पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात प्रवेश समितीने बदल केले. पाचव्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील शनिवारी (३० जुलै) जाहीर करण्यात येणार आहे. विविध कारणांमुळे प्रवेश न मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीत समाविष्ट करण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळानंतर केंद्रीय प्रवेश समितीने प्रवेश प्रक्रियेचे नवे वेळापत्रक शुक्रवारी रात्री जाहीर केले. पाचवी फेरी शनिवारपासून (३० जुलै) सुरू होणार असून रिक्त जागांचे तपशील सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहेत. त्यानंतर १ आणि २ ऑगस्टला सकाळी ११ ते सायकांळी ४ वाजेपर्यंत अर्ज भरायचे आहेत. पाचवी फेरी दोन भागांत होणार आहे. या फेरीच्या पहिल्या भागांत म्हणजे ‘अ’ भागांत दूरचे महाविद्यालय मिळालेले, प्रवेश निश्चित न केल्यामुळे प्रक्रियेच्या बाहेर पडलेले, शाखा किंवा माध्यम बदलून हवे असणारे अशा कोणत्याही कारणासाठी महाविद्यालय बदलून हव्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि चार फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या १४२ विद्यार्थ्यांना पहिल्या भागात प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांनी आपले जुनेच लॉगइन वापरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरायचे आहेत. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ४ ऑगस्टला सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. गुणवत्ता यादीनुसार ४ आणि ५ ऑगस्टला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचे आहेत. पाचव्या फेरीच्या दुसऱ्या भागांत म्हणजे ‘ब’ भागांत अर्ज न केलेल्या, अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनी नवे माहितीपुस्तक घेऊन अर्ज भरायचा आहे. अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी जुनेच लॉग इन वापरून अर्ज पूर्ण करायचा आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता जाहीर होणार असून ८ आणि ९ ऑगस्टला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करायचे आहेत. विशेष फेऱ्यांची सुरुवात १० ऑगस्टपासून होणार आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक पाचवी फेरी

रिक्त जागांचा तपशील – ३० जुलै, सकाळी ११

अर्ज भरणे किंवा पूर्ण करणे – १ व २ ऑगस्ट, सकाळी ११ ते सायंकाळी ४

‘अ’ भागाची गुणवत्ता यादी – ४ ऑगस्ट, सकाळी ११

‘अ’ भागातील प्रवेश – ४ आणि ५ ऑगस्ट, सकाळी ११ ते सायंकाळी ५

‘ब’ भागाची गुणवत्ता यादी – ८ ऑगस्ट, सकाळी ११

‘ब’ भागाचे प्रवेश – ८ ऑगस्ट सकाळी ११ ते सायंकाळी ५ आणि ९ ऑगस्ट, सकाळी १० ते दुपारी ३

माहिती पुस्तके मिळण्याचे केंद्र

एस. एम. जोशी कनिष्ठ महाविद्यालय, हडपसर

हुजूरपागा कनिष्ठ महाविद्यालय, लक्ष्मी रस्ता

म्हाळसाकांत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय, आकुर्डी

अर्ज निश्चित करण्याची केंद्रे

साधना कनिष्ठ महाविद्यालय, हडपसर

नूमवि मुलांची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, बाजीराव रस्ता

प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, निगडी

हे लक्षात ठेवा

  • अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनी शंभर रुपये भरून माहिती पुस्तक आणि लॉग इन आयडी घ्यावा
  • आरक्षणाची सुविधा घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित करून घ्यावा
  • कमीत कमी ५ महाविद्यालयांचा आणि जास्तीत जास्त १५ महाविद्यालयांचा पसंतीक्रम द्यावा
  • पसंती क्रम भरताना आपले गुण, महाविद्यालयाचे तिसऱ्या फेरीचे कट ऑफ गुण, विषय, माध्यम, अंतर, शुल्क हे तपशील लक्षात घ्यावेत
  • रिंक्त जागांचे तपशील आणि महाविद्यालयाचे संकेतांक (कॉलेज कोड) http://pune.fyjc.org.in या संकेतस्थळावर पाहता येतील.