पुण्यात तब्बल दीड महिने उशिराने सुरू झालेल्या पावसाने अखेर रडतखडत का होईना शंभरी गाठली. १ जूनपासून ते मंगळवारी (२२ जुलै) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे वेधशाळेत १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शंभरी गाठली असली तरी आतापर्यंतच्या पावसाची तूट तब्बल पावणेदोनशे मिलिमीटरची आहे. त्यापैकी किती तूट या वेळच्या पावसाळ्यात भरून निघते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दरम्यान, पुण्यात पुढील दोन दिवसातही आतासारखाच चांगला पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागाप्रमाणेच पुण्यात या वेळी पावसाने मोठी वाट पाहायला लावली. विशेषत: १ जूनपासून पहिल्या दीड महिन्याच्या काळात अगदीच नाममात्र पाऊस पडला होता. त्यानंतरही हलक्या सरीच बरसत होत्या. मात्र, गेल्या तीन-चार दिवसात पुण्यात पावसाने चांगलाच वेग धरला. त्यामुळे पावसाची नोंद झपाटय़ाने वाढली. मंगळवारी दिवसभरात पुण्यात पावसाने शंभरी गाठली. पुणे वेधशाळेत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अखेर १०५ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. पुण्यात सोमवारी जोरदार पाऊस पडला. सोमवारी सकाळी साडेआठ ते मंगळवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान २६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर मंगळवारीसुद्धा पावसाचा जोर कायमच होता. पावसाच्या मोठय़ा सरींनीच दिवसाची सुरुवात झाली. पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अधूनमधून थांबत थांबत मोठय़ा सरी पडत होत्या. आताच्या हंगामातील चांगल्या सरी गेल्या दोन दिवसात पडल्या.
शंभरी गाठली तरी सरासरीनुसार, पुणे शहरात आतापर्यंत सुमारे पावणेतीनशे मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. त्या तुलनेत पुण्यात अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. पुढील दोन दिवसात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुण्यातील पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. आताच्या पावसाला कारणीभूत असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. शिवाय ते पश्चिमेकडे सरकत आहे. याचा परिणाम पुण्यात पावसाची वाढ होण्यास झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात पावसाची आणखी तूट भरून निघेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले.

पुण्याची धरणे २४ टक्के भरली
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, पानशेत, वरसगाव, खडकवासला या धरणांच्या क्षेत्रातही मंगळवारी दमदार पाऊस पडला. त्यामुळे धरणांच्या क्षेत्रात पातळीत चांगलीच वाढ झाली. आतापर्यंत पाणीटंचाई आणि एक दिवसाआड पाण्याची वेळ आलेल्या पुण्यासाठी ही दिलासादायक स्थिती आहे. टेमघर धरणाच्या क्षेत्रात मंगळवारी दिवसभरात तब्बल ७४ मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत (५४ मिलिमीटर), वरसगाव (६०), खडकवासला (२५) धरणांच्या क्षेत्रातही दमदार पाऊस पडला. या धरणांमध्ये मंगळवारी सायंकाळपर्यंत एकूण ७.०१ टीएमसी इतका उपयुक्त साठा उपलब्ध होता. एकूण उपयुक्त साठय़ाच्या तुलनेत तो २४.०६ टक्के आहे.
धरणांमधील साठा पुढीलप्रमाणे (साठा टीएमसीमध्ये)-
धरण        मंगळवारचा साठा         टक्केवारी
टेमघर        ०.८६                २३.३१ टक्के
पानशेत        २.४५                २३ टक्के
वरसगाव        २.६५                २०.६४ टक्के
खडकवासला    १.०५                ५३ टक्के