अकरावीला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका घेण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने महाविद्यालयांना केल्या आहेत. विज्ञान आणि वाणिज्य विद्याशाखांसाठी घेण्यात येणाऱ्या या जादा तासिकांना विद्यार्थ्यांकडून मात्र फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावी प्रवेशाच्या चार केंद्रीय प्रवेश फेऱ्या होऊनही विविध कारणांमुळे हजारो विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. मात्र, चार प्रवेश फेऱ्यांनंतर आता महाविद्यालयांतील अध्यापन सुरू झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी जादा तासिका घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने महाविद्यालयांना केल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील तीन महाविद्यालयांमध्ये विज्ञान विषयाचे आणि तीन महाविद्यालयांमध्ये वाणिज्य विषयांचे अभ्यासक्रम घेण्यात येणार आहेत. हे वर्ग २७ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत होत आहेत. मात्र कागदोपत्री हे वर्ग सुरू झालेले असतानाही प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी मात्र या वर्गाकडे फिरकलेलेही नाहीत.

स.प. महाविद्यालय, हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालय, आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या जादा तासिका घेण्यात येत आहेत. मॉडर्न महाविद्यालय, हडपसर येथील साधना महाविद्यालय, पिंपरी-वाघिरे येथील जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय येथे वाणिज्य शाखेच्या जादा तासिका होणार आहेत.