‘मॅन व्हस्रेस वाईल्ड’ या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झालेला बेअर ग्रिल्स याने ‘डिस्कव्हरी वाहिनी’साठी ‘आयलँड विथ बेअर ग्रिल्स’ अन् ‘बेअर ग्रिल्स ब्रेकिंग पॉइंट’ या दोन नव्या मालिका केल्या आहेत. त्या लवकरच प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.
ग्रिल्स याने ‘मॅन व्हस्रेस वाईल्ड’ या मालिकेद्वारे प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्याद्वारे त्याने पृथ्वीवरील काही अतिदुर्गम ठिकाणांवर प्रकाश टाकला आणि तेथे कोणत्याही आधुनिक साधनांविना खडतर परिस्थितीत राहून दाखवले. आता तो नव्या दोन मालिकांद्वारे वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर येणार आहे. या मालिकांमध्ये तो एकटा नसेल, तर काही लोकांनासुद्धा त्याच्या प्रवासामध्ये सहभागी करून घेणार आहे. ही मंडळी त्यांच्यातील भीतीशी सामना करतील आणि पृथ्वीवरील काही अतिदुर्गम वातावरणांत टिकाव धरतील.
आयलँड विथ बेअर ग्रिल्स मालिकेमध्ये काही जणांच्या एका गटाला प्रशांत महासागरातील वाळवंटी बेटावर उतरवले जाईल. आधुनिक जीवनातील सर्व सोयी आणि सुविधांपासून वंचित झालेले हे १३ जण त्यांच्या आरामदायक जीवनातून बाहेर जातील आणि आव्हानात्मक मार्गावर व्यक्तिश: पुढे निघतील. पाठीवर असलेले कपडे आणि काही प्राथमिक साधनांच्याच आधारे ते एका दूरवरील निर्जन बेटावर जातील, जिथे त्यांना एकटे राहून स्वतचे रक्षण करावे लागेल. हा कार्यक्रम मेमध्ये दर सोमवारी रात्री ९ वाजता प्रसारित केला जाणार आहे.
‘बेअर ग्रिल्स : ब्रेकिंग पॉइंट’ या मालिकेमध्ये ग्रिल्स १२ सामान्य लोकांना त्यांच्या आरामशीर वातावरणातून बाहेर काढेल आणि पृथ्वीवरील काही अतिशय बिकट ठिकाणाबद्दल असलेल्या भीतीचा सामना त्यांना करायला लावेल. ज्या व्यक्तींमध्ये जीवनातील सामान्य गोष्टींबद्दल भीती असते (जसे उंची, पाणी आणि बंदिस्त जागेची भीती) आणि मनामध्ये शंकाकुशंका असतात (उंदीर व किडय़ांची भीती) अशा व्यक्ती त्याच्यासोबत असतील. बिकट वन्य प्रदेशातील प्रवासात बेअरसोबत जाताना त्यांना आशा आहे की, ते त्यांच्या जीवनामध्ये इथून पुढे मोठा बदल घडवतील. बेअर ग्रिल्स : ब्रेकिंग पॉइंट २५ मे पासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रसारित केले जाईल.
डिस्कव्हरी नेटवर्क्स एशिया पॅसिफिकचे उपाध्यक्ष राजीव बक्षी म्हणाले,‘‘ बेअर ग्रिल्स हा भारतीय टेलिव्हिजन पडद्यावरील सर्वात आघाडीवर असलेला सव्र्हायव्हल तज्ज्ञ आहे. सर्वोच्च सव्र्हायव्हल पद्धती सादर करून आणि आपल्या क्षमता पार करण्याची प्रेरणा देऊन त्याने भारतातील लक्षावधी चाहत्यांसोबत घट्ट नाते निर्माण केले आहे. या दोन नवीन मालिका नव्या घटकांसह थरारक आणि अविस्मरणीय अनुभव देण्याच्या खात्रीसह येत आहेत.’’