मुलांचे शिक्षण हे आता पालकांच्या चिंतेचा विषय झाला असून दरवर्षीच्या महागाईदराच्या दुप्पट शैक्षणिक खर्चात वाढ होते आहे. शहरी भागांत गेल्या दहा वर्षांच्या काळात शिक्षणावरील खर्च हा दीडशे टक्क्य़ांनी वाढला असल्याचे एका पाहणीतून समोर आले आहे.
‘द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज (असोचेम) या संस्थेने देशातील प्रमुख शहरांमध्ये मुलांच्या शिक्षणावर पालकांकडून करण्यात येणाऱ्या खर्चाची पाहणी केली. राज्यातील मुंबई आणि पुणे या शहरांचा या पाहणीत समावेश होता. गेल्या दहा वर्षांच्या काळात शिक्षणावरील खर्च हा दीडशे पटीने वाढला असल्याचा निष्कर्ष या पाहणीतून समोर येत आहे. पालकांना एका मुलासाठी २००५ मध्ये सरासरी ५५ हजार रुपये खर्च करावे लागत होते. या वर्षी ही रक्कम १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. साधारण ७० टक्के पालक हे हाती मिळणाऱ्या पगारातील ३० ते ४० टक्के रक्कम ही मुलांच्या शिक्षणावर खर्च करत असल्याचे या अहवालानुसार दिसत आहे.
शाळेच्या शुल्काशिवाय वाहतुकीचा खर्च, गणवेश आणि शिक्षण साहित्याचा खर्च पालकांना करावा लागतो. काही शाळांमध्ये रोज वेगळा गणवेश असतो, तर काही शाळांमध्ये शारीरिक शिक्षणासाठी स्वतंत्र, इतर उपक्रमांसाठी स्वतंत्र, ब्लेझर असे तीन ते चार गणवेश असतात. काही शाळा विशिष्ट ब्रँडचे शूज किंवा कपडे हवेत म्हणून आग्रही असतात, यांमुळे एकूण खर्चात वाढ होते.
पुण्यात काय?
शाळांनी त्यांच्या शुल्कामध्ये १५ टक्क्य़ांनी वाढ यापूर्वीच केलेली आहे. सध्या प्राथमिक वर्गाचे साधारण शुल्क हे ६५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत आहे. पूर्वप्राथमिक वर्गाचे शुल्क हे ३५ हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत आहे. शिक्षण साहित्याच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. ब्रँडेड वह्य़ा, प्रयोग वह्य़ा, नकाशा वह्य़ा यांच्या किमती साधारणपणे पंधरा टक्क्य़ांनी वाढल्या आहेत, अशी माहिती नटराज बुक डेपोतील कर्मचाऱ्यांनी दिली. या शिवाय वॉटरबॅग, डबा, कंपासपेटी अशा वस्तूंच्या किमतीतही साधारण १० ते १५ टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. शाळेच्या खरेदीमधील मोठा घटक म्हणजे दप्तर! अगदी लहान मुलांसाठीची दप्तरे १५० रुपयांपासून पुढे आहेत. दप्तरांच्या किमतीतही या वर्षी वाढ झाली आहे. अनेक शाळांमध्ये रोज एक गणवेश, खेळाच्या तासासाठी स्वतंत्र गणवेश आणि आठवडय़ातील एक दिवस स्वतंत्र गणवेश अशी पद्धत आहे. साधारणपणे या तिन्ही संचांची किंमत ही अडीच हजारांपासून पाच हजारांपर्यंत आहे.

पालकांचा शाळा शुल्काव्यतिरिक्त वर्षांकाठी होणारा साधारण खर्च
डबा, वाहतूक – ३० ते ३५ हजार रुपये
गणवेश आणि शूज – ६ ते ७ हजार रुपये
वह्य़ा, पुस्तके – ३ हजार रुपये
दप्तर आणि इतर साहित्य – १ हजार ५०० रुपये
तंत्रज्ञान, उपकरणे – २ हजार रुपये
शाळेची सहल, स्नेहसंमेलन, उपक्रम – ८ ते १० हजार रुपये
क्रीडा साहित्य – २ हजार रुपये
शालाबाह्य़ उपक्रम, स्पर्धा – ३ ते ५ हजार रुपये
शिकवणी – ५ ते २५ हजार रुपये