अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत गेल्या दोन वर्षांच्या गोंधळाची पुनरावृत्ती यंदाही झाली आहे. पसंतीचे महाविद्यालय मिळाले तर विषय नाहीत, ‘बेटरमेंट’ची संधी मिळाली, पण महाविद्यालय हवे ते मिळाले नाही, अशा कारणांमुळे विद्यार्थी नाखूष आहेत. याचवेळी प्रवेश घोळामुळे महाविद्यालयांमधील अध्यापन सुरू होत नाही, म्हणून शिक्षकही नाराज, असे चित्र सध्या आहे. ज्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रवेश घेतला, त्यांनाही काहीतरी चुकल्याचे वाटू लागले आहे. प्रवेश न मिळालेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी गुरुवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर रास्ता रोको केले.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ आहे. प्रवेश ) मिळूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना उपसंचालक कार्यालयाने प्रवेशाची एक संधी दिली. प्रवेश मिळूनही न घेतलेले १४ हजार ९५४ विद्यार्थी होते. त्यापैकी १० हजार ५६२ विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा महाविद्यालय देण्यात आले; मात्र आता या मिळालेल्या महाविद्यालयावरही विद्यार्थी आणि पालक नाराज आहेत. यंदा पसंतीक्रमानुसार वरचे महाविद्यालय मिळवण्याची एकच संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती; मात्र एकच संधी असल्यामुळे हवे ते महाविद्यालय मिळू शकले नाही. त्याचप्रमाणे अनेकांना या प्रक्रियेत ‘बेटरमेंट’ची संधी न मिळाल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

प्रक्रिया न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयांत प्रवेश देताना, ज्या ६६ हजार विद्यार्थ्यांनी आजवर प्रक्रियेनुसार प्रवेश घेतला, त्यांच्यावर अन्याय होणार असल्याने हे विद्यार्थी नाराज आहेत. ‘विद्यार्थ्यांचे म्हणणे शासनाला कळवून शासनाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल,’ असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले

नव्या महाविद्यालयांमुळे गोंधळात भर

प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यांत असताना नवी महाविद्यालये आणि तुकडय़ांसाठी मंजुरी मिळाली आहे. २३ नवी महाविद्यालये आणि १४ तुकडय़ांना मंजुरी मिळाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील एकूण दोन हजार जागा वाढत आहेत. पाचवी फेरी झाली की घेण्यात येणाऱ्या विशेष फे ऱ्यांमध्ये या जागांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाढलेल्या जागांमध्ये कोटय़ाचाही समावेश करण्यात येणार आहे. या जागांमध्ये ‘इनहाऊस’ कोटय़ाचेही प्रवेश करता येणार आहेत. वाढलेल्या जागांमध्ये काही नामांकित महाविद्यालयांचाही समावेश आहे.

महापौरांची भेट

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या पालकांची महापौर प्रशांत जगताप यांनी गुरूवारी भेट घेतली. ‘पालक आणि विद्यार्थ्यांच्या संतापाचा आता उद्रेक झाला आहे. ज्या वयात शिकायचे त्या वयात विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागत आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतच बदल करण्याची गरज आहे,’ असे जगताप यांनी या वेळी सांगितले.

पुढील प्रक्रिया कशी असेल?

  • ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशच मिळाला नाही किंवा अर्जातील त्रुटींमुळे प्रवेश प्रक्रियेत समावेश झाला नाही, अर्जच भरला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी पाचवी फेरी.
  • पाचव्या फेरीनंतर तीन विशेष फे ऱ्यांचे आयोजन.
  • रिक्त जागा आणि महाविद्यालये वाढल्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या जागांचा या फे ऱ्यांमध्ये समावेश करण्यात येईल.
  • विशेष फे ऱ्यांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र लॉग इन आणि पासवर्ड देण्यात येईल.
  • विशेष फेरीसाठी विद्यार्थ्यांनी कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त १५ महाविद्यालयांचा पसंतीक्रम द्यायचा आहे.
  • महाविद्यालयाच्या दुसऱ्या नियमित फेरीतील ‘कट ऑफ’ गुणांनुसार विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम द्यायचा आहे.
  • या फेरीत प्रवेश मिळाल्यास आधी मिळालेला प्रवेश रद्द करता येईल. आधी भरलेल्या शुल्कातील २०० रुपये वजा करून बाकीचे शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळेल.

सध्या पालकांच्या मागणीनुसार सर्वाना एकदम प्रवेश दिल्यास विद्यार्थी आणि पालकांना फक्त अर्ज भरण्याची संधी मिळाल्याचे समाधान मिळेल. त्या ऐवजी पाचव्या फेरीनंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त राहणाऱ्या जागांची नेमकी माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यास त्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळू शकेल. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी संयम ठेवावा.

– विनोद तावडे, शिक्षणमंत्री