शहरातील चौदापैकी एकच सायकल मार्ग सुरू; महापालिका प्रशासनाची लेखी कबुली

शहरात महापालिकेतर्फे कोटय़वधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या चौदा सायकल मार्गापैकी फक्त एकच सायकल मार्ग वापरात असून उर्वरित तेरा सायकल मार्ग विविध अडथळ्यांमुळे सुरू नसल्याची कबुली महापालिका प्रशासनानेच लेखी स्वरूपात दिली आहे. शहरातील सायकल मार्गाची पूर्ण दुरवस्था झाली असून फक्त अतिक्रमणांसाठीच्या राखीव जागा या सायकल मार्गामुळे तयार झाल्या आहेत.

महापालिकेतर्फे शहरात कात्रज-स्वारगेट-हडपसर या मार्गावर पहिला प्रायोगिक तत्त्वावरील सायकल मार्ग सुरू करण्यात आला असून हा प्रकल्प आता पथ विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. हा सायकल मार्ग १५.३६ किलोमीटरचा असून त्याचे काम ३१ मे २०१० रोजी पूर्ण करण्यात आले. त्यासाठी साडेपाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा सायकल मार्ग सुस्थितीत आहे, असा दावा महापालिकेने केला आहे. चालू आर्थिक वर्षांत नवीन सायकल मार्ग प्रस्तावित करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. महापालिका सभेला नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी सायकल मार्गाबाबत लेखी प्रश्न दिले होते. त्या उत्तरांमधून सायकल ट्रॅकचे वास्तव समोर आले आहे.

सायकल मार्ग अंशत: सुरू

महापालिकेकडून ५७.३१ किलोमीटरचे सायकल मार्ग शहरांच्या विविध रस्त्यांच्या कडेने तयार करण्यात आले आहेत. हडपसर, सासवड रस्त्यावरील ग्लायडिंग सेंटरलगत दोन किलोमीटरचा सायकल मार्ग १३ ऑक्टोबर २०१३ रोजी तयार करण्यात आला असून त्याचा वापर सुरू आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र नेहरू योजनेंतर्गत तयार करण्यात आलेले उर्वरित तेरा सायकल मार्ग अंशत:च सुरू असल्याची कबुली महापालिकेने दिली आहे. हे मार्ग अंशत: सुरू असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक कारणांनी हे मार्ग बंदच आहेत.

हे सायकल मार्ग बंद

संगमवाडी पूल ते सादलबाबा दर्गा चौक, येरवडा, बॉम्बे सॅपर्स ते विश्रांतवाडी, येरवडा ते डेक्कन कॉलेज, डेक्कन कॉलेज ते बॉम्बे सॅपर्स, संगमवाडी ते सादलबाबा चौक, हॉटेल ग्रीन पार्क ते बालेवाडी स्टेडिअम, पौड रस्ता-सावरकर उड्डाणपूल (पौड फाटा) ते चांदणी चौक, कर्वे रस्ता-पौड फाटा ते वारजे उड्डाण पूल, पुणे स्टेशन ते फित्झगेराल्ड पूल, गणेशखिंड रस्ता-संचेती रुग्णालय ते पुणे विद्यापीठ चौक, नगर रस्ता-खराडी नाला ते मनपा नवीन हद्द, नगर रस्ता-रामवाडी ते खराडी नाला, सिंहगड रस्ता हे सायकल मार्ग बंद आहेत.

* २००९ ते २०१२ या काळात हे सायकल मार्ग बांधण्यात आले.

*  या चौदा  मार्गासाठी दहा कोटी ६७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

*  बॉम्बे सॅपर्स ते विश्रांतवाडी व सिंहगड रस्ता या मार्गावरील प्रकल्पांच्या कामामध्ये सायकल मार्गाचा समावेश असल्याने स्वतंत्र खर्चाचा तपशील नाही.

*  उर्वरित मार्गासाठी दहा कोटी ६७ लाख खर्च.

प्रथमेश गोडबोले