पुण्यातील मोटारींची बनावट कागदपत्राद्वारे कोल्हापूर आरटीओकडे नोंद करून त्या मोटारी एका व्यक्तीला विक्री करणाऱ्या आरटीओ एजंटला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. पी. बावस्कर यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि तेराशे रुपयांची शिक्षा सुनावली. जानेवारी २००५ मध्ये ही घटना घडली होती.
अकबर अली सोमी (रा. नाना पेठ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. तर, त्याचा साथीदार निसार जमादार हा फरार आहे. या प्रकरणी अल्ताफ पीरमहमंद शेख (रा. भवानी पेठ) यांनी तक्रार दिली होती. या खटल्यात सहायक सरकारी वकील रजनी तहसीलदार यांनी चौदा साक्षीदार तपासले. शेख यांचा भवानी पेठेत जुन्या मोटारी विक्री करण्याचा व्यवसाय आहे.                                                                      आरोपी जमादार हा शेख यांच्याकडून वाहने खरेदी करून त्याची विक्री करत होता. एप्रिल २००४ मध्ये जमादार हा शेख यांच्याकडून पाच मोटारी घेऊन गेला. त्याचे पैसे दिले नाही. त्या मोटारींची बनावट कागदपत्रे तयार करून विक्री केली. विक्री केलेल्या मोटारींची पुणे आरटीओमध्ये नोंद असताना बनावट कागदपत्राव्दारे कोल्हापूर आरटीओत नोंदणी केली. ही मोटार इचलकरंजी येथील एका व्यक्तीला विकली होती. पैसे न मिळाल्यामुळे शेख यांनी जानेवारी २००५ मध्ये तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.