पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अकरावीच्या पाचव्या फेरीसाठी जवळपास २६ हजार जागा रिक्त असून त्यातील साडेआठ हजार जागा विज्ञान अभ्यासक्रमाच्या आहेत. रिक्त राहिलेल्या जागांबरोबरच नव्याने निर्माण झालेल्या जागांचा यामध्ये समावेश आहे. तुकडी वाढवून मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असणारी नामांकित महाविद्यालये फारशी नसल्यामुळे पुढील फेऱ्यांमधील प्रवेशानंतरही पालकांचे समाधान होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अकरावीची पाचवी प्रवेश फेरी शनिवारपासून सुरू झाली आहे. या फेरीसाठीचे रिक्त जागांचे तपशील शनिवारी प्रवेश समितीने जाहीर केले. या फेरीसाठी एकूण २६ हजार ३४८ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये पहिल्या चार फेऱ्यांनंतर रिक्त राहिलेल्या जागा, नव्याने परवानगी मिळालेल्या महाविद्यालयांमधील जागा आणि महाविद्यालयांना तुकडीवाढ मिळाल्यामुळे वाढलेल्या जागांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे सर्वाधिक प्राधान्य असलेल्या विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमासाठी जागा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. वाढीव तुकडय़ांना परवानगी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये नामवंत महाविद्यालये फारशी नाहीत. त्यामुळे मोजक्याच महाविद्यालयांमध्ये प्रवेश हवा म्हणून हटून बसलेल्या पालकांचा या फेरीतही विरसच होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांनी १ आणि २ ऑगस्टला सकाळी ११ ते सायकांळी ४ वाजेपर्यंत अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरताना रिक्त जागा असलेल्या महाविद्यालयांपैकी कमीत कमी पाच महाविद्यालयांचे आणि जास्तीत जास्त १५ महाविद्यालयांचे पसंतीक्रम द्यायचे आहेत. या फेरीच्या पहिल्या भागांत म्हणजे ‘अ’ भागांत दूरचे महाविद्यालय मिळालेले, प्रवेश निश्चित न केल्यामुळे प्रक्रियेच्या बाहेर पडलेले, शाखा किंवा माध्यम बदलून हवे असणारे अशा कोणत्याही कारणासाठी महाविद्यालय बदलून हव्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि चार फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या १४२ विद्यार्थ्यांना पहिल्या भागात प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांनी आपले जुनेच लॉग इन वापरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरायचे आहेत. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ४ ऑगस्टला सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. गुणवत्ता यादीनुसार ४ आणि ५ ऑगस्टला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचे आहेत. पाचव्या फेरीच्या दुसऱ्या भागांत म्हणजे ‘ब’ भागांत अर्ज न केलेल्या, अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनी नवे माहितीपुस्तक घेऊन अर्ज भरायचा आहे. अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी जुनेच लॉग इन वापरून अर्ज पूर्ण करायचा आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता जाहीर होणार असून ८ आणि ९ ऑगस्टला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करायचे आहेत.

* विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीसाठी महाविद्यालयानुसार रिक्त जागांचे तपशील केंद्रीय प्रवेश समितीच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
* महाविद्यालयाचा संकेतांक (कॉलेज कोड) टाकून विद्यार्थ्यांना रिक्त जागांचे तपशील उपलब्ध होतील.
* पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेले गुण, महाविद्यालयाचे तिसऱ्या फेरीचे कटऑफ गुण, विषय, माध्यम, शुल्क, घरापासूनचे अंतर यांची पडताळणी करावी
* रिक्त जागांचे तपशील आणि महाविद्यालयाचे संकेतांक (कॉलेज कोड) http://pune.fyjc.org.in या संकेतस्थळावर पाहता येतील.

शाखा रिक्त जागा
विज्ञान                   ८ हजार ८८८
वाणिज्य (इंग्रजी)  ६ हजार १५३
वाणिज्य (मराठी)  ३ हजार ८१५
कला (इंग्रजी)        ३ हजार ६५
कला (मराठी)       ४ हजार ४२७