31-lp-minal‘तुम्ही विशेष मुलांच्या विशेष गावाबद्दल ऐकलं आहे का?’

‘विशेष मुलं म्हणजे?’

‘आपल्याला सर्वसामान्यत: जी गतिमंद, मतिमंद म्हणून माहीत असतात अशी मुले.’

‘आणि त्यांचं विशेष गाव? आज काय सकाळपासून आमच्याशिवाय कोणी भेटलं नाही का?’

‘ही थट्टा नव्हे. अशा विशेष गावाची योजना खरोखरच आकाराला येत आहे.’

‘गतिमंदांसाठी काम करणाऱ्या नामवंत संस्थांबद्दल आम्ही ऐकलं आहे. या संस्था खरोखरच मोठं काम करत असतात. अन्यथा या दुर्दैवी आणि असहाय मुलांचं या जगात कसं होणार?’

‘आपल्याला या मुलांबद्दल काय माहिती आहे?’

‘त्यांच्याबद्दल काय माहिती असायचंय? ज्यांना बुद्धी नाही, स्वत:चं काही भान नाही, त्यांच्याबद्दल काय माहिती करून घ्यायचं? तो काय एवढा महत्त्वाचा विषय आहे का? ज्यांच्या पोटी अशी मुलं जन्माला येतात त्यांच्या कमनशिबीपणाचं वाईट वाटतं. दया येते त्यांची आणि अशा मुलांचीसुद्धा.’

दयेशिवाय दुसरी काही भावना समाजामध्ये दिसते का या भिन्नमती मुलांबद्दल? यांच्याबद्दल आपण काय काय ऐकतो! अनेकदा आई-वडिलांची त्यांच्याबद्दलची घृणा किंवा ओझं पडल्याची भावना, अनेकदा त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचे प्रयत्न, अगदी त्या टोकाला गेले नाहीत तर आयुष्यभर या मुलांची काळजी, आपल्यानंतर यांचं कसं होणार ही सतत भेडसावणारी चिंता, त्यांना बरोबर घेऊन वावरताना मनात असणारी ओशाळलेपणाची, लाजिरवाणेपणाची भावना.. एक ना अनेक!

बरं, हे फक्त त्यांचे जन्मदाते आणि त्यांची मुले यांच्याबद्दल झाले. घराबाहेरील समाज निष्ठुरच असतो. भिन्नमती मुलांची टिंगळटवाळी, त्यांना टाळण्याचा केला जाणारा प्रयत्न, त्यांच्या असहायतेचा घेतला जाणारा फायदा, त्यातून मतिमंद बालक मुलगी असेल तर परिस्थितीचा वाढणारा गंभीरपणा, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांमधून नियमानुसार १८व्या वर्षी- बाहेर पडावे लागल्यावर ‘पुढे काय?’ हा आ वासून उभा राहणारा प्रश्न- मारुतीच्या शेपटीसारखी वाढत जाणारी आव्हाने.

भिन्नमती व्यक्तींचे वाढत्या वयातील प्रश्न, त्यांचे लैंगिक आयुष्य, उपजीविकेची समस्या हे त्यांचे आई-वडील व समाज दोहोंपुढील समान प्रश्न आहेत.

पण समाज जसा निष्ठुर आणि निर्दय आहे तसाच काही सहृदय व संवेदनशील व्यक्तींनीसुद्धा बनलेला आहेच ना आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे, त्यांनी चालवलेल्या उपक्रमांमुळे भिन्नमती मुलांबाबतच्या परिस्थितीत थोडा बदल होऊ लागला आहे. शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे निदान शहरी व निमशहरी भागात या विशेष मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. पूर्वीत्यांची गणना सरसकटपणे ‘वेडा/ वेडी’ या सदरात होई. त्यांच्यावर काही इलाज होऊ शकतो याविषयी अज्ञानच होते आणि त्यांच्या वागण्याचा त्रास अस झाला की, त्यांना अमानुष मारहाण होत असे. आता हे चित्र बदलत आहे. त्यांच्यावर उपचार केले जातात. त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारे प्रशिक्षित झालेले असे शिक्षक नेमले जातात आणि बरंच काही. यामुळे वातावरण निवळायला प्रारंभ झालेला आहे; मात्र तरीही आमूलाग्र बदल झाला आहे, असे म्हणता येणार नाही. त्यांच्या बाबतीत असणाऱ्या सामाजिक प्रश्नांचे गांभीर्य जैसे थेच आहे.

