कोटय़ातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन अर्ज भरणे बंधनकारक
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी अद्यापही एक आठवडा जाणार असून पुढील आठवडय़ापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये माहितीपुस्तके मिळणार आहेत. या वर्षी अल्पसंख्याक कोटा, व्यवस्थापन कोटा, इनहाऊस कोटा यांतून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही माहितीपुस्तके घेऊन ऑनलाइन अर्ज भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणारी अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया या वर्षी रेंगाळली आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अर्जाचा पहिला भाग दहावीच्या निकालापूर्वीच विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात येत होता. त्यामुळे निकालानंतर येणारा ताण कमी झाला होता. मात्र या वर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास अजूनही साधारण एक आठवडा जाणार आहे. माहितीपुस्तकाची किंमत शंभर रुपये ठेवण्यात आली आहे. माहिती पुस्तकाबरोबरच विद्यार्थ्यांना लॉग इन, पासवर्डही मिळणार आहे.
या वर्षीही अल्पसंख्याक कोटा, व्यवस्थापन कोटय़ातील जागांचा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्यात आलेला नाही. मात्र या कोटय़ांमधून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर ऑनलाइन प्रवेश द्यायचे आहेत. मात्र विद्यार्थ्यांचा लॉग इन आयडी असल्याशिवाय कोटय़ातूनही शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीत.
छापील माहिती पुस्तके शुक्रवापर्यंत हाती येणार असून पुढील आठवडय़ांत ती शाळांमध्ये वितरित करण्यात येतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये माहितीपुस्तके मिळू शकतील, असे केंद्रीय प्रवेश समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी मंगळवारी सांगितले. प्रवेश प्रक्रियेचे माहितीपुस्तक पाहण्यासाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रवेश अर्ज शाळेतूनच भरण्याची सूचना
विद्यार्थ्यांनी खासगी शिकवण्या किंवा सायबरकॅफेमध्ये जाऊन अर्ज भरू नये, तर तो शाळेतूनच भरण्यात यावा, अशी सूचना अकरावी केंद्रीय समितीने माहितीपुस्तकांत दिली आहे. मात्र त्यासाठी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना शाळा साहाय्य करणार का, सुट्टीत अर्ज भरायचा असल्यास त्यासाठी शाळा आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणार का, असा प्रश्नही निर्माण होतो आहे. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी शाळाप्रमुखांनी करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
विभागवार केंद्र
गेल्यावर्षी सरसकट शहरासाठी प्रवेश प्रक्रिया घेतल्यानंतर आता पुन्हा या वर्षी विभागवार केंद्रानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालये ९ भागांत विभागण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पर्याय देताना विभागानुसार प्राधान्यक्रम द्यावेत, असे समितीकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येक विभागांत मार्गदर्शन केंद्रही सुरू करण्यात येणार असून त्याची यादीही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मदतकेंद्र कार्यरत होणार आहेत.