नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये अपहरण केलेल्या पुण्यातील तीन विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. हे तिनही विद्यार्थी बस्तर पोलिसांच्या ताब्यात सुखरुप असल्याचे वृत्त आहे.
आदर्श पाटील, विकास वाळके आणि श्रीकृष्ण खेवले हे पुण्यातील तीन विद्यार्थी नक्षलग्रस्त भागाचा अभ्यास करण्यासाठी सायकलवरून गेले होते. नक्षलग्रस्त भागातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या हेतूने पुण्यातील हे विद्यार्थी नक्षलग्रस्त भागात फिरत होते. या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागातून या मोहिमेला सुरुवात केली होती. महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओदिशाच्या नक्षलग्रस्त भागात सायकलने फिरायचे, तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे असा या विद्यार्थ्यांचा उपक्रम होता. भामरागडपासून त्यांनी हा सायकल प्रवास सुरू केला होता. मात्र, ते शनिवारी बिजापूरहून बासागुड्डाकडे जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. पण नक्षलवाद्यांनी त्यांची आता सुखरुप सुटका केली असून ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.