कदाचित त्यातला मूलभूत मुद्दा असा असेल की, जोपर्यंत आपण या विशेष मुलांकडे दयेच्या भावनेने बघत आहोत, तोपर्यंत समस्या आहे त्या स्थितीतच राहील, कदाचित वाढेलसुद्धा. आपण जर या मुलांकडे काही विशेष क्षमता असणारी मुले म्हणून पाहिले आणि त्या क्षमता विकसित करण्यासाठी साहाय्यकाची भूमिका निभावली तर चित्र वेगळे दिसेल.

‘तुमचं आपलं नेहमीच काही तरी उफराटं! त्यांच्यात कसल्या आल्या आहेत विशेष क्षमता? स्वत:च स्वत:ला धड सांभाळता येत नाही त्यांना.’ स्नेही उसळलेच.

‘एक उदाहरण ऐका. काही दिवसांपूर्वी एका संस्थेत भिन्नमती मुलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. तेथे या मुलांसाठी स्मरणशक्ती स्पर्धा ठेवली होती. त्यांना २५ वस्तू दाखवून नंतर त्यांना किती लक्षात राहतात अशी ती स्पर्धा होती. ती स्पर्धा झाली, कार्यक्रम संपला आणि नंतर जरावेळाने एका स्पर्धक मुलीने सर्व २५ वस्तूंची नावे बिनचूक सांगितली. तिला विचारले, ‘अगं, मघा स्पर्धेच्या वेळेस का नाही सांगितलीस?’ तर त्यावर नुसतं निरागस हास्य. जणू म्हणत होती, ‘तेव्हा मूड नव्हता!’ म्हणजे आपण समजतो, तशी ही ‘बिनडोक’ नसतात. प्रत्येकात काही तरी हुन्नर असतेच. ती हुन्नर फुलवण्याचे काम आपण करायला हवे. ते केल्यास ती पुढे जाऊन आत्मनिर्भर होऊ शकतील. आपल्या विशेष गावाचा गाडा स्वत: हाकण्याइतकी सक्षम होतील. त्यांना स्वयंपूर्ण करणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे.’

‘ही जरा अतिशयोक्ती किंवा युटोपियन ड्रीम आहे असे नाही का वाटत तुम्हाला?’ स्नेह्यांचा संशयवाद.

‘असेल किंवा नसेल, पण पोहायचं असेल तर पाण्यात बुडी मारायलाच हवी ना? त्याविषयीची आणखी माहिती ऐका-

आमच्या ओळखीचे एक बासरीवादक कलाकार आहेत, अगदी ऋषितुल्य! त्यांचा असा अनुभव आहे की, अशा विशेष व्यक्तींना बासरीवादन ऐकवले की त्यांच्यातील हिंसकपणा, चंचलता कमी होते.’

‘हां- म्युझिक थेरपी-’

‘नाही, ही थेरपी नव्हे, भिन्नमती मुले मानसिकदृष्टय़ा शरीरापासून भिन्न असतात. त्यामुळे बासरीचे स्वर त्यांना कानांनी ऐकू येत नाहीत तर त्यांना थेट भिडतात. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या वृत्ती शांत होतात, असा त्यांचा अनुभव आहे.’

हा विषय गहन व महत्त्वाचा आहे. भिन्नमती मुलांविषयी असा प्रयोगशील दृष्टिकोन ठेवणारा एक राष्ट्रीय मेळावा नुकताच रायपूरमध्ये झाला व त्याचे सर्व थरांतून कौतुक झाले.

मतिमंदांच्या क्षमतांना आपण प्रेमाने साद घातली, त्यांचे देवदूत बनण्याचा प्रयत्न करता साहाय्यक बनलो, तर त्यांचाही तसाच प्रेमाने प्रतिसाद येईल, हे निश्चित!
डॉ. मीनल कातरणीकर  – response.lokprabha@expressindia.com