महिलेच्या पोटातून १५ किलोचा गोळा बाहेर काढण्यात पिंपरी-चिंचवडमधील यशवंत चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरांन यश आले आहे. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर संबंधीत महिला सुखरुप आहे. गेल्या सहा वर्षांपासून या महिलेच्या पोटात हा गोळा असल्याचे डॉक्टरांना सांगितले आहे.

लक्ष्मीबाई असे या महिलेचे नाव असून शस्त्रक्रियेनंतर ती सुखरूप आहे. पोटात अशी गाठ अथवा गोळा निर्माण होणे हा ‘ओवरसिस’ नावाचा हा आजार असतो. हा आजार बहुतकरून महिलांमध्ये आढळतो. महिला वयात आल्या की त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल होत असतात त्यामुळे खूप कमी प्रमाणात महिलांमध्ये हा आजार होतो. मात्र, काही महिलांच्या पोटांमध्ये या गोळ्याच वजन हे २०० ते ३०० ग्राम इतके असते असा गोळा सहसा दिसून येत नाही. मात्र, लक्ष्मीबाईच्या पोटात तब्बल १५ किलोचा गोळा आढळून आल्याने खळबळ उडाली होती. डॉक्टरांसाठी देखील हा गोळा बाहेर काढण्याचे मोठे आव्हान होते.

यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉ. संजय पाडाळे (वरिष्ठ सर्जन), डॉ. पुष्कर गालब (सर्जन), डॉ. सचिन, डॉ. राहुल आणि डॉ. राजेश गोरे (भुलतज्ज्ञ) यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. १५ किलोचा गोळा पोटातून काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पहिल्यांदाच करण्यात आली आहे.

या शस्त्रक्रियेबद्दल बोलताना डॉ. पाडाळे म्हणाले, “२५ वर्षांच्या सर्जरी करियरमध्ये अशा प्रकारचा गोळा मी बघितला नव्हता. म्हणूनच आमच्यासाठी ही शस्त्रक्रिया एक आव्हान होते. पोटात अशा प्रकारचा गोळा निर्माण होणे हे खूप कमी प्रमाणात आढळते. यापूर्वी आफ्रिकेमध्ये एका ३० वर्षीय महिलेच्या पोटात ५० ते ६० किलोचा गोळा आढळला होता. शारीरिक यंत्रणेला अशा गोळ्यामुळे अडचण निर्माण होऊन श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तप्रवाह व्यवस्थित न होणे अशा गंभीर प्रकारांना सामोरे जावे लागते”.

भारतात अशा प्रकारच्या घटना खूप कमी प्रमाणात आढळून येतात. पिंपरी-चिंचवड परिसरात अशा प्रकारचा आजार आढळल्याने डॉक्टरांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. महिलांना जर पोटात दुखत असेल तर त्यावर त्वरित उपचार करण्याचे आवाहन डॉक्टरांना केले आहे.