संतोष राऊत यांचा ‘गिनीज’ विक्रमासाठी प्रयत्न
लग्नसमारंभांची शान वाढवणारे रुबाबदार फेटे बांधण्याची कला सर्वाना साधत नाही. त्यातही, उत्सवी गर्दीत कमीतकमी वेळात अधिकाधिक फेटे बांधण्याला महत्त्व. पुण्याच्या संतोष राऊत यांना या दोन्ही गोष्टी साधल्या आहेत. एका तासात तब्बल १२९ फेटे बांधण्याचा विक्रम राऊत यांनी केला असून ‘गिनीज बुक’मध्ये त्याची नोंद होण्यासाठी ते प्रयत्नात आहेत. ‘गिनीज बुक’मधील यापूर्वीचा फेटे बांधण्याचा विक्रम एका तासात ३५ फेटे असा आहे.
राऊत हे लघुपट व चित्रपटांसाठी लेखन, दिग्दर्शन व छायाचित्रण करतात, तसेच ते गेली २० वर्षे फेटे बांधण्याचे काम करत आहेत. ते म्हणाले, ‘‘आमचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ नावाचा गट होता. त्याचे कार्यक्रम सादर करताना फेटे बांधावे लागत. मात्र फेटे बांधून देणारे मिळत नसत. तेव्हा आपल्यालाच फेटे बांधता आले पाहिजेत असे मी ठरवले आणि शैलेश यादव यांच्याकडून ते शिकलो. माझ्या पडत्या काळातही याच कलेने मला साथ दिली. लग्न-मुंजीत मी फेटे बांधून देत असे आणि माझ्या फेटा बांधण्याच्या वेगाचे कौतुक देखील होई. तेव्हा मी एका मिनिटात एक फेटा बांधत होतो आणि वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करत असे. ‘गिनीज’मधील याआधीचा ३५ फेटय़ांचा विक्रम सहज मोडता येईल, असे वाटले. त्यासाठी रोज संध्याकाळी दीड तास फेटे बांधण्याचा सराव करत होतो.’’
‘लिम्का’ बुकसाठीही आपल्याला प्रयत्न करायचा असल्याचे राऊत यांनी सांगितले. ‘लिम्का’ बुकमध्ये आतापर्यंत एका मिनिटात ४ फेटे बांधण्याच्या विक्रमाची नोंद असून आपण एका मिनिटात ५ फेटे बांधू शकतो, असे ते म्हणाले.
पुणे महापालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक व अजय दुधाणे यांनी विक्रमासाठी स्थानिक पंच म्हणून काम पाहिले. महाराष्ट्रीयन व्यक्तीने हा विक्रम प्रस्थापित केल्याचा आनंद वाटतो, असे सांगून मोळक म्हणाले,‘अध्र्या तासात राऊत यांनी ६० फेटे बांधले होते, त्यामुळे तासाभरात १२० फेटे होतील असे वाटले होते. शिवाय महिलांना फेटे बांधताना मोकळ्या केसांवर फेटा बसवण्यात राऊत यांना थोडी अडचण येत होती. परंतु तेही त्यांनी कौशल्याने केले.’ ‘अद्वैत क्रीडा केंद्रा’तर्फे या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सरचिटणीस डॉ. मदन कोठुळे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, निकिता मोघे, संदीप अटपाळकर, अद्वैत देशपांडे या वेळी उपस्थित होते.