राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. जानेवारी २०१७ पासून ते आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात १९८ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या आठवड्यात याच स्वाइन फ्ल्यूने तिघांचा बळी घेतला. पिंपरी-चिंचवडमधील खाजगी रुग्णालयात सध्या दोघांजणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. स्वाइन फ्लूमुळे जीव गमावलेल्या २५ रुग्णांपैकी १० रुग्णांनी महापालिकेच्या यशवंत चव्हाण स्मृती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सध्याचे वातावरण स्वाइन फ्लूचा प्रभावाला पोषक असल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

सर्दी, ताप,खोकला, घसा दुखणे ही स्वाइन फ्लूयुची लक्षणे असून ४८ तासात उपचार घेणे गरजेचे आहे. तसेच टॅमी फ्लू च्या गोळ्या जवळच्या रुग्णालयात जाऊन घ्याव्यात. यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात स्वच्छ करणे, योग्य झोप त्याचबरोबर योग्य आहार आणि विश्रांती हे स्वाइन फ्ल्यू वरील उपाय आहेत. गेल्या वर्षी स्वाइन फ्लूमुळे पिंपरी-चिंचवड शहरात ६३ रुग्णांना जीव गमवावा लागला होता. सद्य स्थितीला पिंपरी-चिंचवडमधील स्वाइन फ्लूच्या बळींची आकडा २५ वर पोहोचला आहे. पुणे शहरातील ७४ रुग्ण दगावले आहेत. दोनदिवसांपूर्वी पुण्यात एकाच दिवशी तीन रुग्ण दगावले होते. यात २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. महापलिकेच्यावतीने स्वाइन फ्लूवर विशेष उपाय योजना करण्यात येत असून या आजाराबाबत कोणतीही लक्षण आढळल्यास नागरिकांनी जवळील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घ्यावे, असे अवाहन करण्यात आले आहे.