वडकी येथील मस्तानी तलावाच्या परिसरामध्ये विवाहाचे निमित्त साधून पार्टीसाठी गेलेल्या तरुणांपैकी दोघेजण पोहताना तलावात बुडाले. त्यातील एका तरुणाचा २७ नोव्हेंबरला विवाह होता. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशामक दल व एनडीआरएफच्या जवानांनी संध्याकाळी उशिरापर्यंत तलावात त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडू शकले नाहीत.
सुनील गणेश गायकवाड (वय २६, रा. काळूबाई मंदिर, शिवरकर वस्ती, हडपसर) व नितेश अनिल येलपुरे (वय २१, रा. महंमदवाडी, हडपसर) असे तलावात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या सुनील गायकवाड याचा २७ नोव्हेंबरला विवाह होता. त्यानिमित्ताने त्याने पाच मित्रांसह पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी ते शनिवारी रात्री तीन वाजता मस्तानी तलावाच्या परिसरात गेले. या मित्रांपैकी सुनील, नितेश व नाबेद शराफत शेख हे पोहण्यासाठी तलावात उतरले. इतरांना पोहता येत नसल्याने ते तलावाकाठी बसले होते. नाबेद याला पोहताना दम लागल्याने तो बाहेर आला. मात्र, सुनील व नितेश मद्यधुंद अवस्थेत पोहत तलावाच्या मध्यभागी गेल्याने बुडाले.
तलावाच्या काठावर बसलेल्या मित्रांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत पोलीस व कुटुंबीयांना माहिती दिली. पोलीस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तरुणांचे कुटुंबीयही तलावाजवळ पोहोचले. अग्निशामक दलाचे जवान, हडपसर येथील शहीद भगतसिंग आपत्कालीन संस्था व एनडीआरएफच्या जवानांनी तलावामध्ये दोघांचा शोध घेतला. संध्याकाळी उशिरापर्यंत सर्व यंत्रणा व तरुणांचे नातलग तलावाजवळ होते, मात्र दोघांचाही शोध लागू शकला नाही, अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोंडभुर्रे यांनी दिली.