्रायव्हर्स व कंडक्टर्स यांच्या बाबतीतील त्यांचं निरीक्षण बहुतांशी खरं आहे. मुंबईसारख्या गर्दीने गच्च भरलेल्या आणि ओसंडून वाहणाऱ्या शहरात बस चालवणं, रस्त्यांमधले खड्डे चुकवणं आणि तरीही वेळापत्रक पाळणं, बसमध्ये चढणाऱ्या सर्व नमुनेदार प्रवाशांना तिकिटं देणं, एवढय़ा अलोट गर्दीत सुट्टय़ा पशांचा हिशोब ठेवणं इत्यादी अनेक गोष्टी बसचे वाहक-चालक लीलया व हसतमुखाने करीत असतात. त्यांच्या आस्थापनेतील कार्यपद्धती पाहिली तर निदान या पातळीवर भ्रष्टाचाराला संधी नसते. आणि त्यांची सौजन्यपूर्ण वागणूक पाहिली तर हे सर्व काम ते केवळ पगारासाठी करतात, असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल.

आम्हाला या वाहक-चालकांच्या सहृदयतेचा अनुभव आला तो २६ जुल २००५ च्या भीषण प्रलयात. त्या रात्री मुंबई शहर व परिसर जवळपास जलसमाधीलाच पोहोचले होते. पण त्यावेळी जागोजागी अडकून पडलेल्या मुंबईकरांना रात्रभराचा निवारा देण्यात, शक्य असेल त्याप्रमाणे इंचइंचाने चढत जाणाऱ्या पाण्यातून बसेस चालवण्यात व प्रवाशांना निदान कुठेतरी घराच्या जवळपास सोडण्यात वाहक-चालकांनी पुढाकार घेतला होता. आणि हे सर्व त्यांनी कुठल्याही अपेक्षेने नव्हे तर, चांगुलपणाच्या स्वयंप्रेरणेतून केलं. हा फारच टोकाचा प्रसंग होता, पण त्यांच्या चांगुलपणाचा अनुभव एरवीसुद्धा प्रवाशांना येत असतो.

‘‘हो हो, आणि त्यांच्या नाठाळपणाचा आणि खडूसपणाचाही अनुभव कित्येकांना येतो, बरं का!’’

‘‘अर्थातच, प्रत्येक माणसांत काळी-पांढरी अशा दोन्ही बाजू असतात. त्यांच्या वागण्याचा जेव्हा लोकांना त्रास होतो; तेव्हा भांडणं, शिव्यागाळी ही सर्व शस्त्रं वापरली जातात. हो ना? आणि जेव्हा त्यांचं सौजन्य आपल्या वाटय़ाला येतं, तेव्हा आपण काय करतो?’’

खरं म्हणजे काहीच करत नाही किंवा ते सौजन्य हा आपला हक्क असल्यासारखे वागतो. पण आमच्या काही समविचारी मित्रांनी या सौजन्याला प्रेमाने प्रतिसाद देण्याचं ठरवलं. दरवर्षी- ९ ऑगस्ट या दिवशी मुंबईतील सर्व बसडेपोंमध्ये अगदी सकाळी, म्हणजे त्यांच्या फेऱ्या सुरू होण्यापूर्वी पोचायचे, आगारातून बस घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहक -चालकाला एक फूल, भेटकार्ड व मिठाई आणि दिवसभरासाठी शुभेच्छा द्यायच्या. सर्व बसेस निघाल्यानंतर त्या आगाराच्या प्रमुखांना जाऊन भेटायचे, त्यांनाही हे सर्व आणि एक लहानशी प्रेमाची भेट द्यायची. तेथे असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे मोबाइल्स, पट्टे, बिल्ले आणि इतरही वस्तू आमच्या खास द्रावणाने र्निजतुक करून द्यायचे आणि हे सर्व आटपून जेमतेम ३५-४० मिनिटांत आगारातून बाहेर पडायचे. कारण त्यांच्या कामाबद्दल त्यांना ‘थॅँक यू’ म्हणताना त्यांच्याच वेळेचा अपव्यय करणे योग्य नाही.

या कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षी सर्वच आगारांतील कर्मचारी भारावून गेले आणि आश्चर्यचकितही झाले. ‘‘आम्हाला आजपर्यंत कोणी एवढी प्रेमाची वागणूक दिली नाही’’ अशीच त्यांची भावना होती. आता मात्र सर्वजण आमची आतुरतेने वाट पाहतात. आम्हाला त्याचा आनंद होतो.

९ ऑगस्ट या दिवशी हा कार्यक्रम करण्याचे एक खास कारण आहे. आपल्या स्वातंत्र्यलढयाच्या इतिहासात हा क्रांतीदिन म्हणून ओळखला जातो. ब्रिटिशांना १९४२ साली या दिवशी ‘चले जाव’ असे आपण ठणकावून सांगितले. आता आपल्या स्वतंत्र राष्ट्रात आपल्याला प्रगतीची प्रतीके असणाऱ्या सेवांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलच्या आपल्या संकुचित व पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीला ‘चले जाव’ म्हणण्यासाठी हा दिवस आम्ही वा-चांना समर्पित केला.

गेली अनेक वष्रे हा कार्यक्रम सुरू आहे आणि आता केवळ मुंबईतील बसआगारे नव्हे, तर ठिकठिकाणच्या एस.टी.च्या आगारांमध्येही हा कार्यक्रम तितक्याच आत्मीयतेने केला जातो. आमच्या प्रेमाची युनियन वाहक-चालकांच्या हृदयात उभारणारा हा अनोखा प्रेमाचा प्रयोग!
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com