पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन; पाणीदार शहरात प्रथमच मोठी पाणीकपात
दरवर्षी पावसाची मोठी कृपा होणाऱ्या मावळच्या कुशीत वसलेल्या पवना धरणामुळे पाणीदार समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरालाही यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा फटका बसला आहे. धरणातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता एक दिवसाआड पाणी देण्यापाठोपाठ या पाण्यात एकूण २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे भरपूर पाण्याचा वापर करण्याची सवय असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आता पाण्याची काटकसर करावीच लागणार आहे.
शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सुरूवातीला ८० टक्के पाणीसाठा झाला होता. जुलै २०१६ पर्यंत नागरिकांना पाणी पुरवण्यासाठी नऊ डिसेंबर २०१५ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. त्यानंतर ११ मार्चला त्यात १५ टक्क्य़ांपर्यंत वाढ करण्यात आली. २८ एप्रिल २०१६ रोजीच्या पाटबंधारे विभागाच्या पत्रानुसार पाणीकपात वाढवण्याची सूचना करण्यात आली. पवना धरणात २८ एप्रिल अखेर २.१९ टीएमसी (अब्ज घनफूट) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो ३.२७ टीएमसी होता. या परिस्थितीत, महापालिकेने तीन मेपासून २५ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहराचे दोन भाग करण्यात आले असून दोन्हींसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
शहरात पाणीकपात करण्यास सुरूवातीस नगरसेवकांचा विरोध होता. पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने तूर्तास कपातीची गरज नाही, असे त्यांचे म्हणणे होते. तथापि, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कपातीची गरज पटवून दिली. त्यानुसार, कपातीची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतरही पुरेसा पाणीसाठा आहे, असा युक्तिवाद करत महापालिकेने कपातीची अंमलबजावणी केलीच नाही. त्यानंतर पुन्हा शहरात आलेल्या अजितदादांनी पाणीकपात करावीच लागेल, असे ठणकावून सांगितले. त्यानुसार, मे पासून कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वपक्षीय नगरसेवकांची सहमती घेत आयुक्तांनी कपातीचा कार्यक्रम जाहीर केला. शहराचे दोन भाग करण्यात येणार आहेत. त्यातील एका भागास दिवसाआड व पूर्वीपेक्षा २५ टक्के कमी पाणी दिले जाणार आहे. तर, उर्वरित भागाला दुसऱ्या दिवशी त्याचपध्दतीने पाणी दिले जाणार आहे. अशापद्धतीने पाणी दिल्यास पाण्याचा पुरेसा दाब राहील आणि वेळेतही वाढ होईल, असा विश्वास पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, महापालिकेने जलतरण तलाव बंद ठेवले असून टँकरचा पाणीपुरवठा गरजेनुसारच ठेवला आहे.

नागरिकांनी यापुढे पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करणे अपेक्षित आहे. कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा अपव्यय होता कामा नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे.
– रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग